Saturday, 8 August 2020

हरवली झडीतली ‘घोंगशी’

 तीन ते चार दिवस पावसाची एकसारखी संततधार म्हणजे झड़ हा पाऊस मोठ्यानं कधीही कोसळत नाही़ मात्र, त्याची रिपरिप सुरू असते़ त्यामुळं शेतातली कामं बंद़ रस्त्यावर चिखलच चिखल! डोळ्याच्या कपारीतून शिवारभर पांढरं धुकंच धुक दिसून येते़ डवरणीची, निंदणीची सर्व काम ठप्प़ सगळा मजूरवर्ग घरीच असतो़ सुरुवातीला आरामदेह वाटणारी झड नंतर मात्र नकोशी वाटते़ ऐरवी कौलाकौलातून सकाळ, दुपारी निघणारा धूर सकाळपासून रात्री उशिरापर्यंंत पावसाच्या थेंबाथेंबाशी बिलगलेला असतो़ मजूर बायाबाप्ये गप्पाटप्पात रंगलेल्या दिसून येतात़ बिड्यांच्या धुराबरोबर गोष्टीचा फड रंगलेला असतो़ 




गावाच्या चौकातील एखाद्या हॉटेलमध्ये मैफल बसलेली असते़ कुणी भज्याची आर्डर दिलेली असते, तर कुणी चहाचा खर्च करणारा असतो़ एखादा म्हातारा जुन्या गोष्टीच्या पोतड्या उघडून दाखवितो़ तरणी पोरं त्याच्या गोष्टी कान टवकारून ऐकत असतात़ तो म्हातारा आपल्या हयातीमधील झडीच्या गोष्टी मोठ्या खुबीने सांगत ऐकणाºयांची उत्कंठा वाढवित असतो़ गावाला पुराचा वेढा, पाण्यातून वाहत गेलेले गुरंढोरं, बुडालेली पिकं, पुरातून वाहत जाणाºया व्यक्तीला कसे बाहेर काढले आदींचे वर्णन तो हातवाºयाच्या मदतीने किंवा उभे राहून, दंड थोपटून कथन करीत असतो़ त्या हॉटेलात पाय ठेवण्यास जागा कमी पडल्यास काहीजण ‘घोंगशी’ घेऊन उभे असतात़ ही ‘घोंगशी’ पोत्याची वरची एक बंद बाजू आत घालून तयार केलेली असते़ कुणी घोंगडी अंगावर घेऊन आलेला असतो़ 

काही शेतकरी दोघा तिघाच्या गटानं अंगावर ‘घोंगशी’ घेवून शिवारात गेलेली असतात़ संपूर्ण शिवार पांढºया तुषारी पावसात न्हाऊन निघालेलं असतं़ पºहाटीच्या, ज्वारीच्या ‘वई’त पाणीच पाणी भरलेलं असतं़ ते धुºयावरून पिकाच्या नुकसान-फायद्याचा अंदाज घेतात़ डवरणं किंवा निंदणाची काम किती दिवसांनंतर सुरू होतील, असा निशाणा लावत धुºयावरील गवतातून त्यांचा विळा भराभर चालत असतो़ मग डोक्यावरील ‘घोंगशी’वरच गवताचा भारा घेवून शेतातल्या पायवाटेतल्या चिखलातून त्यांचे पाय भराभर गावाकडे चालत निघतात़ एखाद्यावेळी पायात काटा रुतल्यास समोरच्याला हाक देत धुºयावर भारा ठेवत काटा काढण्यात येतो़ पायातून रगत निघाल्यानंतरही त्यांचे पाय गाव लगबगीने जवळ करीत असतात़ कारण न जाणो गावाशेजारच्या नाल्याला पूर आल्यास पंचाईत होण्याची शक्यता असते़

घरी आल्यावर गोठ्यातल्या ‘गोहानी’त थोडंथोडं गवत टाकण्यात येते़ पावसाची रिपरिप सुरू असल्यानं जनावरेही एकाच खुट्याला बांधलेली असतात़ शेणाचा सडा असतो़ मग घरधनी ओल्यावरची जनावरं कोरड्या जागेत बांधतो़ आता सांजवेळ झालेली असते़ चिल्टाईचा जोर वाढलेला असतो़ तोपर्यंत घरातल्या धुनी पुन्हा पेटलेली असते़ इकडं घरातलं एखादं पोट्टं दूध सरल्याचं सांगतो तेव्हा तो दुधाच्या खास बादलीत चर्चर् धारा काढत फक्कड चहा बनविण्यास बजावतो़ बाहेर रिपरिप सुरूच असत़े  शाळालाही बुट्टी असल्यानं पोरंसोरं लहानशी ‘घोंगशी’ अंगावर चढवून चिखलातून नाचत असतात़ अशावेळी घरासमोरून एखादा दोस्त ‘घोंगशी’पांघरून जात असल्यास त्याला हाक देत चहा पिण्याचा आग्रह केला जातो़ मग घराच्या ‘वसरी’त बैठक मारत चहा पित झडीच्या, पिकाच्या गोष्टी सुरू होतात़ सोबत तंबाखू नाहीतर बिड्या फुंकण्यात येतात़ तोपर्यंत घरातले कंदिल पेटलेले असतात़ बाहेर अंधारून आलेलं असतं़ रातकिड्यांच्या किरकिरीला सुरुवात होते़ चिल्टही कानाभोवती पिंगा घालतात़ मग एखादा म्हातारा धग पेटवून त्यावर कडुलिंबाचा पाला टाकतो़ त्यातील धुरानं चिलटं,डास पळतात, असा समज असतो़ रात्री जेवणावळीला एखादा घरधनी आपल्या बापाला, आईला, बायकोला, लेकरांना पिकांची    ‘कंडिशन’ सांगतो़ त्यावर सर्वांची मते घेतली जातात़ बाहेर थंडीने हुडहुडी चालविलेली असते़ मग ‘वसरी’त गोधड्या साथरल्या जातात़ मग गोष्टींची उतरण सुरू होते,तसा डोळा झाकत येतो़ झडीचा एक दिवस सरलेला असतो आणि ‘घोंगश्या’ दुसºया दिवसासाठी कोरड्या होण्यासाठी एखाद्या खुटीवर किंवा पºहाटी, तुºहाटीच्या कवट्यावर पहुडलेल्या असतात़

आता ‘झड’ गेलीय कुठं?

दिवस बदलले़ गावरानी जाऊन ‘हायब्रिड’ आलं तशी झडही लोप पावली़ आता झड दिसत नाही़ का कुणास माणसाला दुर्बुद्धी सुचली नि त्याने निर्सगावर मात करण्यास सुरुवात केली़ या सर्व प्रकारात स्वार्थ विजयी ठरला असला तरी त्याचे परिणाम आज दिसून येत आहे़ पावसाचे थेंब कमी झालेत़ आजच्या पिढीला ‘झड’ नावाची संकल्पना गावीही नाही़ पुस्तकातच तो शब्द वाचण्यात येतो़ त्या दिवसांतील धुरांची वलये गुंडाळून बसलीय़ शिवार आता पहिल्यासारखं भिजत नाही़ ‘घोंगशी’ची जागा आता छत्रीनं घेतली़.

Tuesday, 16 June 2020

पुस्तके विकून गाठली अभिनयनगरी


‘बॉलिवूड’मधील अनेक कलावंत दीर्घकाळपर्यंत चाहत्यांच्या मनावर राज्य करत असतात. मग ते निवृत्त झाले असो वा दिवंगत़ नायक असो, सहनायक असो, नायिका असो वा खलनायक. भारतीय चित्रपटसृष्टीतील खलनायक म्हटले की, अभिनेता जीवन यांच्यापासून सुरुवात करता येईल़(कारण त्यांना ओळखणारी पिढी सध्या ८० वर्षांच्या आसपास असू शकते.) नंतरच्या काळात प्राण, अजित, अमरिश पुरी, प्रेम चोप्रा, अमजद खान, कादरखान, सदाशिव अमरापूरकर, मोहन जोशी अशी रांग लागते़ नव्या पिढीतील किरण कुमार, परेश रावल, गुलशन ग्रोवर, शक्ती कपूर आदींचा समावेश होतो. सध्याच्या घडीला मुकेश ऋषी, गोविंद नामदेव, आशिष विद्यार्थी, मुकेश तिवारी ही मंडळी आहेत. मित्रांनो, कलावंताची भूमिका कोणतीही असो, आपल्याला त्यांच्यातील अभिनय वारंवार खुणावत असतो. म्हणून तर मुगल ए आझममधील जितका अकबर, तितकाच सलीम आपल्याला आवडतो़ शोले चित्रपटातील जितके जय विरूचे चाहते असतो, तितका गब्बर पसंत असतो़ जातिवंत रसिक, तोच...जो केवळ कलाकारातील अभिनय चाखतो!
असाच एक खलनायक पाहूयात़़़अजित! होय अजितच...अभिनयाचा गर्भश्रीमंत खलनायक़ आपण खलनायक अजित अर्थात लॉयन यांच्याबदद्ल बोलूयात. शेरवानी किंवा बंद गळ्याचा कोट किंवा थ्री पीस सूट, गळ्यात मोत्यांच्या माळा, टोकदार मिशी आणि बोटात सिगार वा पेटती पाईप. हे दृश्य केवळ अजित यांनाच शोभत होते. अधिकांश वेळा ते श्रीमंत व्यापारी किंवा समाजसेवकाच्या रुपात समोर येऊन पडद्यावर काळेधंदे करण्यात रममाण असल्याचे रसिकांनी पाहिले आहे. त्यांचे खरे नाव हमीद अली खान असे होते. पडद्यावर त्यांनी ‘अजित’ असे नाव धारण केले. ( हे नाव त्यांना ज्येष्ठ दिग्दर्शक महेश भट्ट यांचे वडिल नानाभाई भट्ट यांनी दिले होते, असे सांगण्यात येते.) पीटर, रॉबर्ट, मायकेल सारख्या ख्रिश्चन व्यक्तिरेखा साकारणाºया अजित यांनी पडद्यावर स्मगलरची खलनायक म्हणूनच ओळख निर्माण केली. त्यांची प्रतिमा मवाळपणाने बोलणारी; पण विध्वंसक खलनायकाची होती. सन १९४० च्या सुरुवातीला २२ व्या वर्षी त्यांना मुंबईत हीरो बनण्याची हुक्की आली. अभ्यासाची पुस्तके विकून जिवाची मुंबई नव्हे, अभिनयासाठी मुंबई गाठली. (अजित यांचा जन्म हैदराबादमधील गोलकोंडा येथे २७ जानेवारी १९२२ रोजी झाला होता. वारंगलमध्ये शिक्षण घेतले.) मेहनत आणि संघर्षाच्या जोरावर ते हीरोही बनले. नानाभाई भट्ट यांनी त्यांना हीरो म्हणून पडद्यावर उतरवले. नास्तिक, बडा भाई, मिलनस बारादरी, ढोलक यात नायक म्हणून अभिनय साकारला, तर मुगल-ए-आझममध्ये सेकंड लीडवर समाधान मानले.
अजित यांनी आपल्या चाळीस वर्षांच्या कारकिर्दीत पृथ्वीराज कपूर यांच्यापासून अगदी अमिताभ बच्चन यांच्यासह अजय देवगण यांच्याबरोबरही काम केले आहे. त्यावेळी नूतन आणि नर्गिस वगळून सर्व अभिनेत्रींसोबत त्यांनी अभिनय साकारला. सहायक अभिनेता (साईड हीरो) म्हणून त्यांनी ‘नया दौर’ आणि ‘मुगल-ए-आजम’मध्ये दिलीप कुमारसोबत काम केले. आपण अभिनयात कमी नाही, हे त्यांनी या दोन चित्रपटांतून दाखवून दिले; परंतु नंतरच्या काळात त्यांना केवळ बी ग्रेड चित्रपटच मिळत राहिली. राजेंद्र कुमार यांच्या सल्ल्यावरून त्यांनी ‘सूरज’ चित्रपटापासून खलनायक म्हणून नवीन ‘ईनिंग’ सुरू केली. दुसºयाच वर्षी आलेल्या ‘कालीचरण’नंतर त्यांना लॉयन अशी उपाधी मिळाली. यापूर्वी ६० च्या दशकात प्राण यांनी मैदान गाजवले होते. यानंतर अजित यांनी १९७० आणि ८०चे दशक गाजवण्यास सुरुवात केली. हा खलनायक प्रामुख्याने श्रीमंती लोळत पडलेला दिसून आला. कालीचरणमधील ‘दीनदयाल’ असाच काहीसा होता. ‘सारा शहर मुझे लॉयन के नाम से जानता है’, हा संवाद मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाला. या खलनायकाला एक पर्सनल असिस्टंट सुद्धा असल्याचे दिसून येते़ ‘मोना डार्लिंग’ असे तिचे नाव़ अजित यांनी या भूमिकेत इतका जीव ओतला की चाहते ‘लॉयन’सोबत मोनाचीही आठवण काढत असे.

