Sunday, 25 September 2022

बाप, बाप होता है ...

 एका पित्याची निराशा खूप घातक असू शकते. दिवसभराच्या श्रमानंतर तो आपल्या बाळांना पाहताच खुश होतो अन् त्याचा थकवा क्षणात पळून जातो. म्हणूनच आपल्या मुलांच्या सुखासाठी तो जगातील सर्व दु:ख सहन करण्याची ताकद राखून ठेवतो. उत्तुंग आशावादी, विविध नात्यांचा शिल्पकार, त्यागी, वज्रमनाच्या आणि तेवढ्याच संवेदनशील नात्याला कुणी दु:ख देता कामा नये.


मागील दिवसांत मोबाईलवर समाज माध्यमातून आलेला एक संदेश वाचण्यात आला. तरुणपणी आणि मध्यमवयात माणसाने कितीही मोठ्या पदावर काम केले असले तरी म्हातारपणात तो अधिकारविहिन तर होतोच़ शिवाय कुटुंबांत अडगळीत पडलेला दिसून येतो. काही हजारांची पेन्शन हाती येत असेल तर बरे, अन्यथा त्याच्याच पत्नीला कुटुंबात असलेले स्थान त्याच्या वाट्याला येत नाही़ येथे त्याची पत्नी सुद्धा मुले आणि सुनांसोबत जुळवून घेताना दिसून येते़ कारण ‘हे’ गेले तर आपल्याकडे कोण लक्ष देणार? ही महत्त्वाची बाब वारंवार तिच्या डोळ्यांसमोर येत असते़ इकडे त्या व्यक्तीची पिता म्हणून महती कधीचीच विसरलेली असते़, असा त्या संदेशाचा काहीसा आशय होता.


वडिल, पिता, बाबा, अब्बा, वालिद अशा अनेक शब्दांचे एकच नाते, ज्यामुळे कुणाचेही आयुष्य पूर्ण होऊ शकत नाही. या पवित्र नात्याची अन्य नात्यांशी तुलना होऊ शकत नाही. बालपणी आपण वडिलांचे बोट धरून चालणे शकतो. त्याच्याच कुशीत सुख-दु:खात निश्चत असतो. लहानपणीचे सर्व हट्ट तोच पूर्ण करतो. चॉकलेट, खेळणीपासून ते लॅपटॉप, बाईक, कार आणि उच्चशिक्षणापर्यंतच्या सर्व मागण्या पूर्ण करणारा एक पिताच असतो. आज अशी वेळ आली, की या आधुनिक आणि धावपळीच्या आयुष्यात ( आणि ही धावपळ आणली कुणी, हा एक वेगळा विषय) मुलांजवळ आपल्या पित्यासाठी वेळ नाही. 


पिता हा ईश्वरासारखाच... जन्माबरोबरच या व्यक्तीशी आपला सामना होतो. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तो सोबत असतो. एक पिता आपल्या मुलांचा सर्वांत चांगला शिक्षक असतो. ही पिता नावाची सावली आपल्या मुलांसोबत सदैव असतो आणि त्यांच्याच सर्वांगीण उन्नतीसाठी आयुष्यभर झटत असतो.

याबाबत जाँर्ज हर्बर्ट यांचे एक सुंदर वाक्य आहे. ते असे, की एक पिता शंभर शाळामास्तरांपेक्षा मोठा असतो. तो आपल्या मुलांना नेहमी यशासाठी प्रोत्साहित करतो. एका पित्याचे हृदय नारळासारखे वरून कठोर आणि तितकेच आतून मुलायम आणि संवेदनशिल असते. जेव्हा मुले आपल्या मार्गावरून चुकीने बाजूला होण्याच्या स्थितीत असतात, त्याचवेळी हा पिता राग आणि प्रेमाने समज देऊन त्यांना सन्मार्ग मिळवून देतो.


एक समाजशास्त्रज्ञ म्हणतो, एका पित्याची निराशा खूप घातक असू शकते. दिवसभराच्या श्रमानंतर तो आपल्या बाळांना पाहताच खुश होतो अन् त्याचा थकवा क्षणात पळून जातो. म्हणूनच आपल्या मुलांच्या सुखासाठी तो जगातील सर्व दु:ख सहन करण्याची ताकद राखून ठेवतो. मातृपितृ भक्तीचे सुंदर उदाहरण आपल्या पुराणात दिसून येते. खांद्यावर मातापित्यांना तीर्थक्षेत्री घेऊन जाणारा श्रावण जेव्हा त्यांची तहान भागवण्यासाठी ओढ्यावर पाणी आणावयास जातो, त्याचवेळी  राजा दशरथाचा एक तीर त्याच्या शरीरात शिरतो. प्राण जाण्यापूर्वी तो दशरथाला विनवतो, की माझे माता-पिता तहानलेले आहेत. आपण त्यांच्यापर्यंत पाणी पोहोचून ते पाजा.  अशा या उत्तुंग आशावादी, विविध नात्यांचा शिल्पकार, त्यागी, वज्रमनाच्या आणि तेवढ्याच संवेदनशील नात्याला कुणी दु:ख देता कामा नये.


संजय मुंदलकर

(सर्वाधिकार सुरक्षित) 

Thursday, 22 September 2022

सहा लाखांची झोप

 झोपेत पडणारी स्वप्न माणसाच्या आरोग्याला महत्त्वाची आहे. या संदर्भात  निद्रा आणि  स्वप्न तज्ज्ञ डॉ. नायमन म्हणतात, की  माणसाची कार्यक्षमता, इच्छाशक्ती  आणि भावनिक यांचे  संगोपन आणि जोपासना स्वप्नांमुळे होते. स्वप्नविरहित  झोप  ही मोठ्या धोक्याचा इशारा आहे. 

मानवजातीला सर्वांत जास्त काय प्रिय असेल, ती झोप असते़ अगदी हक्काची  असणारी, कुठेही कधीही झोप काढणे शक्य जवळ जवळ शक्य असतेच. आणि  झोप काढून पैसे कमावता येत असेल तर...? मग मज्जाच मजा!असाच  काहीसा  प्रकार मागील दिवसांत घडला आहे. एका स्पर्धेतून बंगाली तरुणीला सर्वांत जास्त वेळ झोप काढल्याबद्दल चक्क  सहा  लाख रुपयांचे  बक्षीस  देण्यात आले. 

या स्पर्धेत तब्बल साडेचार  लाख स्पर्धकांनी भाग घेतला आणि पश्चिम बंगालमधील श्रीरामपूर(हुगळी) येथील त्रिपर्णा  चक्रवर्ती  हिने  सलग १०० दिवस  ९  तास  झोपून विक्रम केला आणि सहा लाख कमावले. याबाबत त्रिपर्णाने सांगितले, की  लहानपणापासूनच मला झोपण्याची  खूप आवड आहे. जेव्हा कधी झोप येते, तेव्हा मी बिनधास्तपणे झोप काढते. अनेकवेळा  परीक्षेच्या वेळीही झोपेचा अनुभव घेतला आहे...आता बोला!

त्रिपर्णाने आपण झोपाळू असल्याचा दावा केला असला तरी  माणसाची झोप कमी झाली असल्याचे अनेकदा सर्वेक्षणातून आढळून आले आहे. विशेष म्हणजे या झोपेचे आणि स्वप्नाचेही दूध-सायीचे नाते आहे. तणावाखाली झोपणाºया माणसाला स्वप्न  पडण्याचे प्रमाण कमी असल्याचे सांगण्यात येते.

स्वप्नं बघण्यात  वेळ वाया घालवू नकोस , असे माणसाला वारंवार कुटुंबाकडून सांगण्यात येते. (चक्क इशारा देण्यात येतो)  हातून  चूक झाली  की  झोपला होतास का किंवा झोपली होती काय, असा संताप व्यक्त होतो. सुस्त माणसाला ‘झोपाळू’ म्हणून  हिणवलेही जाते. थोडक्यात  म्हणजे  झोप  हा माणसाचा कायम शत्रू असल्याचे मनावर बिंबवले जाते. आता मात्र ही झोप आधुनिक जगातील माणसावर सूड घेत आहे. तंत्रज्ञान त्याच्या पायाशी लोळण घेत आहे. लक्ष्मी आणि  सुखसाधने  प्रसन्न  असली तरी झोपेने त्याच्याकडे पाठ फिरवली आहे. 

