मित्रांनो, असे म्हणतात की मृत्यू प्रत्येक जीवाचे अस्तित्व नष्ट करतो, ते एक सत्य आहे आणि प्रत्येकाला स्वीकारावेच लागते. एक दिवस जायचेच आहे, असे म्हणत मानवजातही जगत एकेक दिवस ढकलत असते. अर्थात हे झाले मनुष्याला एका ठराविक वयानंतर येणाºया मृत्यूबाबत; परंतु कुणी स्वत:हूनच आपला मृत्यू ओढवून घेत असेल तर...
होय! ही मानवजात जर आपल्या मृत्यूचा रस्ता स्वत:च तयार करत असेल तर त्याला काय म्हणावे? आणि हे सर्व या जगातील प्रत्येक माणूस अगदी तुम्ही आम्ही सर्वजण करत आहोत. कारण संपूर्ण जगभराला जल, वायू, जमीन प्रदूषणाचा जो विळखा पडलाय, तो आपल्यामुळेच! हवा, जमीन, पाणी, आकाश या सर्व ठिकाणी मानवाने आपल्या मरणघंटा बांधून ठेवल्या आहेत. आणि अशा अकाली मृत्यूमुळे केवळ नुकसानच नुकसान होत असल्याचे दिसून येते.
आपल्या देशापुरता विचार करावयाचे झाल्यास, येथील प्रत्येक राज्य प्रदूषणाच्या मगरमिठीत सापडले आहे. मनुष्याचा पाण्यापेक्षा हवेशी अधिक संबंध असतो. कारण श्वसनासाठी चोवीस तास हवेची गरज असते. मात्र, आता हीच हवा प्रदूषित झाली आहे, नव्हे आपण ती केली आहे...आजच्या या घडीला करतही आहोत. मोठ्या संख्येत वाहनांचा वापर, उद्योगांमध्ये नियमांचे उल्लंघन अशा मानवनिर्मित बाबी कारणीभूत आहेत.
सध्या देशातील प्रदूषणाचा चांगलाच गाजत आहे. जगातील अत्यंत धोकादायक आणि गंभीर प्रदूषित शहरांच्या यादीत भारतातील काही शहरांचा समावेश आहे़ यात राष्ट्रीय राजधानी दिल्ली सुद्धा आहे. दिल्लीतील प्रदूषणाचे कारणे अनेक सांगण्यात येतात़ बोंब उठली, ती थोपविण्यासाठी काही कारखान्यांना नोटिशी रवाना होतात़ मूळ मुद्दा कायम राहतो़ पराली (शेतपिकांचा शिल्लक भाग) जाळणे, वाहनांची भरमसाठ संख्या, फटाक्यांचा धूर, कारखान्यांतून बाहेर पडणारा धोकादायक वायू अशी काही या प्रदूषित वातावरणाची कारणे. याठिकाणी संबंधित सर्व ‘प्रताप’ मानवनिर्मित आहेत, ही बाब मंडळी विसरतात.
दिल्ली महानगर आणि शेजारच्या राज्यात औद्योगिक क्षेत्र अधिक आहेत. रासायनिक, चामडे, खत निर्मिती उद्योगांची भरमार असल्याचे प्रदूषित वायूची निर्मिती अधिक राहणारच! सुरुवात येथूनच होत असल्याचे या कारखान्यांची तपासणी होते का, असा प्रश्न निर्माण होणारच. दिल्लीतील ही स्थिती पाहता सरकारकडून येत्या दिवाळी सण उत्सवाच्या कालावधीत फटाके जाळण्यावर बंदी येऊ शकते. कारण लहान मुलांच्या आरोग्यावर त्याचा सर्वाधिक परिणाम होत असतो. मुंबईत यावर काही प्रमाणात निर्बंध घालण्यात आले आहे. कारण या शहरातही हीच समस्या निर्माण झाली आहे.
सम-विषम
राष्ट्रीय राजधानीतील प्रदूषण थोपविण्यासाठी सर्व वाहनांना आॅड आणि इव्हन अर्थात विषम-सम असा उपाय सूचविण्यात आला. या नियमानुसार, वाहनाचा शेवटचा क्रमांक विषम (१,३,५) असेल तर ते फक्त विषम तारखांनाच रस्त्यांवर धावेल. तर, वाहनाचा क्रमांक सम (२,४,६) असल्यास, त्याच तारखेला वाहन घराबाहेर पडू शकेल. आप सरकारने २०१६ मध्ये पहिल्यांदा ही योजना लागू केली होती. यावर दिल्ली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी अभ्यास करण्यात आला आणि संशोधनात सकारात्मक परिणाम दिसून आले. मात्र, हवेच्या गुणवत्तेत अपेक्षेइतकी सुधारणा झाली नाही. नंतरच्या वर्षातही विषम-सम योजना लागू होती. यातून वाहनांच्या एकूण प्रदूषणापैकी दुचाकींमुळे ५६ टक्के प्रदूषण होते. २०१९ मध्ये सुद्धा हा नियम लागू करण्यात आला होता. कॉन्सिल आॅन एनर्जी एन्व्हायर्नमेंट अँड वॉटरच्या अभ्यासानुसार, सम-विषमचा विशेष फायदा नाही. दिल्लीतील वाहतुकीमुळे सर्वाधिक प्रदूषण होत असल्याचे अहवालात म्हटले आहे. काही तज्ज्ञांनुसार, विषम-सममुळे वाहतूक कोंडी कमी होऊन प्रत्येक वाहनातून उत्सर्जित होणाºया वायूंमुळे प्रदूषण कमी होण्यास मदत होते. हवेच्या गुणवत्तेची पातळी सुधारण्यावर त्याचा किरकोळ परिणाम होतो. दुसरीकडे काही तज्ज्ञांनी एक्यूआय ४५० ते ५०० असल्यास विषम-सम नियम लागू करावा.
कोरोना काळ
याशिवाय मागील कोरोना महामारीच्या पहिल्या आणि दुसºया टप्प्यात या आजारांची लागण झाली होती, अशा काही जणांना अन्य आजारांचा सुद्धा संसर्ग होत असल्याचे वाचण्यात आले आहे. त्यामुळे प्रत्येकाला स्वच्छ हवेची गरज आहे. केवळ श्वास घेऊन चालणार नाही, तर तो स्वच्छ आणि आरोग्यदायी हवेचाच असावा. यात वावगे काय? आपण प्रदूषण का करतोय, हा प्रश्न स्वत:च्या मनात का निर्माण करत नाही? आपण दररोज वापरत असलेल्या वाहनातून बाहेर पडत असलेला विषारी वायू का थांबवत नाही? फटाके न फोडल्याने वातावरणातील हवा स्वच्छ राहत असेल, तर त्याचा आपल्याला हव्यास का नाही? झाडांद्वारे स्वच्छ हवा वातावरणात पसरत असेल, त्याकडे आपले हात का वळत नाही?
निसर्ग ‘धुके’ निर्माण करतो आणि स्वत:ला अत्याधुनिक, प्रगतीचे पाईक, विकासाचा महामेरू समजणारी मानवजात ‘धूर’ निर्माण करते़
निसर्ग स्वार्थाविना कर्तव्य पार पाडतो आणि माणूस स्वार्थाला गोचिडासारखा चिपकून धूर निर्माण करतो़.
संजय मुंदलकर