व्हिस्कीची आॅफर

कोणत्याही चित्रपटात खलनायकाने केवळ मारच खावा, असे अपेक्षित असते़ अजित मात्र त्याला अपवाद आहे. ते नायकाला चक्क व्हिस्की आॅफर करतात. आठवा जंजीर... या चित्रपटात एक संवाद आहे़ खलनायक सेठ धर्मदयाल तेजा म्हणतो, ‘आओ विजय, बैठो और हमारे साथ एक स्कॉच पियो. हम तुम्हें खा थोडेही जाएंगे. वैसे भी हम व्हेजिटेरियन है’. या चित्रपटात समोर त्यावेळचा अँग्री यंग मॅन अमिताभ बच्चन होते. जंजीर चित्रपटात अजित यांनी शब्दांमध्ये पॉझ घेत बोलण्याचा प्रयोग केल्याचे आपण सर्वांनी पाहिले आहे. (याबाबत असे सांगण्यात येते की अजित यांनी हैदराबादेतील एक व्यक्ती अशाचप्रकारे संवाद साधत असल्याचा अनुभव घेतला होता.) पुढील काळात हीच त्यांची ओळख बनली़ खलनायक सुद्धा मृदुभाषी आणि शालिन असू शकतो, हे त्यांनी सिद्ध करून दाखवले. याचा प्रत्यय जुगनू, वारँट, चरस, यादों की बारात, कहानी किस्मत की, संग्राम अशा अनेक चित्रपटांतून पाहावयास मिळतो.

गीतेचे ज्ञान 

कोणत्याही चित्रपटात हीरो (नायक) हाच खलनायकाला संस्कृती आणि नैतिकेतेचे धडे देत असतो. (चित्रपटाच्या लेखकाने तशीच काहीशी तरतूद केलेली असते.) अजित यांचा मामला मात्र उलटा आहे. ते स्वत: हीरोला ज्ञान देत असतात. हे म्हणतात, अपनी उम्र से बढ़कर बातें नहीं करते. आशीर्वाद तो बड़े देते हैं. हम तो सिर्फ राय देते हैं़ अच्छा खरीदार हमेशा सौदा करने से पहले दुसरों की किंमत का अंदाजा लगाता है. अजितमधल्या खलनायकाला हेही माहिती आहे की गीतेची रचना कशी झाली. त्यांचा एक संवाद असा आहे, ‘तारीख इस बात की गवाही देती है कि महाभारत की कहानियाँ कभी गुलाबजल से नहीं लिखी गयी. ये हमेशा गरम खून से लिखी जाती है.
मित्रांनो, अजित यांना आपले संवाद बोलण्याची एक विशिष्ट ढब गवसली होती. ती त्यांच्या आवाजाला ‘परफेक्ट’ बसली. आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी सकारात्मक भूमिका साकारल्या. मुगल-ए-आजममधील अजित यांना विसरणे अशक्य आहे. त्यांच्या आवाजात एक ‘वजन’ होते, ज्याने त्यांना मृत्यूपर्यंत म्हणजे २३ आँक्टोबर १९९८ पर्यंत ‘श्रीमंत खलनायक’ म्हणून कायम ठेवले.

काही प्रसिद्ध संवाद

* कुत्ता जब पागल हो जाता है तो उसे गोली मार देते हैं (जंजीर)
* सारा शहर मुझे लॉयन के नाम से जानता है (कालीचरण)
* जिस तरह कुछ आदमियों की कमजोरी बेईमानी होती है, उसी तरह कुछ आदमियों की कमजोरी ईमानदारी होती है (जंजीर)
* जिंदगी सिर्फ दो पांवों से भागती है और मौत हजारों हाथों से उसका रास्ता रोकती है (आजाद)
* मेरा जिस्म जरूर जख्मी है, लेकिन मेरी हिम्मत जख्मी नहीं (मुगल-ए-आजम)
* शाकाल जब बाजी खेलता है तो जितने पत्ते उसके हाथ में होते हैं, उतने ही उसकी आस्तीन में होते हैं (यादों की बारात)

©  संजय इस्तारी मुंदलकर

Sunday, 14 June 2020

नमुने



गाव म्हटलं गावात अनेक नमुने असतात़ आता हे काय ‘बेण’ असं विचारालं, तर बरं होणार नाही़ ‘बेणं’ या शब्दाचा अर्थच जात असा़ ‘माती तशी चूल’ अशी म्हण तर विचारात घेतली तर ‘गाव तशा जाती’ राहणार आणि त्यातील ह्या ‘बेणी’ सुद्धा! गाव हे अगदी दहा-वीस घरांपासून तिकडे हजारांच्या लोकसंख्येत सांगता येईल़ लहान परिसर असल्याने प्रत्येकांच्या ओळखीशी आपण जुळलेले असतो़ त्यांचा स्वभाव माहिती असतो़ त्यांच्या प्रत्येक गोष्टीशी जुळवून घेतात़
माझा जन्म गावातलाच़ गावातल्या मातीशी नाळ जुळलेला मी माणूस़ प्राथमिक शाळेत असेपर्यंत मी अनेकांची घरे बघितली नव्हती वा त्यांची माहिती नव्हती़ मात्र,वय वाढले गेले तशी गावाशी ओळख झाली़ ‘माणसां’शी ओळख झाली तशी त्यांच्या स्वभावाच्या विविध कंगोºयाशीही ओळख झाली़ अनुभव येत गेले़ तशी स्वभावावर लिंपण होत गेली़
माझ्या गावात ‘खंड्या’ नावाचा व्यक्ती होता़ आता तो हयात नाही़ बºयाच वर्षांपूर्वी तो देवाघरी गेला़ त्यावेळी अंदाजे माझं वय चौदा-पंधरा वर्षे असेल़ ह्या खंड्याचं मूळ नाव मला माहिती नाही़ बहुधा तो लहान भावासोबत राहात असावा़ तर हा खंड्या पाहायला काळा होता़ त्याचा वरचा ओठ दोन भागात तुटलेला होता़ तसा तो पाहायला वाईट नव्हता; पण काळ्या रंगावर ओठाची दोन ‘खांड’ झाल्याने तो भयानक दिसायचा़ कदाचित याच कारणामुळं त्याचं लग्न झालेलं नसावं़ लहान मुलं त्याला घाबरायची़ शेतातील कामे करून आपले आणि भावाच्या पोटापाण्याची व्यवस्था करायचा़ माझ्या घराजवळ देवीच्या मूर्तीची स्थापना करण्यात येत़ विसर्जनाच्या दिवशी कुणी वाघाचं सोंग घेई, कुणी घोडा बनत, कुणी जिराफाचं सोंग घेत़ यात खंड्या वाघाचं रुप साकारत असे़ मुळातच तो रंगानं काळा होता़ त्यामुळं त्याच्या अंगावर पिवळे पट्टे उठून दिसतं़ तर हा खंड्या वाघाचा नाच करण्यात निपुण होता़ कधीही आणि केव्हाही तो तसे नृत्य करण्यास तयार असे़ देवी विसर्जनात खंड्याशिवाय कुणीही वाघाचे सोंग घेत नव्हते़ आणि कुणी तसा विचार केलेलाही त्याला खपत नसे़ त्याच्या या स्वभावाचा कुणीही फायदा घेत असे़ एका विसर्जनाच्या दिवशी अंगात ताप असूनही त्याने आपले काम चोख बजावले होते़ ‘देवी मला काहीही होऊ देणार नाही’, असे तो म्हणत असे़ आणि खरोखर त्याचा ताप दुसºया दिवशी पार पळाला़ एकदा तो विहिरीवर पाणी भरण्यास आला़ काही टारगट पोट्यांना हुक्की आली़ ते सर्वजण खंड्याजवळ आले आणि त्यांनी वाघाचा नाच सादर करण्यास सांगितलं़ झालं हा खंड्यानं बादली-दोन बाजूला ठेवला आणि तिथंच ‘डजगनं डजगनं’सुरू केलं़
काशिनाथ लांडगे हे गावातील आणखी दुसरं ‘बेणं’ होतं़ आडनांव लांडगे असलं तरी तो बघायला ‘वाघा’सारखाचं होता़ साडेसहा फूट उंची, धिप्पाड अंगकाठी, काळाकुट्ट रंग, चेहºयावर माताच्या वणा,आवाजातही मोठी जरब असं हे व्यक्तिमत्त्व होतं़ तर या काशिनाथबुवाच्या बायकोपोराबद्दल अनेकांनी वेगवेगळं ऐकलं होतं़ तो एकटाच राहत असे़ कदाचित त्यांच्या कामचुकारवृत्तीने,आळशीपणामुळे बायको त्याला सोडून गेली असावी़ पोटापाण्यासाठी तो फारसा काम करताना दिसत नसे़ त्याचा दिनक्रम ठरलेला असे़ दुसरं काही नाही केलं तरी त्याची सकाळची आंघोळ कधी चुकली नाही़ तो कधी आजारी पडलेला, असं मीच काय? कुणीही ऐकलेलं नाही़ कधी कधीच तो काम करायचा, असं म्हटलं तर हसायला नको़ कारण तो कामाला जाताना क्वचितच दिसायचा़ मात्र, रामकृष्ण मामाच्या कामठ्यात बसलेला असायचा आणि त्याच्याशी चकाट्या पिटायचा़ हा कामठा एसटी स्टँडला लागूनच होता़ त्यामुळे गप्पांना विषयांची वाणवा नसे़ तर हा काशिनाथ कुणावरही विनाकारण डाफरत असे़ त्याचं कुणाशी कधी वाजेल याचा भरवसा नसे़ कधीकधी तो गावखाºयाची रखवालीचं काम करायचा; पण रस्त्यावरूनच आवाज करीत त्यामुळं कमीत कमी डुकरं तरी पळून जायची़ पिकात मात्र शिरायचा नाही़
आमच्या गावात भागवताचं सप्ताहाभर दररोज जेवणाचा कार्यक्रम होत असे़ कुठे वरणभात,पोळीचं तर कुठे खिचडी,कढीचं जेवण राहायचं़ हा बुवा एकटा असल्याने त्याला आमंत्रण असायचंच; पणह्या काशिनाथबुवाचा आहार खूप होता़ तो किती खायचा, ह्याचा हिशोब लावताना जेवण वाढणारे थकून जातं़ एक पंगत संपली तरी त्याचं जेवण संपत नसे़ खिचडी तरी तो पायली-दोन पायल्यांची खात असेलच़ अनेकांनी त्यांच्या आहाराच्या अंदाज घेण्याचा प्रयत्न केला;परंतु ते कुणालाही साधलं नाही़
तसे गावात ‘बेणं’ खूप होते आणि आहेतही़ मात्र, आता खूप फरक पडला आहे़ गावातले दिवस बदलत आहेत, कदाचित म्हणून असावेत़ आबा, पक्या, ईठ्या, सुध्या असे अनेक भारी भारी ‘कॅरेक्टर्स’ आहेत़


© संजय इस्तारी मुंदलकर

शिवारातील आमराई झाल्यात उजाड...


