दोन तासांची उत्तरपत्रिका अर्ध्या तासापेक्षा कमी वेळेत पूर्ण केली जाते, यात त्यांच्या आकलनशक्तीचा वा बुद्धीचा वापर कसा होणार? अशा परीक्षाला आणि त्यातून मिळणाºया प्रमाणपत्राला भविष्यकाळात काय किंमत असेल हाही एक चिंतेचा विषय आहे.
काल सोमवारी राज्यातील काही शहरात घडवून आणलेल्या कथित आंदालनात विद्यार्थ्यांचा सहभाग होता. तो प्रकार कुणी आणि कसा अंमलात आणला यावर पोलिस हाय-टेक तपास करत आहेत. काहींना अटक करण्यात आली आहे; परंतु मूळ प्रश्न कायम आहे. हाताशी आलेल्या तंत्रज्ञानातून या विद्यार्थ्यांनी जसे आॅनलाईन शिक्षण घेतले, त्याच तंत्रज्ञानाने त्यांना शाळेच्याच बसवर दगडफेक करण्यास बाध्य केले.
इयत्ता बारावीसह दहावीच्या परीक्षाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. मग बारावीचा विद्यार्थी आपल्या घरात वा अभ्यासिकेत अभ्यासात व्यस्त असणे साहजिक होते़ त्याला पालकांनी वा मातापित्यांनी बाहेर कसे काय पडू दिले. याशिवाय कोरोना नियमांचेही बंधन होते़ तरीही त्यांनी जुमानले नाही़ नागपुरात जो काही प्रकार घडला, यात गरिबांचीही मुले होती़ मध्यमवर्गीयांचीही आणि श्रीमंत घरातीलही होती. झोपडपट्टीतील होती. एका चाळीतील वा डुप्लेक्समध्ये राहणारी होती. अशाप्रकारच्या कथित भडकावू आंदोलनात काही बरेवाईट झाले असते तर सर्वाधिक नुकसान कुणाचे झाले असते, हा विचार त्यांच्या पालकांनी केला नसावा काय? आणि मुळात आपल्या सतरा-अठरा वर्षांच्या मुलाचे वय आंदोलन करण्याचे वा त्यात सहभागी होण्याचे नाही, हे त्यांच्या माता पित्यांना समजले नसावे काय?
राज्यात आॅनलाईन परीक्षाच्या मागणीसाठी जो काही प्रकार सुरू आहेत, तो अजिबात विद्यार्थ्यांच्या हिताचा नाही. घरी बसून आॅनलाईन परीक्षा घेणे वा देणे हा एक प्रकारे सामुहिक नक्कल (कॉपी) करण्याला उत्तेजन देण्यासारखा असेल. आॅनलाईन परीक्षा देताना विद्यार्थी गूगलचा वापर करून उत्तरे देतात, असा अनुभव आहे. दोन तासांची उत्तरपत्रिका अर्ध्या तासापेक्षा कमी वेळेत पूर्ण केली जाते, यात त्यांच्या आकलनशक्तीचा वा बुद्धीचा वापर कसा होणार? अशा परीक्षाला आणि त्यातून मिळणाºया प्रमाणपत्राला भविष्यकाळात काय किंमत असेल हाही एक चिंतेचा विषय आहे.
अशा आंदोलनात आपला पाल्य सहभागी झाला आणि त्याच्यावर पोलिस प्रकरणे वा गुन्हे दाखल झाल्यास (अल्पवयीन म्हणून का होईना) तर त्याचे शैक्षणिकच काय, सार्वजनिक आयुष्य सुद्धा उद्धवस्त होईल. शिक्षण विभाग शक्यतोवर असे काही होऊ करणार नाही; परंतु जमावात (अशा झुंडीतील परिणाम भयंकर असतात.) दुखापत झाली अथवा कोरोना संसर्ग झाल्यास परीक्षापूर्वी दवाखान्यात उपचार घेत पडावे लागेल. मग शैक्षणिक वर्ष, पैसा आणि वेळ वाया जाईल़ त्यामुळे यापासून सर्वांनी सावध राहणे गरजेचे आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मागील पाच वर्षांपासून देशभरातील विद्यार्थ्यांसोबत ‘परीक्षा पे चर्चा’ हा उपक्रम आयोजित करतात. परीक्षासंबंधी ताणतणाव दूर करण्याच्या आणि त्यांना एक पालक म्हणून मार्गदर्शन करण्याचा त्यांचा उद्देश असतो. यात नागपुरातील किती विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे? याचेही आत्मपरीक्षण, चिंतन होणे गरजेचे आहे.
राज्याची उपराजधानी नागपूर शहरात आयआयएम, ट्रीपल आयआयटी, लॉ युनिव्हर्सिटी, एम्स अशा प्रसिद्ध शिक्षण संस्था आहेत़ सोबतीला व्यवस्थापन क्षेत्रातील, अभियांत्रिकी, वैद्यकीय, आयटीआय, तंत्रनिकेतन अशा किती अभ्यासक्रमांच्या संस्था आहेत़ त्यांचा उपयोग कोण घेणार? त्यातील प्रवेशासाठी जोरदार यश मिळवण्यापेक्षा कोणते झेंगट या विद्यार्थ्यांनी आपल्या मागे लावून घेण्याचा निर्णय घेतला, हे समजण्या पलिकडे आहे. केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या अनेक शिक्षण-प्रशिक्षण संस्था नागपुरात आहे़ कोण घेणार त्याचा उपयोग? देशभरातील विद्यार्थी शेकडो किलोमीटर अंतरावरील विद्यार्थी आपल्या घराला, कुटुंबाला दूर ठेवत याठिकाणी शिकावयास येतो आणि आपला पाल्य हातात दगड घेऊन आपलाच सखासोयरा, भाऊबहिण, मित्र, नातेवाईकाला सुरक्षित शाळेत पोहोचवणाºया बसवर दगडफेक करतो, यात चुकला तो पालकच आणि हरला तो पालकच!
संजय मुंदलकर