Wednesday, 29 April 2020


लढवय्या इरफान

बीहड़ में बागी होते हैं, डकैत मिलते हैं पार्लियामेंट में (पानसिंह तोमर), ये शहर हमें जितना देता है उससे कहीं ज्यादा ले लेता है (लाईफ ईन ए मेट्रो), हमारी तो गाली पर भी ताली पड़ती है और हमें आज भी राजा भैया बुलाया जाता है (साहिब बीवी और गँगस्टर), शराफत की दुनिया का किस्सा ही खत्म, अब जैसी दुनिया वैसे हम (जज्बा), आदमी जितना बड़ा होता है, उसके छुपने की जगह उतनी ही कम होती है (कसूर), डेथ और शिट किसी को, कहीं भी, कभी भी आ सकती है (पिकू), गलतिया भी रिश्तों की तरह होती है. करनी नही पडती, हो जाती है (डी डे), शैतान की सबसे बडी चाल ये है की वो सामने नही आता (हैदर), तुम मेरी दुनिया छिनोगे, मैं तुम्हारी दुनिया में घुस जाउंगा(मदारी) आणि हासिलमधील...और जानसे मार देना बेटा, हम रह गये ना मारने में देर नही लगायेंगे, भगवान कसम, हे अभिनेता इरफान खान यांच्या काही चित्रपटांतील काही लोकप्रिय संवाद.
इरफान यांनी आपल्या अस्सल अभिनयाद्वारे लोकांना हसवले आणि त्यांच्या डोळ्यांतून आसूही पाडले. आपल्या विविधांगी भूमिकांतून प्रेक्षकांच्या भावनांना हात घातला. इरफानची डोळेच सर्व काही सांगून जायची. डोळ्यांतील भाव आणि संवादातून त्याचा अभिनय प्रेक्षकांच्या मनावर कायम कोरला जात असे़ लंच बॉक्स, इंग्रजी मीडियम, तलवार, मकबूल, ये साली जिेंदगी, हैदर, ब्लॅकमेल, हिंदी मीडियम, द वारियर, हासिल, लाईफ आॅफ पाई, द नेमसेक, रोग यासारख्या ५० हून अधिक चित्रपट आणि ए मायटी हार्ट, ज्युरासिक पार्क, स्लमडॉग मिलियनेयर आणि द अमेझिंग स्पायडरमॅन अशा हॉलिवूडपटांतून इरफान यांनी स्वकर्तृत्वाने अभिनयाचे सर्वाेच्च शिखर गाठले.
इरफान यांनी चित्रपटांशिवाय चाणक्य, भारत एक खोज, सारा जहां हमारा, बनेगी अपनी बात, चंद्रकांता आणि श्रीकांत अशा मालिकांमध्ये अभिनय साकारला. नाटक आणि दूरचित्रवाणी मालिकांत काम करून इरफान आपली ओळख निर्माण करत असतानाच निर्माती मीरा नायर यांनी ‘सलाम बॉम्बे’ चित्रपटात भूमिका दिली होती.
मित्रांनो, चेहºयावर फारसे हावभाव दिसत नसले तरी शब्दफेक, जबरदस्त संवादाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता इरफान खान यांचा अभिनयप्रवास सोपाही नव्हता. जयपुरातील पठाण परिवारात जन्मलेल्या इरफान यांची खरी रुची क्रिकेटकडे होती. जयपुरातील चौगान स्टेडियममध्ये सराव सुरू असतानाच सी.के. नायडू ट्रॉफीसाठी निवड झाली होती; परंतु कुटुंबियांनी परवानगी दिली नाही़ मग एका शिष्यवृत्तीच्या आधारे सन १९८४ मध्ये दिल्लीतील ‘नॅशनल स्कूल आॅफ ड्रामा’मध्ये (एनएसडी)अभिनयाचा अभ्यास केला़ ‘एनएसडी’ मध्ये शिक्षण घेतल्यानंतर इरफान यांनी दिल्लीत नाटकात काम करण्यास सुरुवात केली आणि तेथील अभिनय क्षेत्रात चांगले नावही कमावले. यानंतर त्यांनी मुंबईची दिशा पकडली.