भारतात आणि जगात सुद्धा अपुरी झोप हा साथीचा आजार बनला आहे. सुरुवातीच्या दिवसांत यश, पैसा आणि उपभोग याकडे धावणाºया माणसाने झोपेकडे दुर्लक्ष केले. परिणामी तो ताण-तणावाच्या अंमलाखाली बिछाण्यावर पडतो, झोप मात्र कोसोदूर असते. गोळ्या घेतल्या तरच त्याला झोप येते. दुसरे असे की या कृत्रिम झोपेमुळे  त्याला  स्वप्न  पडेनाशी झाली आहे. झोपेत पडणारी स्वप्न माणसाच्या आरोग्याला महत्त्वाची आहे. या संदर्भात  निद्रा आणि  स्वप्न तज्ज्ञ डॉ. नायमन म्हणतात, की  माणसाची कार्यक्षमता, इच्छाशक्ती  आणि भावनिक यांचे  संगोपन आणि जोपासना स्वप्नांमुळे होते. स्वप्नविरहित  झोप  ही मोठ्या धोक्याचा इशारा आहे.  झोपेची उपेक्षा  माणसाला  फार महागात पडते.  हृदयविकार, रक्तदाब पोटाचे आजार असे आजार (झोपेच्या अभावामुळे ) मागे लागले आहे.

अन्नासाठी दाही दिशा फिराव्या तसे आधुनिक  माणसाला  झोपेसाठी  दहा डॉक्टरांकडे फिरावे लागत असून, मोठा खर्च होत आहे. निद्रानाशाच्या आजाराची साथ  जगात वणव्यासारखी पसरत असून, एकट्या अमेरिकेत  या दुखण्यावर दर वर्षी ५० ते १०० अब्ज डॉलर्स  खर्च होत आहेत.  झोपेच्या गोळ्या सर्वाधिक  खपाचे औषध बनले आहे. 

 ‘डाएट’चा बाऊ  करून  माणसाने खाण्या-पिण्यातील आनंद गमावला आहे. झोपेच्या भयामुळे  ही स्थिती निर्माण झाली आहे. झोप ही शरीराला आवश्यक विश्रांती आहे. कामधाम सोडून झोप काढली पाहिजे, असेही नाही. मात्र, दुपारी जेवणानंतर २० मिनिटांची झोप पुरते. रात्री  देखील ८ ते  ९ तासाची झोप सरसकट आवश्यक नसते. भुकेप्रमाणे  झोपेचे प्रमाण माणसागणिक भिन्न पातळीवर असते. एखाद्या माणसाला रात्री तीनचार तासांची झोपसुद्धा पुरते . तिच्याआधारे  तो दिवसभार वेगाने  काम करू शकतो. जाग  येताच क्षणी तरतरी वाटत असेल तर  पुरेशी झोप मिळाली आहे असे समजावे.   झोप ही बहात्तर दुखण्यांवरील  रामबाण इलाज आहे, असे  डॉ. नायमन निक्षून सांगतात.                               

संजय मुंदलकर

(सर्वाधिकार सुरक्षित) 

Tuesday, 20 September 2022

सण आणि कॉर्पाेरेट आयुष्य

 लोकांना चटक लावण्यात आली आणि पुढील कारस्थानी लोक लाळ घोळत घात लावून बसली आहेत आणि सावज टप्प्यात आले की तुमच्या ‘व्हाया मोबाईल’ बँकेच्या खात्यातून पैसा कायमचा चटका लावून कसा लंपास करतात, हे कळत सुद्धा नाही.  कारण आधुनिक होण्याचे, कॉर्पाेरेट  आयुष्य जगण्याचे भूत थयथय करत नाचत आहे. 


मागील  २० ते २५ वर्षांत  समाजातील काही वर्गांचे जीवनमान फार बदलून गेले़ काही घटकांचा जीवन आणि मरण यातील दरी बुजवणारी गरज ही मोजक्या लोकांचा शौक, बडेजावपणा, आकर्षण आणि देखावा बनली, हे दुर्दैव मानावे का? ताटातील  भाजीपोळीची  जागा आता मोबाईल, महाग कपडे, दागिने, एचडी टीव्ही, टॅब, संगणक, लॅपटॉप, एसी  आदींनी घेतली. पोट भरण्यासाठी अन्नाची गरज भासेनाशी झाली़ इतकेच  काय प्राणवायूही नकोसा झाला आणि तो मिळणार कुठून, कसा?   कारण प्रदूषणही  याच समाजाने, तुम्ही  आम्ही पसरवले़ सर्व कसे ‘आॅनलाईन’ झाले़ ‘आॅर्डर’ करताच  हाती  नव्हे  तर  पायाशी  लोळण घेण्याचा प्रकार वाढला़ अगदी चोवीस तास सर्व सेवा मोबाईलवर काही सेकंदांच्या ‘क्लिक-क्लिक’वर उपब्लध होत आहेत. 

आता तर समाजाच्या सणांची संकल्पनाच पार बदलून गेली़ सणसुद्धा प्रायोजित झाले़ होळी, पोळा, दसरा अशा सणांच्या माध्यमातून ते आपणास दिसून येते़ आता तर दिवाळीसण ‘कॉर्पाेरेट’ होण्याकडे निघालाय़ हा  सण पूर्वीसारखा साजरा होताना दिसून येत नाही़ वेब  पोर्टल्सनी सध्या आॅनलाइन  विक्रीचा धमाकाच सुरू केला आहे. आपल्या वेबसाईटवर जगभरातील ब्रँडचा भडिमार केला जात आहे़ प्रत्येक पोर्टल  ग्राहकाला आकर्षित करत आहे.  प्रसारमाध्यमातून  तर एक महिन्याभरापासूनच ‘आॅनलाईन’ खरेदीच्या  एकेक पानाच्या  जाहिराती सुरू होतात़ ज्याच्या त्या वाचनात आल्यात त्याचे हात मोबाईल, संगणकाकडे वळतात़ (कारण येथेही इंटरनेट, वायफाय तयार असतो़) ‘आॅनलाईन कंपन्या’ तर सज्ज झालेल्या असतात़ 

एके काळी केवळ  पुस्तक, कपडे, भेटवस्तू, ईलेक्ट्रॉनिक्स वस्तूवर असणारा कल, आज लाईफ स्टाईल साहित्यांकडे वळला आहे. मनातील भावना ईमोजीने गुंडाळून टाकल्या. मातापित्यांजवळ, मित्रांजवळ, नातेवाईकांजवळ भावना जाहीर करण्यास  शब्द आहेत; परंतु  ते व्यक्त करण्यास वेळ नाही़ कारण  इतरांसाठी आॅनलाईन उपस्थित राहायचे आहे. त्यातून कृत्रिम आशा-अपेक्षा पूर्ण करायच्यात़

 जो  तो आपले दैनंदिन आयुष्य ‘आॅनलाईन’मुळे कसे ‘स्मार्ट’ करता येईल, हा विचार करतो आहे़ दुचाकी, हातात स्मार्ट मोबाईल  आणि  अंगावर आकर्षक कपडे असले म्हणजेच ‘आयुष्य ’अशी नवी  संकल्पना उदयास  आली आहे़, मग हाताशी काम नसले  तरी  चालेल़  शिकार  असलेल्या  प्राण्याला चटक लावून  ‘स्लो  पॉयझन’ देत त्याची शिकार करणे, हा ‘कॉर्पाेरेट’  असे गोंडस  नाव असलेल्या कंपन्यांनी  व्यवसाय स्वीकारला  आहे़ ‘ग्राहकाचे  संतोष  हेच आमचे समाधान’ ही बाब केव्हाच मागे पडली़ आता तर आॅनलाईन कंपन्या मोबाईलऐवजी विटाचे तुकडे वा कपडे धुण्याचे साबण पाठवते आणि मग सुरू होतात, तक्रारी आणि तक्रारी...शेवटी  दोघेही  पोहोचतात कोर्टात़ 

 दुकानात जाऊन चार पैशांची घासाघीस  करीत वस्तू विकत घ्यायची, ही  पारंपरिक खरेदी घरातील डेस्कटॉपच्या विंडोमध्ये किंवा मोबाईलमध्ये  खुणावत  असली  तरी  त्याचे प्रमाण किती? देशातील किती लोकसंख्याकडे संगणक आहेत...इंटरनेट आहे़ जिथे अजूनही भूक मारली जाते, रोजगाराअभावी आत्महत्या होते़, पैसे नाही म्हणून शिक्षण नाही, दारिद्र्य-गरिबी पाठलाग सोडत नाही, तिथे आॅनलाईन आयुष्य, आॅनलाईन खरेदी कुठून येणार? 

