Tuesday, 17 March 2020

लोहार सुतार समाजाला संजिवनी  मिळावी...


आजच्या  परिस्थितीत बारा बलुतेदार वर्गातील जनता अगदीच मागासलेली राहिली आहे. त्या सर्वांचे  पारंपरिक  व्यवसाय यांत्रिकीकरणाने गिळंकृत केले आहे, पूर्णपणे मोडकळीस आलेले आहेत. त्यामुळे त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचे मोठे संकट उभे ठाकले राहिल्याचे दिसून येते.

ग्रामीण भागामध्ये पारंपरिक व्यवसायातून आपली कलाकुसर दाखवून त्यातून मिळालेल्या उत्पन्नातून आपला प्रपंच कसाबसा चालवत असे; परंतु  आधुनिकतेच्या नावाखाली यांत्रिकीकरणाचा  राक्षस बलुतेदारांपुढे उभा केला आहे. त्यामुळे त्यांचे व्यवसाय  कालबाह्य झाले, तर काही होण्याच्या मार्गावर आहेत. परिणाम असा झाला, की अनेक बलुतेदारांवर उपासमारीचे संकट उभे राहिले. शिक्षणाचा प्रश्न तर दूरवर राहिला.
 बलुतेदारांमध्येच पूर्वी समावेश असलेले मातंग व चांभार यांना शासनाने स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ देऊ केले खरे;परंतु त्यांनाही हव्या तशा सुविधा पुरवण्यात शासन प्रशासनाकडून पुरवण्यात येत  नसल्याचे दिसून येते. खºया अर्थाने शासनच काय पण प्रत्येक गावात, तालुक्यात, जिल्ह्यात राजकारण करताना लोकप्रतिनिधींच्याही  नजरेस बलुतेदारांची जगण्यासाठीची धडपड दिसते. त्यांचे हलाखीचे जीवन, व्यवसायांना लागलेली घरघर, खुंटलेला विकास हे सर्व काही  उघड्या  डोळ्यांनी  दिसून येते़ मात्र, त्याकडे राजकीय मंडळी जाणीवपूर्व दुर्लक्ष करीत करीत असतात. बलुतेदार घटकांची लोकसंख्या काही अपवाद सोडला, तर कित्येक गावांमध्ये बोटावर मोजण्याइतकीच असते. नेमका याच गोष्टींचा फायदा घेत  निवडणूक जिंकली जाते. बलुतेदारांमध्ये प्रामुख्याने लोहार, सुतार, सोनार, परिट ( धोबी), कुंभार, न्हावी, शिंपी, साळी,जोशी आदींची मिळून महाराष्टÑामध्ये जवळपास पाच कोटींच्या आसपास लोकसंख्या आहे.  मात्र, या लोकसंख्याचा वापर राजकारण्यांकडून फक्त निवडणुकीतील मतांपुरताच केला जातो.  निवडणूक  आली  की, आम्ही   बलुतेदारांसाठी  हे  करू, ते करू अशा भुलथापा मारून मते मिळवण्यात यशस्वी होतात. त्यानंतर मात्र दिलेल्या आश्वासनांचा दुसºया निवडणुकीपर्यंत विसर पडलेलाच दिसून  येतो.
लोहार आणि सुतार हा समाज त्यापैकीच  एक.  राजाच्या दरबारी लोहाराला विशेष स्थान होते. युद्धसंपन्न अशा शस्त्रागाराचा भार त्याच्या डोक्यावर असे. मान-सन्मान होता़ लढाईतील विजयाचा  विशेष वाटा  लोहाराचा असे. कधीकाळी श्रीमंती भोगणाºया या समाजाची आर्थिकस्थिती काळानुरूप बदलत गेली. उद्योगधंद्यांना उभारी देण्यात अग्रक्रमावर असलेल्या लोहार समाजाला संजीवनी देण्याची गरज आहे. उद्योगासाठी त्याच्यातील गुणकौशल्याचा वापर करून  घेण्यासाठी  संधी निर्माण करणे ही प्रशासनाची जबाबदारी असून या समाजाला  एखाद्या केंद्रीय  संस्थेशी जोडणे  काळाची  गरज  बनलेली आहे.  