अभ्यासाशी कट्टी

इरफान यांचे अभ्यासासोबत कधी पटले नाही. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले होते, माझ्या अभ्यासावरून घरात नेहमीच तणाव राहत असे. सुरुवातीच्या दिवसांत त्यांनी जयपुरात घराशेजारच्याच शाळेत शिक्षण घेतले;परंतु त्यांनी इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून शिक्षण घ्यावे, अशी त्यांच्या आईची खूप इच्छा होती. शाळेतील सर्व सहकाºयांना इंग्रजी भाषेत बोलताना ते पाहत होते़ मात्र, त्यावरून त्यांना अनेकदा शिक्षकाकडून शिक्षा मिळत होती.

सन्मान

इरफान खान यांना ‘हासिल’मधील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट खलनायक म्हणून फिल्मफेअर सन्मान मिळाला. ‘स्लमडॉग मिलिनिअर’मधील पोलिस अधिकाºयाची भूमिका साकारल्यानंतर हॉलिवूडचे दरवाजे खुले झाले. ‘पानसिंह तोमर’साठी राष्ट्रीय पुरस्कारानेही गौरवण्यात आले. ‘एक डॉक्टर की मौत’मधील त्यांच्या भूमिकेचे समीक्षकांनी खूप कौतुक केले. भारत सरकारकडून ‘पद्मश्री’ हा सन्मानही प्रदान करण्यात आला.
मित्रांनो, दोन वर्षांपूर्वी मार्च २०१८ मध्ये त्यांना ‘न्यूरो इंडोक्राईन ट्यूमर’ नामक आजाराचे निदान झाले होते. लंडनमध्ये कर्करोगावरील उपचार घेतल्यानंतर इरफान भारतात परतले. लढवय्या वृत्तीच्या इरफान यांना कामाशिवाय स्वस्थ बसवले नाही. ‘इंग्रजी मीडियम’ चित्रपटाचे छायाचित्रण पूर्ण केले. कोरोना लॉकडाऊनमुळे फारशी कमाई करू शकला नसला तरी त्यांचा अभिनय सरसच होता. चित्रपटामध्ये राधिका मदान आणि करिना कपूरदेखील
होती. या चित्रपटात शेवटची भूमिका केल्यानंतर दुर्दैवाने आयुष्यासोबतच अभिनयाचेही अर्धशतक पार करावे लागले. आज २९ एप्रिल २०२० रोजी झालेला त्यांना मृत्यू देशविदेशातील लाखो चाहत्यांना चटका लाऊन गेला. दोन दिवसांपूर्वी त्यांच्या आईचा मृत्यू झालेला. ज्या मातेच्या उदरातून जन्म घेतला, त्याच मातेच्या पाठोपाठ त्यांनी पृथ्वीवरील आपली जीवनयात्रा संपवली. त्यांचा अभिनय वर्षाेन्वर्षे स्मरणात राहिल...अलविदा इरफान!

© संजय इस्तारी मुंदलकर 

Saturday, 25 April 2020

आता तारणार केवळ काळी माय

आता सर्वत्र एकच चर्चा सुरू झाली आहे़ ‘लॉकडाऊन’ ३ मे रोजी संपणार की वाढणार? सरकारचा निर्णय काय असेल? असे अनेक प्रश्न सर्वसामान्याच्या मनात उभे राहिले आहे़ कारण देशभरात कोरोना रुग्णांच्या तीव्रतेवरून रेड, आॅरेंज आणि ग्रीन असे विभाग पाडण्यात आले आहे़ त्यानुसार उपाययोजना, नियमांत शिथिलता देण्यात येत आहेत़ असे असले तरी रुग्णांची संख्या वाढतीवरच असल्याचे दिसून येते़ केंद्रीय आरोग्य खात्यानुसार, आज २५ एप्रिल २०२० रोजीच्या रात्री सव्वा दहावाजेपर्यंत भारतात २४ हजार ९४२ इतके कोरोना रुग्ण असून ७७९ जणांचा मृत्यू झाला आहे.