लोकांना चटक लावण्यात आली आणि पुढील कारस्थानी लोक लाळ घोळत घात लावून बसली आहेत आणि सावज टप्प्यात आले की तुमच्या ‘व्हाया मोबाईल’ बँकेच्या खात्यातून  पैसा कायमचा चटका लावून कसा लंपास करतात, हे कळत सुद्धा नाही.  कारण आधुनिक होण्याचे ,कॉर्पाेरेट  आयुष्य जगण्याचे भूत थयथय करत नाचत आहे. 

शेवटी प्रश्न काही दिवसांच्या आयुष्याचाच आहे... आणि दसरा आणि दिवाळी सण काही आठवड्यांवरच येऊन ठेपला आहे.

संजय मुंदलकर

(सर्वाधिकार सुरक्षित) 

Monday, 19 September 2022

प्लास्टिकला नाहीच म्हणा ...

 सध्या पर्यावरणाचा नको तितका तोल ढासळला आहे. अर्थात हे सर्व नैसर्गिक असले तरी त्याला कारणीभूत आपण सर्व मानवजातच आहो. पृथ्वी नष्ट होण्याचा मार्गावर असताना तरी ही बाब आपण नाकारण्याचे धाडस करू शकणार नाही. ओला-कोरडा  दुष्काळ  (यात सर्व आले-पूर, महापूर, जीवघेणे तापमान आदी) हा प्रकार कुणी आणला, निसर्गाने तर नक्कीच नाही! ही कुºहाड आपण आपल्या पायावर मारून घेतली. जंगले तोडली, शेतजमिनी संपवल्या, नद्यांच्या प्रवाहात अतिक्रमण केले. रसायनाला अति महत्त्व दिले. जमिनी नापिक करून सोडल्या. पारंपरिकतेला तुच्छ लेखत सेंद्रिय खताला नामशेष केले. पावसाचे पाणी मुरायला जागा ठेवली नाही. या सर्वांचा परिणाम काय तो, आपण आपल्या अस्तित्वावर उठलो. 

आता नवीन संकट उभे ठाकले आहे़ आणि ते म्हणजे प्लास्टिक. पूर्वी आपल्या दैनंदिन कामात प्लास्टिकचा फारच कमी होत होता. साधारणत: कागदपत्रं ठेवणे, कपडे ठेवण्यासाठी उपयोग होत असे. मात्र, काही वीसेक वर्षांपासून या प्लास्टिक  कॅ रीबॅगचा  इतका वापर वाढला की तो मानवी वा जनावरांच्या जीवावर उठला आहे. प्लास्टिकाा पिशव्यांची  उपलब्धता वाढली आणि  हा  एक  सोपा पर्याय आहे, हे दिसून आल्यानंतर त्याच्या वापरापेक्षाही गैरवापरच अधिक वाढला, हे लक्षात येण्यास फार वेळ लागला. तोपर्यंत पाणी नाकातोंडात जावून गुदमरायला लागले होते.

प्लास्टिकच्या अतिवापरापेक्षा गैरवापरामुळे निसर्गाचे मोठे नुकसान होत आहे. आज  कॅ रीबॅगचा वापर ही गरज वा सोय कमी आणि स्टाईल अधिक बनली आहे. साध्या औषधाच्या गोळ्या घेतल्या तरीसुद्धा लोक  दुकानदाराकडे          कॅ रीबॅग मागतात आणि ती  दिली नाही, तर जोरजोरात भांडतात देखील. शेवटी दुकानदारही ग्राहक टिकवायचे असते म्हणून त्यांची मागणी पूर्ण करतात. बरेचदा  कॅ रीबॅग इतक्या पातळ असतात  की, घरी जाईपर्यंत त्या फाटतात आणि दुसºया दिवशी त्या कचºयासोबत उकिरड्यावर जातात. याचा दुष्परिणाम किती मोठ्या प्रमाणात होतो याचा विचार ना दुकानदार  करतात, ना तुम्ही आम्ही. सध्याच्या परिस्थितीत आपल्याकडे कचºयामध्ये सर्वात मोठी समस्या आहे ती प्लास्टिकच्या पिशव्यांचीच.

समुद्रात तर भरतीच्या वेळी कितीतरी टन कचरा किनाºयावर फेकला जातो. त्यात प्लास्टिक सर्वांधिक असते. मुंबईत ही बाब अनेकदा अनुभवास आली आहे. समुद्रकिनारी गावांमध्ये, शहरांमध्ये  समुद्राच्या पाण्याचा तळ प्लास्टिकने झाकलेला आहे, इतका प्लास्टिकचा वापर वाढलेला आहे. ही एका भीषण धोक्याला जन्म घालणारी गोष्ट आहे. याचा जीवसृष्टीवर-जलसृष्टीवर अतिशय प्रतिकूल परिणाम होतो. 

समुद्राच्या, नद्यांमध्ये राहणारे जलचर पाण्यात टाकलेले प्लास्टिक खाऊन नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. हे मृत प्राणी कापल्यानंतर त्यांच्या पोटात प्लास्टिक आढळल्याचे दिसून आले आहे. आपल्याकडे नदीत किंवा समुद्रात निर्माल्य टाकताना  तेही प्लास्टिक पिशवीसह टाकले जाते. घरातील  कचराही प्लास्टिक पिशवीमध्ये बांधून कचराकुंडीत   टाकला जातो. हा कचरा जी जनावरे खातात, त्यांच्या पोटात प्लास्टिक जाते. मोकाट फिरणाºया गायी किंवा म्हशींच्या पोटातून तीस-चाळीस किलो प्लास्टिकचे कागद काढण्यात आले आहेत. 

पूर्वी प्लास्टिकच्या पिशव्यांचा पर्याय नव्हता, त्यावेळी कापडी पिशव्या वापरल्या जात होत्याच ना? मग आता का होत नाही? याचे मुख्य कारण म्हणजे आज मोठमोठ्या मॉलमध्ये जाऊन खरेदी करून प्लास्टिकच्या पिशव्यांमधून सामान आणणे हे मोठेपणाचे लक्षण वा फॅ शन मानली जात आहे. अशावेळी मॉल्सवाल्यांनी वा दुकानदारांनी कापडी पिशव्यांचा पर्याय  निवडणे आवश्यक आहे. या कापडी पिशव्यांवर  त्यांना  त्यांची जाहिरातही करता येते. 

प्लास्टिक पिशव्यांना कापडी पिशव्यांचा वापर करणे हाच पर्याय आहे. प्लास्टिकचा वापर टाळणे हा एक पर्यावरणपूरक आणि  कालसुसंगत विचार आहे. पर्यावरणाच्या सुरक्षिततेचा विचार करून राज्याच्या पर्यावरण विभागाने प्लास्टिकवर बंदी आणली आहे, त्याला सर्वांनी पाठिंबा देणे, सहकार्य करणे अत्यंत गरजेचे आहे. कारण मानवी रक्तात  प्लास्टिकचा अंश मिळाल्याचे वृत्त वाचण्यात आले आहे.

Saturday, 20 August 2022

समाजद्रोहींकडूनच अपघात

वाहन उत्पादक  कंपन्यांनी ग्राहकांवर अधिक भार टाकत मासिक हप्त्यांनी सवलत दिल्याच्या दिवसांपासून आजतागत हा प्रकार सुरूच आहे. त्यावर आता तरी अंकुश बसणे अगदी काळाची गरज होऊन बसली आहे. रस्ते  आहेत तेवढेच आहेत आणि वाहतूक नियमांबाबतची बेफिकीरी वाढत आहे.


मृत्यू हा शाश्वत आणि सत्य. संपूर्ण जीवनमात्र त्याला स्वीकारतात ; परंतु सर्व काही सुरळीत सुरू असताना कुणाच्या तरी चुकीने आयुष्याचा अंत होतो़ ही बाब स्वीकारण्याजोगी नाहीच़ सध्या मानवजात नको तितकी ‘फास्ट’झाली आहे़ सर्व गोष्टी चुटक्यासरशी व्हाव्यात अशी ज्याची त्याची उपेक्षा असते आणि त्यासाठी त्याची कोणत्याही परिणामाला सामोरे जाण्याची तयारी असते. मग निसर्गनिर्मित असो वा मानवनिर्मित असो नियमांना पायदळी तुडविणे, हे फार शहाणपणाचे समजले जाते. त्यात प्राण गेला तरी बेहत्तर! असंच काहीसं सध्या होत आहे़ वाहनातून इच्छितस्थळी पोहोचण्यासाठी हा मानव पार नियम तोडत आहे आणि पदरी मात्र अपघाती मृत्यू ओढवून घेतोय. 