सुतार समाजाचेही तसेच झाले. एखाद्या लाकडातून किती सामान गवसेल? कोणत्या लाकडाचं आयुष्य किती? असा अंदाज वाढीबुवा हात लावून सांगायचा. कोणते शास्त्र होते त्याच्याजवळ, माहिती नाही. आता त्याच्या अंगभूत गुणांचे  काय झाले? त्याच्या व्यवसायावर ‘फर्निचर’ने अतिक्रण केले. प्लायवूड, सनमायका, फोरमायका या सारख्या बाजारात  सहज मिळणाºया  गुळगुळीत अन् चकचकीत सामानामुळे वाढीबुवाच्या  पोटापाण्याचा प्रश्न आणखी जटील बनला. आता तर अन्य समाजानेही त्याचा व्यवसाय ताब्यात  घेतल्याचे दिसून येते़ कधी संपूर्ण गावाची गरज भागवणारा हा समाज आता परागंदा झाला आहे, हे वास्तव पुसता येत नाही. मुळातच या समाजाला केवळ शिक्षण सुविधाच नाही तर त्याच्यातील कौशल्याचा, कलाकुसरीचा उपयोग करून घेणे गरजेचे आहे. आणि त्यासाठी त्याला  उद्योगात स्थान देणे, रोजगार देण्याचे कर्तव्य आता सरकारला, प्रशासनाला पार पाडावयाचे आहे. त्यामुळे  या  बांधवांसाठी ‘लोहार सुतार आर्थिक विकास महामंडळ’ अशा  अशी प्रशासकीय संस्था निर्माण करावी. विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी वसतिगृहाची निर्मिती, शिष्यवृत्ती, समाजातील ज्येष्ठांना निवृत्तीपेन्शनची व्यवस्था अशा काही मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार होणे अपेक्षित आहे़   याशिवाय परिट(धोबी) चांभार, कुंभार, न्हावी  या प्रमुख समाजघटकांतील बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.         
या संदर्भात विश्वकर्मा लोहार सुतार विकास परिषद, नागपूर यांनी काही प्रमुख मागण्या पुढे केल्या आहेत. देशात श्री विश्वकर्मा जयंतीला सार्वजनिक सुट्टी जाहीर व्हावी, महाराष्ट्र राज्यस्तरावर लोहार सुतार आर्थिक उन्नती महामंडळाची निर्मिती करण्यात यावी (याद्वारे दीर्घ मुदतीचे आणि कमी व्याजाचे कर्ज अपेक्षित), उपराजधानीतील एमआयडीसीमध्ये उद्योगनिर्मितीसाठी  दीर्घ लीजवर जागा देण्यात यावी, राजधानी मुंबई आणि उपराजधानीत अधिवेशन काळात समाजातील कारागिरांच्या साहित्याचे प्रदर्शन आणि विक्रीस प्रोत्साहन द्यावे, समाजबांधवांना मोफत किंवा ना नफा ना तोटा या  तत्त्वावर लाकडाचे वितरण करावे, राज्यातील महत्त्वाच्या शहरात वसतिगृहाची  निर्मिती करण्यात यावी, लोहार सुतार समाजातून एका व्यक्तिची विधानपरिषदेत नियुक्ती करावी, केंद्र सरकार वा राज्य  सरकारच्या  मालकीच्या कारखान्यांकडून समाजाला लोखंडाचा स्वस्त दरात पुरवठा व्हावा आदींचा यात समावेश आहे.