मागील सुमारे ३२ दिवसांपासून देशातील उद्योगधंदे, कारखाने, कंपन्यांतील उत्पादन बंद आहेत़ साहजिकच नोकरदारांच्या हाती, मजुरांच्या हाती किती प्रमाणात पैसा आहेत, याबाबत तेच स्वत: सांगू शकतील, अशी स्थिती निर्माण झाली आहे़ केंद्र आणि राज्य सरकारकडून अन्नधान्य स्वरुपात, लाभार्थ्यांना काही रकमेचा निधी पुरवण्यात आला आहे़ असे असले तरी प्रत्येकाची स्थिती बिकट असल्याचे दिसून येते़ अगदी कार्पाेरेट क्षेत्रातील कंपनी मालकापासून सर्वसामान्य मजुरांना एका रांगेत आणण्यात कोरोना विषाणू कमालीचा यशस्वी ठरला आहे, असे म्हटले वावगे ठरू नये़
मूळ मुद्दा पुढील ३ मे रोजीचा ‘लॉकडाऊन’ संपल्यानंतरच्या दिवसांतील आहे. कोणत्याही कारखान्यातील उत्पादन तत्काळ बाजारात येऊन त्याची किमत वसूल होणार नाही. त्यासाठी काही वेळ, काळ जाऊ द्यावा लागणार आहे. घटलेला विकासदर स्थिरस्थावर होण्यास बराच कालावधी लागेल़ अशास्थितीत भारतीय अर्थव्यवस्थेची आर्थिक घडी बसवण्यात केवळ एकच आणि एकच क्षेत्र आपल्या हाती आहे. ते म्हणजे शेती. आता शेतीची पूर्णपणे ‘मना’पासून (कारण आपण शेतजमिनीला स्वार्थापायी दूर लोटले होते.) मशागत करून तिच्यातून उत्पादन घेणे एवढेच आपल्या हाती आहे़ ज्या काळ्यामातीपासून आपण मानवजात दिवसांगणिक दूर जात होतो, तिची सेवा करणे (शेती उत्पादन घेणे) अगदी कमीपणाचे समजत होतो, ती आता पुन्हा नव्याने फुलवावी लागणार आहे़ पूर्वीपेक्षा अधिक घाम गाळून ‘मोती’ पिकवावे लागणार आहे़ अधिक पैसा कमावण्याच्या स्वार्थापायी सुपीक जमीन मुद्दाम पडित पाडून तिच्यावर लोकवस्तीचे बिनकामाचे ले-आऊट पाडून ठेवलेत, मोठमोठ्या इमारती बांधून ठेवल्या (अनेक ठिकाणी कुणाचेही वास्तव्य नाही.)़ आता ती अगोदरची घमेंड, मस्ती सोडावी लागेल. उरलेल्या शेतजमिनी कसणेच आपल्या हाती आहे. तरच ती आपल्याला जिवंत राखण्यास पहिल्यापेक्षा अधिक मदत करेल. ही काळी मायच आपल्या भारत देशाची अर्थव्यवस्था तोलून धरेल, यात कुणाचेही दुमत असू नये.

पुढील काही दिवसांत खरीप हंगाम सुरू होईल़ कापूस, तूर, धान, ज्वारी, जवस, उडिद, मूग, मटकी, सोयाबीन, तीळ अशा पिकांचा हा हंगाम़ देशात या काळात अधिक पिकांची पेरणी केली जाते आणि उत्पादनही अगदी कमी काळात हाती येते़ यापैकी खाद्यतेलाची समस्या भागवणारे सोयाबीन आणि जवस, दाळपिके अर्थातच तूर, उडिद, मूग, मटकी, धान्याची गरज भागवणारी ज्वारी आणि नगदी पिके म्हणजे कापूस, तूर, सोयाबीन,ऊस आदींचा समावेश आहे. यापैकी कापूस, तूर वगळता इतर सर्व पिके कमी कालावधीत तयार होते. म्हणजे आपल्या सर्वांची अन्नाची गरज लवकर भागू शकते़ तर, कापूस आणि तूर पिकाच्या विक्रीतून नगदी पैसा हाती येतो़ शिवाय कापसाची निर्यातही करता येते़ उसापासून तयार होणारे उत्पादन हाती येण्यास बराच वेळ लागतो.