बहर येत नाही म्हणून अनेक कास्तकारांनी आपल्या आमराई विकून टाकल्या़ झाडांशी असलेले नाते आणि आजोबा,पणजोबा, वडिलांनी आपल्या हातांनी लावलेली झाडे कवडीमोल पैशांत मोजली़ ज्यांना रुजण्यास कित्येक दिवस लागली,आपल्या जगण्याचं महत्त्व पटवून देण्यास करोडो क्षण लागली, ती झाडे काही क्षणात जमीनदोस्त करण्यात आली़ आणि नियती बघा, हे सर्व आपण ‘याच देही याच डोळी’ बघितलं़ अगदी आदि आणि अंत सुद्धा!


शेतकºयांचा आपल्या झाडाझुडपांवर भारी जीव असता़े शेतकरीच काय पण सामान्य गावकरीही झाडांवर तितकाच प्रेम करतो़ ज्याच्या घरी वावर नाहीत, तोही झाडांना जोपासतो़ गावशिवारात बाभूळ, कडुलिंब, सुबाभूळ, पळस, आवळा, आंबा, उंबर, कवठ, चिंच, बोर अशी कितीतरी प्रकारची झाडे असतात़ लहान-मोठी झाडे तर वेगळीच! बाभळाची तर बनच बन असतात, तशी कडुलिंबांचीही मोठी रांग दिसून येते़ नदीच्या काठी आणि पडीक जमिनीत बोरीच बोरी दिसून येते़ कुणी धुºयावर ही झाडे लावतो,तर कुणी आपल्या पडतात त्यांची लागण करतो़ झाडं कोणतंही असो ते कुठं आणि कसं कामास येईल, हे सांगता येत नाही़
आंब्यांची झाडं तर शिवाराची शान असते़ कोणत्याही गावाभोवताल आमराई असतेच़ कुण्याच्या  धुºयावरही ही झाडे आढळून येतात़ आंब्यांची झाडे वाढण्यास आणि फळ येण्यास मोठा कालावधी घेत असल्यामुळे अनेकजण आता कलमी आंब्याकडे वळले आहेत़ मात्र, गावरानीची चव जशी हायब्रिडला नसते, तशी चव कलमीला नसतेच, हे मान्य करावेच लागते़
विदर्भातील गोंदिया ते मध्यप्रदेशातील रजेगांव या राज्यमार्गावर तर आंब्याची मोठमोठी झाडे आहेत़ काही प्रमाणात की तोडली गेली आहेत. राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागानेही ग्रामीण रस्त्याचे जाळे तयार करताना रस्त्याच्या बाजूला बाभळी, कडुलिंब, आंबा आदी अनेक प्रकारची झाडे लावली आहेत़
शिवारात असायची तशी चिंचेची झाडं गावातही असायची़ आपल्या मुळा जमिनीत घट्ट आणि खोलवर रुजवणारे हेच एकमेव झाड असावे़ फांद्या अत्यंत दाट असल्याने पक्ष्यांचा तो मोठा निवारा असतो़ पाऊस, ऊन्हं आणि हिवाळ्यातील थंडीपासून संरक्षण करणारं हे झाडं आहे़ अखजीला ‘चिचुणी’ करण्यासाठी कुण्या दुकानात जावं लागत नाही़ चिंचेच्या कोवळा पाला खाण्यात काय मजा होती़ सुटीच्या दिवशी शाळेतील पोरंपोरी दिवसभर चिंचेच्या झाडाखाली असायच्या़ दहा दगड मारल्यानंतर पाच दगडात पंधरा तुकडे पडायचे़ आपल्या वर्गातल्या पोरीवर ‘इम्प्रेशन’ मारण्यासाठी चिंचा पाडण्यात पोट्टे वस्ताद होते़ एखाद्याच्या दगडानं कुणाचं डोकं फुटल्यास त्याबदल्यात चिंचा देऊन समजावणी
केली जाई़
विदर्भात प्रत्येक गावात आमराई होती, आहे असं म्हणण्याचं धाडस आता करता येणार नाही़ आपल्या गावातील ग्राहकांची गरज भागवून उरलेल्या आंब्यांची विक्री करण्यात येत होती़ वावरातील खरिपाची कामे करताना शेतकºयाची एक ‘जीवनसाथी’ म्हणजे भाकरीची शिदोरी़ पहाटे पाच सुमारास घरातून आपल्या बैलांसह वावरात निघालेला शेतकरी शिदोरी घेऊनच निघालेला असतो़ वखरवाहीत व्यस्त असल्याने कधीकधी रात्रीचीही भाकर न्यावी लागते़ साधारणत: सकाळी नऊच्या सुमारास तो शिदोरी सोडतो़ त्यापूर्वी तो आपल्या शेताच्या मध्यभागी असलेल्या झाडाची दोन-चार आंबे दगडं मारून तोडतो़ भाकरी-भाजीच्या घासासोबत कांदा तोंडी लावतो तशीच आंब्याची फोडही! या साºयांचा एक घासच जगातल्या पक्वान्नांहून सरस ठरतो़ जरा अनुभव घेऊन बघा़
पाण्याच्या दोन-चार घोटाबरोबर हा शेतकरी श्रम करतो, मेहनत करतो़  तृप्तीची ढेकर दिल्यानंतर थोडीशी सुस्ती आल्याने त्याच आंब्याच्या झाडाखाली तो दोन क्षण डोळे लावतो़ घरी परताना तो आणखी दोन-चार आंबे शिदोरीच्या थैलीत ठेवतो़ कारण दुपारच्या जेवणसाठी घरधनीनला आमरस करायचं असतं़
बाभळीच्या झाडाचंही तसंच़ हे झाडं कुणाला लावावं लागत नाही़ तो आपणच आपला रुजतो़ या झाडाचा कोणताही भाग बेकामी नाही़ पान, फुल, शेंग, लाकूड आणि अगदी काटे सुद्धा कुंपणाच्या उपयोगात येतं़ गरिबासाठी तर ते ‘कल्पवृक्ष’चं ठरतं़ घराची दारं, खिडक्या, मयाली, मांडवासाठी ‘डी’ अशी कितीतरी साहित्य एकटा झाड देतो़ अनेक कास्तकारांनी आपल्या पडतात बाभळांचे बन तयार करत असतात़ त्यातून मोठा फायदा मिळत असे़
मात्र, गेल्या काही वर्षांत चित्र बदलले़ माणूस नको तितका स्वार्थी बनला़ आणि त्याने निसर्गावरच कुºहाड उचलली़ लाकडाचा व्यवसाय करणाºयांनी आपली नजर गावांकडे वळवली़ अगोदरच नापिकीमुळे त्रस्त झालेल्या शेतकºयांनीही त्याच्या हाकेला ‘ओ’ दिली़ आपल्या पडतातील शेकडो झाडे त्याने अगदी कमी किंमतीत विकून टाकली़ कालपरवापर्यंत हिरवीगार दिसणारी जागा आता ‘बोडखी’ दिसू लागली़ धुरेही उजाड झाली़ बहर येत नाही म्हणून अनेक कास्तकारांनी आपल्या आमराई विकून टाकल्या़ झाडांशी असलेले नाते आणि आजोबा, पणजोबा, वडिलांनी आपल्या हातांनी लावलेली झाडे कवडीमोल पैशांत मोजली़ ज्यांना रुजण्यास कित्येक दिवसं लागलीत,आपल्या जगण्याचं महत्त्व पटवून देण्यास हजारो तास लागले, ती झाडे काही क्षणात जमीनदोस्त करण्यात आली़ आणि नियती बघा, हे सर्व आपण ‘याच देही याच डोळी’ बघितलं़ अगदी आदि आणि अंत सुद्धा!
शहरातले लाकडाचं टाल (वखारी) बघा़ हजारो टन ओली झाडे पडलेली दिसून येते. याकडे सरकारचे दुर्लक्ष आहेत आणि पर्यावरणवाद्यांचेही! केवळ सागवान तोडीला ‘लक्ष्य’ करून चालणार नाही, तर लहानातल्या लहान झाडाच्या तोडीला विरोध झालाच पाहिजे, तरच हा निसर्ग आपला आहे; अन्यथा अवेळी नाश हा ठरलेलाच!

© संजय इस्तारी मुंदलकर

Wednesday, 13 May 2020

काळाला शरण गेलेली रंजना

अभिनेत्री रंजना ही प्रसिद्ध अभिनेत्री वत्सला देशमुख यांची कन्या. ‘पिंजरा’ चित्रपटात अभिनेत्री संध्याच्या बहिणीच्या भूमिकेत वत्सला यांना आपण बघितले आहे. याशिवाय अनेक हिंदी चित्रपटांमध्येही त्यांनी भूमिका साकारल्या  आहेत.

अभिनेत्री संध्या यांच्यासोबत रंजनाचे अतिशय जवळचे नाते. संध्या या वत्सला देशमुख यांच्या धाकट्या भगिनी. या नात्याने त्या रंजनाच्या मावशी आहेत. संध्या यांचे लग्न व्ही. शांताराम यांच्यासोबत झाले होते. त्यामुळे रंजना या व्ही. शांताराम यांच्या भाची होत्या. त्यांनीच  रंजनाला  १९७५ मध्ये ‘चंदनाची चोळी अंग अंग जाळी’ चित्रपटातून पडद्यावर आणले होते. पहिल्याच चित्रपटात रंजनाने  रसिकांची मने जिंकली.
 रंजनाने केलेले चित्रपट आणि त्यातील गाणी आजही लोकांच्या स्मरणात आहे. ‘मुंबईचा फौजदार’मधील ‘हा सागरी किनारा...’, तसेच ‘अरे संसार संसार’मधील ‘निसर्ग राजा...’ ही रंजनाची गाणी आजदेखील गुणगुणली जातात. विनोदी भूमिकांसोबतच गंभीर भूमिकांमध्येही ती उजवी ठरली. खेड्यातील मुलीपासून ते शहरातील मॉडर्न गर्लपर्यंतच्या प्रत्येक भूमिकेत  स्वत:ला अक्षरश: झोकून द्यायची. ‘भुजंग’मधील  ग्रामीण स्त्री असो वा ‘भालू’ चित्रपटातील उच्चशिक्षित स्त्रीची भूमिका असो, रंजना कुठेच कमी पडली नाही.
सासू वरचढ जावई, सुशीला, चानी, केला इशारा जाता जाता, भालू, खिचडी, लक्ष्मीची पाऊले, सावित्री, जखमी वाघीण, गोंधळात गोंधळ, सासुरवाशीण, बिन कामाचा नवरा, मुंबईचा फौजदार आदी चित्रपटांतून रंजनाने आपली अभिनयशक्ती जागवली. १९८०  मध्ये ‘अरे संसार संसार’ आणि १९८३ मध्ये ‘गुपचूप गुपचूप’ चित्रपटांसाठी तिला राज्यसरकारचा उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. रंजनाची ‘मामा’ अशोक सराफ यांच्यासोबत आॅनस्क्रीन केमिस्ट्री खूप छान जमून आली होती. रंजना आणि अशोक सराफ एकमेकांच्या प्रेमात पडल्याचीही चर्चा रंगली होती. ही शेवटपर्यंत केवळ एक चर्चाच ठरली. सर्व काही सुरळीत सुरू असताना एका क्षणात  तिचे  आयुष्यच पालटून गेले. ‘झुंजार’च्या (१९८३) चित्रीकरणासाठी बंगळुरूला जात असताना  कार अपघातात  रंजनाला कायमचे अपंगत्व आले. तिचे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले. शेवटपर्यंत सावरू शकली नाही.