©संजय इस्तारी मुंदलकर

Sunday, 15 March 2020

वाहतूक नियमांबाबत समाज संवेदनशील नाहीच...


वाहतूक व्यवस्था अपुरे रस्ते आणि वाढत्या गाड्या यामुळे फारच विस्कळीत झाली आहे. त्यात परत वाहतूक नियम न पाळणाºयांची फार मोठी आहे. अगदी तरुण मुले, मुली, काका, काकू ते पार वयस्कर लोकांपर्यंत सर्व वयोगटातील माणसे सिग्नल तोडत असतात. सिग्नल बदलायला १० सेकंद उरली असली तरी लोकं मागून हॉर्न वाजवतात जणू काही आपण सिग्नलची वाट पाहणे हा गुन्हा आहे. अनेकदा या अगदी क्षुल्लक कारणावरून वाद होत असल्याचा अनुभव येत असतो.

वाढत्या शहरीकरणामुळे शहरातील वाहतूक समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. रस्त्यांची दूरवस्था, वाहनांच्या संख्येत झालेली प्रचंड वाढ व शिस्तीचा अभाव  आदीमुळे भारतातील  सर्व मोठ्या शहरांत जलद आणि सुरक्षित प्रवास करणे कठीण झाले आहे. परदेशात याउलट परिस्थिती आढळते. उत्तम रस्ते, सुस्थितीतील अत्याधुनिक वाहने व नियमांची काटेकोर अंमलबजावणी यामुळे तेथील प्रवास जलद आणि सुरक्षित होणे सहज शक्य होते. अर्थात परदेशात लोकसंख्या भारताच्या मानाने खूप कमी आहे. ते देश सधन असल्याने त्यांना रस्ते बांधणी व त्यांची योग्य निगा राखणे जमू शकते.

आपल्याकडे पायी चालणारे, हातठेले, बैलगाडीसारख्या हळू चालणाºया वाहनांपासून ते जलद धावणाºया दुचाकी, जीप, मोटारी, ट्रक, ट्रॅक्टर, कंटेनर, सीमेंट वाहून नेणारी अवजड वाहने एकाच रस्त्याचा वापर करीत असतात. साहजिकच वाहतूक व्यवस्था प्रभावी होते.त्यातच वाहने थांबविण्याच्या जागा मर्यादित असल्याने व रस्त्यावरील अतिक्रमणे व फेरीवाले यामुळे ही परिस्थिती अधिकच अवघड होते. साहजिकच शहरात राहणाºया लोकांना वाहतूक समस्येचा फार त्रास होतो. शिवाय प्रदूषणामुळे त्यांच्या आरोग्यावरही परिणाम होतो. तरीही नोकरी धंद्यासाठी शहरातील वाहतुकीचा हा त्रास सहन करण्याशिवाय सर्वजण हतबल आहेत.

रस्त्यावर सर्वाधिक कोण...
आपण अनेकदा बोलून जातो की रस्त्यांवर गर्दी अधिक आहे. भरदुपारी काम करणारी मंडळी आपापल्या कार्यालयात असेल, तर ही रस्त्यांवरील मंडळी कोण आहे. तर यात सर्वाधिक संख्या ही रिकामटेकड्यांची आहे. ज्यांना काहीही काम नाही आणि यात सर्वात प्रमाण हे गुन्हेगारांचे आहे. ही मंडळी आपले सावज टिपत असतात. यात तरुणांचा अधिक भरणा दिसून येतो. यात बेरोजगारही आहे. याशिवाय मार्केटिंगच्या नावावर अनेकजण रस्त्यांवर असतात...त्यांची वाहने रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा होईल, अशापद्धतीने ठेवलेली असतात.  काहीजण नुसतीच फिरायला आलेली असतात. काही ग्राहक असतात, काही दुसºया शहरातून आलेली असतात. या सर्वांची वर्गवारी केली तर समाजातील एक छुपी बेरोजगारी आपल्याला दिसून येते. [ हा एक वेगळा विषय असला तरी त्याचा संबंध रस्ते अपघातासोबत आहेच ]




माहिती तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे या बिकट समस्येवर अगदी वेगळ्या प्रकारचा अभिनव उपाय सापडेल अशी आशा निर्माण झाली आहे. माणूस प्रवास कशासाठी करतो. नोकरीधंद्यानिमित्त आॅफिस वा दुकानात  जाण्यासाठी, शिक्षण, वैद्यकीय उपचार अशांसारख्या सुविधा घेण्यासाठी, बाजारहाट करण्यासाठी, इतर व्यक्तींना भेटण्यासाठी वा प्रत्यक्ष वास्तू , परिस्थिती वा निसर्ग पाहण्यासाठी. या व अशाप्रकारच्या सर्व कामांसाठी भविष्यात प्रत्यक्ष प्रवास करण्याची जरूर भासणार नाही. घरबसल्या या सर्व गोष्टी संगणकाच्या माध्यमातून आपल्याला साध्य करता येतील. यातील बºयाचशा गोष्टी परदेशात तसेच आपल्या देशातही यशस्वीरीत्या राबविण्यास सुरवात झाली आहे.