देशातील प्रत्येक मार्गावर अपघात होत आहेत़  रस्ता एकपदरी असो वा सहापदरी कोणताही जीव त्यावर सुरक्षित नाही़ कोणताही चांगला मार्ग वाहनांच्या सुरक्षित वेग ासाठी आणि प्रवासाचा वेळ कमी होण्यासाठी असला तरी सुरक्षिततेचा हेतू कधीच मागे पडला आहे. यापैकी अतिवेगाचा हेतू तर साध्य झाला;परंतु सुरक्षित आणि सुरळीत प्रवासाचा (वाहतुकीचा) हेतू साध्य झालेला आहे, असे ठाम सांगता येणार नाही. कारण रस्तोरस्ती अजूनही अपघातांची मालिका आहे.  भारतात रस्ते अपघातांचे प्रमाण मोठे आहेच़भरीसभर चार वा सहापदरी अशा अधिक रुंदीच्या रस्त्यांवरही असे अपघात वारंवार व्हावेत, हे मोठे दुर्दैवच म्हटले पाहिजे.

  अपघातांच्या मागे केवळ रस्ते हे एकमेव कारण नसल्याचे अनेकदा आढळून आले आहे. मानवी चुकाही अपघातास कारणीभूत ठरत आहेत. रस्ता कितीही सुरक्षित असला तरी तेवढे पुरेसे नाही. रस्त्यावरून जाणाºया वाहनांमध्ये किती प्रवासी (वा माल) कोंबावेत, वाहनचालकाने सलग किती तास ‘ड्रायव्हिंग’ करावी आणि वाहनाचा वेग किती असावा यावर सरकारने लक्ष ठेवावे,असे म्हणणे मूर्खपणाचे ठरेल.म्हणजेच अपघातांना इतर कारणांपेक्षा मानवी चुका अधिक कारणीभूत असल्याचे लक्षात येते. या चुकांची साखळी वाहतुकीची परवाने देण्यापासून सुरू होते, तिथून ती अतिवेगाने वाहने चालवण्याची प्रवृत्तीपर्यंत संपते. 

अगदी  बनावट परवाधारक चालकापासून वळणावर वाहन असताना मोबाईलवर बोलण्यापर्यंतची साखळी अपघाताला कारणीभूत ठरली आहे़ आज अशी स्थिती आहे की  परवाना असलेला चालक अ सो वा नसलेला चालक असो, दोघांनाही अन्य कुणाच्या जीवांची पर्वा नाही़ मोबाईल कानाशी ठेवत  वाहन चालवणारे समाजद्रोही अनेकदा पाहावयास मिळतात. ते  कदापिही वाहतुकीच्या नियमांबाबत दक्ष नसतात. वेगाची मर्यादा न पाळणे, भरधाव गाडी ‘लेन’ तोडून दुसºया ‘लेन’मध्ये घेणे अशा प्रकारातून ते अपघातास कारणीभूत ठरतात. मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर अशा प्रकारच्या अनेक दुर्घटना मानवी चुकांमुळे झालेल्या आहेत. भारतात रस्ते अपघातात मरणाºयांची संख्या मोठी आहे आणि त्यावरून भारतीय किती बेशस्त आहेत, यावर प्रकाश पडत असतो. या बेशिस्तीमध्ये बेफाम वेगाने गाड्या चालवणे,‘ओव्हरटेक’ करण्याची चुकीची पद्धत आदी बाबी प्रामुख्याने आढळतात.अनेकदा प्रवासीही चालकाला गाडी वेगाने चालवण्याबाबत प्रोत्साहित करत असतात. अशाप्रकारामुळे वेगाची ‘झिंग’ पूर्ण होत असली तरी हा आपल्या आणि वाहकाच्या जीवाशी खेळ असतो, ही जाणीव त्यांना नसते. भारतात वाहनांची संख्या वाढत आहे.  (वाहन उत्पादक  कंपन्यांनी ग्राहकांवर अधिक भार टाकत मासिक हप्त्यांनी सवलत दिल्याच्या दिवसांपासून आजतागत हा प्रकार सुरूच आहे. त्यावर आता तरी अंकुश बसणे अगदी काळाची गरज होऊन बसली आहे.) मात्र, रस्ते  आहेत  तेवढेच आहेत आणि वाहतूक नियमांबाबतची बेफिकीरी वाढत आहे. त्यामुळे  ‘सुरक्षित वाहतूक’ हे  आव्हान  समाजासमोर दिवसांगणिक बिकट  होत  चालले  आहे. कारण दुर्घटनांचा बळी हाच समाज ठरत आहे.

संजय मुंदलकर (सर्वाधिकार सुरक्षित) 

Friday, 12 August 2022

शब्दांना फुटले भाले ...

 यंदाच्या १५ आॅगस्ट  रोजी भारतीय स्वातंत्र्याने सुमारे ७५ वर्षे पूर्ण केलेली असतील़ आणि म्हणून देशभरात भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होणार आहे. घरोघरी तिरंगा ध्वज फडकविण्यात येणार असून, स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष स्मरणीय ठरावे, यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने संपूर्ण देश एक होणार असून, सर्वांचा सहभाग अभिप्रेत आहे. एकत्वाची ही भावना  भविष्यासाठी प्रेरणादायी  ठरेल, हे निश्चित!


भारताला गतवैभवाचा आणि स्वातंत्र्यलढ्याचा गौरवशाली परंपरा आणि इतिहास आहे. स्वातंत्र्यातील आनंद अनुभवताना पारतंत्र्याची बंधने झुगारून देत ज्यांनी या लढ्याला सशक्त   केले आणि त्यासाठी घरदारावर तुळशीपत्र ठेवले अशा असंख्य अनाम वीरांप्रति देशवासियांच्या मनात अभिमानाची भावना सातत्याने तेवत आहे. त्यांचा त्याग हा आपल्या प्रगतीचा जसा आधार आहे, तशी ती देशाला यशाच्या मार्गावर पुढे नेणारी प्रेरणादायी बाब आहे. 

देशाने मागील ७५ वर्षांच्या काळात विविध सरकार सत्तेत आली आणि देशाला विकासाच्या दिशेने चालत ठेवले़ या  मोठ्या कालावधीत  केलेली नेत्रदीपक प्रगती आपल्यासमोर आणि संपूर्ण जगासमोर आहे. आज  देश विज्ञान, तंत्रज्ञान, कला, कृषी, क्रीडा, शिक्षण, पायाभूत सुविधा, आरोग्य, अंतराळ, संरक्षण आदी विविध क्षेत्रात पुढे पुढे जात आहे. भारताने नव्या आणि उमेदीच्या काळात रस्त्यांचे जाळे विणत असतानाच रेल्वेमार्गाला प्राधान्य दिले. विमानाद्वारे सीमाही ओलांडल्या. शेतीला प्राधान्य देत असतानाच उद्योगांतून धूर सोडला. आणि सोबत विज्ञानही ठेवले. आजच्या घडीला आपल्यासोबत अन्य देशांनाही विकासाच्या दिशा दाखवत आहे. आणि जगाचे नेतृत्व करण्याची पात्रता आपल्या अंगी बाळगण्याचा दुर्दम्य आशावाद ठेवत आहे. या वाटेवरून आणखी उत्तुंग यशाकडे जाताना मागे  वळून  स्वातंत्र्य सैनिकांप्रति सन्मानाची भावना मनात राहणे हे सुद्धा देशगौरवासाठी तेवढेच महत्त्वाचे आहे. या निमित्ताने शाळा-महाविद्यालयांतून, विविध सामाजिक उपक्रमांतून त्यांचे कार्य नव्या पिढीपर्यंत  पोहोचणे अपेक्षित आहेत आणि त्यादृष्टीने उपक्रमही आयोजित करण्यात येत आहेत.

स्वातंत्र्यप्राप्तीच्या त्या दिवसांत शब्दांना भाले फुटले होते. ती शस्त्रांसारखी पाजळून निघाली होती, तर मौनांनाही शब्दांचे स्वरूप मिळाले होते. वंदे  मातरम् किंवा चले जाव या दोन शब्दांतून ठिगणी नव्हे,आग नव्हे तर वणवा भडकला होता. शब्दांची मर्यादा आणि त्याची प्राबल्य  काय असते, याचा प्रत्यय त्या काळात अनुभवास येत होता. तर, राष्ट्रपिता महात्मा गांधींनी मौनातून इंग्लिश सत्तेचा निषेध व्यक्त  केलेला. त्याच धर्तीवर तिरंगा हे सुद्धा एक प्रतिक... देशभक्तीचे, देशप्रेमाचे, समतेचे, एकतेचे, कर्तव्याचे आणि निष्ठेचेही.