            आयुष्याचे नाटक

रंजनाने मराठी नाटक ‘फक्त एकदाच’मधून पदार्पण केले होते. हे नाटक रंजनाच्या आयुष्यावर आधारित असल्याचे म्हटले जाते. व्हीलचेअरवर असलेल्या स्त्रीला तिचा प्रियकर सोडून जातो, असे कथानक असलेले हे नाटक रंगभूमीवर आले, ज्यात तिने अखेरची भूमिका केली होती. अशातच ३ मार्च २००० रोजी हृदय  बंद  पडल्याने रंजनाने वयाच्या अवघ्या ४५ व्या वर्षी  कायमचा निरोप घेतला. एका मुलाखतीत रंजनाच्या मातोश्री वत्सला देशमुख यांनी सांगितले होते, अपघातानंतर रंजनाला अपंगत्व आले. तशा अवस्थेतही तिने  अनेक वर्षे काढली. मृत्यू समोर दिसत असतानाही मृत्यूला घाबरली नाही. आनंदी  होत  मृत्यूला हसतमुखाने ती सामोरी गेली. गोंधळात गोंधळ, मुंबईचा फौजदार, जखमी वाघीण, भुजंग, एक डाव भुताचा यांसह अनेक चित्रपटांमध्ये रंजना झळकली.  ही ८० च्या दशकातील मराठीतील आघाडीची अभिनेत्री. ‘लेडी कॉमेडियन’ म्हणूनही रंजनाला ओळखले जाते.  करिअर  यशोशिखरावर असताना एक वळण असे आले,की  तिचे संपूर्ण आयुष्यच बदलून गेले. तिची जीवन कहाणी कुणालाही हेलावून सोडणारी आहे. यावर्षी ३ मार्च २०२० रोजी रंजनाला या जगाचा निरोप घेऊन  २०  वर्षांचा काळ लोटला  आहे. 


© संजय इस्तारी मुंदलकर 

आशादायी रामेश्वरी



आजच्या घडीला मराठी, हिंदी चित्रपटांत नशीब आजमावण्यासाठी अनेक तरुणी दररोज दाखल होत आहेत़ त्यांच्या जवळ गोरा सुंदर चेहरा आहे. कदाचित अभिनयही करता येईल; परंतु गोरा चेहरा हे भांडवल असूच असत नाही, यावर आमचे ठाम मत आहे़ कारण या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी, नशिबाची साथ आवश्यक असते.   सावळा चेहरा असूनही स्मिता पाटील, रामेश्वरी  अभिनयात  मोठ्या उंचीवर पोहोचल्या होत्या.
आंध्र प्रदेशच्या काकीनाडा येथे जन्मलेल्या तल्लूरी रामेश्वरी हिंदी चित्रपटात ‘रामेश्वरी’ म्हणून ओळखल्या जातात.  ‘दुल्हन  वही  जो  पिया  मन  भाये’ (सन १९७७) या पहिल्या चित्रपटाने मोठी  लोकप्रियता मिळवली. राजश्री प्रॉडक्शनच्या या चित्रपटात रामेश्वरीने कम्मोची भूमिका साकारली होती.  चित्रपटाने देशभरातील चित्रपटगृहात रौप्य महोत्सव आणि सुवर्ण महोत्सव साजरा केला. यासह रामेश्वरी एका रात्रीतून स्टार बनल्या. चित्रपटाची कथा लोकांच्या अगदी आसपास घडणारी होती. कथेतील पात्रे देखील सामान्य लोकांतून घेतली  गेली आहेत असे दिसून येते.
 मदन पुरी, प्रेम किशन, इफ्तिखार, शशी कला, श्यामली, शिवराज, सुंदर, लीला मिश्रा, सविता बजाज, पिलू वाडिया, विजू  खोटे आणि जगदीप यांनी भूमिका साकारल्या होत्या. गाणे आणि रवींद्र जैन यांचे संगीतही मधुर आणि मधुरच...
सन १९७० च्या दशकातही, सावळ्या रंगाच्या मुलींना ‘स्टार मटेरियल’ मानलं जात नव्हतं. तथापि, जया भादुरीनं लहान वयात यश संपादन केल्याचा अनुभव प्रेक्षकांनी घेतला होता. रामेश्वरीने हिंदी चित्रपट क्षेत्रात करिअरची सुरुवात केली तेव्हा जया भादुरी-बच्चन यांनी अमिताभ बच्चन यांच्याशी लग्न करून स्वत: ला अभिनयापासून दूर केले होते. अशा परिस्थितीत  प्रेक्षकांना रामेश्वरीत जया बच्चनची  प्रतिमा  दिसू  लागली, असेही काहीजण सांगतात.
रामेश्वरी  यांनी  पूर्णपणे भारतीय सुसंस्कृत स्त्रीची  प्रतिमा स्वीकारली. त्याच्यात दर्शकांना  एक आदर्श मुलगी, एक आदर्श पत्नी आणि आदर्श सून अशी प्रतिमा दिसू लागली होती.  नशिबाने  मात्र फार काळ  साथ दिली नाही. एका चित्रपटाच्या छायाचित्रणादरम्यान  डोळ्याला  दुखापत झाली. यात एका डोळ्याचा आकार बदलला. या अपघाताने त्याच्या कारकिर्दीला ग्रहणच लागले. त्यांना चित्रपट मिळणे बंद झाले. मिळणाºया भूमिका सह अभिनेत्री म्हणून होत्या. मात्र, दुसरा मार्ग नव्हता. रामेश्वरीने परिस्थितीशी तडजोड करत मिळेल त्या भूमिका साकारण्यास सुरुवात केली. यात ‘आशा’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते.
रामेश्वरी यांनी तेलुगु चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. निर्माता के. विश्वनाथ यांचा १९७८  साली प्रदर्शित झालेला चित्रपट ‘सीतालक्ष्मी’ हा त्यांच्या कारकिर्दीचा क्लासिक चित्रपट मानला जातो. याशिवाय त्यांनी चिन्नो पेडडुडू, निझाम, नंदनवनम या तेलुगु चित्रपटांमध्येही आपली प्रतिभा दाखवली. ‘चिन्नो पेडडडू’ साठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा नंदी पुरस्कार देण्यात आला. लहान पडद्यावरील  कैरी, मितवा,  फूल  कमल के, जब लव लव, बाबुल का आंगन छोटा ना, पडोसी आणि चमत्कार आदी मालिकांतही  अभिनय साकारला आहे.
रामेश्वरी यांनी  वर्गमित्र आणि पंजाबी चित्रपटांचे अभिनेता-निर्माता दीपक सेठ यांच्याशी लग्न केले. त्यांना भास्कर प्रताप आणि सूर्य प्रेम अशी दोन मुले आहेत. रामेश्वरी यांनी आपल्या पतीसमवेत १९८८ मध्ये ‘हम फरिश्ते नहीं’ ची निर्मिती केली. त्यात अभिनय देखील केला. २००७ मध्ये शेक्सपियरचे नाटक द कॉमेडी आॅफ एरर्स’ वर आधारित पंजाबी चित्रपट देखील बनवला होता.
अभिनयापासून दूर होण्याबद्दल रामेश्वरी म्हणतात, की  चित्रपटांमधून निवृत्त झालेले नाही. अजूनही काम करण्याची आकांक्षा बाळगून आहे. निर्माता मला विसरले आहेत. चांगल्या अभिनयासाठी कोणत्याही औपचारिक प्रशिक्षणाची आवश्यक नसते, असा माझा विश्वास आहे. प्रतिभा  ही नक्कीच जन्मजात असते. प्रशिक्षण एखाद्याची प्रतिभा वाढवू शकते, ती निर्माण करू शकत नाही.


काही प्रमुख चित्रपट

दुल्हन वही जो पिया मन भाये (१९७७), मेरा  रक्षक (१९७८), सुनयना (१९७९), आशा (१९८०), मान अभिमान (१९८०), शारदा (१९८१), अग्निपरी
क्षा (१९८१), आदत से मजबूर (१९८१),इकरार,  ए न्यू हिस्ट्री, मान मर्यादा, भाई  का दुश्मन भाई, प्यारी भाभी , हम  फरिश्ते नहीं , कुछ  तुम कहो  कुछ  हम  कहें, बंटी आणि बबली. याशिवाय हिंदी आणि तेलगू व्यतिरिक्त मल्याळम, कन्नड, बंगाली, उडिया आणि भोजपुरी चित्रपटांमध्येही भूमिका केल्या आहेत.

लोकप्रिय गाणी

ले तो आये हमें सपनों की गाँव में, इन नजारों को तुम देखो, खुशियाँ ही
खुशियाँ दामन में जिसके, ऐ मेरे उदास मन, जहाँ प्रेम का पावन दियारा जले, तुने मुझे बुलाया शेरावालीये आदी अनेक गाणी त्यांच्यावर चित्रित झालेली आहेत.
© संजय इस्तारी मुंदलकर 

Monday, 11 May 2020

लॉकडाऊन काळात हरवलेली माणुसकी




‘कोरोनामृत्यू’ पासून सुटकेचा आटापीटा करत दुर्दैवाने मृत्यू आल्यानंतर त्याच्या अंत्यसंस्कारालाही नाकारणारी माणसे याच मातीत जन्मली आहेत. रुग्णांवर उपचार करणाºया कर्मचाºयांच्या कामात मुद्दाम अडथळे आणली जात आहेत, हे वास्तव समाजाला पचवावे लागेल. काळानुसार कोरोना संकटाचा विसरही पडेल; परंतु आपल्या माणसांनी शरीरावर केलेल्या जखमांचा, अपमानास्पद वागणुकीला, मनाला दिलेल्या वेदनांचा विसर होणे कठीण असेल़ 

सार्वजनिक जीवनात प्रशासकीय अधिकारी, कर्मचाºयांना मारहाण, जिवे मारण्याची धमकी देण्याचे प्रकार अनेक वर्षांपासून घडत आले आहेत. क्वचित मारहाणही केली जाते. डॉक्टरांवरील हल्ले हा खरं तर जुना विषय. मात्र, यासंबंधी कडक असे कायदे निर्माण न झाल्याने आरोपीला शिक्षा होत नसल्याचे दिसून येते. यातून पुन्हा नवीन घटना घडली जाते. सध्या जगाचे अस्तित्व संपवू पाहणाºया कोरोनाच्या गंभीर संकटातही हे प्रकार थांबलेले नाहीत. सफाई कामगार, पोलिस, डॉक्टर्स, पारिचारिका यांच्यासह अन्य शासकीय कर्मचारी आपले प्राण धोक्यात घालून कर्तव्य पार पाडत आहेत. ही सर्व मंडळी घरादाराचा त्याग करून कोरोनाबाधितांवर उपचार करत आहेत, त्यांच्या आयुष्यासाठी २४ तास कर्तव्य बजावत आहेत, कुणी एखादी महिला पोलिस आपल्या बाळापासून दूर राहून किंवा त्याला सोबत घेऊनही कर्तव्य पार पाडत असल्याचे प्रसारमाध्यमातून वाचावयास मिळत आहे़ अनेक पोलिस कर्मचारी, डॉक्टर्स वा पारिचारिका आपल्या कुटुंबातील सदस्याला संसर्ग होऊ नये यासाठी त्यांच्यापासून अलग राहत आहे़ असे असूनही या सर्वांवर जिवेघेणे हल्ले, मारहाण होत आहे, त्यांना अपमानित करण्यात येत आहे. विशेष संपूर्ण देशभरात अशा घटना घडत आहेत. यातील बहुतांश घटना लॉकडाऊनच्या दुसºया टप्प्यात एप्रिल महिन्यात घडलेल्या आहेत.



ही घटना १७ एप्रिल २०२० रोजीची आहे. झारखंडमधील रांची येथील कोकर सँम्फोर्ड रुग्णालयातील किडनी ट्रांसप्लांट सर्जन डॉ. गीता आपल्या रुग्णालयात कारमधून जात असताना दोन तरुणांनी त्यांची कार अडवली़ यावेळी त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. धक्कादायक म्हणजे त्यांच्या कारवर थुंकण्यात आले.
उत्तर प्रदेशातील मुरादाबादेत १४ एप्रिल रोजी घडलेली ही घटना अतिशय संतापजनक आहे. याठिकाणी कोरोना विषाणूच्या संसर्गाने एकाचा मृत्यू झाला. यानंतर डॉक्टर्स आणि आरोग्य विभागाचे एक पथक मृतकाच्या संपर्कात आलेल्यांना क्वॉरन्टाईन करण्यासाठी गेले असता काही लोकांनी त्यांच्यासह पोलिस अधिकारी तसेच अन्य कर्मचाºयांवर दगडफेक केली.रुग्णवाहिका आणि अन्य शासकीय वाहनांची तोडफोड केली. यावेळी एकूण पाचजण गंभीर जखमी झाले.