पाऊसही आपल्याच बाजूने

मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी ‘लॉकडाऊन’ मध्येही अतिशय आनंदाची बातमी आहे. यंदा मान्सून सामान्य असेल. सरासरीइतका पाऊस पडणार असून जून ते सप्टेंबर या काळात सरासरीच्या ९६ ते १०० टक्के पाऊस पडेल, असा मान्सूनचा पहिला दीर्घकालीन अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.
आपल्या देशात सामान्यत: जून महिन्याच्या मध्यात मान्सूनची सुरुवात होते. आॅगस्ट महिन्याच्या शेवटी आणि सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला मान्सून परततो. यंदा पाऊसमान सामान्य राहण्याची शक्यता २१ टक्के, तर सामन्यापेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता २० टक्के असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. केरळमध्ये १ जूनपर्यंत पावसाचे आगमन होण्याची आशा आहे. चेन्नईत ४ जून, पणजीमध्ये ७ जून, हैदराबादमध्ये ८ जून, तसेच महाराष्ट्रातील पुणे आणि मुंबईत अनुक्रमे १० आणि ११ जूनपर्यंत दाखल होईल, असेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे या पावसामुळे रब्बी पिकांचे अर्थात गहू, हरभरा पिकांचेही भवितव्य शेतकºयांच्या हाती राहणार आहे.

उपासमारीचेही मोठे संकट

जगातील सर्व देशांनी धान्यउत्पादनाबाबत तातडीने उपाययोजना न केल्यास पुढील काही महिन्यात अनेक ठिकाणी उपासमारीचे गंभीर संकट निर्माण होऊ शकते, असा इशारा संयुक्त राष्ट्रांची एक शाखा असलेल्या विश्व खाद्य कार्यक्रम (डब्ल्यूएफपी) यांच्याकडून देण्यात आला आहे़ विश्व खाद्य कार्यक्रमानुसार, कोव्हिड-19 मुळे जगातील आर्थिक क्षेत्रात आलेल्या संकटामुळे यंदा जगात तीव्र खाद्य असुरक्षाचा सामना करणाºया लोकांची संख्या दुप्पट होऊ शकते.अर्थात या महामारीमुळे जगभरात २६.५ कोटी लोकांचा मृत्यू होऊ शकतो. जगात मागील वर्षातच खाद्य असुरक्षात वाढ होण्यास सुरुवात झाली होती. आता कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे ही परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते. ‘डब्ल्यूएफपी’च्या आकडेवारीनुसार, पोटभर जेवण न मिळणाºयांची संख्या २०२० मध्ये २६.५ कोटीपर्यंत चढू शकते, हीच संख्या मागील वर्षात १३.५ कोटी इतकी होती.
जिनेव्हामध्ये आयोजित एका कार्यक्रमात विश्व खाद्य कार्यक्रमाचे मुख्य अर्थशास्त्रज्ञ तसेच संशोधन, मूल्यांकन आणि देखरेख विभागाचे  प्रमुख आरिफ हुसेन यांनी सांगितले की, कोव्हिड-19 हे संकट, त्या लोकांसाठी अत्यंत विनाशकारी आहे, जे यापूर्वीपासूनच अन्नसंबंधी समस्यांनी घेरलेले आहेत.
कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या प्रसारावर नियंत्रण मिळवण्यासाठी  लागू केलेल्या ‘लॉकडाऊन’मुळे जागतिक अर्थव्यवस्थेचे होणाºया नुकसानीबाबत जी-20 देशांनी म्हटले की, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खाद्य किंमतीची अस्थिरता थांबण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. विश्व खाद्य कार्यक्रम यांच्या वतीने २१ एप्रिल २०२० रोजी सादर केलेल्या चौथ्या वार्षिक जागतिक अहवालात नमूद केले की, यंदाच्या कोरोनो विषाणू संकट जगभर पसरण्यापूर्वीच मागील वर्षापासून खाद्य असुरक्षा संकट घोंगावत होते. सुमारे ५५ देशांमध्ये १३.५ कोटी यासंबंधीची आपत्कालिन स्थिती सहन करत होते. या जागतिक कारणामुळेही अन्नधान्याचे उत्पादन वाढवणे गरजेचे आहे, ही बाब लक्षात घ्यावी लागणार आहे.

