Sunday, 14 June 2020

नमुने



गाव म्हटलं गावात अनेक नमुने असतात़ आता हे काय ‘बेण’ असं विचारालं, तर बरं होणार नाही़ ‘बेणं’ या शब्दाचा अर्थच जात असा़ ‘माती तशी चूल’ अशी म्हण तर विचारात घेतली तर ‘गाव तशा जाती’ राहणार आणि त्यातील ह्या ‘बेणी’ सुद्धा! गाव हे अगदी दहा-वीस घरांपासून तिकडे हजारांच्या लोकसंख्येत सांगता येईल़ लहान परिसर असल्याने प्रत्येकांच्या ओळखीशी आपण जुळलेले असतो़ त्यांचा स्वभाव माहिती असतो़ त्यांच्या प्रत्येक गोष्टीशी जुळवून घेतात़
माझा जन्म गावातलाच़ गावातल्या मातीशी नाळ जुळलेला मी माणूस़ प्राथमिक शाळेत असेपर्यंत मी अनेकांची घरे बघितली नव्हती वा त्यांची माहिती नव्हती़ मात्र,वय वाढले गेले तशी गावाशी ओळख झाली़ ‘माणसां’शी ओळख झाली तशी त्यांच्या स्वभावाच्या विविध कंगोºयाशीही ओळख झाली़ अनुभव येत गेले़ तशी स्वभावावर लिंपण होत गेली़
माझ्या गावात ‘खंड्या’ नावाचा व्यक्ती होता़ आता तो हयात नाही़ बºयाच वर्षांपूर्वी तो देवाघरी गेला़ त्यावेळी अंदाजे माझं वय चौदा-पंधरा वर्षे असेल़ ह्या खंड्याचं मूळ नाव मला माहिती नाही़ बहुधा तो लहान भावासोबत राहात असावा़ तर हा खंड्या पाहायला काळा होता़ त्याचा वरचा ओठ दोन भागात तुटलेला होता़ तसा तो पाहायला वाईट नव्हता; पण काळ्या रंगावर ओठाची दोन ‘खांड’ झाल्याने तो भयानक दिसायचा़ कदाचित याच कारणामुळं त्याचं लग्न झालेलं नसावं़ लहान मुलं त्याला घाबरायची़ शेतातील कामे करून आपले आणि भावाच्या पोटापाण्याची व्यवस्था करायचा़ माझ्या घराजवळ देवीच्या मूर्तीची स्थापना करण्यात येत़ विसर्जनाच्या दिवशी कुणी वाघाचं सोंग घेई, कुणी घोडा बनत, कुणी जिराफाचं सोंग घेत़ यात खंड्या वाघाचं रुप साकारत असे़ मुळातच तो रंगानं काळा होता़ त्यामुळं त्याच्या अंगावर पिवळे पट्टे उठून दिसतं़ तर हा खंड्या वाघाचा नाच करण्यात निपुण होता़ कधीही आणि केव्हाही तो तसे नृत्य करण्यास तयार असे़ देवी विसर्जनात खंड्याशिवाय कुणीही वाघाचे सोंग घेत नव्हते़ आणि कुणी तसा विचार केलेलाही त्याला खपत नसे़ त्याच्या या स्वभावाचा कुणीही फायदा घेत असे़ एका विसर्जनाच्या दिवशी अंगात ताप असूनही त्याने आपले काम चोख बजावले होते़ ‘देवी मला काहीही होऊ देणार नाही’, असे तो म्हणत असे़ आणि खरोखर त्याचा ताप दुसºया दिवशी पार पळाला़ एकदा तो विहिरीवर पाणी भरण्यास आला़ काही टारगट पोट्यांना हुक्की आली़ ते सर्वजण खंड्याजवळ आले आणि त्यांनी वाघाचा नाच सादर करण्यास सांगितलं़ झालं हा खंड्यानं बादली-दोन बाजूला ठेवला आणि तिथंच ‘डजगनं डजगनं’सुरू केलं़