बिहारमधील औरंगाबाद जिल्ह्यातील अकौनी नावाच्या गावात दिल्ली शहरातून एकजण आल्याची सूचना मिळाल्याने डॉक्टरांचे एक पथक गावात पोहोचले़ मात्र, गावकºयांनी त्यांच्यावरच हल्ला चढवला. यावेळी डॉक्टर, वाहनचालक आणि अन्य एक कर्मचारी असे जखमी झाले. गावातील लोकांनी वाहनांचीही तोडफोड केली. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी, पोलिस अधिकारी आणि उपविभागीय महसूल अधिकारी घटनास्थळी पोहोचले. गावकºयांनी या सर्वांवर दगडफेक केली. यापूर्वी बिहारमधील मधुबनी, भागलपूर, कटिहारसह राज्यातील अनेक भागात डॉक्टर्स तसेच पोलिसांवर हल्ल्याचा घटना घडल्या आहेत.
या काळात माणुसकी इतकी पायदळी तुडवली, मानवी संवेदना इतक्या बोथट झाल्या की मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यावरही अडथळा आणण्यात येत आहे. हरयाणातील अंबाला येथील चांदपुरा येथील एका निश्चित केलेल्या ठिकाणी अंत्यसंस्काराची तयारी करत असताना घटनास्थळी मोठ्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली. तसेच, पोलिस आणि डॉक्टरांच्या पथकावर हल्ला चढवला. अन्य वाहनासह रुग्णवाहिकेचीही तोडफोड केली. एका शवाला त्याचा अखेरचा अधिकार देण्यासही मानवी जीवाने सपशेल नकार दिला़ यापेक्षा दुर्र्दैवी उदाहरण कोणते?

अशा घटनांचे चक्र सुरूच आहे. आज ११ मे दिवसही अपवाद नाही़ महाराष्ट्रातील चाळीसगांव येथेही काही कर्मचाºयांवर हल्ला केल्याचे वृत्त आहे. उत्तर प्रदेशातील कानपूर ग्रामीण जिल्ह्यातील रसूलाबाद भागात तुलसीनगर कंजड डेरा येथे लोकांना एकत्र जमा न होण्यास मनाई केल्याने महिलांसह काही लोकांनी पोलिसांच्या एका पथकावर जिवघेणा चढवला. महिलांकडून दगडफेकही केली गेली. त्यामुळे पोलिसांनी तत्काळ घटनास्थळ सोडले आणि त्यामुळेच त्यांचे प्राण बचावले. तरीही या हल्ल्यात तीन अधिकाºयांसह दोन महिला आणि दोन पुरुष पोलिस कर्मचारी जखमी झाले. याप्रकरणी सहा महिला आरोपींसह अन्य १३ हल्लेखोरांना ताब्यात घेतले आहे.
चेन्नईमध्ये कोरोनामुळे एका डॉक्टरचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या अंत्यविधीलाही लोकांनी विरोध केल्याचा प्रकार घडला. यावेळी रुग्णवाहिकेवर दगडफेक केली होती. अशीच एक घटना आंध्र प्रदेशातही घडली. काही दिवसांपूर्वी कोरोनामुळे डॉक्टरचा मृत्यू झाल्यानंतर लोकांनी त्याच्या अंत्यसंस्काराला विरोध केला होता, आंदोलनही केले होते. कोरोनाबाधितांवर उपचार करणाºया डॉक्टर्स, पारिचारिकांना भाड्याच्या घरात राहण्यास मनाई केल्याचेही प्रकार देशभरात घडल्याचे दिसून आले. दोन आठवड्यांपूर्वी मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये विनोबानगर परिसरात सर्वेक्षण करावयास गेलेल्या एका वैद्यकीय पथकावर (मेडिकल टीम) काहींनी दगडफेक केली. तसेच, त्यांचे मोबाईलही तोडले.


दोन दिवसांपूर्वी मुंबईत हल्लेखोराने पोलिसांवर कोयत्याने हल्ला चढवला़ मागील महिन्यात पंजाब राज्यात काही गुंडांनी एका पोलिस अधिकाºयावर वार करून एक हात तोडला होता. यात अत्यंत धक्कादायक आणि संतापाची बाब म्हणजे राजकीय नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते आदींचा सहभाग असल्याचे दिसून आले आहे. अशीच एक घटना महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील इस्लामपुरात २८ एप्रिलला घडली आहे. लॉकडाऊन आणि कलम १४४ लागू असणे, महामारी कायद्याची अंमलबजावणी सुरू असताना आपला दारूचा धंदा बिनबोभाट सुरू राहावा यासाठी एका राजकीय पक्षाच्या नगरसेवकाने नगरपालिका मुख्याधिकाºयांच्या कक्षात जाऊन मारण्याची धमकी दिली. या घटनेनंतर संबंधित नगरसेवक गावातून पळून गेला़ मात्र, फरार असलेल्या त्या नेत्याच्या मुसक्या तर आवळल्याच, शिवाय त्याचे बियर बार दुकानही कायमचे बंद करून टाकले. कायदेशीररित्या त्याचा परवाना रद्द करण्यात आला़ कारण घंटागाडीतून दारूची अवैध वाहतूक करताना पकडण्यात आले होते. आता इस्लामपूर पोलिसांनी १० मे च्या पहाटे केलेल्या अटकेच्या कारवाईमुळे सांगली जिल्ह्यातील राजकारण्यांच्या छातीत धडकी भरली, हे निश्चित!

सरकारकडून गंभीर दखल

दरम्यान, देशात वैद्यकीय कर्मचाºयांवर होणाºया हल्ल्याची केंद्र सरकारने गंभीर दखल घेत त्यांच्या सुरक्षेसाठी अध्यादेश काढला आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या अध्यादेशाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे अशाप्रकारच्या घटनांतील हल्लेखोरांना कमीत कमी तीन महिने ते सात वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. तसेच, ५० हजारांपासून पाच लाखांपर्यंत दंडात्मक कारवाईही होऊ शकते. विशेष म्हणजे हल्लेखोरांविरोधातील दाखल झालेला गुन्हा दखलपात्र,अजामीनपात्र असेल. संपूर्ण घटनेची चौकशी ३० दिवसांत पूर्ण केली जाईल आणि एका वर्षांत दोषींना शिक्षा ठोठावली जाईल.

© संजय इस्तारी मुंदलकर 

Friday, 1 May 2020

संगीतवेडा ऋषी




संगीत आणि आर. के. प्रॉडक्शन यांचा केवळ अभिनयाशीच नव्हे तर ताल, सूर, लय आदींसोबत घट्ट अनुबंध होता़ पृथ्वीराज कपूर यांच्यानंतर द ग्रेट शो मँन राज कपूर यांनीही संगीताला अनन्यसाधारण असे महत्त्व दिले. त्यांना शब्दांची, संगीताची जाण होती़ म्हणून राज कपूर यांनी आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीला सामाजिक चित्रपटनिर्मितीला प्राधान्य दिले. श्री ४२०, आवारा, अनाडी, मेरा नाम जोकर अशा चित्रपटांपासून ‘हिना’पर्यंत आपल्याला हाच अनुभव येतो. ऋषी कपूर यांच्या प्रत्येक यशस्वी चित्रपटातही संगीत अतिशय महत्त्वाचे ठरल्याचे आपणास दिसून येते. ऋषी यांचा नायक म्हणून पहिला चित्रपट ‘बॉबी’मधील सर्व गाणी हिट ठरली होती. सत्तरच्या दशकातील तरुणाईसाठी ती ‘स्वप्नाळू गाणी’ ठरलीत, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
मैं शायर तो नहीं, झूठ बोले कौआ काटे, हम तुम एक कमरे में बंद हो (बॉबी), हमने तुमको देखा, एक मै और एक तू (खेल खेल में), एक हसीना थी, तुमने किसीसे प्यार किया, दर्दे दिल (कर्ज), तू तू है वही (ये वादा रहा), ओ मेरी चांदनी, तू मुझे सुना मै तुझे सुनावू (चांदनी), सोचेंगे तुम्हें प्यार करें के नहीं (दिवाना), दामिनी ओ मेरी दामिनी (दामिनी), बोल राधा बोल तुने ये क्या किया (बोल राधा बोल), सागर जैसी आँखेवाली, जाने ने दो ना, सागर किनारे दिल ये पुकारे (सागर), डफली वाले डफली बजा, हम तो चले परदेस (सरगम), मेरी किसमत में तू नही, भँवरेने खिलाया फुल (प्रेमरोग), लंबूजी लंबूजी (कुली), चल चल चल मेरे भाई (नशिब), परदा है परदा (अमर अकबर अँथोनी), मै देर करता नही (हिना), बेचैन तुने इतना किया (नगिना) आदी गाण्यांनी ऋषी यांना तितक्याच प्रमाणात यशस्वी केले, जितके अभिनयाने!
अभिनय, संगीत, गीतांबरोबरच त्यांचे नृत्य कौशल्यही यशासाठी कारणीभूत ठरले. प्रत्येक गाण्यासोबत त्यांची नृत्यशैली बदलत गेल्याचे आपणांस दिसून येते. अगदी ‘नशिब’ चित्रपटातील चल चल चल मेरे भाई असो, ‘अमर अकबर अँथोनी’ मधील परदा है परदा असो, ‘सरगम’मधील डफलीवाले असो वा ‘चांदनी’मधील ओ मेरी चांदनी असो, या सर्व गाण्यांत ऋषींनी आपल्या नृत्याने प्रेक्षकांना कायम आकर्षित करून ठेवले.
‘दिवाना’मधील शाहरूख खान आणि अगदी कमी वयातील दिव्या भारती यांच्या भूमिकांसमोर ‘सोचेंगे तुम्हें प्यार करें के नहीं...’ या गाण्यावर तुफान नृत्यकौशल्य सादर करत आपल्यातील नर्तक अभिनेता शाबूत असल्याचे दाखवून दिले.
सुरुवातीच्या काळातील म्हणजे सन १९७६ मधील रंजितासोबतच्या ‘लैला मजनू’मधील सर्वच्या सर्व गाणी हिट ठरली़ आजही ती ऐका़, कानाला मनमुराद असा आनंद मिळतो़ हुस्न हाजिर है मोहब्बत की सजा पाने को, इस रेशमी पाजेब की झंकार, तेरे दर पे आया हू, ये दिवाने की जिद है, अब अगर हमसे खुदाई भी, लिखकर तेरा नाम जमीन पऱ़़ही सर्व गाणी हिट ठरली. मो़ रफी, लता मंगेशकर, अनुराधा पौडवाल, प्रीती सागर, शंकर शंभू, अंबर कुमार, राजकुमार रिझवी, अजिज नाझा आदींच्या स्वरातील गाण्यांनी चित्रपटाला मोठे यश मिळवून दिले होते आणि संगीतकार होते मदन मोहन आणि जयदेव़ ऋषी यांना मोहम्मद रफी, किशोर कुमार, शैलेंद्र सिंग इतकेच काय कुमार शानू, उदित नारायण यांचाही आवाज सुट होत होता. त्यामुळेच काळानुरुप ऋषी बदलत गेले, असे म्हणता येईल.