 मोबाईल, फोन व इंटरनेटच्या साहाय्याने जगातील कोणत्याही संपर्क साधता येऊ लागला आहे व माहितीची देवाण घेवाणही करणे सहज शक्य झाले आहे. परदेशात अनेक ठिकाणी घरबसल्या आॅफिसचे काम करण्याची सुविधा कंपन्यांनी आपल्या कर्मचारी वर्गाला देऊ केली आहे. वेगवेगळया गावात राहणाºया व्यक्ती आता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे एकत्र चर्चा करू शकतात. वेबसाईटवरून दुकानदार आपल्या वस्तू जगभरातील गरजू ग्राहकांना दाखवू शकतो. अशा अनेक वेब दुकानांतून फेरफटका मारून आपण क्रेडीट कार्डद्वारे पैसे देऊ न आपल्या पसंतीची खरेदी करू शकतो.

भविष्यात  प्रत्यक्ष उपचार, इंजेक्शन वा  आॅपरेशन वगळता बाकी सर्व वैद्यकीय सल्ला आॅनलाईन घेता येईल. औषधीही घरपोच मिळतील. लग्न ठरविणे, घर पाहणे, कारखाना, प्रत्यक्ष प्रक्रिया वा कार्यक्रम पाहणे, भेट देणे  आदी कामे इंटरनेटच्या साहाय्याने  करता येतील. केवळ करमणूक म्हणून वा सहलीसाठी प्रवास करतील. अर्थात वस्तूंची निर्मिती करणे, प्रक्रिया करणे त्याची वाहतूक करणे, संरक्षण वा ज्याठिकाणी प्रत्यक्ष उपस्थिती आवश्यक असते अशा व्यवसायातील व्यक्तींना प्रवास टाळता येणार नाही. भारतात इंटरनेटचा प्रसार वेगाने होत आहे. इंटरनेटच्या सुविधांसाठी लागणाºया खर्चातही झपाट्याने घट होत आहे. 


दुसरीकडे समाजविघातक समस्याही या इंटरनेटने निर्माण केल्या आहेत. हे विसरून चालणार नाही आणि या सगळ्या गोष्टींचा वाहतुकीशी संबंध जोडावा, अशी स्थिती तरी नाही. आपल्या देशात संगणक क्षेत्रातील तज्ज्ञ मनुष्यबळाची कमतरता नाही. मात्र, त्याचे योग्य व्यवस्थापन होत नाही. आपण अजूनही काळाची पावले ओळखली नाहीत़, हे फार मोठे दुर्दैव आपल्या समाजाचे आहे आणि  त्यातून विविध अडचणी, समस्या निर्माण होतात. समाज निकोप, सुरक्षित तरच देश बलशाली, हे सूत्र कायद्याने शिकवण्याची गरज नाही, हे ज्या दिवशी सर्वांना समजेल, तो दिन सोन्याचा असेच म्हणावे लागेल.

महामार्गावरील अपघातांची कारणे

* जड वाहनांच्या चालकाने २४ तासांतून किती वेळ वाहन चालवावे, यावर बंधन नाही
* वाहनांना थांबण्यासाठी मोठ्या प्रमाणात ‘सब वे’ चा अभाव
* लांब पल्ल्याच्या वाहनचालकांना आराम करण्यासाठी सोय नाही
* मोठ्या वाहनांकडून पहाटेच्या सुमारास अपघात होतात. याबाबत जागृती नाही
* वाहनचालकाची झोप न होणे हेही मुख्य कारण
* अपघातग्रस्त वाहनांच्या दुरुस्तीसाठी सोय जवळजवळ उपलब्ध नसणे