काशिनाथ लांडगे हे गावातील आणखी दुसरं ‘बेणं’ होतं़ आडनांव लांडगे असलं तरी तो बघायला ‘वाघा’सारखाचं होता़ साडेसहा फूट उंची, धिप्पाड अंगकाठी, काळाकुट्ट रंग, चेहºयावर माताच्या वणा,आवाजातही मोठी जरब असं हे व्यक्तिमत्त्व होतं़ तर या काशिनाथबुवाच्या बायकोपोराबद्दल अनेकांनी वेगवेगळं ऐकलं होतं़ तो एकटाच राहत असे़ कदाचित त्यांच्या कामचुकारवृत्तीने,आळशीपणामुळे बायको त्याला सोडून गेली असावी़ पोटापाण्यासाठी तो फारसा काम करताना दिसत नसे़ त्याचा दिनक्रम ठरलेला असे़ दुसरं काही नाही केलं तरी त्याची सकाळची आंघोळ कधी चुकली नाही़ तो कधी आजारी पडलेला, असं मीच काय? कुणीही ऐकलेलं नाही़ कधी कधीच तो काम करायचा, असं म्हटलं तर हसायला नको़ कारण तो कामाला जाताना क्वचितच दिसायचा़ मात्र, रामकृष्ण मामाच्या कामठ्यात बसलेला असायचा आणि त्याच्याशी चकाट्या पिटायचा़ हा कामठा एसटी स्टँडला लागूनच होता़ त्यामुळे गप्पांना विषयांची वाणवा नसे़ तर हा काशिनाथ कुणावरही विनाकारण डाफरत असे़ त्याचं कुणाशी कधी वाजेल याचा भरवसा नसे़ कधीकधी तो गावखाºयाची रखवालीचं काम करायचा; पण रस्त्यावरूनच आवाज करीत त्यामुळं कमीत कमी डुकरं तरी पळून जायची़ पिकात मात्र शिरायचा नाही़
आमच्या गावात भागवताचं सप्ताहाभर दररोज जेवणाचा कार्यक्रम होत असे़ कुठे वरणभात,पोळीचं तर कुठे खिचडी,कढीचं जेवण राहायचं़ हा बुवा एकटा असल्याने त्याला आमंत्रण असायचंच; पणह्या काशिनाथबुवाचा आहार खूप होता़ तो किती खायचा, ह्याचा हिशोब लावताना जेवण वाढणारे थकून जातं़ एक पंगत संपली तरी त्याचं जेवण संपत नसे़ खिचडी तरी तो पायली-दोन पायल्यांची खात असेलच़ अनेकांनी त्यांच्या आहाराच्या अंदाज घेण्याचा प्रयत्न केला;परंतु ते कुणालाही साधलं नाही़
तसे गावात ‘बेणं’ खूप होते आणि आहेतही़ मात्र, आता खूप फरक पडला आहे़ गावातले दिवस बदलत आहेत, कदाचित म्हणून असावेत़ आबा, पक्या, ईठ्या, सुध्या असे अनेक भारी भारी ‘कॅरेक्टर्स’ आहेत़