पत्नी नितू

ऋषी कपूर यांनी डिम्पल कपाडियापासून कोवळ्या वयातील दिव्या भारतीसोबत अगदी रोमँटिक अभिनय केला. श्रीदेवी, जयाप्रदा, मीनाक्षी शेषाद्री, जुही चावला, पद्मिनी कोल्हापूरे, पूनम ढिल्लो, माधुरी दीक्षित, अश्विनी भावे, वर्षा उसगांवकर, मनीषा कोईराला, नीलम, मौसमी चटर्जी, सुलक्षणा पंडित, मंदाकिनी, किमी काटकर, मधू, रविना टंडन, तब्बू, फराह, टीना मुनिम या सर्वांसोबत अभिनय केला, तर नीतू सिंग ही त्यांची पडद्याबाहेर आणि पडद्यावरीलही म्हणजे आॅन-आॅफ स्क्रीन पे्रयसी राहिली. या दोघांचे एकूण १२ चित्रपट आहेत़ पडद्यावर त्यांच्या रोमँटिक जोडीलाही जास्त पसंती होती. नंतरच्या काळात त्यांनी विवाहही केला. खेल खेल में (१९७५), कभी कभी (१९७६), अमर अकबर अँथनी (१९७७), दुनिया मेरी जेब में (१९७९) आणि पति पत्नी और वो (१९७९- यात दोघेही पाहुणे कलाकार) हिट ठरले. जहरीला इंसान (१९७४), जिंदा दिल (१९७५), दुसरा आदमी (१९७७), अनजाने में (१९७८), झुठा कहीं का (१९७९) आणि धन दौलत (१९८०), दो दुनी चार (२०१०), बेशरम (२०१३) हे ‘फ्लॉप’ ठरले.
कोणत्याही पठडीतील असो, ऋषी कपूर यांनी परिपक्व अभिनयच सादर केला़ समोर कुठलाही ज्येष्ठ सहकारी असो, त्यांनी स्वत:ला सिद्धच केले़ संजीव कुमार (कभी कभी), अमिताभ बच्चन (कुली, नशिब, अमर अकबर अँथनी), शत्रुघ्न सिन्हा (नशिब) या सर्व सिनिअर कलाकारांच्या प्रतिभेच्या काळात सामोरे गेले आणि आपली स्व स्थान निर्माण केले़ त्याचा परिपाक म्हणूनच त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार, फिल्मफेअर लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड, रशियन सरकारकडून विशेष सन्मान, फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेता, क्रिटिक पुरस्कार, स्क्रीन लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड, फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता पुरस्कार असे कित्येक सन्मान मिळालेत.
ऋषी हे आपल्या अभिनयाच्या रुपाने भारतीय चित्रपटसृष्टीत अजरामर राहतील;परंतु गीत संगीताच्या माध्यमातूनही ते आपल्यापाशी असतील, यात शंका नाही.
© संजय इस्तारी मुंदलकर

Wednesday, 29 April 2020


लढवय्या इरफान

बीहड़ में बागी होते हैं, डकैत मिलते हैं पार्लियामेंट में (पानसिंह तोमर), ये शहर हमें जितना देता है उससे कहीं ज्यादा ले लेता है (लाईफ ईन ए मेट्रो), हमारी तो गाली पर भी ताली पड़ती है और हमें आज भी राजा भैया बुलाया जाता है (साहिब बीवी और गँगस्टर), शराफत की दुनिया का किस्सा ही खत्म, अब जैसी दुनिया वैसे हम (जज्बा), आदमी जितना बड़ा होता है, उसके छुपने की जगह उतनी ही कम होती है (कसूर), डेथ और शिट किसी को, कहीं भी, कभी भी आ सकती है (पिकू), गलतिया भी रिश्तों की तरह होती है. करनी नही पडती, हो जाती है (डी डे), शैतान की सबसे बडी चाल ये है की वो सामने नही आता (हैदर), तुम मेरी दुनिया छिनोगे, मैं तुम्हारी दुनिया में घुस जाउंगा(मदारी) आणि हासिलमधील...और जानसे मार देना बेटा, हम रह गये ना मारने में देर नही लगायेंगे, भगवान कसम, हे अभिनेता इरफान खान यांच्या काही चित्रपटांतील काही लोकप्रिय संवाद.
इरफान यांनी आपल्या अस्सल अभिनयाद्वारे लोकांना हसवले आणि त्यांच्या डोळ्यांतून आसूही पाडले. आपल्या विविधांगी भूमिकांतून प्रेक्षकांच्या भावनांना हात घातला. इरफानची डोळेच सर्व काही सांगून जायची. डोळ्यांतील भाव आणि संवादातून त्याचा अभिनय प्रेक्षकांच्या मनावर कायम कोरला जात असे़ लंच बॉक्स, इंग्रजी मीडियम, तलवार, मकबूल, ये साली जिेंदगी, हैदर, ब्लॅकमेल, हिंदी मीडियम, द वारियर, हासिल, लाईफ आॅफ पाई, द नेमसेक, रोग यासारख्या ५० हून अधिक चित्रपट आणि ए मायटी हार्ट, ज्युरासिक पार्क, स्लमडॉग मिलियनेयर आणि द अमेझिंग स्पायडरमॅन अशा हॉलिवूडपटांतून इरफान यांनी स्वकर्तृत्वाने अभिनयाचे सर्वाेच्च शिखर गाठले.
इरफान यांनी चित्रपटांशिवाय चाणक्य, भारत एक खोज, सारा जहां हमारा, बनेगी अपनी बात, चंद्रकांता आणि श्रीकांत अशा मालिकांमध्ये अभिनय साकारला. नाटक आणि दूरचित्रवाणी मालिकांत काम करून इरफान आपली ओळख निर्माण करत असतानाच निर्माती मीरा नायर यांनी ‘सलाम बॉम्बे’ चित्रपटात भूमिका दिली होती.
मित्रांनो, चेहºयावर फारसे हावभाव दिसत नसले तरी शब्दफेक, जबरदस्त संवादाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता इरफान खान यांचा अभिनयप्रवास सोपाही नव्हता. जयपुरातील पठाण परिवारात जन्मलेल्या इरफान यांची खरी रुची क्रिकेटकडे होती. जयपुरातील चौगान स्टेडियममध्ये सराव सुरू असतानाच सी.के. नायडू ट्रॉफीसाठी निवड झाली होती; परंतु कुटुंबियांनी परवानगी दिली नाही़ मग एका शिष्यवृत्तीच्या आधारे सन १९८४ मध्ये दिल्लीतील ‘नॅशनल स्कूल आॅफ ड्रामा’मध्ये (एनएसडी)अभिनयाचा अभ्यास केला़ ‘एनएसडी’ मध्ये शिक्षण घेतल्यानंतर इरफान यांनी दिल्लीत नाटकात काम करण्यास सुरुवात केली आणि तेथील अभिनय क्षेत्रात चांगले नावही कमावले. यानंतर त्यांनी मुंबईची दिशा पकडली.

अभ्यासाशी कट्टी

इरफान यांचे अभ्यासासोबत कधी पटले नाही. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले होते, माझ्या अभ्यासावरून घरात नेहमीच तणाव राहत असे. सुरुवातीच्या दिवसांत त्यांनी जयपुरात घराशेजारच्याच शाळेत शिक्षण घेतले;परंतु त्यांनी इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून शिक्षण घ्यावे, अशी त्यांच्या आईची खूप इच्छा होती. शाळेतील सर्व सहकाºयांना इंग्रजी भाषेत बोलताना ते पाहत होते़ मात्र, त्यावरून त्यांना अनेकदा शिक्षकाकडून शिक्षा मिळत होती.

सन्मान

इरफान खान यांना ‘हासिल’मधील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट खलनायक म्हणून फिल्मफेअर सन्मान मिळाला. ‘स्लमडॉग मिलिनिअर’मधील पोलिस अधिकाºयाची भूमिका साकारल्यानंतर हॉलिवूडचे दरवाजे खुले झाले. ‘पानसिंह तोमर’साठी राष्ट्रीय पुरस्कारानेही गौरवण्यात आले. ‘एक डॉक्टर की मौत’मधील त्यांच्या भूमिकेचे समीक्षकांनी खूप कौतुक केले. भारत सरकारकडून ‘पद्मश्री’ हा सन्मानही प्रदान करण्यात आला.
मित्रांनो, दोन वर्षांपूर्वी मार्च २०१८ मध्ये त्यांना ‘न्यूरो इंडोक्राईन ट्यूमर’ नामक आजाराचे निदान झाले होते. लंडनमध्ये कर्करोगावरील उपचार घेतल्यानंतर इरफान भारतात परतले. लढवय्या वृत्तीच्या इरफान यांना कामाशिवाय स्वस्थ बसवले नाही. ‘इंग्रजी मीडियम’ चित्रपटाचे छायाचित्रण पूर्ण केले. कोरोना लॉकडाऊनमुळे फारशी कमाई करू शकला नसला तरी त्यांचा अभिनय सरसच होता. चित्रपटामध्ये राधिका मदान आणि करिना कपूरदेखील
होती. या चित्रपटात शेवटची भूमिका केल्यानंतर दुर्दैवाने आयुष्यासोबतच अभिनयाचेही अर्धशतक पार करावे लागले. आज २९ एप्रिल २०२० रोजी झालेला त्यांना मृत्यू देशविदेशातील लाखो चाहत्यांना चटका लाऊन गेला. दोन दिवसांपूर्वी त्यांच्या आईचा मृत्यू झालेला. ज्या मातेच्या उदरातून जन्म घेतला, त्याच मातेच्या पाठोपाठ त्यांनी पृथ्वीवरील आपली जीवनयात्रा संपवली. त्यांचा अभिनय वर्षाेन्वर्षे स्मरणात राहिल...अलविदा इरफान!

© संजय इस्तारी मुंदलकर 

Saturday, 25 April 2020

आता तारणार केवळ काळी माय

आता सर्वत्र एकच चर्चा सुरू झाली आहे़ ‘लॉकडाऊन’ ३ मे रोजी संपणार की वाढणार? सरकारचा निर्णय काय असेल? असे अनेक प्रश्न सर्वसामान्याच्या मनात उभे राहिले आहे़ कारण देशभरात कोरोना रुग्णांच्या तीव्रतेवरून रेड, आॅरेंज आणि ग्रीन असे विभाग पाडण्यात आले आहे़ त्यानुसार उपाययोजना, नियमांत शिथिलता देण्यात येत आहेत़ असे असले तरी रुग्णांची संख्या वाढतीवरच असल्याचे दिसून येते़ केंद्रीय आरोग्य खात्यानुसार, आज २५ एप्रिल २०२० रोजीच्या रात्री सव्वा दहावाजेपर्यंत भारतात २४ हजार ९४२ इतके कोरोना रुग्ण असून ७७९ जणांचा मृत्यू झाला आहे.

मागील सुमारे ३२ दिवसांपासून देशातील उद्योगधंदे, कारखाने, कंपन्यांतील उत्पादन बंद आहेत़ साहजिकच नोकरदारांच्या हाती, मजुरांच्या हाती किती प्रमाणात पैसा आहेत, याबाबत तेच स्वत: सांगू शकतील, अशी स्थिती निर्माण झाली आहे़ केंद्र आणि राज्य सरकारकडून अन्नधान्य स्वरुपात, लाभार्थ्यांना काही रकमेचा निधी पुरवण्यात आला आहे़ असे असले तरी प्रत्येकाची स्थिती बिकट असल्याचे दिसून येते़ अगदी कार्पाेरेट क्षेत्रातील कंपनी मालकापासून सर्वसामान्य मजुरांना एका रांगेत आणण्यात कोरोना विषाणू कमालीचा यशस्वी ठरला आहे, असे म्हटले वावगे ठरू नये़
मूळ मुद्दा पुढील ३ मे रोजीचा ‘लॉकडाऊन’ संपल्यानंतरच्या दिवसांतील आहे. कोणत्याही कारखान्यातील उत्पादन तत्काळ बाजारात येऊन त्याची किमत वसूल होणार नाही. त्यासाठी काही वेळ, काळ जाऊ द्यावा लागणार आहे. घटलेला विकासदर स्थिरस्थावर होण्यास बराच कालावधी लागेल़ अशास्थितीत भारतीय अर्थव्यवस्थेची आर्थिक घडी बसवण्यात केवळ एकच आणि एकच क्षेत्र आपल्या हाती आहे. ते म्हणजे शेती. आता शेतीची पूर्णपणे ‘मना’पासून (कारण आपण शेतजमिनीला स्वार्थापायी दूर लोटले होते.) मशागत करून तिच्यातून उत्पादन घेणे एवढेच आपल्या हाती आहे़ ज्या काळ्यामातीपासून आपण मानवजात दिवसांगणिक दूर जात होतो, तिची सेवा करणे (शेती उत्पादन घेणे) अगदी कमीपणाचे समजत होतो, ती आता पुन्हा नव्याने फुलवावी लागणार आहे़ पूर्वीपेक्षा अधिक घाम गाळून ‘मोती’ पिकवावे लागणार आहे़ अधिक पैसा कमावण्याच्या स्वार्थापायी सुपीक जमीन मुद्दाम पडित पाडून तिच्यावर लोकवस्तीचे बिनकामाचे ले-आऊट पाडून ठेवलेत, मोठमोठ्या इमारती बांधून ठेवल्या (अनेक ठिकाणी कुणाचेही वास्तव्य नाही.)़ आता ती अगोदरची घमेंड, मस्ती सोडावी लागेल. उरलेल्या शेतजमिनी कसणेच आपल्या हाती आहे. तरच ती आपल्याला जिवंत राखण्यास पहिल्यापेक्षा अधिक मदत करेल. ही काळी मायच आपल्या भारत देशाची अर्थव्यवस्था तोलून धरेल, यात कुणाचेही दुमत असू नये.