मित्रांनो, मुळातच आपण कृषिदेशातील  नागरिक़ माननिय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतीसंबंधी कामांना ‘लॉकडाऊन’पासून बंधनमुक्त ठेवले आहे़ त्यामुळे शेतीची कामे सुरू आहेत. ज्या कुणाकडे शेतजमीन आहे, त्यांनी आता पिकांच्या उत्पादनाचे नियोजन करावे़ या नंतरच्या काळात सरकारकडून आणखी काही दिशानिर्देश लागू होण्याची शक्यता आहे़ पिककर्जेही मिळतील़ त्यातूनही कामे करता येईल; परंतु त्याचवेळी पूरक पिकांच्या उत्पादनावरही
भर देणे अगदी काळाची गरज बनली आहे़ पशुपालन (याद्वारे दुग्धव्यवसाय),चारा पिकांची लागवड, शेळीमेंढीपालन,कोंबडी,बदकांचे पालन, अंडी व्यवसाय, नर्सरी, मत्स्यपालन, फुलांची शेती, पाण्याची सोय असल्यास फळपिकांचे उत्पादन करता येणे शक्य आहे़ यातून आपली आणि पर्यायाने देशाची आर्थिक स्थिती मूळपदावर आणण्यास आपण मोठी मदत करू शकतो.

© संजय इस्तारी मुंदलकर


Thursday, 9 April 2020

चीन, पाकिस्तानची मारली मती


चीनमध्ये पहिला कोरोना रुग्ण डिसेंबर २०१९ च्या अखेरीस आढळला होता. त्यानंतर अवघ्या तीन महिन्यांच्या कालावधीत जगभरातील २०० देशांमध्ये संसर्ग फैलावला आहे. जिथून कोरोनाचा जन्म झाला आणि तो अन्यत्र पसरला, त्या चीनमधील संसर्ग संपल्यात जमा आहे. मात्र, त्याचवेळी  अमेरिका, इटली, स्पेन, ब्रिटन, नेपाळ, पाकिस्तान, भारत आदी देशांमध्ये या आजाराचा वेगाने फैलाव होत आहे. हजारो मृतांची संख्या वाढत आहे. युरोप आणि अमेरिकेत सर्वांधिक हाहाकार सुरू आहे.
आज ९ एप्रिल २०२० रोजी जगभरात कोरोनाबाधितांची संख्या १४ लाख ५० हजारांहून अधिक असून ८५ हजारजणांचा मृत्यू झाला आहे. ब्रिटनमध्ये एकाच दिवसांत ९३८ जणांचा मृत्यू झाला, तर अमेरिकेत ४ लाखांहून अधिकजणांना बाधा झाली आहे. फ्रान्समध्ये ही संख्या एक लाख ९ हजारांवर
पोहोचली आहे. ब्रिटनमध्ये ६० हजारांहून अधिकांना बाधा झालेली आहे. तुर्कीमध्ये ३४ हजारांहून अधिकजण बाधित झाले आहेत.
जर्मनीत एक लाख ९ हजारजणांना बाधा झाली असून मृतांची संख्या दोन हजारांवर गेली आहे. ब्राझीलमध्ये १४ हजारांहून अधिकांना संसर्ग झाला, तर  पोलंडमध्ये पाच हजारजण बाधित झाल्याची माहिती आहे. अशाप्रकारे सध्या जगभरात जीवघेण्या कोरोनाने थैमान घातले आहे. हे संपूर्ण संकट परतून लावण्यासाठी सर्व देशांकडून युद्धस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. अशातच तुम्हा आम्हांचे दुर्दैव म्हणून की काय, अशा परिस्थितीत चीनने दक्षिण चीन महासागरात चक्क युद्धसराव केल्याची माहिती समोर आली आहे.
मागील काही दिवसांत महासागरात अ‍ॅन्टी शिप, अ‍ॅन्टी सब-मरिन आणि अ‍ॅन्टी एअरक्राफ्टच्या मदतीने या क्षेत्रात मोठा युद्धसराव केला. याव्यतिरिक्त फ्लीटच्या नेव्हिगेशनचाही सराव केल्याची माहिती आहे. या क्षेत्रात आपला प्रभाव दाखवून देणे हाच युद्धसरावामागील चीनचा हेतू असल्याचे आंतरराष्ट्रीयस्तरावरील लष्करीविषयक अभ्यासकांनी म्हटले आहे.
दुसरीकडे सध्या दक्षिण चीन महासागरात अमेरिकेची कोणतीही युद्धनौका उपस्थित नसल्याची माहिती आहे. अमेरिकेच्या युद्धनौका कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सध्या प्रशासनासोबत कार्यरत असल्याचे विविध वृत्तसंस्थांनी म्हटले आहे. चीनने मात्र नेमके याच वेळेचा फायदा घेऊन युद्धसराव केल्याचे म्हटले जात आहे. यानंतर अमेरिकासह अनेक देशांनी या कृतीचा निषेध केला. त्यावर चीनने अमेरिकेवरच निशाणा साधला. आम्ही अन्य देशांना कोरोनाविरूद्ध लढण्यास मदत करत असल्याचे चीन सरकारने म्हटले आहे.
दरम्यान, दक्षिण चीन महासागरात अनेक लहान बेटे आहेत. त्यातील सर्वाधिक भागावर चीनने आपला दावा केला आहे, तर फिलिपिन्स, व्हिएतनाम, मलेशिया, तैवान आणि ब्रुनेई यांनी दावा नाकारला आहे. त्यातूनच सर्व देश कोरोनाविरोधात मोठा लढा देण्यात व्यस्त असताना चीन नुसताच खाजवून घेण्याचा प्रयत्न करत आहे,असे म्हणता येईल.