तिरंगा ध्वजामागे राष्ट्रप्रेमाची, गौरवाची, अभिमानाची भावना आहे.  सीमेवर लढणारा जवानही तिरंग्यासाठी प्राण देण्यास तयार असतो. अंतराळात जाणाºया यानावर असलेला तिरंगा आपल्या मनात अभिमान निर्माण करतो. अशा  या आपल्या  तिरंगा  ध्वजाप्रति भावना व्यक्त करताना त्याचा सन्मान राखला जाईल याची दक्षतादेखील घ्यावी लागणार आहे.

अमृत महोत्सवाच्या निमित्ताने  सरकारने  ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम सुरू केला आहे.  या माध्यमातून तिरंग्याप्रति, भारतीय स्वातंत्र्याप्रति असलेली भावना घराघरातील तरुणाईपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न होत आहे.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशाच्या पुढील यशाची आणि गौरवाची पायाभरणी करणारा ठरावा अशी अपेक्षा आहे. त्यासाठी देशप्रेमाची ही ज्योत  मनात  सतत  तेवत आणि प्रज्वल ठेवावी लागणार आहे. आपली प्रत्येक सकारात्मक  कृती देशाच्या राष्ट्रध्वजाचा गौरव अधिक वाढवणारी ठरणार आहे. 

Sunday, 24 July 2022

अपघात टाळता येत नाही का?

 देशभरात आज दोन भीषण रस्ते अपघात झालेत. महाराष्ट्र आणि शेजारच्या मध्य प्रदेशात. आणि एकूण १९ जणांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिकस्तरावर सांगण्यात येत आहे. (यात बालकांचाही समावेश आहे)

मध्य प्रदेशातील इंदूरहून अमळनेरच्या दिशेने जाणारी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची (एसटी) बस धार जिल्ह्यातील खलघाट पुल तोडून नर्मदा नदीत कोसळली. या अपघातात १३ प्रवाशांचा मृत्यू झाला. आज सोमवारी सकाळी पावणे दहाच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे.

दुसरा अपघात अमरावती जिल्ह्यात परतवाडा- बैतुल (मध्य प्रदेश) मार्गावरील निंभोरा फाट्याजवळ भीषण अपघात झाला आहे. रविवारी रात्री उशिरा किंवा मध्यरात्रीनंतर दुचाकी आणि कार वाहनाच्या या अपघातात सहाजणांचा मृत्यू झाला आहे, तर एकजण जखमी आहे मृतांमध्ये बोदड,खरपी, बहिरम येथील नागरिकांचा समावेश असल्याचे वृत्तवाहिन्यांनी म्हटले आहे. दुचाकी आणि कारच्या अपघातात सहा जणांना जीव गमवावा लागला. अपघातानंतर प्रवाशांचे मृतदेह गाडीमध्ये अडकून होते, असे पोलिसांनी म्हटले आहे.

वरील दोन्ही घटनांत पावसाचा नक्कीच संबंध आहे. असे असले यात मानवी चुकांच मानता येईल. कारण कोणत्याही रस्ते पुलावरून वाहनाचा वेग कमी असावा, असा नियम आहे आणि ही बाब त्या बसचालकाला माहिती असावीच. त्यामुळे ही बस नक्कीच वेगात असावी. अन्यथा पुलावरील कठडा बुडापासून तुटला नसता.
दुसरे असे, की हा कठडा पूर्ण तुटला आहे. त्यामुळे त्याचे बांधकाम कच्चे होते, हे सिद्ध आहे.

अमरावती झालेल्या घटनेतही वेग कारणीभूत असू शकतो. अपघातानंतर प्रवाशांचे मृतदेह गाडीमध्ये अडकून पडणे आणि सकाळपर्यंत कुणालाच त्याबाबत न कळणे, यावरून दोन्ही वाहनांची मोठी धडक झाली असावी. जो कुणी जखमी असेल, त्यालाही अन्य कुणाशी संपर्क आलेला नाही, यावरून तोही गंभीर असावा.

सध्या पावसाचे दिवस आहेत. पाण्यामुळे रस्ते निसरडे होतात. रस्त्यात खड्डे असतील, तर त्याचा अंदाज येत नाही. तरीही वेगाचा हव्यास धरून मृत्यूपर्यंत पोहोचण्यास माणसाला घाई झालेली असते, असेच म्हणावे लागेल.

अनेकदा आपले वाहन अन्य वाहनावर धडकणार (अर्थात दिवसाच्या उजेडात) आहे, हे आपल्याला त्या अगोदर काही सेकंद कळलेले असते;परंतु ती घटना / अपघात का कुणास टाळता येत नाही. प्रामुख्याने ही बाब चालकाच्या मानसिकतेवर अवलंबून असते आणि न होणारी घटना होऊन जाते. याशिवाय अशावेळी संबंधित व्यक्ती वा वाहनातील इतरांना जोरदार मानसिक धक्का बसून हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते. (कारण अपघात म्हणजेच मृत्यू, ही मानवाची मानसिकता झालेली




आहे.) आणि किरकोळ वा गंभीर जखमा होऊन मृत्युमुखी पडतो. ही शक्यता बहुतांश वेळा नाकारता येत नाही. या संदर्भात एक बातमी वाचण्यात आली होती, की एका चारचाकी वाहनातील महिलेला अपघात पुढ्यात दिसत होता़ बचावाची कोणतीही स्थिती नसताना तिने आपले बाळ तत्काळ वाहनाबाहेर टाकले. घटनेत तिचा मृत्यू झाला;परंतु बाळ वाचले. सांगायचे असे की वाहनचालक वा अन्य व्यक्ती तत्कालिन काय निर्णय घेतात, त्यावरही अवलंबून असते.

संजय इस्तारी मुंदलकर

Monday, 28 March 2022

फक्त आणि फक्त वेशभूषातून अभिनय जगला ‘हा’ अभिनेता आणि गाठली मोठी उंची...

तळागाळातील माणसांसाठी कळवळा असणारा, अडल्या- नडल्याला सढळ हस्ते मदत करणारा, डॉ. राममोहन लोहियांबद्दल प्रचंड आदर असणारा, निर्मात्याला पैशांसाठी कधीही न नडणारा, असा हा ‘सज्जन खलनायक’ होता. सन २०१३ मध्ये अमेरिकेतील अनियतकालिकाच्या भारतीय एका आवृत्तीने हिंदी चित्रपटक्षेत्रातील २५ महान अभिनेत्यांची यादी तयार केली, त्यात निळू फुले यांचा समावेश होता.


डोक्यावर कडक तिरपी गांधी टोपी, अंगामध्ये  पांढरा झब्बा, काळे जाकिट, पांढरे शुभ्र धोतर, एका हाताने वर उचललेला सोगा,  पायात  कोल्हापुरी चपला, ओठावर मिशी, रस्त्यावरून चालताना व्यक्त केलेला मस्तवालपणा, अधून मधून तोंडातील तंबाखूची मारलेली पिचकारी, अशी एकूण वेषभूषा निळू फुले यांची राहायची़ ही काहीशी ठरलेली असायची, असेही म्हणता येईल़ कधीतरी ती कथानकानुसार ती बदलत जायची; परंतु खलनायकाचा सार त्यांच्या वेशभूषेतून समजून येत असे़ आणि निळू फुलेंच्या अभिनयाचे हेच यश होते. चेहºयावरील हावभाव, देहबोली आणि वेशभूषा यांतून अभिनयाने उंची कधीचीच गाठलेली असायची, संवाद तर दूरच राहिले. अशा आवेशात निळूभाऊंनी तब्बल २५० चित्रपट अभिनयाने परिपूर्ण केले. 