संजय इस्तारी मुंदलकर

© NITYAAYAN

जादुई स्वरांची मल्लिका:भारतरत्न लता मंगेशकर



लता मंगेशकर...भारताच्या गानकोकिळा...भारतातील सर्वोच्च सन्मान ‘भारतरत्न’ मिळवणाºया दुसºया गायिका आहेत.  त्यांच्या अजरामर गाण्यांनी जवळपास सात दशके रसिकांना भुरळ घातली आहे. त्यांच्या  नावाची दखल गिनीज बूक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्येही घेतली गेली आहे.  चित्रपटसृष्टीतील मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कारानेही लतादीदींना गौरवण्यात आले आहे. लतादीदींचा हा सांगितिक ठेवा वेगवेगळ्या प्रकारच्या गाण्यांनी समृद्ध आहे. आजवर २० भारतीय भाषांत त्यांनी गाणी गायली आहेत. केवळ भारत नव्हे तर जगभरातील रसिकांवर त्यांची मोहिनी आहे.


लतादीदींचा जन्म २८ सप्टेंबर १९२९ रोजी इंदोरमध्ये पंडित दीनानाथ मंगेशकर यांच्या सांगितिक वारसा लाभलेल्या कुटुंबात झाला. दीनानाथांची नाटक संस्था होती. ते स्वत:ही उत्तम गायक होते. लतादीदींना वडिलांकडूनच संगीताचे प्रशिक्षण मिळाले. अमान अली खाँ साहेब आणि अमानत खान यांच्याकडेही लतादीदींनी संगीताचे धडे गिरवले. घरातून संगीताचा वारसा आणि गुरुकृपा यामुळे लतादीदींसारख्या हिºयाची  झळाळी  वाढण्यास कितीसा वेळ लागणार? मात्र त्यालाही दृष्ट लागली. दीनानाथांचे १९४२ मध्ये निधन झाले आणि घराचा सर्व भार त्यांच्या खांद्यावर आला. वडिलांच्या निधनानंतर लतादीदींसाठी गाणे केवळ आवड  न  राहता गरज बनली.  लतादीदींनी १९४२-४८ या काळात हिंदी आणि मराठी अशा आठ चित्रपटांत भूमिका केल्यात. 


 लतादीदींनी काम केलेला पहिला चित्रपट होता नवयुगचा ‘पहिली मंगळागौर’. याच चित्रपटात त्यांनी ‘नटली चैत्राची नवलाई...’ हे गाणे गायिले. दीदींची गायनाची औपचारिक सुरुवात झाली ती ‘किती हसाल’ या चित्रपटाने (१९४२). पुढे दीदींनी ‘आप की सेवा में’ या हिंदी चित्रपटासाठी पार्श्वगायन केले . लतादीदी जेव्हा गायन क्षेत्रात आल्या तेव्हा नूरजहां, शमशाद बेगम, जोहराबाई अंबालेवाली असा आवाजांची चलती होती. अशा काळात आवाज पातळ असे सांगून लता दीदींना संगीतकार नाकारत होते.  संगीतकार गुलाम हैदर  यांनी  सुरुवातीला त्यांना संधी दिली नव्हती. मात्र, १९४९ मध्ये नियतीने लता मंगेशकर या नावाला एका झंझावाताचे रुप दिले. बरसात, अंदाज, दुलारी आणि महलसाठी दीदींनी गायलेली गाणी सुपरहिट ठरली. त्यानंतर जे घडले तो इतिहास सर्वांना माहित आहे.

एस. डी. बर्मन, ओ.पी. नय्यर, सी. रामचंद्र, मदन मोहन अशा अनेक दिग्गज संगीताकारांसोबत लतादीदींनी भारतीय चित्रपटसंगीताचे विश्व गाजवले. लतादीदींच्या हिंदी आणि मराठी गाण्यांनी रसिकांना समृद्ध केले. लतादीदींनी भारतीय जनमानसाचे कान तृप्त केलेत असे म्हणणे अतिशयोक्तीचे  ठरणार नाही. आतापर्यंत दीदींनी जवळजवळ सर्व संगीतकारांबरोबर गाणी ध्वनिमुद्रित केली.

