Thursday, 9 April 2020

चीन, पाकिस्तानची मारली मती


चीनमध्ये पहिला कोरोना रुग्ण डिसेंबर २०१९ च्या अखेरीस आढळला होता. त्यानंतर अवघ्या तीन महिन्यांच्या कालावधीत जगभरातील २०० देशांमध्ये संसर्ग फैलावला आहे. जिथून कोरोनाचा जन्म झाला आणि तो अन्यत्र पसरला, त्या चीनमधील संसर्ग संपल्यात जमा आहे. मात्र, त्याचवेळी  अमेरिका, इटली, स्पेन, ब्रिटन, नेपाळ, पाकिस्तान, भारत आदी देशांमध्ये या आजाराचा वेगाने फैलाव होत आहे. हजारो मृतांची संख्या वाढत आहे. युरोप आणि अमेरिकेत सर्वांधिक हाहाकार सुरू आहे.
आज ९ एप्रिल २०२० रोजी जगभरात कोरोनाबाधितांची संख्या १४ लाख ५० हजारांहून अधिक असून ८५ हजारजणांचा मृत्यू झाला आहे. ब्रिटनमध्ये एकाच दिवसांत ९३८ जणांचा मृत्यू झाला, तर अमेरिकेत ४ लाखांहून अधिकजणांना बाधा झाली आहे. फ्रान्समध्ये ही संख्या एक लाख ९ हजारांवर
पोहोचली आहे. ब्रिटनमध्ये ६० हजारांहून अधिकांना बाधा झालेली आहे. तुर्कीमध्ये ३४ हजारांहून अधिकजण बाधित झाले आहेत.
जर्मनीत एक लाख ९ हजारजणांना बाधा झाली असून मृतांची संख्या दोन हजारांवर गेली आहे. ब्राझीलमध्ये १४ हजारांहून अधिकांना संसर्ग झाला, तर  पोलंडमध्ये पाच हजारजण बाधित झाल्याची माहिती आहे. अशाप्रकारे सध्या जगभरात जीवघेण्या कोरोनाने थैमान घातले आहे. हे संपूर्ण संकट परतून लावण्यासाठी सर्व देशांकडून युद्धस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. अशातच तुम्हा आम्हांचे दुर्दैव म्हणून की काय, अशा परिस्थितीत चीनने दक्षिण चीन महासागरात चक्क युद्धसराव केल्याची माहिती समोर आली आहे.
मागील काही दिवसांत महासागरात अ‍ॅन्टी शिप, अ‍ॅन्टी सब-मरिन आणि अ‍ॅन्टी एअरक्राफ्टच्या मदतीने या क्षेत्रात मोठा युद्धसराव केला. याव्यतिरिक्त फ्लीटच्या नेव्हिगेशनचाही सराव केल्याची माहिती आहे. या क्षेत्रात आपला प्रभाव दाखवून देणे हाच युद्धसरावामागील चीनचा हेतू असल्याचे आंतरराष्ट्रीयस्तरावरील लष्करीविषयक अभ्यासकांनी म्हटले आहे.
दुसरीकडे सध्या दक्षिण चीन महासागरात अमेरिकेची कोणतीही युद्धनौका उपस्थित नसल्याची माहिती आहे. अमेरिकेच्या युद्धनौका कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सध्या प्रशासनासोबत कार्यरत असल्याचे विविध वृत्तसंस्थांनी म्हटले आहे. चीनने मात्र नेमके याच वेळेचा फायदा घेऊन युद्धसराव केल्याचे म्हटले जात आहे. यानंतर अमेरिकासह अनेक देशांनी या कृतीचा निषेध केला. त्यावर चीनने अमेरिकेवरच निशाणा साधला. आम्ही अन्य देशांना कोरोनाविरूद्ध लढण्यास मदत करत असल्याचे चीन सरकारने म्हटले आहे.
दरम्यान, दक्षिण चीन महासागरात अनेक लहान बेटे आहेत. त्यातील सर्वाधिक भागावर चीनने आपला दावा केला आहे, तर फिलिपिन्स, व्हिएतनाम, मलेशिया, तैवान आणि ब्रुनेई यांनी दावा नाकारला आहे. त्यातूनच सर्व देश कोरोनाविरोधात मोठा लढा देण्यात व्यस्त असताना चीन नुसताच खाजवून घेण्याचा प्रयत्न करत आहे,असे म्हणता येईल.

पाकिस्तानचे भूत

इमरान खान सरकारने कोरोनामुळे मोठे नुकसान होऊनही पाकिस्तानात ‘लॉकडाऊन’ लागू केलेले नाही. याशिवाय या देशात महागाई, दारिद्र्य आदी प्रकारांनी कळस गाठला आहे. सर्वसामान्यांचे दैनंदिन जीवन कठीण परिस्थितीत व्यतित होत असताना सरकारला त्याच्याशी काहीही देणे घेणे नसल्याचे दिसून येते़ कारण जगभरातील देशांवर कोरोना संकटाची टांगती तलवार असताना पाकिस्तानने मात्र मागील १९ मार्चला बलुचिस्ता
न प्रांतातून सुमारे ७५० किलोमीटर अंतरापर्यंत मारा करणाºया क्रूझ मिसाईल (क्षेपणास्त्र) बाबर-२ ची चाचणी केली. दुर्दैवाने १४ किलोमीटरपर्यंत पोहोचल्यानंतर केवळ दोन मिनिटांतच ते जमिनीवर कोसळले. पाकिस्तानी अधिकाºयांनुसार, बाबर-२ साठी पाकिस्तान चीनची मदत घेत आहे़ मुळात पाकिस्तानच्या मानगुटीवर भारताच्या डीआरडीओद्वारा निर्माण होणाºया एक हजार किलोमीटर लक्ष्य साधणाºया निर्भय क्रूझ मिसाईलसोबत बरोबरी करण्याचे भूत बसल्याचे दिसून येते.
©  संजय मुंदलकर