पुढील काही दिवसांत खरीप हंगाम सुरू होईल़ कापूस, तूर, धान, ज्वारी, जवस, उडिद, मूग, मटकी, सोयाबीन, तीळ अशा पिकांचा हा हंगाम़ देशात या काळात अधिक पिकांची पेरणी केली जाते आणि उत्पादनही अगदी कमी काळात हाती येते़ यापैकी खाद्यतेलाची समस्या भागवणारे सोयाबीन आणि जवस, दाळपिके अर्थातच तूर, उडिद, मूग, मटकी, धान्याची गरज भागवणारी ज्वारी आणि नगदी पिके म्हणजे कापूस, तूर, सोयाबीन,ऊस आदींचा समावेश आहे. यापैकी कापूस, तूर वगळता इतर सर्व पिके कमी कालावधीत तयार होते. म्हणजे आपल्या सर्वांची अन्नाची गरज लवकर भागू शकते़ तर, कापूस आणि तूर पिकाच्या विक्रीतून नगदी पैसा हाती येतो़ शिवाय कापसाची निर्यातही करता येते़ उसापासून तयार होणारे उत्पादन हाती येण्यास बराच वेळ लागतो.

पाऊसही आपल्याच बाजूने

मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी ‘लॉकडाऊन’ मध्येही अतिशय आनंदाची बातमी आहे. यंदा मान्सून सामान्य असेल. सरासरीइतका पाऊस पडणार असून जून ते सप्टेंबर या काळात सरासरीच्या ९६ ते १०० टक्के पाऊस पडेल, असा मान्सूनचा पहिला दीर्घकालीन अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.
आपल्या देशात सामान्यत: जून महिन्याच्या मध्यात मान्सूनची सुरुवात होते. आॅगस्ट महिन्याच्या शेवटी आणि सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला मान्सून परततो. यंदा पाऊसमान सामान्य राहण्याची शक्यता २१ टक्के, तर सामन्यापेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता २० टक्के असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. केरळमध्ये १ जूनपर्यंत पावसाचे आगमन होण्याची आशा आहे. चेन्नईत ४ जून, पणजीमध्ये ७ जून, हैदराबादमध्ये ८ जून, तसेच महाराष्ट्रातील पुणे आणि मुंबईत अनुक्रमे १० आणि ११ जूनपर्यंत दाखल होईल, असेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे या पावसामुळे रब्बी पिकांचे अर्थात गहू, हरभरा पिकांचेही भवितव्य शेतकºयांच्या हाती राहणार आहे.

उपासमारीचेही मोठे संकट

जगातील सर्व देशांनी धान्यउत्पादनाबाबत तातडीने उपाययोजना न केल्यास पुढील काही महिन्यात अनेक ठिकाणी उपासमारीचे गंभीर संकट निर्माण होऊ शकते, असा इशारा संयुक्त राष्ट्रांची एक शाखा असलेल्या विश्व खाद्य कार्यक्रम (डब्ल्यूएफपी) यांच्याकडून देण्यात आला आहे़ विश्व खाद्य कार्यक्रमानुसार, कोव्हिड-19 मुळे जगातील आर्थिक क्षेत्रात आलेल्या संकटामुळे यंदा जगात तीव्र खाद्य असुरक्षाचा सामना करणाºया लोकांची संख्या दुप्पट होऊ शकते.अर्थात या महामारीमुळे जगभरात २६.५ कोटी लोकांचा मृत्यू होऊ शकतो. जगात मागील वर्षातच खाद्य असुरक्षात वाढ होण्यास सुरुवात झाली होती. आता कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे ही परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते. ‘डब्ल्यूएफपी’च्या आकडेवारीनुसार, पोटभर जेवण न मिळणाºयांची संख्या २०२० मध्ये २६.५ कोटीपर्यंत चढू शकते, हीच संख्या मागील वर्षात १३.५ कोटी इतकी होती.
जिनेव्हामध्ये आयोजित एका कार्यक्रमात विश्व खाद्य कार्यक्रमाचे मुख्य अर्थशास्त्रज्ञ तसेच संशोधन, मूल्यांकन आणि देखरेख विभागाचे  प्रमुख आरिफ हुसेन यांनी सांगितले की, कोव्हिड-19 हे संकट, त्या लोकांसाठी अत्यंत विनाशकारी आहे, जे यापूर्वीपासूनच अन्नसंबंधी समस्यांनी घेरलेले आहेत.
कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या प्रसारावर नियंत्रण मिळवण्यासाठी  लागू केलेल्या ‘लॉकडाऊन’मुळे जागतिक अर्थव्यवस्थेचे होणाºया नुकसानीबाबत जी-20 देशांनी म्हटले की, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खाद्य किंमतीची अस्थिरता थांबण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. विश्व खाद्य कार्यक्रम यांच्या वतीने २१ एप्रिल २०२० रोजी सादर केलेल्या चौथ्या वार्षिक जागतिक अहवालात नमूद केले की, यंदाच्या कोरोनो विषाणू संकट जगभर पसरण्यापूर्वीच मागील वर्षापासून खाद्य असुरक्षा संकट घोंगावत होते. सुमारे ५५ देशांमध्ये १३.५ कोटी यासंबंधीची आपत्कालिन स्थिती सहन करत होते. या जागतिक कारणामुळेही अन्नधान्याचे उत्पादन वाढवणे गरजेचे आहे, ही बाब लक्षात घ्यावी लागणार आहे.

मित्रांनो, मुळातच आपण कृषिदेशातील  नागरिक़ माननिय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतीसंबंधी कामांना ‘लॉकडाऊन’पासून बंधनमुक्त ठेवले आहे़ त्यामुळे शेतीची कामे सुरू आहेत. ज्या कुणाकडे शेतजमीन आहे, त्यांनी आता पिकांच्या उत्पादनाचे नियोजन करावे़ या नंतरच्या काळात सरकारकडून आणखी काही दिशानिर्देश लागू होण्याची शक्यता आहे़ पिककर्जेही मिळतील़ त्यातूनही कामे करता येईल; परंतु त्याचवेळी पूरक पिकांच्या उत्पादनावरही
भर देणे अगदी काळाची गरज बनली आहे़ पशुपालन (याद्वारे दुग्धव्यवसाय),चारा पिकांची लागवड, शेळीमेंढीपालन,कोंबडी,बदकांचे पालन, अंडी व्यवसाय, नर्सरी, मत्स्यपालन, फुलांची शेती, पाण्याची सोय असल्यास फळपिकांचे उत्पादन करता येणे शक्य आहे़ यातून आपली आणि पर्यायाने देशाची आर्थिक स्थिती मूळपदावर आणण्यास आपण मोठी मदत करू शकतो.

© संजय इस्तारी मुंदलकर


Thursday, 9 April 2020

चीन, पाकिस्तानची मारली मती


चीनमध्ये पहिला कोरोना रुग्ण डिसेंबर २०१९ च्या अखेरीस आढळला होता. त्यानंतर अवघ्या तीन महिन्यांच्या कालावधीत जगभरातील २०० देशांमध्ये संसर्ग फैलावला आहे. जिथून कोरोनाचा जन्म झाला आणि तो अन्यत्र पसरला, त्या चीनमधील संसर्ग संपल्यात जमा आहे. मात्र, त्याचवेळी  अमेरिका, इटली, स्पेन, ब्रिटन, नेपाळ, पाकिस्तान, भारत आदी देशांमध्ये या आजाराचा वेगाने फैलाव होत आहे. हजारो मृतांची संख्या वाढत आहे. युरोप आणि अमेरिकेत सर्वांधिक हाहाकार सुरू आहे.
आज ९ एप्रिल २०२० रोजी जगभरात कोरोनाबाधितांची संख्या १४ लाख ५० हजारांहून अधिक असून ८५ हजारजणांचा मृत्यू झाला आहे. ब्रिटनमध्ये एकाच दिवसांत ९३८ जणांचा मृत्यू झाला, तर अमेरिकेत ४ लाखांहून अधिकजणांना बाधा झाली आहे. फ्रान्समध्ये ही संख्या एक लाख ९ हजारांवर
पोहोचली आहे. ब्रिटनमध्ये ६० हजारांहून अधिकांना बाधा झालेली आहे. तुर्कीमध्ये ३४ हजारांहून अधिकजण बाधित झाले आहेत.
जर्मनीत एक लाख ९ हजारजणांना बाधा झाली असून मृतांची संख्या दोन हजारांवर गेली आहे. ब्राझीलमध्ये १४ हजारांहून अधिकांना संसर्ग झाला, तर  पोलंडमध्ये पाच हजारजण बाधित झाल्याची माहिती आहे. अशाप्रकारे सध्या जगभरात जीवघेण्या कोरोनाने थैमान घातले आहे. हे संपूर्ण संकट परतून लावण्यासाठी सर्व देशांकडून युद्धस्तरावर प्रयत्न सुरू आहेत. अशातच तुम्हा आम्हांचे दुर्दैव म्हणून की काय, अशा परिस्थितीत चीनने दक्षिण चीन महासागरात चक्क युद्धसराव केल्याची माहिती समोर आली आहे.
मागील काही दिवसांत महासागरात अ‍ॅन्टी शिप, अ‍ॅन्टी सब-मरिन आणि अ‍ॅन्टी एअरक्राफ्टच्या मदतीने या क्षेत्रात मोठा युद्धसराव केला. याव्यतिरिक्त फ्लीटच्या नेव्हिगेशनचाही सराव केल्याची माहिती आहे. या क्षेत्रात आपला प्रभाव दाखवून देणे हाच युद्धसरावामागील चीनचा हेतू असल्याचे आंतरराष्ट्रीयस्तरावरील लष्करीविषयक अभ्यासकांनी म्हटले आहे.
दुसरीकडे सध्या दक्षिण चीन महासागरात अमेरिकेची कोणतीही युद्धनौका उपस्थित नसल्याची माहिती आहे. अमेरिकेच्या युद्धनौका कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सध्या प्रशासनासोबत कार्यरत असल्याचे विविध वृत्तसंस्थांनी म्हटले आहे. चीनने मात्र नेमके याच वेळेचा फायदा घेऊन युद्धसराव केल्याचे म्हटले जात आहे. यानंतर अमेरिकासह अनेक देशांनी या कृतीचा निषेध केला. त्यावर चीनने अमेरिकेवरच निशाणा साधला. आम्ही अन्य देशांना कोरोनाविरूद्ध लढण्यास मदत करत असल्याचे चीन सरकारने म्हटले आहे.
दरम्यान, दक्षिण चीन महासागरात अनेक लहान बेटे आहेत. त्यातील सर्वाधिक भागावर चीनने आपला दावा केला आहे, तर फिलिपिन्स, व्हिएतनाम, मलेशिया, तैवान आणि ब्रुनेई यांनी दावा नाकारला आहे. त्यातूनच सर्व देश कोरोनाविरोधात मोठा लढा देण्यात व्यस्त असताना चीन नुसताच खाजवून घेण्याचा प्रयत्न करत आहे,असे म्हणता येईल.