२७ जून १९६३ रोजी भारत-चीन युद्धानंतर एका कार्यक्रमात लताबाईंनी कवी प्रदीप लिखित आणि सी. रामचंद्र यांनी संगीतबद्ध केलेले ‘ऐ मेरे वतन के लोगों...’ हे देशभक्तिपर गीत भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या उपस्थितीत गायले. तेव्हा  लताच्या सुमधुर कंठातून युद्धात देशासाठी प्राण देणाºया जवानांना श्रद्धांजली वाहणारे ते गीत ऐकून पंडितजींच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले, असे सांगितले जाते.
लतादीदीने मराठीत अनेकानेक गाणी गायिली. त्यांनी हृदयनाथ मंगेशकर, वसंत प्रभू, श्रीनिवास खळे आणि सुधीर फडकेंचा विशेष उल्लेख करावा. लागेल. लतादीदीने स्वत: ‘आनंदघन’ अशा नावाने मराठी गाणी स्वरबद्ध करून गायिलेली आहेत.


© संजय इस्तारी मुंदलकर        

Sunday, 1 March 2020

जयश्री गडकरांचं अप्रतिम सौंदर्य, अद्वितीय अभिनय


अप्रतिम सौंदर्य, अद्वितीय अभिनयाने रसिकांच्या मनावर पाच दशके अधिराज्य गाजवणाºया अभिनेत्री जयश्री गडकर यांचा जन्म २१ फेब्रुवारी १९४२ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातल्या सदाशिवगड येथे सामान्य कोकणी कुटुंबात जयश्री गडकर यांचा जन्म झाला होता. मूळच्या मीना, नंतर जया, जयश्री या नावाने ओळखल्या जाऊ लागल्या. त्या पाच वर्षांच्या असतानाच त्यांचे कुटुंब मुंबईला आल्यामुळे त्यांचे पुढचे शिक्षण मुंबईला झाले. कॉलेज शिक्षण मात्र झाले नाही. नृत्य-गायनाची आवड असल्यामुळे कलाक्षेत्राकडे त्यांचा विशेष ओढा होता. लहान असताना चोरून चित्रपट पाहिल्याच्या आठवणी जयश्री गडकर यांनी त्यांच्या ‘अशी मी जयश्री’ या आत्मचरित्रात सांगितल्या आहेत. बालपणीच त्यांचे नृत्याचे शिक्षण सुरू झाले. त्या गोपीकृष्णांकडून कथ्थक शिकल्या. पुढे  त्यांनी  गायनाचेही धडे घेतले.
१९५५ साली व्ही. शांताराम यांच्या झिनक झनक पायल बाजे’ मधील एका गाण्यात कोरसमध्ये नृत्य करणाºया तरुणींपैकी जयश्री गडकर एक होत्या. त्यावेळी त्यांचे वय होते केवळ  १३ वर्षे. १९५६ साली ‘दिसत तसं नसतं’ मध्ये अभिनेते  राजा गोसावी  यांच्यासोबत जयश्री यांनी काम केले होते. या चित्रपटातील एका गाण्यात त्यांनी नृत्य केले होते.
याच काळात रशियाचे नेते क्रुश्चेव भारत भेटीवर आले असताना पुण्यात एका कार्यक्रमात त्यांच्या स्वागतासाठी जयश्री गडकर यांनी ‘घनश्याम सुंदरा...’ आणि ‘लटपट लटपट तुझं चालणं...’  गाण्यांवर नृत्य सादर केले.  छायाचित्रकार राम देवताळे यांनी जयश्री गडकर यांची छायाचित्रे काढून त्यांच्या स्टुडिओमध्ये लावली. ही छायाचित्रे दिनकर पाटील यांच्या बघण्यात आली. त्यामुळे ‘दिसतं तसं नसतं’ मध्ये जयश्री गडकर यांना नृत्याची संधी मिळाली होती. दरम्यान, राजा परांजपे यांनी जयश्री गडकर यांना पाहिले आणि ‘गाठ पडली ठका ठका’मध्ये नायिकेची संधी मिळाली. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहले नाही. सूर्यकांत हे नायक होते. पुढे ही जोडी सांगत्ये ऐका, लग्नाला जातो मी, पंचारती, मल्हारी मार्तंड, लाखात अशी देखणी, साधी माणसं, सून लाडकी  या   घराची आदी चित्रपटांतून एकत्र झळकली. या जोडीला प्रेक्षकांनी पसंतीची पावती दिली होती.
सूर्यकांत यांच्याशिवाय अभिनेते राजा गोसावी यांच्यासोबतही जयश्री यांची आॅन स्क्रीन जोडी जमली होती. राजा गोसावींसोबत तब्बल नऊ चित्रपटांत जयश्री यांनी काम केले होते. ‘सांगत्ये ऐका’मधील ‘बुगडी माझी सांडली गं...’ ही लावणी अतिशय गाजली होती. तसेच, ‘साधी माणसं’ मधील ‘ऐरणीच्या देवा तुला ठिगणी ठिणगी वाहून दे...’ ही गाणीही अतिशय लोकप्रिय ठरली. मराठी चित्रपटांत सोज्वळ आणि तमाशाप्रधान भूमिका साकारून त्यांनी अष्टपैलू अभिनयाचे दर्शन घडवले होते.

