Wednesday, 13 May 2020

काळाला शरण गेलेली रंजना

अभिनेत्री रंजना ही प्रसिद्ध अभिनेत्री वत्सला देशमुख यांची कन्या. ‘पिंजरा’ चित्रपटात अभिनेत्री संध्याच्या बहिणीच्या भूमिकेत वत्सला यांना आपण बघितले आहे. याशिवाय अनेक हिंदी चित्रपटांमध्येही त्यांनी भूमिका साकारल्या  आहेत.

अभिनेत्री संध्या यांच्यासोबत रंजनाचे अतिशय जवळचे नाते. संध्या या वत्सला देशमुख यांच्या धाकट्या भगिनी. या नात्याने त्या रंजनाच्या मावशी आहेत. संध्या यांचे लग्न व्ही. शांताराम यांच्यासोबत झाले होते. त्यामुळे रंजना या व्ही. शांताराम यांच्या भाची होत्या. त्यांनीच  रंजनाला  १९७५ मध्ये ‘चंदनाची चोळी अंग अंग जाळी’ चित्रपटातून पडद्यावर आणले होते. पहिल्याच चित्रपटात रंजनाने  रसिकांची मने जिंकली.
 रंजनाने केलेले चित्रपट आणि त्यातील गाणी आजही लोकांच्या स्मरणात आहे. ‘मुंबईचा फौजदार’मधील ‘हा सागरी किनारा...’, तसेच ‘अरे संसार संसार’मधील ‘निसर्ग राजा...’ ही रंजनाची गाणी आजदेखील गुणगुणली जातात. विनोदी भूमिकांसोबतच गंभीर भूमिकांमध्येही ती उजवी ठरली. खेड्यातील मुलीपासून ते शहरातील मॉडर्न गर्लपर्यंतच्या प्रत्येक भूमिकेत  स्वत:ला अक्षरश: झोकून द्यायची. ‘भुजंग’मधील  ग्रामीण स्त्री असो वा ‘भालू’ चित्रपटातील उच्चशिक्षित स्त्रीची भूमिका असो, रंजना कुठेच कमी पडली नाही.
सासू वरचढ जावई, सुशीला, चानी, केला इशारा जाता जाता, भालू, खिचडी, लक्ष्मीची पाऊले, सावित्री, जखमी वाघीण, गोंधळात गोंधळ, सासुरवाशीण, बिन कामाचा नवरा, मुंबईचा फौजदार आदी चित्रपटांतून रंजनाने आपली अभिनयशक्ती जागवली. १९८०  मध्ये ‘अरे संसार संसार’ आणि १९८३ मध्ये ‘गुपचूप गुपचूप’ चित्रपटांसाठी तिला राज्यसरकारचा उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. रंजनाची ‘मामा’ अशोक सराफ यांच्यासोबत आॅनस्क्रीन केमिस्ट्री खूप छान जमून आली होती. रंजना आणि अशोक सराफ एकमेकांच्या प्रेमात पडल्याचीही चर्चा रंगली होती. ही शेवटपर्यंत केवळ एक चर्चाच ठरली. सर्व काही सुरळीत सुरू असताना एका क्षणात  तिचे  आयुष्यच पालटून गेले. ‘झुंजार’च्या (१९८३) चित्रीकरणासाठी बंगळुरूला जात असताना  कार अपघातात  रंजनाला कायमचे अपंगत्व आले. तिचे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले. शेवटपर्यंत सावरू शकली नाही.

