Friday, 29 September 2023

संयुक्त कुटुंबात हात आणि साथ सोबत-सोबत ...

 काही दशकांआधी भारतीय समाज संयुक्त होता. मोठ्या कुटुंबातून वास्तव्यास होता. एकेका कुटुंबात सामान्यपणे १० ते १२ सदस्यांचा समावेश असे. आईवडिल, मुले, सुना, नातू या नात्यांसोबत कधी कधी विधवा बहीण, आत्या वा अन्य नातेवाईकांचाही समावेश असे. सकाळपासून सुरू होणारा स्वयंपाक पार काही तासांपर्यंत चालायचा. शेतातील  कामे  असो वा घर हातभार लावणारी अनेक हात असल्याने कामे  कशी भराभर व्हायची !



काळ बदलत गेला. शेतांचे तुकडे झाले तसे कुटुंबे  दुभंगली. देशात कारखानदारीसोबतच विविध कार्यालये उदयास आली. नोकरीकडे जाणाºयांचे प्रमाण वाढले. आपल्या आईवडिलांच्या कुशीत पहुडणारी मुले  आता आपल्या मातापित्यांना आपल्याजवळ ठेवण्याच्या ‘पात्रते’ची  झाली. कधी  कधी  आईवडिलांना  भार समजून  तो वाटणीला आला. विवाहित बहिणींना  वेगवेगळ्या चॉईस मिळाल्या. जो तो आपल्या पुरतेच पाहू लागला. आणि त्यातून नव्या समस्या निर्माण झाल्या़ कुठे आजी आजोबा दूर झाले तर कुठे आत्या दुरावल्या. जगाचे रहाटगाडगे समजून समाजाने हे सर्व  मान्य केले. अद्यापही भारतीय कुटुंब विभागलेलेच आहे. संयुक्त  होण्याची वेळ आली असताना कुणाचीही मने समोर धजावत नसल्याचे चित्र अनुभवास येत आहे.






मात्र, त्याचवेळी अमेरिकन समाजात मोठे बदल होत आहेत. याठिकाणी संयुक्त कुटुंबे झपाट्याने वाढत आहेत. कदाचित त्यांनी ही कुटुंबपद्धत ‘सुखा’सोबत ‘समाधाना’चीही मानली असावी. कारण २३ टक्के प्रौढ आता त्यांचे पालक आणि आजी आजोबांसोबत राहत आहेत. एका सर्वेक्षणानुसार,२०१५ ते २०२०च्या दरम्यान ‘सँडविच’ कुटुंबांची संख्या २८ टक्क्यांवरून ३० टक्क्यांवर पोहोचली आहे. ६५ वर्षांपेक्षा जास्त वयाचे लोक, जे  त्यांचे पालक आणि  प्रौढ मुलांची काळजी घेतात, त्यांना ‘सँडविच’ पिढी म्हणतात. एक अमेरिकन सामाजिक कार्यकर्त्या लॉरा रेगन सहा वृद्ध सदस्यांच्या  कुटुंबाला  मदत  करतात. कधी कधी वृद्ध आई-वडील आणि मुलांची काळजी घेणे हे दोन भिन्न वास्तवांमध्ये जगण्यासारखे असते. दोन पिढ्यांना सुखी ठेवणे हे अवघड काम आहे; परंतु त्यांच्याकडूनच कामाचे व्यवस्थापन करायला शिकले आणि कुटुंबासोबतच्या आयुष्यातील  प्रत्येक दिवस  ही एक अनमोल भेट आहे याची मला जाणीव झाली, असे रेगन सांगतात.



विभक्त कुटुंबापेक्षा संयुक्त कुटुंबातील मुले अधिक शिक्षित असल्याचे आढळून आले आहे. संयुक्त कुटुंबातील मुलांचा शैक्षणिक स्तर विभक्त कुटुंबापेक्षा चांगला असतो, असेही अमेरिकन समाजात घडत आहे. मोठ्या कुटुंबांमध्ये राहणारे किमान ३० टक्के तरुण पदवीधर आहेत़ तर, विभक्त कुटुंबांमध्ये ही संख्या केवळ  २० टक्क्यांची आहे. २७ टक्के उच्च उत्पन्न मिळवणाºया व्यक्ती संयुक्त कुटुंबात वास्तव्यास आहेत. कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या कुटुंबांचा वाटा अनुक्रमे २१ आणि २४ टक्के आहे. 