लग्नानंतरही अभिनय...
१९७५ साली बाळ धुरी यांच्यासोबत जयश्री विवाहबद्ध झाल्या. लग्नानंतरसुद्धा त्यांनी अभिनय सुरू ठेवला. बाळ धुरी यांच्यासोबतही त्यांनी काही चित्रपटांत भूमिका केल्या. अशी असावी सासू, हे दान कुंकवाचे, मुंबई ते मॉर्शिअसमध्ये ही जोडी एकत्र झळकली. ‘ससुराल’,‘लव कुश’, ‘डिटेक्टिव’, ‘संपूर्ण महाभारत’,‘जियो तो ऐसे जियो’ हिंदी चित्रपटांतूनही जयश्री यांनी भूमिका साकारल्या. केवळ मराठी, हिंदीतच नव्हे तर गुजराती, तामिळ, भोजपुरी आणि पंजाबी चित्रपटांतही काम केले.
 साधी माणसं, पाटलाची सून, थांब लक्ष्मी कुंकू  लावतेसाठी सलग तीन वर्षे राज्य शासनाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जयश्री यांना मिळाला. जयश्री गडकर यांनी दग्दर्शन क्षेत्रातसुद्धा यशस्वी वावर केला.‘अशी असावी सासू’ हा चित्रपट त्यांनी  दिग्दर्शित केला होता. ‘अशी मी जयश्री’ हे जयश्री गडकर यांचे आत्मचरित्र प्रकाशित झाले आहे. मराठमोळ्या अभिनयाने सगळ्यांची मने जिंकू न घेणाºया जयश्री गडकर  यांची  आत्मकथा वसंत भालेकर यांनी  शब्दांकित केली आहे. आपल्या अप्रतिम अभिनयाने रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाºया जयश्री गडकर  यांनी २९ आॅगस्ट २००८ रोजी जगाचा निरोप घेतला. हृदयविकारामुळे त्यांची प्राणज्योत मालवली.

कैकयीऐवजी कौशल्या ...
भारतीय पहिली महामालिका ‘रामायण’मध्ये जयश्रींना  कै कयी बनायचे होते. तसे त्यांनी रामानंद सागर यांच्याकडे बोलून दाखवले. त्यावर ‘ही भूमिका  तुला दिली तर लोक मला शिव्या देतील, असे रामानंद यांनी जयश्रींना उत्तर दिले होते. कौशल्याच्या भूमिकेसाठी सुरुवातीपासूनच तुझंच नाव आम्ही ठरवलं होतं आणि  ही भूमिका तूच करावी, असे रामानंद सागर यांनी जयश्रींना म्हटले. विशेष असे की ‘रामायण’मध्ये दशरथ बनले होते त्यांचे पती बाळ धुरी.


© संजय इस्तारी मुंदलकर