यंदाच्या १५ आॅगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्याने सुमारे ७५ वर्षे पूर्ण केलेली असतील़ आणि म्हणून देशभरात भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होणार आहे. घरोघरी तिरंगा ध्वज फडकविण्यात येणार असून, स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष स्मरणीय ठरावे, यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने संपूर्ण देश एक होणार असून, सर्वांचा सहभाग अभिप्रेत आहे. एकत्वाची ही भावना भविष्यासाठी प्रेरणादायी ठरेल, हे निश्चित!
भारताला गतवैभवाचा आणि स्वातंत्र्यलढ्याचा गौरवशाली परंपरा आणि इतिहास आहे. स्वातंत्र्यातील आनंद अनुभवताना पारतंत्र्याची बंधने झुगारून देत ज्यांनी या लढ्याला सशक्त केले आणि त्यासाठी घरदारावर तुळशीपत्र ठेवले अशा असंख्य अनाम वीरांप्रति देशवासियांच्या मनात अभिमानाची भावना सातत्याने तेवत आहे. त्यांचा त्याग हा आपल्या प्रगतीचा जसा आधार आहे, तशी ती देशाला यशाच्या मार्गावर पुढे नेणारी प्रेरणादायी बाब आहे.
देशाने मागील ७५ वर्षांच्या काळात विविध सरकार सत्तेत आली आणि देशाला विकासाच्या दिशेने चालत ठेवले़ या मोठ्या कालावधीत केलेली नेत्रदीपक प्रगती आपल्यासमोर आणि संपूर्ण जगासमोर आहे. आज देश विज्ञान, तंत्रज्ञान, कला, कृषी, क्रीडा, शिक्षण, पायाभूत सुविधा, आरोग्य, अंतराळ, संरक्षण आदी विविध क्षेत्रात पुढे पुढे जात आहे. भारताने नव्या आणि उमेदीच्या काळात रस्त्यांचे जाळे विणत असतानाच रेल्वेमार्गाला प्राधान्य दिले. विमानाद्वारे सीमाही ओलांडल्या. शेतीला प्राधान्य देत असतानाच उद्योगांतून धूर सोडला. आणि सोबत विज्ञानही ठेवले. आजच्या घडीला आपल्यासोबत अन्य देशांनाही विकासाच्या दिशा दाखवत आहे. आणि जगाचे नेतृत्व करण्याची पात्रता आपल्या अंगी बाळगण्याचा दुर्दम्य आशावाद ठेवत आहे. या वाटेवरून आणखी उत्तुंग यशाकडे जाताना मागे वळून स्वातंत्र्य सैनिकांप्रति सन्मानाची भावना मनात राहणे हे सुद्धा देशगौरवासाठी तेवढेच महत्त्वाचे आहे. या निमित्ताने शाळा-महाविद्यालयांतून, विविध सामाजिक उपक्रमांतून त्यांचे कार्य नव्या पिढीपर्यंत पोहोचणे अपेक्षित आहेत आणि त्यादृष्टीने उपक्रमही आयोजित करण्यात येत आहेत.
स्वातंत्र्यप्राप्तीच्या त्या दिवसांत शब्दांना भाले फुटले होते. ती शस्त्रांसारखी पाजळून निघाली होती, तर मौनांनाही शब्दांचे स्वरूप मिळाले होते. वंदे मातरम् किंवा चले जाव या दोन शब्दांतून ठिगणी नव्हे,आग नव्हे तर वणवा भडकला होता. शब्दांची मर्यादा आणि त्याची प्राबल्य काय असते, याचा प्रत्यय त्या काळात अनुभवास येत होता. तर, राष्ट्रपिता महात्मा गांधींनी मौनातून इंग्लिश सत्तेचा निषेध व्यक्त केलेला. त्याच धर्तीवर तिरंगा हे सुद्धा एक प्रतिक... देशभक्तीचे, देशप्रेमाचे, समतेचे, एकतेचे, कर्तव्याचे आणि निष्ठेचेही.
तिरंगा ध्वजामागे राष्ट्रप्रेमाची, गौरवाची, अभिमानाची भावना आहे. सीमेवर लढणारा जवानही तिरंग्यासाठी प्राण देण्यास तयार असतो. अंतराळात जाणाºया यानावर असलेला तिरंगा आपल्या मनात अभिमान निर्माण करतो. अशा या आपल्या तिरंगा ध्वजाप्रति भावना व्यक्त करताना त्याचा सन्मान राखला जाईल याची दक्षतादेखील घ्यावी लागणार आहे.
अमृत महोत्सवाच्या निमित्ताने सरकारने ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम सुरू केला आहे. या माध्यमातून तिरंग्याप्रति, भारतीय स्वातंत्र्याप्रति असलेली भावना घराघरातील तरुणाईपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न होत आहे.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशाच्या पुढील यशाची आणि गौरवाची पायाभरणी करणारा ठरावा अशी अपेक्षा आहे. त्यासाठी देशप्रेमाची ही ज्योत मनात सतत तेवत आणि प्रज्वल ठेवावी लागणार आहे. आपली प्रत्येक सकारात्मक कृती देशाच्या राष्ट्रध्वजाचा गौरव अधिक वाढवणारी ठरणार आहे.