नीळकंठ कृष्णाजी फुले आणि नंतरच्या काळात फक्त निळू फुले़ ४ एप्रिल १९३० रोजी पुण्यात महात्मा जोतिबा फुले यांचा वारसा सांगणाºया घराण्यात त्यांचा जन्म झाला. स्वातंत्र्यसैनिक म्हणून चळवळीत भाग घेतला. राष्ट्रीय सेवादलाची बांधिलकी आयुष्यभर मानली. वयाच्या सतराव्या वर्षी आर्मी फोर्सेस मेडिकल कॉलेजमध्ये ८० रुपये पगारावर काम करतानासुद्धा दरमहा १० रुपये निळूभाऊ राष्ट्र सेवा दलाच्या व्यवस्थापनाला देत असे. पुस्तकांच्या वाचनाच्या छंदातून ते वगनाट्य, लोकनाट्याकडे वळले.


१९५७ मधील लोकसभा निवडणुकीच्या दिवसांत निळंूनी ‘येरा गबाळ्याचे काम नोहे’ नावाचे लोकनाट्य  लिहिले आणि ते तुफान गाजले. नंतरच्या काळात ‘कथा अकलेच्या कांद्याची’ चे दोन हजारांवर प्रयोग झाले. हा अभिनय बघून दिग्दर्शक अनंत  माने  यांनी निळूभाऊंना १९६८ मध्ये ‘एक गाव बारा भानगडी’मध्ये ‘झेल्या पाटील’ त्यांच्यावर सोपवला आणि येथूनच गावाकडचा अस्सल खलनायक (VILEN) जन्माला आला. त्यांचे कर्तृत्व आणि प्रसिद्धी, लोकप्रियता  अनेकांनी अनुभवली आहे. ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांच्या पहिल्या चित्रपटात अर्थात ‘सारांश’ मध्ये निळूभाऊंनी सत्तांध राजकारण्याची खलनायकी भूमिका केली होती. यातील एक दृश्य आठवा...अनुपम आपली पेर्इंग गेस्ट सुजाता हिला निळूंच्या घरी येऊन त्यांच्या मुलाशी प्रेमसंबंध असल्याचे सांगतात. यावेळी निळूंनी जागवलेला अभिनय पहा़ आपल्याला चक्क निळूंचा संताप येतो; परंतु ते त्यांच्या अभिनयाचे यश असते. याचवेळी भिंगरीतील निळू डोळ्यांसमोर आणा. आपल्यातील प्रेक्षक शांत होतो. असेच काहीसे मशाल, कुली ( भूमिका नथू मामा), वो सात दिन, सिंहासन, पिंजरा मोहरे अशा हिंदी-मराठी चित्रपटांविषयी सांगता येईल. 


दोन ध्रुवांचा अभिनय

‘सिंहासन’मधील मूक प्रेक्षक बनलेला पत्रकार, सत्तेच्या खेळामधील जीवघेण्या चाली बघून वेडा होणारा आणि सहकाराच्या चळवळीतून ओसाड रानामध्ये द्राक्षाचे बगिचे फुलवणारा ‘सामना’मधील सरपंच भाऊंनी  ताकदीने केला. मुक्काम पोस्ट ढेबेवाडीमधील दरोडेखोर, पिंजरामधील नाच्या (१९७३),या तर दोन ध्रुवावरील भूमिका. चोरीचा मामलामधील ललिता पवारबरोबरचा हातगाडीवालाही अविस्मरणीय ठरला. 


सन १९७३ ते ७५ अशी लागोपाठ तीन वर्षे त्यांना राज्य शासनाचे अभिनयाचे पारितोषिक मिळाले. यात हात लावीन तिथे सोने, सामना आणि चोरीचा मामला या चित्रपटांतील  अभिनयाची दखल घेण्यात आली होती. १९९१ मध्ये संगीत नाटक अकादमीचे पारितोषिक आणि ‘कला गौरव’सारखे अनेक पुरस्कार त्यांच्या नावे जमा झाले. केसरी मराठा ट्रस्ट, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद (पुणे शाखा) कडून त्यांचा सन्मान करण्यात आला. 

असा निळू कलावंत अचानक १३ जुलै २००९ रोजी वयाच्या ७८ व्या वर्षी आयुष्याच्या पडद्यावरून नाहीसे झाला. आता त्यांच्या उत्तुंग अभिनयाचा वारसा त्यांची कन्या गार्गी फुले थत्ते चालवत आहेत.


लेखन

संजय इस्तारी मुुंदलकर


सर्वाधिकार सुरक्षित

(लेखातील छायाचित्र गुगलवरून साभार)

 

Saturday, 26 February 2022

अभ्यास आणि झोप

नवे वर्ष आले की आपल्या सर्वांचे डोळे परीक्षांकडे लागलेले असते. परीक्षा कोणत्याही वर्गाची असली तरी अख्खे कुटुंब परीक्षार्थी बनलेले असतात. त्यात दहावी वा बारावीची परीक्षा म्हटली की उत्सुकतासोबतच घाईगडबड आणि काहीसा तणाव सुद्धा अनेक कुटुंबात दिसून येतो. इयत्ता नववीखालील परीक्षा साधारण: एप्रिलमध्ये असतात़ दहावी-बारावी मात्र फेब्रुवारी,मार्च महिन्यात असल्याने अनेक विद्यार्थी रात्री उशिरा जागरण न करता सकाळी उठून अभ्यास करत असतात. मात्र, यावेळी काहीशी थंडी असल्यामुळे पहाटे उठून अभ्यास करताना झोप येते. विद्यार्थ्यांचा अभ्यास कमी आणि झोपण्यातच जास्त वेळ जातो. या सगळ्यांचा परिणाम अभ्यास आणि निकालावर होत असतो. मात्र, पहाटे अभ्यासाच्या वेळी काही गोष्टी पाळल्यास झोप दूर पळवता येऊ शकते.



सकाळी उठल्यानंतर अनेक विद्यार्थी केवळ ‘स्टडी लॅम्प’च्या प्रकाशात अभ्यास करण्याचा प्रयत्न करतात. एक ठराविक जागा वगळता बाकीची खोली जवळजवळ अंधारातच राहते. या कमी प्रकाशात आणि शांत वातावरणात झोप लागणे स्वाभाविक आहे. अशा वेळी अभ्यासाच्या ठिकाणी प्रकाश मोठा ठेवल्यास झोप टाळता येते.


अनेकजण सकाळी उठल्यानंतर बिछाना अर्थातच बेडवर बसून अभ्यासाला सुरुवात करतात. मित्रांनो, यातून एक तर आळशीपणा येऊ शकतो किंवा झोपून हळूहळू वाचन सुरू केल्यास झोप येते. त्यामुळे अभ्यास करताना नेहमी खुर्चीवर किंवा भींतीला पाठ सरळ करून बसावे. समोर टेबल ठेवावा. पुस्तक मांडीवर न ठेवता समोरच्या टेबलवर असावे. बसण्याच्या स्थितीतही काही वेळाने हात किंवा पाय हलवत राहावे.


अभ्यासादरम्यान काही वेळाने पाणी प्यावे. हे आरोग्यासाठीच फायदेशीर ठरेल. यामुळे वारंवार उठून शौचालयात जावे लागले तरी ज्यामुळे शरीरातील निष्क्रियता कमी होण्यास मदत होते.


परीक्षेच्या काळात रात्री उशिरापर्यंत अभ्यास केल्यास सकाळी जागे होणे कठीण असते. थकलेल्या मनाने अभ्यास केला की पुन्हा पुन्हा झोप येते. अशावेळी चेहºयावर पाणी शिंपडावे. आळस दूर होतो आणि अभ्यास करण्यासाठी मन नव्याने सक्रिय होते.


अभ्यास करताना वरील काही गोष्टी पाळणे गरजेचे आहे.


बेस्ट लक...


संजय मुंदलकर

शिक्षण अभ्यासक

Wednesday, 9 February 2022

लता दीदींच्या ‘गांधर्व स्वरा’नेच चित्रपटांतील नायिकांना दिली प्रसिद्धी

लता दीदींनी गायिलेल्या गाण्यांतूनच भारतीय चित्रपटांतील नायिकांना फार मोठ्या प्रसिद्धीचे वलय, यश आणि वारेमाप पैसा मिळाला, ही बाब दुर्लक्षून आणि नाकारून कदापिही चालणार नाही. अनेकदा कथा दमदार वा अभिनय कसदार नसतानाही केवळ गाण्याने प्रसिद्धी मिळाल्याचा अनुभव देशातील हिंदी चित्रपटक्षेत्राने घेतला आहे़ दीदींच्या स्वरांनी कित्येक नायिकांच्या अभिनय प्रवासाचा मार्ग मोकळा केला, त्यांच्या यशाचा जो कळस उभा राहिला त्याचा पाया बनण्याचे महत्कार्य केले. जुन्या-नव्या पिढीतील नायिकांना आपला स्वर दिला आणि त्यांनाही यश मिळवून दिले. या नायिकांच्या कारकिर्दीत मैलाची दगड ठरलेली काही गाणी केवळ दीदींनीच दिली.