            आयुष्याचे नाटक

रंजनाने मराठी नाटक ‘फक्त एकदाच’मधून पदार्पण केले होते. हे नाटक रंजनाच्या आयुष्यावर आधारित असल्याचे म्हटले जाते. व्हीलचेअरवर असलेल्या स्त्रीला तिचा प्रियकर सोडून जातो, असे कथानक असलेले हे नाटक रंगभूमीवर आले, ज्यात तिने अखेरची भूमिका केली होती. अशातच ३ मार्च २००० रोजी हृदय  बंद  पडल्याने रंजनाने वयाच्या अवघ्या ४५ व्या वर्षी  कायमचा निरोप घेतला. एका मुलाखतीत रंजनाच्या मातोश्री वत्सला देशमुख यांनी सांगितले होते, अपघातानंतर रंजनाला अपंगत्व आले. तशा अवस्थेतही तिने  अनेक वर्षे काढली. मृत्यू समोर दिसत असतानाही मृत्यूला घाबरली नाही. आनंदी  होत  मृत्यूला हसतमुखाने ती सामोरी गेली. गोंधळात गोंधळ, मुंबईचा फौजदार, जखमी वाघीण, भुजंग, एक डाव भुताचा यांसह अनेक चित्रपटांमध्ये रंजना झळकली.  ही ८० च्या दशकातील मराठीतील आघाडीची अभिनेत्री. ‘लेडी कॉमेडियन’ म्हणूनही रंजनाला ओळखले जाते.  करिअर  यशोशिखरावर असताना एक वळण असे आले,की  तिचे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले. तिची जीवन कहाणी कुणालाही हेलावून सोडणारी आहे. यावर्षी ३ मार्च २०२० रोजी रंजनाला या जगाचा निरोप घेऊन  २०  वर्षांचा काळ लोटला  आहे. 


© संजय इस्तारी मुंदलकर 

आशादायी रामेश्वरी



आजच्या घडीला मराठी, हिंदी चित्रपटांत नशीब आजमावण्यासाठी अनेक तरुणी दररोज दाखल होत आहेत़ त्यांच्या जवळ गोरा सुंदर चेहरा आहे. कदाचित अभिनयही करता येईल; परंतु गोरा चेहरा हे भांडवल असूच असत नाही, यावर आमचे ठाम मत आहे़ कारण या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी, नशिबाची साथ आवश्यक असते.   सावळा चेहरा असूनही स्मिता पाटील, रामेश्वरी  अभिनयात  मोठ्या उंचीवर पोहोचल्या होत्या.
आंध्र प्रदेशच्या काकीनाडा येथे जन्मलेल्या तल्लूरी रामेश्वरी हिंदी चित्रपटात ‘रामेश्वरी’ म्हणून ओळखल्या जातात.  ‘दुल्हन  वही  जो  पिया  मन  भाये’ (सन १९७७) या पहिल्या चित्रपटाने मोठी  लोकप्रियता मिळवली. राजश्री प्रॉडक्शनच्या या चित्रपटात रामेश्वरीने कम्मोची भूमिका साकारली होती.  चित्रपटाने देशभरातील चित्रपटगृहात रौप्य महोत्सव आणि सुवर्ण महोत्सव साजरा केला. यासह रामेश्वरी एका रात्रीतून स्टार बनल्या. चित्रपटाची कथा लोकांच्या अगदी आसपास घडणारी होती. कथेतील पात्रे देखील सामान्य लोकांतून घेतली  गेली आहेत असे दिसून येते.
 मदन पुरी, प्रेम किशन, इफ्तिखार, शशी कला, श्यामली, शिवराज, सुंदर, लीला मिश्रा, सविता बजाज, पिलू वाडिया, विजू  खोटे आणि जगदीप यांनी भूमिका साकारल्या होत्या. गाणे आणि रवींद्र जैन यांचे संगीतही मधुर आणि मधुरच...
सन १९७० च्या दशकातही, सावळ्या रंगाच्या मुलींना ‘स्टार मटेरियल’ मानलं जात नव्हतं. तथापि, जया भादुरीनं लहान वयात यश संपादन केल्याचा अनुभव प्रेक्षकांनी घेतला होता. रामेश्वरीने हिंदी चित्रपट क्षेत्रात करिअरची सुरुवात केली तेव्हा जया भादुरी-बच्चन यांनी अमिताभ बच्चन यांच्याशी लग्न करून स्वत: ला अभिनयापासून दूर केले होते. अशा परिस्थितीत  प्रेक्षकांना रामेश्वरीत जया बच्चनची  प्रतिमा  दिसू  लागली, असेही काहीजण सांगतात.