संयुक्त कुटुंबातील सहजीवनात राहणारे ४८ टक्के तरुण त्यांच्या कौटुंबिक जीवनात आनंदी आहेत. त्याच वेळी, विभक्त कुटुंबातील ४४ टक्के तरुण आनंद मानून घेतात. अमेरिकासारख्या नोकरीप्रधान समाज व्यवस्थेत लहान मुलांना आईवडिलांची जशी गरज आहे, तशीच आजी आजोबांची आणि अन्य नात्यांचीही आहे. संयुक्त कुटुंबाचा आनंद मिळतो, तो असा. कारण मनाने एकत्र राहण्याचे सुख केवळ याच समाज व्यवस्थेत अनुभवता येते. संयुक्त कुटुंबातील जबाबदाºयांच्या ओझ्यामुळे अशा कुटुंबांवर ताण येतो, असे मानले जाते. कालांतरान े मात्र ही कुटुंबे पालक व मुलांत समतोल राखण्यास शिकली असल्याचेही आढळून आले आहे. ते आता जबाबदारीला ओझे मानत नाहीत. कारण त्यांचे हात आणि साथ आता सोबत-सोबत असतात़ 


संजय मुंदलकर

Wednesday, 20 September 2023

महिलांच्या राजकीय घडवणुकीसाठी सुगीचे दिवस मानायचे का ...

याशिवाय देशातील अन्य राज्यांमधील विधानसभांमध्येही महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळू शकेल. मात्र, त्याच वेळी या सर्व जागा महिलांसाठी फक्त १५ वर्षांसाठी राखीव असतील. म्हणजेच त्यांना पाच-पाच वर्षांच्या तीन टर्म अनुभवता येणार आहे. हा कालावधी संपल्यानंतर आरक्षण सुरू ठेवायचे असल्यास नव्याने कायदा करावा लागेल़ तरीही महिलांच्या राजकीय घडवणुकीसाठी हे सुगीचे दिवस मानायचे का, हाही एक मोठा प्रश्न आहे़




मागील २७ वर्षांपासून सातत्याने मागणी होत असलेले महिला आरक्षण विधेयक मोदी सरकारने संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मंगळवारी ( १९ सप्टेंबर) मांडले. संसदेच्या नव्या इमारतीमध्ये कारभार सुरू झाल्यानंतर मांडण्यात आलेले ‘नारी शक्ती वंदन अधिनियम’ असे नाव या विधेयकाला देण्यात आले आहे. त्यावर बुधवारी चर्चा होणार आहे. उल्लेखनिय असे विधेयकामुळे लोकसभा आणि विधानसभेमधील प्रत्येक तिसरा सदस्य हा महिला सदस्य असेल. 



असे असले तरी या महिला आरक्षण विधेयकाला एक इतिहास सुद्धा आहे. काँग्रेसप्रणीत संयुक्त पुरोगामी आघाडीच्या सरकारच्या कार्यकाळात हे विधेयक राज्यसभेमध्ये ९ मार्च २०१० रोजी बहुमताने संमत झाले भारतीय जनता पार्टी, डावे पक्ष आणि जेडीयूने समर्थन केले होते. लोकसभेमध्ये मात्र मांडण्यात आले नाही. राष्ट्रीय जनता दलाबरोबरच समाजवादी पक्षाने त्यावेळी   विरोध केला होता आणि नेमकेच हे दोन पक्ष त्यावेळी यूपीए सरकारचा भाग होते. हे सदर विधेयक संसदेमध्ये मांडल्यास सरकारला समर्थन देणाºया पक्षांकडून विरोध होईल, अशी भीती त्यावेळी काँग्रेसला होती. यानंतर काँग्रेस संसदीय दलाच्या प्रमुख सोनिया गांधी यांनी २०१७  साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहून सरकारने सदर विधेयक मांडल्यास आपला पक्ष समर्थन करेल असे म्हटले होते. शिवाय  काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष राहुल गांधी यांनी सुद्धा १६ जुलै २०१८ रोजी पत्र लिहून विधेयकाला पाठिंबा देण्याची ग्वाही दिली होती.