पाकिस्तानचे भूत

इमरान खान सरकारने कोरोनामुळे मोठे नुकसान होऊनही पाकिस्तानात ‘लॉकडाऊन’ लागू केलेले नाही. याशिवाय या देशात महागाई, दारिद्र्य आदी प्रकारांनी कळस गाठला आहे. सर्वसामान्यांचे दैनंदिन जीवन कठीण परिस्थितीत व्यतित होत असताना सरकारला त्याच्याशी काहीही देणे घेणे नसल्याचे दिसून येते़ कारण जगभरातील देशांवर कोरोना संकटाची टांगती तलवार असताना पाकिस्तानने मात्र मागील १९ मार्चला बलुचिस्ता
न प्रांतातून सुमारे ७५० किलोमीटर अंतरापर्यंत मारा करणाºया क्रूझ मिसाईल (क्षेपणास्त्र) बाबर-२ ची चाचणी केली. दुर्दैवाने १४ किलोमीटरपर्यंत पोहोचल्यानंतर केवळ दोन मिनिटांतच ते जमिनीवर कोसळले. पाकिस्तानी अधिकाºयांनुसार, बाबर-२ साठी पाकिस्तान चीनची मदत घेत आहे़ मुळात पाकिस्तानच्या मानगुटीवर भारताच्या डीआरडीओद्वारा निर्माण होणाºया एक हजार किलोमीटर लक्ष्य साधणाºया निर्भय क्रूझ मिसाईलसोबत बरोबरी करण्याचे भूत बसल्याचे दिसून येते.
©  संजय मुंदलकर