© संजय इस्तारी मुंदलकर

शिवारातील आमराई झाल्यात उजाड...


बहर येत नाही म्हणून अनेक कास्तकारांनी आपल्या आमराई विकून टाकल्या़ झाडांशी असलेले नाते आणि आजोबा,पणजोबा, वडिलांनी आपल्या हातांनी लावलेली झाडे कवडीमोल पैशांत मोजली़ ज्यांना रुजण्यास कित्येक दिवस लागली,आपल्या जगण्याचं महत्त्व पटवून देण्यास करोडो क्षण लागली, ती झाडे काही क्षणात जमीनदोस्त करण्यात आली़ आणि नियती बघा, हे सर्व आपण ‘याच देही याच डोळी’ बघितलं़ अगदी आदि आणि अंत सुद्धा!


शेतकºयांचा आपल्या झाडाझुडपांवर भारी जीव असता़े शेतकरीच काय पण सामान्य गावकरीही झाडांवर तितकाच प्रेम करतो़ ज्याच्या घरी वावर नाहीत, तोही झाडांना जोपासतो़ गावशिवारात बाभूळ, कडुलिंब, सुबाभूळ, पळस, आवळा, आंबा, उंबर, कवठ, चिंच, बोर अशी कितीतरी प्रकारची झाडे असतात़ लहान-मोठी झाडे तर वेगळीच! बाभळाची तर बनच बन असतात, तशी कडुलिंबांचीही मोठी रांग दिसून येते़ नदीच्या काठी आणि पडीक जमिनीत बोरीच बोरी दिसून येते़ कुणी धुºयावर ही झाडे लावतो,तर कुणी आपल्या पडतात त्यांची लागण करतो़ झाडं कोणतंही असो ते कुठं आणि कसं कामास येईल, हे सांगता येत नाही़
आंब्यांची झाडं तर शिवाराची शान असते़ कोणत्याही गावाभोवताल आमराई असतेच़ कुण्याच्या  धुºयावरही ही झाडे आढळून येतात़ आंब्यांची झाडे वाढण्यास आणि फळ येण्यास मोठा कालावधी घेत असल्यामुळे अनेकजण आता कलमी आंब्याकडे वळले आहेत़ मात्र, गावरानीची चव जशी हायब्रिडला नसते, तशी चव कलमीला नसतेच, हे मान्य करावेच लागते़
विदर्भातील गोंदिया ते मध्यप्रदेशातील रजेगांव या राज्यमार्गावर तर आंब्याची मोठमोठी झाडे आहेत़ काही प्रमाणात की तोडली गेली आहेत. राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागानेही ग्रामीण रस्त्याचे जाळे तयार करताना रस्त्याच्या बाजूला बाभळी, कडुलिंब, आंबा आदी अनेक प्रकारची झाडे लावली आहेत़
शिवारात असायची तशी चिंचेची झाडं गावातही असायची़ आपल्या मुळा जमिनीत घट्ट आणि खोलवर रुजवणारे हेच एकमेव झाड असावे़ फांद्या अत्यंत दाट असल्याने पक्ष्यांचा तो मोठा निवारा असतो़ पाऊस, ऊन्हं आणि हिवाळ्यातील थंडीपासून संरक्षण करणारं हे झाडं आहे़ अखजीला ‘चिचुणी’ करण्यासाठी कुण्या दुकानात जावं लागत नाही़ चिंचेच्या कोवळा पाला खाण्यात काय मजा होती़ सुटीच्या दिवशी शाळेतील पोरंपोरी दिवसभर चिंचेच्या झाडाखाली असायच्या़ दहा दगड मारल्यानंतर पाच दगडात पंधरा तुकडे पडायचे़ आपल्या वर्गातल्या पोरीवर ‘इम्प्रेशन’ मारण्यासाठी चिंचा पाडण्यात पोट्टे वस्ताद होते़ एखाद्याच्या दगडानं कुणाचं डोकं फुटल्यास त्याबदल्यात चिंचा देऊन समजावणी
केली जाई़