 

लोकसभेमध्ये बुधवारी  (२० सप्टेंबर) विधेयक पारित होण्याची १०० टक्के शक्यता असून, यानंतर ते राज्यसभेत पारित केले जाईल़ राष्ट्रपतींची त्यावर स्वाक्षरी झाल्यानंतर कायद्यात रुपांतर होईल. 


लोकसभेत सध्या ८२ महिला सदस्य आहेत. ‘नारी शक्ती वंदन अधिनियम’  विधेयकाचे  कायद्यात रुपांतर झाल्यास ३३ टक्के आरक्षणानुसार या जागा १८१ वर पोहोचतील. जागा महिलांसाठी राखीव असतील.  विधेयकामध्ये राजधानी दिल्लीच्या विधानसभेमध्ये सुद्धा  महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्यात आले आहे. अर्थातच दिल्लीच्या विधानसभेतील ७० पैकी २३ जागा  महिलांसाठी राखीव असतील. याशिवाय देशातील अन्य राज्यांमधील विधानसभांमध्येही महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळू शकेल. मात्र, त्याच वेळी या सर्व जागा महिलांसाठी फक्त १५ वर्षांसाठी राखीव असतील. म्हणजेच त्यांना पाच-पाच वर्षांच्या तीन टर्म अनुभवता येणार आहे. हा कालावधी संपल्यानंतर आरक्षण सुरू ठेवायचे असल्यास नव्याने कायदा करावा लागेल़ तरीही महिलांच्या राजकीय घडवणुकीसाठी हे सुगीचे दिवस मानायचे का, हाही एक मोठा प्रश्न आहे़ कारण संसदेत आरक्षण विधेयक मंजूर झाल्यानंतर तो कायदा होईल सुद्धा; परंतु त्या कायद्याच्या अंमलबजावणीचे काय? त्यासाठी मोठा कालावधी लागू शकतो, असेही सांगण्यात येते़ यात कदाचित दोन लोकसभेइतका (अर्थात १० वर्षे) कालावधीही असेल़



इथंपर्यंत सर्व ठीक असले तर ही महिला आरक्षणाची मागणी थेट २७ वर्षांपासून हो त आहे. म्हणजेच इतक्या कालावधीत पाच निवडणुका पार पडल्या असत्या. कारण महिला आरक्षण विधेयकाची मागणी पहिल्यांदा सप्टेंबर १९९६ मध्ये तत्कालीन पंतप्रधान देवेगौडा यांच्या नेतृत्वाखालील संयुक्त मोर्चाच्या सरकारने ८१ व्या घटनादुरुस्ती विधेयकाच्या स्वरुपात लोकसभेमध्ये करण्यात आली. हेच विधेयक १९९८ साली अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनेही मांडले. अनेक पक्षांना एकत्र आणून तयार करण्यात आलेल्या सरकारच्या या विधेयकाला विरोध झाला. वाजपेयी सरकारने १९९९, २००२ आणि २००३ साली सुद्धा विधेयक मंजूर करण्याचा प्रयत्न केला. त्यातही  यश आले नाही. अखेर २००८ साली विधेयक सादर करण्यात आले. यात लोकसभासह राज्यातील विधानसभांमध्ये ३३ टक्के आरक्षण देण्याचे म्हटले होते. राज्यसभेत ९ मार्च २०१० रोजी बहुमताने भाजपा, डावे पक्ष आणि जेडीयू आदी पक्षांच्या समर्थनाने पारित झाले; परंतु लोकनियुक्त प्रतिनिधी असलेल्या लोकसभेत मात्र सादर करता आले नाही, ही वस्तुस्थिती आहे.


संजय मुंदलकर

Friday, 15 September 2023

‘झड’ गेलीय कुठं?

