Tuesday, 18 April 2023

प्रत्येक जण मृत्यूच्या दाढेत

 आज मंगळवारी नागपूरवासीयांसाठी  दु:खाचा ठरला़ बुलढाणा जिल्ह्यातून जाणाºया समृद्धी महामार्गावर भीषण अपघात अपघातात भारतीय क्रिकेट खेळाडू प्रवीण हिंगणीकर यांच्या पत्नी सुवर्णा यांचा मृत्यू झाला. तर, ते स्वत: जखमी झाले. मेहकरजवळच्या लासुरा फाट्याजवळ क्रेटा गाडी उभ्या असलेल्या कंटेनरवर धडकली. कार चालकाला  झोपेची डुलकी लागल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती  मिळत आहे. तपासानंतर दुर्घटनेचे कारण बाहेर येईलच.


 सर्व काही सुरळीत सुरू असताना कुणाच्या तरी चुकीने आयुष्याचा अंत होतो़ ही बाब स्वीकारण्याजोगी नाहीच़ सध्या   मानवजात नको तितकी ‘फास्ट’झाली आहे़ सर्व गोष्टी चुटक्यासरशी व्हाव्यात अशी ज्याची त्याची उपेक्षा असते आणि त्यासाठी त्याची कोणत्याही परिणामाची तयारी असते. मग निसर्गनिर्मित असो वा मानवनिर्मित असो नियमांना पायदळी तुडविणे, हे फार शहाणपणाचे समजतो, मग त्यात प्राण गेला तरी बेहत्तर! असंच काहीसं सध्या होत आहे़ वाहनातून इच्छितस्थळी पोहोचण्यासाठी हा मानव पार नियम तोडत आहे आणि पदरी मात्र अपघाती मृत्यू ओढवून घेतोय. 

 देशातील प्रत्येक मार्गावर अपघात होत आहेत़  रस्ता एकपदरी असो वा सहापदरी कोणताही जीव त्यावर सुरक्षित नाही़ कोणताही चांगला मार्ग वाहनांच्या सुरक्षित वेग ासाठी आणि प्रवासाचा वेळ कमी होण्यासाठी असला तरी वाहनांची वाहतूक अधिक सुरळीत व्हावी, सुरक्षित व्हावी,हाही त्यामागील हेतू आहे. यापैकी अतिवेगाचा हेतू तर साध्य झाला;परंतु सुरक्षित आणि सुरळीत वाहतुकीचा हेतू साध्य झालेला आहे, असे काही ठाम म्हणता येणार नाही. कारण रस्तोरस्ती अजूनही अपघातांची मालिका दिसून येते़  भारतात रस्ते अपघातांचे प्रमाण मोठे आहेच; परंतु सहापदरी आणि चारपदरी अशा अधिक रुंदीच्या मार्गांवरही असे अपघात वारंवार व्हावेत,हे मोठे दुर्दैव आहे.

      अपघातांच्या मागे केवळ रस्ते हे एकमेव कारण नसते. मानवी चुकाही अपघातास कारणीभूत ठरत असतात. रस्ता कितीही सुरक्षित असला तरी तेवढे पुरेसे नाही. रस्त्यावरून जाणाºया वाहनांमध्ये किती प्रवासी कोंबावेत, वाहनचालकाने सलग किती तास ‘ड्रायव्हिंग’ करावी आणि वाहनाचा वेग किती असावा यावर सरकारने लक्ष ठेवावे,असे म्हणणे मूर्खपणाचे ठरेल.म्हणजेच अपघातांना इतर कारणांपेक्षा मानवी चुका अधिक कारणीभूत असल्याचे लक्षात येते. या चुकांची साखळी वाहतुकीची परवाने देण्यापासून सुरू होते, तिथून ती अतिवेगाने वाहने चालवण्याची प्रवृत्तीपर्यंत संपते. 

अगदी  बनावट परवाधारक चालकापासून वळणावर वाहन असताना मोबाईलवर बोलण्यापर्यंतची साखळी अपघाताला कारणीभूत ठरली आहे, व्यवस्थित परवाने न दिलेले हे वाहक वाहतुकीच्या नियमांबाबत कधीच दक्ष नसतात. उलट आपण वाहतुकीचे नियम डावलून हमखास वाहतूक केली पाहिजे,याबाबत ते गरजेपेक्षा जास्त दक्ष असतात. त्यामुळे वेगाची मर्यादा न पाळणे, टोलनाक्यावर भरधाव गाडी ‘लेन’ तोडून दुसºया ‘लेन’मध्ये घेणे अशा प्रकारातून ते अपघातास कारणीभूत ठरतात. भारतात रस्ते अपघातात मरणाºयांची संख्या मोठी आहे आणि त्यावरून भारतीय किती बेशस्त आहेत, यावर प्रकाश पडत असतो. या बेशिस्तीमध्ये बेफाम वेगाने गाड्या चालवणे,‘ओव्हरटेक’ करण्याची चुकीची पद्धत आदी बाबी प्रामुख्याने आढळतात.अनेकदा प्रवासीही चालकाला गाडी वेगाने चालवण्याबाबत प्रोत्साहित करत असतात. अशाप्रकारामुळे वेगाची ‘झिंग’ पूर्ण होत असली तरी हा आपल्या आणि वाहकाच्या जीवाशी खेळ असतो, ही जाणीव त्यांना नसते. भारतात वाहनांची संख्या वाढत आहे.  रस्ते  आहेत  तेवढेच  आहेत आणि वाहतूक नियमांबाबतची बेफिकीरी वाढत आहे. त्यामुळे  ‘सुरक्षित वाहतूक’ हे आव्हान समाजासमोर दिवसांगणिक बिकट होत चालले आहे.

Ⓒ SANJAY MUNDALKAR