संगीत आणि गायनासाठी आपले सारे आयुष्य पणाला लावणाºया एकमेव म्हणजे लता दीदी मंगेशकर. दीदींनी अनेक विक्रम रचले. त्यांच्या ताना, हरकती आणि आवाजाची कोणालाही सर नाही आणि पुढेही नसेल. प्रत्येक गाण्यात त्या खरोखरच जीव ओतत होत्या. कधी गाण्यातून ममता दिसली, कधी एका प्रेयसीची प्रीती, कधी अल्लडपणा, कधी कारुण्य, कधी त्याच आवाजातून पराक्रमाची गाथा कानी आली. उस्ताद अमानत अली खान, अमानत खान देवासवाले, पंडित तुलसीदास शर्मा ही लता दीदींचे गुरू होते. याशिवाय त्यांनी संगीतकार अनिल बिस्वास यांच्याकडूनही प्रशिक्षण घेतले. 

कैक पिढ्यांसाठी लता दीदींचा आवाज म्हणजे एक संस्कार होता...आणि याच संस्कारातून भारतीय चित्रपटांतील कलाकारांना विशेषत: नायिकांना ओळख मिळाली. यात अभिनयाचा अधिक वाटा असला तरी लता दीदींनी गायिलेल्या गाण्यांतूनच भारतीय चित्रपटांतील नायिकांना फार मोठ्या प्रसिद्धीचे वलय, यश आणि वारेमाप पैसा मिळाला, ही बाब दुर्लक्षून आणि नाकारून कदापिही चालणार नाही. अनेकदा कथा दमदार वा अभिनय कसदार नसतानाही केवळ गाण्याने प्रसिद्धी मिळाल्याचा अनुभव देशातील हिंदी चित्रपटक्षेत्राने घेतला आहे़ विशेषत: नव्वदच्या दशकातील अनेक चित्रपटांबाबत बोलता येईल.


लता दीदींनी भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रत्येक संगीतकार आणि गायकासोबत गाणे गायिले आहे. याबाबत त्या पहिल्या गायिका ठरल्या आहेत, असे म्हटले तरी वावगे ठरू नये. दीदींनी देशातील प्रत्येक नायिकाला ओळख दिली़ अगदी १९४९ पासून तर आजतागतच्या अर्थात दोन हजार सालातील आजपर्यंतच्या कालावधीतील नायिकांना त्यांनी आपल्या स्वराने प्रसिद्धी मिळवून दिली. अगदी नर्गिस, मधुबाला, वहिदा रहमान, माला सिन्हा, हेमामालिनी, स्मिता पाटील, परवीन बाबी, झिनत अमान, रेखा, जया भादुरी, मीनाक्षी शेषाद्री, काजल, माधुरी दीक्षित, भाग्यश्री, राणी मुखर्जी या प्रत्येक पिढीतील नायिकांना दीदींनी आपला आवाज दिला़ तांत्रिकदृष्ट्या प्रत्येक गाण्याच्या छायाचित्रणात नायिका गाणे (आपले ओठ हलवत) गात असली तरी त्यामागे स्वर होता लता दीदींचा! ही गाणी सर्वसामान्य रसिकांंच्या ओठांवर रुळल्याने चित्रपटांतील नायिकांना पुढील चित्रपटांचा मार्ग मोकळा होत गेला.


‘प्यार हुआ इकरार हुआ’ हे गाणे निर्माता दिग्दर्शक अभिनेते राज कपूर यांच्या बरसात चित्रपटातील. यातील स्त्रीस्वर मात्र लता दीदींचा होता आणि ते गाणे लोकप्रिय ठरले़ अर्थात नायिका नर्गिस यांना त्याचा फायदा झाला. ‘आयेगा आनेवाला’ हे महलमधील रहस्यमय,रोमांचित करणारे गाणे मधुबाला यांच्यावर चित्रित करण्यात आले़ या गाण्याला फार मोठे यश मिळाले, तसेही नायिका मधुबाला यांनाही!


वैजयंतीमाला यांच्यावर चित्रित मधुमतीमधील ‘आजा रे मै तो..’ या सारखी अनेक गाणी अतिशय लोकप्रिय ठरली. ‘इन्ही लोगो ने...’, ‘मौसम है आशिकाना...’ पाकिजामधील गाण्यांबद्दलही हेच बोलता येईल. लता दीदींचा स्वर आणि मीनाकुमारी यांचे पदलालित्य यांची सरमिसळ होऊन त्याचा फायदा नायिकेलाच झाला. 


‘आ जाने जा...’ हे हेलन यांच्यावर चित्रित केलेले गाणे. इन्तकाममध्ये त्या नायिका नव्हत्या;परंतु दीदींच्या आवाजातील गाण्याने हेलन यांना लोकप्रिय केले. याच धर्तीवर समाधी चित्रपटातील ‘बंगले के पिछे...’ या गाण्याबद्दल बोलता येईल़ आशा पारेख यांना ओळख मिळवून देण्यात दीदींच्या या गाण्याचा महत्त्वाचा वाटा होता. ‘शर्मिली’ तील ‘खिलते है गुल यहाँ...’ने राखी यांना यश दिले. माला सिन्हा, हेमा मालिनी, रेखा, जया भादुरी यांच्याबद्दल हेच बोलता येईल. 


‘तेरे बिना जिंदगी से कोई सिकवा नही...’ या गाण्याने दीदींनी सुचित्रा सेन यांना प्रसिद्धीच्या झोकात आणले. ‘आ जा आयी बहार...’ मधून नायिका साधना यांना मोठे यश मिळाले. ‘एक प्यार का नगमा है...’ यातून नंदा यांना फायदाच मिळाला. नंतरच्या काळात डिम्पल यांना ‘हम तुम एक कमरे में बंद हो...’ या गाण्यातून दीदींचा अल्लड स्वर नायिकेलाही अनुभवता आला. शबाना यांना ‘हजार राहे मुडके देखी...’ या आणि अन्य गाण्यांतून मोठी प्रसिद्धी मिळाली. हेमामालिनी यांना ‘जिंदगी की ना टुटे लडी...’ नितीन मुकेश यांच्यासोबतच्या गाण्याने यशाचा मार्ग मोकळा झाला. नौशाद यांच्या संगीत निर्देशनातील ‘ऐ दिल ए नादान...’ या गाण्याबाबतही हेच बोलता येईल. मेरे नशीब में तू है के नही, ये मुलाकात एक बहाना या गाण्यांनी हेमा यांना स्वप्नसुंदरी होण्यास बाध्य केले, हे कसे नाकारता येईल.‘काँटो से खिचके ये आँचल...’ हे गाणे वहिदा रहमान यांच्यासाठी बनले होते की काय, असे नकळत वाटून जाते. ‘आशा’ मधील ‘शीशा हो या दिल हो...’ ने रिना रॉय यांना यशाची गोडी दिली. ‘रोटी, कपडा और मकान’ मधील ‘मैं ना भुलूंगा...’ने झिनत अमान यशाची पायरी चढल्या. 


१९८१ मधील ‘एक दुजे के लिये’ मधील ‘सोलह बरस की...’ या गाण्याने तर रती अग्निहोत्रीला रातोरात स्टारच्या रांगेत बसवले. ‘सिलसिला’ मधील ‘देखा एक ख्वाब तो...’ ने रेखाच्या यशात भरच टाकली. १९८५ मध्ये ‘राम तेरी गंगा मैली’ मधील सर्व गाणी मंदाकिनीच्या मोठ्या यशात सहभागी होती.


‘यारा सिली विरह का...’ आणि ‘दिल हूम हूम करे...’ या अनुक्रमे लेकीन आणि रुदालीमधून डिम्पल कपाडिया यांना नवी ओळख मिळाली. ही दोन्ही गाणी लोकसंगीतावर आधारित होती. संगीतकार भूपेन हजारिका यांनी संगीतबद्ध केली होती. दीदींचा आर्त स्वर आणि आतील हाक डिम्पलच्या अभिनयाला तारुन गेली, हे कसे विसरता येईल. याचप्रमाणे नुरीमध्ये पूनम ढिल्लो हिला सुद्धा ‘आ जा रे दिलबर आजा’ हे गाणे प्रसिद्धी देऊन गेले. 