तीन ते चार दिवस पावसाची एकसारखी संततधार म्हणजे झड़ हा पाऊस मोठ्यानं कधीही कोसळत नाही़ मात्र, त्याची रिपरिप सुरू असते़ त्यामुळं शेतातली कामं बंद़ रस्त्यावर चिखलच चिखल! डोळ्यांच्या कपारीतून शिवारभर पांढरं धुकंच धुक दिसून येते़ डवरणीची, निंदणीची सर्व काम ठप्प़ सगळा मजूरवर्ग घरीच असतो़ सुरुवातीला आरामदेह वाटणारी झड नंतर मात्र नकोशी वाटते़ ऐरवी कौलाकौलातून सकाळ, दुपारी निघणारा धूर सकाळपासून रात्री उशिरापर्यंत पावसाच्या थेंबाथेंबाशी बिलगलेला असतो़ मजूर बायाबाप्ये गप्पाटप्पात रंगलेल्या दिसून येतात़ बिड्यांच्या धुराबरोबर गोष्टीचा फड रंगलेला असतो़ गावाच्या चौकातील एखाद्या हॉटेलमध्ये मैफल बसलेली असते़ कुणी भज्याची आर्डर दिलेली असते, तर कुणी चहाचा खर्च करणारा असतो़ 


एखादा म्हातारा जुन्या गोष्टीच्या पोतड्या उघडून दाखवितो़ तरणी पोरं त्याच्या गोष्टी कान टवकारून ऐकत असतात़ तो म्हातारा आपल्या हयातीमधील झडीच्या गोष्टी मोठ्या खुबीनं सांगत ऐकणाºयांची उत्कंठा वाढवित असतो़ गावाला पुराचा वेढा, पाण्यातून वाहत गेलेले गुरंढोरं, बुडालेली पिकं, पुरातून वाहत जाणाºया लोेकांना कसे बाहेर काढले आदींचे वर्णन तो हातवाºयाच्या मदतीने किंवा उभे राहून, दंड थोपटून कथन करीत असतो़ त्या हॉटेलात पाय ठेवण्यास जागा कमी पडली तरी काहीजण ‘घोंगशी’ घेऊन उभे असतात़ ही ‘घोंगशी’ पोत्याची वरची एक बंद बाजू आत घालून तयार केलेली असते़ कुणी घोंगडी अंगावर घेऊन आलेला असतो़ 


काही शेतकरी दोघा-तिघांच्या गटानं अंगावर ‘घोंगशी’ घेवून शिवारात गेलेली असतात़ संपूर्ण शिवार पांढºया तुषारी पावसात न्हाऊन निघालेलं असतं़ पºहाटीच्या, ज्वारीच्या ‘वई’ त  पाणीच पाणी भरलेलं असतं़ ते धुºयावरून पिकाच्या नुकसान फायद्याविषयी बोलू दाखवितात.  डवरणं किंवा निंदणाची काम किती दिवसांनंतर सुरू होतील, असा अंदाज लावत धुºयावरील गवतातून त्यांचा विळा भराभर चालत असतो़ मग डोक्यावरील ‘घोंगशी’वरच गवताचा भारा घेवून शेतातल्या पायवाटेतल्या चिखलातून त्यांचे पाय भराभर गावाकडं चालत निघतात़ एखाद्यावेळी पायात काटा रुतल्यास समोरच्याला हाक देत धुºयावर भारा ठेवत काटा काढण्यात येतो़ पायातून रगत निघाल्यानंतरही त्यांचे पाय गाव लगबगीनं जवळ करीत असतात़ कारण न जाणो गावाशेजारच्या नाल्याला पूर आल्यास पंचाईत होण्याची शक्यता असते़