रामेश्वरी  यांनी  पूर्णपणे भारतीय सुसंस्कृत स्त्रीची  प्रतिमा स्वीकारली. त्याच्यात दर्शकांना  एक आदर्श मुलगी, एक आदर्श पत्नी आणि आदर्श सून अशी प्रतिमा दिसू लागली होती.  नशिबाने  मात्र फार काळ  साथ दिली नाही. एका चित्रपटाच्या छायाचित्रणादरम्यान  डोळ्याला  दुखापत झाली. यात एका डोळ्याचा आकार बदलला. या अपघाताने त्याच्या कारकिर्दीला ग्रहणच लागले. त्यांना चित्रपट मिळणे बंद झाले. मिळणाºया भूमिका सह अभिनेत्री म्हणून होत्या. मात्र, दुसरा मार्ग नव्हता. रामेश्वरीने परिस्थितीशी तडजोड करत मिळेल त्या भूमिका साकारण्यास सुरुवात केली. यात ‘आशा’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते.
रामेश्वरी यांनी तेलुगु चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. निर्माता के. विश्वनाथ यांचा १९७८  साली प्रदर्शित झालेला चित्रपट ‘सीतालक्ष्मी’ हा त्यांच्या कारकिर्दीचा क्लासिक चित्रपट मानला जातो. याशिवाय त्यांनी चिन्नो पेडडुडू, निझाम, नंदनवनम या तेलुगु चित्रपटांमध्येही आपली प्रतिभा दाखवली. ‘चिन्नो पेडडडू’ साठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा नंदी पुरस्कार देण्यात आला. लहान पडद्यावरील  कैरी, मितवा,  फूल  कमल के, जब लव लव, बाबुल का आंगन छोटा ना, पडोसी आणि चमत्कार आदी मालिकांतही  अभिनय साकारला आहे.
रामेश्वरी यांनी  वर्गमित्र आणि पंजाबी चित्रपटांचे अभिनेता-निर्माता दीपक सेठ यांच्याशी लग्न केले. त्यांना भास्कर प्रताप आणि सूर्य प्रेम अशी दोन मुले आहेत. रामेश्वरी यांनी आपल्या पतीसमवेत १९८८ मध्ये ‘हम फरिश्ते नहीं’ ची निर्मिती केली. त्यात अभिनय देखील केला. २००७ मध्ये शेक्सपियरचे नाटक द कॉमेडी आॅफ एरर्स’ वर आधारित पंजाबी चित्रपट देखील बनवला होता.
अभिनयापासून दूर होण्याबद्दल रामेश्वरी म्हणतात, की  चित्रपटांमधून निवृत्त झालेले नाही. अजूनही काम करण्याची आकांक्षा बाळगून आहे. निर्माता मला विसरले आहेत. चांगल्या अभिनयासाठी कोणत्याही औपचारिक प्रशिक्षणाची आवश्यक नसते, असा माझा विश्वास आहे. प्रतिभा  ही नक्कीच जन्मजात असते. प्रशिक्षण एखाद्याची प्रतिभा वाढवू शकते, ती निर्माण करू शकत नाही.


काही प्रमुख चित्रपट

दुल्हन वही जो पिया मन भाये (१९७७), मेरा  रक्षक (१९७८), सुनयना (१९७९), आशा (१९८०), मान अभिमान (१९८०), शारदा (१९८१), अग्निपरी
क्षा (१९८१), आदत से मजबूर (१९८१),इकरार,  ए न्यू हिस्ट्री, मान मर्यादा, भाई  का दुश्मन भाई, प्यारी भाभी , हम  फरिश्ते नहीं , कुछ  तुम कहो  कुछ  हम  कहें, बंटी आणि बबली. याशिवाय हिंदी आणि तेलगू व्यतिरिक्त मल्याळम, कन्नड, बंगाली, उडिया आणि भोजपुरी चित्रपटांमध्येही भूमिका केल्या आहेत.

लोकप्रिय गाणी

ले तो आये हमें सपनों की गाँव में, इन नजारों को तुम देखो, खुशियाँ ही
खुशियाँ दामन में जिसके, ऐ मेरे उदास मन, जहाँ प्रेम का पावन दियारा जले, तुने मुझे बुलाया शेरावालीये आदी अनेक गाणी त्यांच्यावर चित्रित झालेली आहेत.
© संजय इस्तारी मुंदलकर