नव्या पिढीत हम आपके है कौन आणि मैंने प्यार किया या दोन्ही चित्रपटांनी माधुरी दीक्षित आणि भाग्यश्री या मराठी नायिकांना यशाचा मार्ग मोकळा करून दिला. ‘दीदी तेरा देवर दिवाना...’, ‘बडा दुख देना तेरे लखन...’ या गाण्यांनी माधुरी दीक्षितच्या यशाचा मार्ग मोकळा केला होता. श्रीदेवीला सुद्धा त्यापासून दूर ठेवता येणार नाही़ हिम्मतवाला, चांदनी, नगिना, लम्हे यातून श्रीदेवीला मोठे नाव मिळाले. नाचे मयुरीमधील सुधा चंद्रन यांच्या अभिनयाला दीदींच्या गाण्यांची साथ मिळाली आणि त्या रातोरात स्टार बनल्या. ‘पत्थर के फुल’ मधील रामलक्ष्मण यांच्या गाण्यांनी दीदींनी रविना टंडनला रस्ता मिळवून दिला.


अन्य एक मराठमोळी पद्मिनी कोल्हापूरे यांच्या बाबतही हेच म्हणता येईल़ बालकलावंत पद्मिनी यांना ‘सत्यम् शिवम् सुंदरम्’ मधील ‘यशोमती मैया से...’ या गाण्याने अभिनय प्रवासाचा मार्ग मोकळा केला. प्रेमरोगमधील ‘ये गलिया ये चौबारा...’ आणि ‘प्यार झुकता नही...’मधील गाणी पद्मिनी कोल्हापूरे यांच्या यशातील पायरी बनली. ‘सौतन’ मधील ‘ जिंदगी प्यार का गीत है...’ हे गाणे पद्मिनी यांना तर ‘शायद मेरी शादी का खयाल...’ गाण्याने टीना मुनिमला यशावर पोहोचवले. दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे, दिल तो पागल है, दिल से, मोहब्बते या चित्रपटांतून दीदींनी काजल, राणी मुखर्जी, प्रीती झिंटा, ऐश्वर्या राय या नव्या पिढीतील नायिकांना आपला स्वर दिला आणि त्यांनाही यश मिळवून दिले. 


दीदींनी त्याग आणि समर्पणातून संगीत देवीची उपासना केली. त्यांना शतश: शतश: प्रणाम!


संजय मुंदलकर गीतकार

(छायाचित्र : साभार)



Tuesday, 1 February 2022

...आणि यात पालकच हरला

दोन तासांची उत्तरपत्रिका अर्ध्या तासापेक्षा कमी वेळेत पूर्ण केली जाते, यात त्यांच्या आकलनशक्तीचा वा बुद्धीचा वापर कसा होणार? अशा परीक्षाला आणि त्यातून मिळणाºया प्रमाणपत्राला भविष्यकाळात काय किंमत असेल हाही एक चिंतेचा विषय आहे. 

काल सोमवारी राज्यातील काही शहरात घडवून आणलेल्या  कथित आंदालनात विद्यार्थ्यांचा सहभाग होता. तो प्रकार कुणी आणि कसा अंमलात आणला यावर पोलिस हाय-टेक तपास करत आहेत. काहींना अटक करण्यात आली आहे; परंतु मूळ प्रश्न कायम आहे. हाताशी आलेल्या तंत्रज्ञानातून या विद्यार्थ्यांनी जसे आॅनलाईन शिक्षण घेतले, त्याच तंत्रज्ञानाने त्यांना शाळेच्याच बसवर दगडफेक करण्यास बाध्य केले.


इयत्ता बारावीसह दहावीच्या परीक्षाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. मग बारावीचा विद्यार्थी आपल्या घरात वा अभ्यासिकेत अभ्यासात व्यस्त असणे साहजिक होते़ त्याला पालकांनी वा मातापित्यांनी बाहेर कसे काय पडू दिले. याशिवाय कोरोना नियमांचेही बंधन होते़ तरीही त्यांनी जुमानले नाही़ नागपुरात जो काही प्रकार घडला, यात गरिबांचीही मुले होती़ मध्यमवर्गीयांचीही आणि श्रीमंत घरातीलही होती. झोपडपट्टीतील होती. एका चाळीतील वा डुप्लेक्समध्ये राहणारी होती. अशाप्रकारच्या कथित भडकावू आंदोलनात काही बरेवाईट झाले असते तर सर्वाधिक नुकसान कुणाचे झाले असते, हा विचार त्यांच्या पालकांनी केला नसावा काय? आणि मुळात आपल्या सतरा-अठरा वर्षांच्या मुलाचे वय आंदोलन करण्याचे वा त्यात सहभागी होण्याचे नाही, हे त्यांच्या माता पित्यांना समजले नसावे काय? 


राज्यात आॅनलाईन परीक्षाच्या मागणीसाठी जो काही प्रकार सुरू आहेत, तो अजिबात विद्यार्थ्यांच्या हिताचा नाही. घरी बसून आॅनलाईन परीक्षा घेणे वा देणे हा एक प्रकारे सामुहिक नक्कल (कॉपी) करण्याला उत्तेजन देण्यासारखा असेल. आॅनलाईन परीक्षा देताना विद्यार्थी गूगलचा वापर करून उत्तरे देतात, असा अनुभव आहे. दोन तासांची उत्तरपत्रिका अर्ध्या तासापेक्षा कमी वेळेत पूर्ण केली जाते, यात त्यांच्या आकलनशक्तीचा वा बुद्धीचा वापर कसा होणार? अशा परीक्षाला आणि त्यातून मिळणाºया प्रमाणपत्राला भविष्यकाळात काय किंमत असेल हाही एक चिंतेचा विषय आहे. 


अशा आंदोलनात आपला पाल्य सहभागी झाला आणि त्याच्यावर पोलिस प्रकरणे वा गुन्हे दाखल झाल्यास (अल्पवयीन म्हणून का होईना) तर त्याचे शैक्षणिकच काय, सार्वजनिक आयुष्य सुद्धा उद्धवस्त होईल. शिक्षण विभाग शक्यतोवर असे काही होऊ करणार नाही; परंतु जमावात (अशा झुंडीतील परिणाम भयंकर असतात.) दुखापत झाली अथवा कोरोना संसर्ग झाल्यास परीक्षापूर्वी दवाखान्यात उपचार घेत पडावे लागेल. मग शैक्षणिक वर्ष, पैसा आणि वेळ वाया जाईल़ त्यामुळे यापासून सर्वांनी सावध राहणे गरजेचे आहे.






देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मागील पाच वर्षांपासून देशभरातील विद्यार्थ्यांसोबत ‘परीक्षा पे चर्चा’ हा उपक्रम आयोजित करतात. परीक्षासंबंधी ताणतणाव दूर करण्याच्या आणि त्यांना एक पालक म्हणून मार्गदर्शन करण्याचा त्यांचा उद्देश असतो. यात नागपुरातील किती विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे? याचेही आत्मपरीक्षण, चिंतन होणे गरजेचे आहे.


राज्याची उपराजधानी नागपूर शहरात आयआयएम, ट्रीपल आयआयटी, लॉ युनिव्हर्सिटी, एम्स अशा प्रसिद्ध शिक्षण संस्था आहेत़ सोबतीला व्यवस्थापन क्षेत्रातील, अभियांत्रिकी, वैद्यकीय, आयटीआय, तंत्रनिकेतन अशा किती अभ्यासक्रमांच्या संस्था आहेत़ त्यांचा उपयोग कोण घेणार? त्यातील प्रवेशासाठी जोरदार यश मिळवण्यापेक्षा कोणते झेंगट या विद्यार्थ्यांनी आपल्या मागे लावून घेण्याचा निर्णय घेतला, हे समजण्या पलिकडे आहे. केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या अनेक शिक्षण-प्रशिक्षण संस्था नागपुरात आहे़ कोण घेणार त्याचा उपयोग? देशभरातील विद्यार्थी शेकडो किलोमीटर अंतरावरील विद्यार्थी आपल्या घराला, कुटुंबाला दूर ठेवत याठिकाणी शिकावयास येतो आणि आपला पाल्य हातात दगड घेऊन आपलाच सखासोयरा, भाऊबहिण, मित्र, नातेवाईकाला सुरक्षित शाळेत पोहोचवणाºया बसवर दगडफेक करतो, यात चुकला तो पालकच आणि हरला तो पालकच!


संजय मुंदलकर