घरी आल्यावर गोठ्यातल्या ‘गोहानी’त थोडंथोडं गवत टाकण्यात येते़ पावसाची रिपरिप सुरू असल्यानं जनावरंही एकाच खुट्याला बांधलेली असतात़ शेणाचा सडा पडलेला असतो़ मग घरधनी ओल्यावरची जनावरं कोरड्या जागेत बांधतो़ आता सांजवेळ झालेली असते़ चिल्टाईचा जोर वाढलेला असतो़ तोपर्यंत घरातली धुनी पुन्हा पेटलेली असते़ इकडं घरातलं एखादं पोरगं दूध सरल्याचं सांगतो तेव्हा तो दुधाच्या खास बादलीत चर्चर् धारा काढत फक्कड चहा बनविण्यास बजावतो़ बाहेर रिपरिप सुरूच असत़े शाळालाही सुट्टी असल्यानं पोरंसोरं लहानशी ‘घोंगशी’ अंगावर चढवून चिखलातून नाचत असतात़ अशावेळी घरासमोरून एखादा दोस्त ‘घोंगशी’पांघरून जात असल्यास त्याला हाक देत चहा पिण्याचा आग्रह केला जातो़ मग घराच्या ‘वसरी’त बैठक मारत चहा पित झडीच्या, पिकाच्या, पुराच्या गोष्टी सुरू होतात़ सोबत तंबाखू घोटत नाहीतर बिड्या फुंकण्यात येतात़ तोपर्यंत घरातले कंदिल पेटलेले असतात़ बाहेर अंधारून आलेलं असतं़ रातकिड्यांच्या किरकिरीला सुरुवात होते़ चिल्टही कानाभोवती पिंगा घालतात़ मग एखादा म्हातारा धग पेटवून त्यावर कडुलिंबाचा पाला टाकतो़ त्यातील धुरानं चिलटं,डास पळतात, असा समज असतो़

आजच्या पिढीला ‘झड’ काय असते, ते उमगत नाही, आम्हीही त्याचा अर्थ सांगत नाही़ झडचं नाही तर बोटानं दाखवणार काय? गावातल्या तलावातील पाणी हाच ‘पूर’ म्हणून सांगितला जातो. पुस्तकातच तो शब्द वाचण्यात येतो़ त्या दिवसांतील धुरांची वलये गुंडाळून बसलीय़ शिवार आता पहिल्यासारखं भिजत नाही़ कारण माणसाला दुर्बुद्धी सुचली नि त्यानं निसर्गाच्या पायावर कुºहाडीचे, तंत्रज्ञानाचे कित्येक घाव घातले. जल, जंगल, हवा नासवून टाकली.

रात्री जेवणावळीला एखादा घरधनी आपल्या बापाला, आईला, बायकोला, लेकरांना पिकांची  ‘कंडिशन’ सांगतो़ त्यावर सर्वांची मते घेतली जातात़ बाहेर गारठा वाढत जातो, थंडीनं हुडहुडी चालविलेली असते़ मग ‘वसरी’त गोधड्या साथरल्या जातात़ मग गोष्टींची उतरण सुरू होते, तसा डोळा झाकत येतो़ झडीचा एक दिवस सरलेला असतो आणि ‘घोंगश्या’ दुसºया दिवसासाठी कोरड्या होण्यासाठी एखाद्या खुटीवर किंवा पºहाटी, तुºहाटीच्या कवट्यावर पहुडलेल्या असतात़


दिवस बदलले़ गावरानी जाऊन ‘हायब्रिड’ आलं, तशी झडही लोप पावली़ आता झड दिसत नाही़, आम्ही ती गमावून बसलो़ पावसाचे थेंब कमी झालेत़ आजच्या पिढीला ‘झड’ काय असते, ते उमगत नाही, आम्हीही त्याचा अर्थ सांगत नाही़ झडचं नाही तर बोटानं दाखवणार काय? गावातल्या तलावातील पाणी हाच ‘पूर’ म्हणून सांगितला जातो. पुस्तकातच तो शब्द वाचण्यात येतो़ त्या दिवसांतील धुरांची वलये गुंडाळून बसलीय़ शिवार आता पहिल्यासारखं भिजत नाही़ कारण माणसाला दुर्बुद्धी सुचली नि त्यानं निसर्गाच्या पायावर कुºहाडीचे, तंत्रज्ञानाचे कित्येक घाव घातले. जल, जंगल, हवा नासवून टाकली. विज्ञानानं माणसाच्या नको त्या विकासासाठी ‘विजय’ मिळविला असला तरी त्यासाठी बुद्धी गहाण टाकून स्वत:ची इतकी हानी करवून घेतली, की आता भरपाई होणं अशक्य आहे़ निसर्गाच्या विरोधात केलेल्या पापाचे परिणाम अख्खी मानवजात कुढत कुढत आज भोगत आहे़ 


संजय मुंदलकर

‘गावाकडची बेंबळा’ संग्रहातून