Monday, 6 April 2020

कोरोना आणि वसुंधरा


चीन देशातून पसरलेल्या कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे संपूर्ण जगभरात लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे़ अनेकांना त्याची लागण झाली असून, हजारोंना ‘क्वारंटाईन’ करण्यात आले आहेत. जगातील बोटावर मोजण्याइतपत देश त्यापासून मुक्त राहिले आहेत़ अनेक देशांत ‘लॉकडाऊन’(टाळेबंदी) करण्यात आली आहे़ महत्त्वाचे उद्योगधंदे, कारखाने, कंपनी बंद ठेवण्यात आल्या आहेत़ सर्वसामान्य नागरिकांसह कामगारांना, मजुरांना, शासकीय कर्मचाºयांना (अत्यावश्यक सेवा वगळता) घरातच राहण्याचे निर्देश देण्यात आले आहे़ याशिवाय प्रत्येक भारतीय नागरिकाने वैयक्तिक स्वच्छता पाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे; परंतु त्याचवेळी या कोरोना विषाणूमुळे सुरूअसलेल्या ‘लॉकडाऊन’मुळे पृथ्वीला, धरणीमातेला, वसुंधरेला मोठा दिलासा मिळाला आहे. ही पृथ्वी आता अधिक स्वच्छ हवेचा श्वास घेत आहे. एका माहितीनुसार, धरतीवर अशी स्वच्छ हवा सुमारे ७५ वर्षांनंतर आढळली आहे. यापूर्वी दुसºया जागतिक महायुद्धानंतर इतकी स्वच्छ हवा होती, असेही सांगण्यात येत आहे. काही प्रसारमाध्यमांनी प्रकाशित केलेल्या वृत्तानुसार, दुसºया महायुद्धानंतर ही पहिली वेळ असेल, जेव्हा कार्बन उत्सर्जन सर्वांत कमी होत आहे. कोरोनामुळे अनेक देशांमध्ये ‘लॉकडाऊन’ जाहीर केल्याने जगभरात प्रदूषणाचे प्रमाण कमी झाले आहे.
‘ग्लोबल कार्बन प्रोजेक्ट’चे प्रमुख रॉब जॅक्सन यांनी म्हटले, की यावर्षी कार्बन उत्सर्जनमध्ये ५ टक्के घट झाली आहे. याआधी २००८ च्या आर्थिक मंदीमध्ये कार्बन उत्सर्जन कमी झाले होते. यावेळी १.४ टक्के घट दिसून आली होती. दुसºया महायुद्धाच्या काळात प्रामुख्याने युरोप, आशियातील अनेक देशांतील कारखाने, बाजारपेठा, वाहतूक, उद्योग पूर्णपणे बंद होते. त्यामुळे प्रदूषण कमी झाले. आता इतक्या वर्षांनंतर चित्र पाहायला मिळत आहे, असेही रॉब जॅक्सन यांनी म्हटले आहे. पर्यावरणतज्ज्ञ तसेच वैज्ञानिकांच्या मते, कोरोना विषाणूमुळे सुरू असलेल्या ‘लॉकडाऊन’मुळे जागतिक कार्बन उत्सर्जनमध्ये १० ते २० टक्के घट झाली आहे; पण हे जास्त काळ नसणार आहे. कारण २०२१ च्या सुरुवातीला तापमान पुन्हा वाढायला लागेल. त्यामुळे चिंता पुन्हा वाढणार, हे अपेक्षित आहे.
दरम्यान, संयुक्त राष्ट्राने (युनो) मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात एक अहवाल प्रकाशित केला होता. प्रत्येक वर्षी कार्बन उत्सर्जनमध्ये ७.६ टक्के इतकी घसरण झाली तरच ‘ग्लोबल वॉर्मिंग’अर्थात जागतिक तापमानात १.५ अंश से
ल्सियसची कमतरता येईल.
हिंदी वृत्तपत्र राज एक्सप्रेसनुसार, एका नव्या अभ्यास सर्वेक्षणात पृथ्वी सभोवती असलेले सुरक्षा कवच अर्थात ओझोनच्या थरात सुधारणा होत आहे. पर्यावरण विज्ञान क्षेत्रातील  संशोधन संस्था ‘सीआयआरईएस’ च्या (को-आॅपरेटिव्ह इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च इन एन्व्हायर्नमेंटल सायन्स) संशोधक अंतरा बँनर्जी यांनी युनिव्हर्सिटी आॅफ कोलोराडो बोल्डर येथे यासंदर्भात माहिती दिली. पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धात पर्यावरण बदलाविषयीचे संकेत मिळाले आहेत. हे बदल ‘मॉन्ट्रियल प्रोटोकॉल’मुळे ओझोनच्या थराचे छिद्र आंकुचन पावत असल्याने होत आहेत.

मॉन्ट्रियल प्रोटोकॉल...

‘मॉन्ट्रियल प्रोटोकॉल’ हा एक जागतिक पातळीवरील करार आहे. या करारात ओझोन थराला कमजोर करणाºया घटकांचे उत्सर्जन थांबवण्यासाठी काही देशांनी सहमती दर्शवली आहे. हा करार ओझोन थराच्या संरक्षणासाठी व्हिएन्ना संमेलनात पारित केला होता. या करारावर १६ सप्टेंबर १९८७ रोजी स्वाक्षºया करण्यात आल्या़ तसेच, हा करार १ जानेवारी १९८९ लागू करण्यात आला होता. विशेष म्हणजे या करारात आतापर्यंत सातवेळा संशोधन करण्यात आले आहेत. शास्त्रज्ञांनुसार ‘मॉन्ट्रियल प्रोटोकॉल’चे पूर्णत: पालन केल्यास २०५० पर्यंत ओझोन थराच्या छिद्राला पूर्ण झाकण्यात यश मिळू शकते.