विदर्भात प्रत्येक गावात आमराई होती, आहे असं म्हणण्याचं धाडस आता करता येणार नाही़ आपल्या गावातील ग्राहकांची गरज भागवून उरलेल्या आंब्यांची विक्री करण्यात येत होती़ वावरातील खरिपाची कामे करताना शेतकºयाची एक ‘जीवनसाथी’ म्हणजे भाकरीची शिदोरी़ पहाटे पाच सुमारास घरातून आपल्या बैलांसह वावरात निघालेला शेतकरी शिदोरी घेऊनच निघालेला असतो़ वखरवाहीत व्यस्त असल्याने कधीकधी रात्रीचीही भाकर न्यावी लागते़ साधारणत: सकाळी नऊच्या सुमारास तो शिदोरी सोडतो़ त्यापूर्वी तो आपल्या शेताच्या मध्यभागी असलेल्या झाडाची दोन-चार आंबे दगडं मारून तोडतो़ भाकरी-भाजीच्या घासासोबत कांदा तोंडी लावतो तशीच आंब्याची फोडही! या साºयांचा एक घासच जगातल्या पक्वान्नांहून सरस ठरतो़ जरा अनुभव घेऊन बघा़
पाण्याच्या दोन-चार घोटाबरोबर हा शेतकरी श्रम करतो, मेहनत करतो़  तृप्तीची ढेकर दिल्यानंतर थोडीशी सुस्ती आल्याने त्याच आंब्याच्या झाडाखाली तो दोन क्षण डोळे लावतो़ घरी परताना तो आणखी दोन-चार आंबे शिदोरीच्या थैलीत ठेवतो़ कारण दुपारच्या जेवणसाठी घरधनीनला आमरस करायचं असतं़
बाभळीच्या झाडाचंही तसंच़ हे झाडं कुणाला लावावं लागत नाही़ तो आपणच आपला रुजतो़ या झाडाचा कोणताही भाग बेकामी नाही़ पान, फुल, शेंग, लाकूड आणि अगदी काटे सुद्धा कुंपणाच्या उपयोगात येतं़ गरिबासाठी तर ते ‘कल्पवृक्ष’चं ठरतं़ घराची दारं, खिडक्या, मयाली, मांडवासाठी ‘डी’ अशी कितीतरी साहित्य एकटा झाड देतो़ अनेक कास्तकारांनी आपल्या पडतात बाभळांचे बन तयार करत असतात़ त्यातून मोठा फायदा मिळत असे़
मात्र, गेल्या काही वर्षांत चित्र बदलले़ माणूस नको तितका स्वार्थी बनला़ आणि त्याने निसर्गावरच कुºहाड उचलली़ लाकडाचा व्यवसाय करणाºयांनी आपली नजर गावांकडे वळवली़ अगोदरच नापिकीमुळे त्रस्त झालेल्या शेतकºयांनीही त्याच्या हाकेला ‘ओ’ दिली़ आपल्या पडतातील शेकडो झाडे त्याने अगदी कमी किंमतीत विकून टाकली़ कालपरवापर्यंत हिरवीगार दिसणारी जागा आता ‘बोडखी’ दिसू लागली़ धुरेही उजाड झाली़ बहर येत नाही म्हणून अनेक कास्तकारांनी आपल्या आमराई विकून टाकल्या़ झाडांशी असलेले नाते आणि आजोबा, पणजोबा, वडिलांनी आपल्या हातांनी लावलेली झाडे कवडीमोल पैशांत मोजली़ ज्यांना रुजण्यास कित्येक दिवसं लागलीत,आपल्या जगण्याचं महत्त्व पटवून देण्यास हजारो तास लागले, ती झाडे काही क्षणात जमीनदोस्त करण्यात आली़ आणि नियती बघा, हे सर्व आपण ‘याच देही याच डोळी’ बघितलं़ अगदी आदि आणि अंत सुद्धा!
शहरातले लाकडाचं टाल (वखारी) बघा़ हजारो टन ओली झाडे पडलेली दिसून येते. याकडे सरकारचे दुर्लक्ष आहेत आणि पर्यावरणवाद्यांचेही! केवळ सागवान तोडीला ‘लक्ष्य’ करून चालणार नाही, तर लहानातल्या लहान झाडाच्या तोडीला विरोध झालाच पाहिजे, तरच हा निसर्ग आपला आहे; अन्यथा अवेळी नाश हा ठरलेलाच!

© संजय इस्तारी मुंदलकर