बालकलाकार, नायिका, गायिका, खलनायिका, खाष्ट सासू असे बºयाच भूमिकांतून लोकप्रिय ठरलेल्या अभिनेत्री म्हणजे ललिता पवार...बालकलाकार, नायिका, गायिका, खलनायिका, खाष्ट सासू अशी अनेक लेबल त्यांना आपल्या कारकिर्दीत लागून गेले.
ललिता पवार यांचा जन्म नाशिकजवळील येवला येथे १८ एप्रिल १९१६ रोजी लक्ष्मणराव सगुण यांच्या घरी झाला. वयाच्या बाराव्या वर्षी अभिनय क्षेत्रात पदार्पण करत ललिता पवार यांनी सात दशके अर्थात ७० वर्षांत ७०० पेक्षा अधिक चित्रपटांत अभिनय साकारला आहे.
ललिता पवार यांनी बालकलाकार म्हणून मूकपटात काम करायला सुरुवात केली. १९२८ साली ‘आर्यमहिला’ या मूकपटाच्या माध्यमातून ललिता पवार यांनी काम करण्यास सुरुवात केली. गनिमी कावा, ठकसेन राजपुत्र, समशेर बहादूर, चतुर सुंदरी, पृथ्वीराज संयोगिता, दिलेर जिगर या मूकपटांनंतर त्यांना बोलपटासाठी विचारणा झाली.
ललिता पवार यांचा हिम्मत-ए- मर्दा हा चित्रपट खूपच गाजला. पुढे त्यांनी दुनिया क्या है या चित्रपटाची निर्मितीदेखील केली. अमृत, गोरा कुंभार, जय मल्हार, रामशास्त्री, अमर भूपाळी, मानाचं पान, चोरीचा मामला असे अनेक चित्रपट गाजले़ ललिता पवार यांनी नायिका म्हणून काम करण्यासोबत खलनायिका म्हणूनदेखील काम केले.
खलनायिका अशा...
ललिता पवार एकेकाळी बॉलिवूडमध्ये इतर महिला कलाकारांसारख्याच हिरोईन बनण्याचे स्वप्न बाळगून आल्या होता. एका घटनेने मात्र त्यांना खलनायिका बनवले.़़त्यांचे आयुष्यच बदलून गेले. १९४२ मध्ये आलेल्या ‘जंग-ए-आझादी’चे छायाचित्रण सुरू असताना भगवान दादा यांना ललिता पवार यांना थोबाडीत मारायची होती. भगवान दादा यांनी त्यांना इतक्या जोरात थोबाडीत मारली, की ललिता पवार खाली कोसळल्या आणि त्यांच्या कानातून रक्त येऊ लागले. यानंतर त्यांच्या शरीराच्या डाव्या भागात लकवा गेला. ललिता पवार यशावकाश तब्येतीतून बाहेर आल्या. लकव्यामुळे मात्र डावा डोळा गमवावा लागला. भरीसभर चेहराही कायमचा बिघडला. डोळा खराब झाल्याने ललिता पवार यांचे हिरोईन बनण्याचे स्वप्न तुटले, हार तर मानली नाही. त्यांना नायिकेची भूमिका मिळाली नाही. मात्र इथूनच हिंदी सिनेमातील सर्वात खाष्ट सासूचा जन्म झाला.
कधी खाष्ट सासू तर कधी कठोर आई, त्या जेव्हा पडद्यावर येत त्यावेळी प्रेक्षकांपैकी अनेकांच्या तोंडून शिव्याशाप बाहेर पडत. त्यांचा अभिनय पाहून विश्वास ठेवणे कठीण व्हायचे की, त्या अभिनय करतात, की सगळं खरं खरं घडत आहे. त्यांनी खाष्ट सासूच्या अशा व्यक्तिरेखा साकारल्या, ज्या पाहून लोक क्रूर सासूचे उदाहरण देण्यासाठीही त्यांचे नाव घेतात. दुसरीकडे पडद्यावर कठोर दिसणाºया ललिता पवार खºया आयुष्यात मात्र वेगळ्या होत्या.
गायिका सुद्धा ...
पहिल्या चित्रपटानंतर ललिता पवार यांचे मानधन इतके वाढले, की अभिनयासोबत त्या चित्रपटांची निर्मितीही करू लागल्या. ललिता यांची कारकीर्द शानदार सुरू होती. त्या अभिनेत्री असण्यासोबत गायिकादेखील होत्या. हिम्मत-ए- मर्दामधील त्यांनी गायलेले ‘नील आभा में प्यारा गुलाब रहे, मेरे दिल में प्यारा गुलाब रहे...’ हे गाणे चांगलेच गाजले. रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ या पौराणिक मालिकेत त्यांनी मंथराची भूमिका साकारली होती. आयुष्याचा शेवटच्या टप्प्यात त्यांना जबड्याचा कर्करोग झाला होता. त्यांच्यावर उपचार सुरू होते; परंतु वजन कमी होण्यासह स्मृतीभ्रंशही झाला. अशातच २४ फेब्रुवारी १९९८ रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
*****
No comments:
Post a Comment