‘लॉकडाऊन’ कारणीभूत

कोविद-१९ अर्थात कोरोना व्हायरस डिसीज 2019 पासून झालेल्या संक्रमणाला परतून लावण्यासाठी जगभरातील देशांनी ताळेबंदी
(लॉकडाऊन) लागू केली आहे. यात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्णपणे बंद असल्याने पृथ्वीभोवतीच्या वातावरणात तसेच पर्यावरणात तीव्र गतीने सुधार झाला आहे. धरतीच्या दहाही दिशांतून होणारी वाहतूक बंद असून जगातील लाखो कारखाने, उद्योग बंद पडले आहेत. त्यामुळे विकसित, अर्धविकसित देशांतून होणाºया प्रदूषण उत्सर्जन प्रमाणात घट झाली आहे. परिणामी वायुमंडळातील हवा स्वच्छ झाल्याचे आढळून आले आहे.
भारतासंदर्भात प्रकाशित करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, देशातील ९० शहरांमध्ये नाममात्र वायुप्रदूषणाची नोंद करण्यात आली. यात असेही सांगण्यात येते की यामुळे श्वास घेणे सोपे झाले झाले़ (अर्थातच सर्वांना स्वच्छ हवा मिळाली.)
कोरोनामुळे देशात लागू असलेल्या ‘लॉकडाऊन’च्या प्रभावामुळे प्रदूषणात घट झाली असली तरी सरकाराला या क्षेत्रात अधिक उपाययोजना करण्याची गरज असल्याचे संकेतही पर्यावरण तज्ज्ञांनी दिले आहेत. याकडे दुर्लक्ष करून अजिबात चालणार नाही. कोरोनासंबंधित महामारीने जगातील मानवजातीला झोपेतून जागे केल्याचे दिसून येत आहे. यापुढील काळात मानवाला केवळ आपले आरोग्यच नाही, तर धरतीमातेचे आणखी शोषण करण्याऐवजी तिच्या अधिक सुरक्षिततेसाठी, तिच्या संवर्धनासाठी सातत्याने प्रयत्न राहण्याची गरज दाखवून दिली आहे.

गंगा नदीही स्वच्छ

केंद्र सरकारने देशव्यापी ‘लॉकडाऊन’ घोषित केल्यानंतर गंगा नदीचे पाणी स्वच्छ होत असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांतून झळकत आहेत. वाराणसी येथील आयआयटी अर्थात भारतीय प्रऔद्योगिकी संस्थातील रासायनिक अभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक पी. के. मिश्रा यांनी सध्या बंद स्थितीत असलेले औद्योगिक कारखाने गंगा नदीच्या पाण्याची पत सुधारण्यास मदत करत स्पष्ट केले आहे. नदीच्या पाण्यात स्वच्छतेबाबत ४० ते ५० टक्क्यांनी सुधारणा झाली असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (सीपीसीबी) सुमारे ३६ देखरेख केंद्रांनी गंगा नदीचे पाणी विविध ठिकाणांवरून गोळा केले. विरघळलेला प्राणवायू, जैव रासायनिक प्राणवायूची गरज, एकूण कोलीफॉर्म, पीएच पातळी हे निकष पाण्याची शुद्धता तपासण्यासाठी वापरण्यात आले. विविध पातळीवर केलेल्या तपासून सुमारे २७ बिंदूंच्या आधारे हे पाणी आंघोळ, वन्यजीव तसेच मत्स्यांच्या प्रसारासाठी योग्य दर्जाचे असल्याचे सीपीसीबीने आपल्या अहवालात म्हटले आहे. उद्योगांकडून होणाºया प्रदूषणाचे प्रमाण तपासण्याची संधी ‘सीपीसीबी’ला प्राप्त झाली आहे. त्याआधारे उपाययोजना करता येईल, असेही सांगण्यात येत आहे. याशिवाय दिल्लीतील अनेक भागातील हवा स्वच्छ झाल्याने आकाश निळेशार दिसून येत आहे.

हिमालयाचे दर्शन

वाहतूक आणि औद्योगिक कारखाने बंद असल्याने पर्यावरणाची स्थिती सुधारली आहे़ वायु प्रदूषण कमी झाल्याने वातावरण बिल्कुल साफ झाले आणि तब्बल ३० वर्षांनंतर हवा इतकी स्वच्छ झाली की पंजाबमधील जालंधर शहरापासून सुमारे १६० किमी अंतरावर असलेल्या हिमालयाच्या पर्वतरांगा स्पष्ट दिसू लागल्या. या शहरातील नागरिकांनी या दृश्याचा पुरेपूर आनंद घेतल्या़ या गोष्टीवरून असे दिसून येते की, आपण निसर्गाच्या सौंदर्याला किती मुकलो आहोत.

© संजय मुंदलकर