पाकिस्तानचे भूत

इमरान खान सरकारने कोरोनामुळे मोठे नुकसान होऊनही पाकिस्तानात ‘लॉकडाऊन’ लागू केलेले नाही. याशिवाय या देशात महागाई, दारिद्र्य आदी प्रकारांनी कळस गाठला आहे. सर्वसामान्यांचे दैनंदिन जीवन कठीण परिस्थितीत व्यतित होत असताना सरकारला त्याच्याशी काहीही देणे घेणे नसल्याचे दिसून येते़ कारण जगभरातील देशांवर कोरोना संकटाची टांगती तलवार असताना पाकिस्तानने मात्र मागील १९ मार्चला बलुचिस्ता
न प्रांतातून सुमारे ७५० किलोमीटर अंतरापर्यंत मारा करणाºया क्रूझ मिसाईल (क्षेपणास्त्र) बाबर-२ ची चाचणी केली. दुर्दैवाने १४ किलोमीटरपर्यंत पोहोचल्यानंतर केवळ दोन मिनिटांतच ते जमिनीवर कोसळले. पाकिस्तानी अधिकाºयांनुसार, बाबर-२ साठी पाकिस्तान चीनची मदत घेत आहे़ मुळात पाकिस्तानच्या मानगुटीवर भारताच्या डीआरडीओद्वारा निर्माण होणाºया एक हजार किलोमीटर लक्ष्य साधणाºया निर्भय क्रूझ मिसाईलसोबत बरोबरी करण्याचे भूत बसल्याचे दिसून येते.
©  संजय मुंदलकर

Monday, 6 April 2020

कोरोना आणि वसुंधरा


चीन देशातून पसरलेल्या कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे संपूर्ण जगभरात लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे़ अनेकांना त्याची लागण झाली असून, हजारोंना ‘क्वारंटाईन’ करण्यात आले आहेत. जगातील बोटावर मोजण्याइतपत देश त्यापासून मुक्त राहिले आहेत़ अनेक देशांत ‘लॉकडाऊन’(टाळेबंदी) करण्यात आली आहे़ महत्त्वाचे उद्योगधंदे, कारखाने, कंपनी बंद ठेवण्यात आल्या आहेत़ सर्वसामान्य नागरिकांसह कामगारांना, मजुरांना, शासकीय कर्मचाºयांना (अत्यावश्यक सेवा वगळता) घरातच राहण्याचे निर्देश देण्यात आले आहे़ याशिवाय प्रत्येक भारतीय नागरिकाने वैयक्तिक स्वच्छता पाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे; परंतु त्याचवेळी या कोरोना विषाणूमुळे सुरूअसलेल्या ‘लॉकडाऊन’मुळे पृथ्वीला, धरणीमातेला, वसुंधरेला मोठा दिलासा मिळाला आहे. ही पृथ्वी आता अधिक स्वच्छ हवेचा श्वास घेत आहे. एका माहितीनुसार, धरतीवर अशी स्वच्छ हवा सुमारे ७५ वर्षांनंतर आढळली आहे. यापूर्वी दुसºया जागतिक महायुद्धानंतर इतकी स्वच्छ हवा होती, असेही सांगण्यात येत आहे. काही प्रसारमाध्यमांनी प्रकाशित केलेल्या वृत्तानुसार, दुसºया महायुद्धानंतर ही पहिली वेळ असेल, जेव्हा कार्बन उत्सर्जन सर्वांत कमी होत आहे. कोरोनामुळे अनेक देशांमध्ये ‘लॉकडाऊन’ जाहीर केल्याने जगभरात प्रदूषणाचे प्रमाण कमी झाले आहे.
‘ग्लोबल कार्बन प्रोजेक्ट’चे प्रमुख रॉब जॅक्सन यांनी म्हटले, की यावर्षी कार्बन उत्सर्जनमध्ये ५ टक्के घट झाली आहे. याआधी २००८ च्या आर्थिक मंदीमध्ये कार्बन उत्सर्जन कमी झाले होते. यावेळी १.४ टक्के घट दिसून आली होती. दुसºया महायुद्धाच्या काळात प्रामुख्याने युरोप, आशियातील अनेक देशांतील कारखाने, बाजारपेठा, वाहतूक, उद्योग पूर्णपणे बंद होते. त्यामुळे प्रदूषण कमी झाले. आता इतक्या वर्षांनंतर चित्र पाहायला मिळत आहे, असेही रॉब जॅक्सन यांनी म्हटले आहे. पर्यावरणतज्ज्ञ तसेच वैज्ञानिकांच्या मते, कोरोना विषाणूमुळे सुरू असलेल्या ‘लॉकडाऊन’मुळे जागतिक कार्बन उत्सर्जनमध्ये १० ते २० टक्के घट झाली आहे; पण हे जास्त काळ नसणार आहे. कारण २०२१ च्या सुरुवातीला तापमान पुन्हा वाढायला लागेल. त्यामुळे चिंता पुन्हा वाढणार, हे अपेक्षित आहे.
दरम्यान, संयुक्त राष्ट्राने (युनो) मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात एक अहवाल प्रकाशित केला होता. प्रत्येक वर्षी कार्बन उत्सर्जनमध्ये ७.६ टक्के इतकी घसरण झाली तरच ‘ग्लोबल वॉर्मिंग’अर्थात जागतिक तापमानात १.५ अंश से
ल्सियसची कमतरता येईल.
हिंदी वृत्तपत्र राज एक्सप्रेसनुसार, एका नव्या अभ्यास सर्वेक्षणात पृथ्वी सभोवती असलेले सुरक्षा कवच अर्थात ओझोनच्या थरात सुधारणा होत आहे. पर्यावरण विज्ञान क्षेत्रातील  संशोधन संस्था ‘सीआयआरईएस’ च्या (को-आॅपरेटिव्ह इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च इन एन्व्हायर्नमेंटल सायन्स) संशोधक अंतरा बँनर्जी यांनी युनिव्हर्सिटी आॅफ कोलोराडो बोल्डर येथे यासंदर्भात माहिती दिली. पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धात पर्यावरण बदलाविषयीचे संकेत मिळाले आहेत. हे बदल ‘मॉन्ट्रियल प्रोटोकॉल’मुळे ओझोनच्या थराचे छिद्र आंकुचन पावत असल्याने होत आहेत.

मॉन्ट्रियल प्रोटोकॉल...

‘मॉन्ट्रियल प्रोटोकॉल’ हा एक जागतिक पातळीवरील करार आहे. या करारात ओझोन थराला कमजोर करणाºया घटकांचे उत्सर्जन थांबवण्यासाठी काही देशांनी सहमती दर्शवली आहे. हा करार ओझोन थराच्या संरक्षणासाठी व्हिएन्ना संमेलनात पारित केला होता. या करारावर १६ सप्टेंबर १९८७ रोजी स्वाक्षºया करण्यात आल्या़ तसेच, हा करार १ जानेवारी १९८९ लागू करण्यात आला होता. विशेष म्हणजे या करारात आतापर्यंत सातवेळा संशोधन करण्यात आले आहेत. शास्त्रज्ञांनुसार ‘मॉन्ट्रियल प्रोटोकॉल’चे पूर्णत: पालन केल्यास २०५० पर्यंत ओझोन थराच्या छिद्राला पूर्ण झाकण्यात यश मिळू शकते.

‘लॉकडाऊन’ कारणीभूत

कोविद-१९ अर्थात कोरोना व्हायरस डिसीज 2019 पासून झालेल्या संक्रमणाला परतून लावण्यासाठी जगभरातील देशांनी ताळेबंदी
(लॉकडाऊन) लागू केली आहे. यात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्णपणे बंद असल्याने पृथ्वीभोवतीच्या वातावरणात तसेच पर्यावरणात तीव्र गतीने सुधार झाला आहे. धरतीच्या दहाही दिशांतून होणारी वाहतूक बंद असून जगातील लाखो कारखाने, उद्योग बंद पडले आहेत. त्यामुळे विकसित, अर्धविकसित देशांतून होणाºया प्रदूषण उत्सर्जन प्रमाणात घट झाली आहे. परिणामी वायुमंडळातील हवा स्वच्छ झाल्याचे आढळून आले आहे.
भारतासंदर्भात प्रकाशित करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, देशातील ९० शहरांमध्ये नाममात्र वायुप्रदूषणाची नोंद करण्यात आली. यात असेही सांगण्यात येते की यामुळे श्वास घेणे सोपे झाले झाले़ (अर्थातच सर्वांना स्वच्छ हवा मिळाली.)
कोरोनामुळे देशात लागू असलेल्या ‘लॉकडाऊन’च्या प्रभावामुळे प्रदूषणात घट झाली असली तरी सरकाराला या क्षेत्रात अधिक उपाययोजना करण्याची गरज असल्याचे संकेतही पर्यावरण तज्ज्ञांनी दिले आहेत. याकडे दुर्लक्ष करून अजिबात चालणार नाही. कोरोनासंबंधित महामारीने जगातील मानवजातीला झोपेतून जागे केल्याचे दिसून येत आहे. यापुढील काळात मानवाला केवळ आपले आरोग्यच नाही, तर धरतीमातेचे आणखी शोषण करण्याऐवजी तिच्या अधिक सुरक्षिततेसाठी, तिच्या संवर्धनासाठी सातत्याने प्रयत्न राहण्याची गरज दाखवून दिली आहे.

गंगा नदीही स्वच्छ

केंद्र सरकारने देशव्यापी ‘लॉकडाऊन’ घोषित केल्यानंतर गंगा नदीचे पाणी स्वच्छ होत असल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांतून झळकत आहेत. वाराणसी येथील आयआयटी अर्थात भारतीय प्रऔद्योगिकी संस्थातील रासायनिक अभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक पी. के. मिश्रा यांनी सध्या बंद स्थितीत असलेले औद्योगिक कारखाने गंगा नदीच्या पाण्याची पत सुधारण्यास मदत करत स्पष्ट केले आहे. नदीच्या पाण्यात स्वच्छतेबाबत ४० ते ५० टक्क्यांनी सुधारणा झाली असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (सीपीसीबी) सुमारे ३६ देखरेख केंद्रांनी गंगा नदीचे पाणी विविध ठिकाणांवरून गोळा केले. विरघळलेला प्राणवायू, जैव रासायनिक प्राणवायूची गरज, एकूण कोलीफॉर्म, पीएच पातळी हे निकष पाण्याची शुद्धता तपासण्यासाठी वापरण्यात आले. विविध पातळीवर केलेल्या तपासून सुमारे २७ बिंदूंच्या आधारे हे पाणी आंघोळ, वन्यजीव तसेच मत्स्यांच्या प्रसारासाठी योग्य दर्जाचे असल्याचे सीपीसीबीने आपल्या अहवालात म्हटले आहे. उद्योगांकडून होणाºया प्रदूषणाचे प्रमाण तपासण्याची संधी ‘सीपीसीबी’ला प्राप्त झाली आहे. त्याआधारे उपाययोजना करता येईल, असेही सांगण्यात येत आहे. याशिवाय दिल्लीतील अनेक भागातील हवा स्वच्छ झाल्याने आकाश निळेशार दिसून येत आहे.

हिमालयाचे दर्शन

वाहतूक आणि औद्योगिक कारखाने बंद असल्याने पर्यावरणाची स्थिती सुधारली आहे़ वायु प्रदूषण कमी झाल्याने वातावरण बिल्कुल साफ झाले आणि तब्बल ३० वर्षांनंतर हवा इतकी स्वच्छ झाली की पंजाबमधील जालंधर शहरापासून सुमारे १६० किमी अंतरावर असलेल्या हिमालयाच्या पर्वतरांगा स्पष्ट दिसू लागल्या. या शहरातील नागरिकांनी या दृश्याचा पुरेपूर आनंद घेतल्या़ या गोष्टीवरून असे दिसून येते की, आपण निसर्गाच्या सौंदर्याला किती मुकलो आहोत.

© संजय मुंदलकर

Tuesday, 17 March 2020

लोहार सुतार समाजाला संजिवनी  मिळावी...


आजच्या  परिस्थितीत बारा बलुतेदार वर्गातील जनता अगदीच मागासलेली राहिली आहे. त्या सर्वांचे  पारंपरिक  व्यवसाय यांत्रिकीकरणाने गिळंकृत केले आहे, पूर्णपणे मोडकळीस आलेले आहेत. त्यामुळे त्यांच्यासमोर उदरनिर्वाहाचे मोठे संकट उभे ठाकले राहिल्याचे दिसून येते.

ग्रामीण भागामध्ये पारंपरिक व्यवसायातून आपली कलाकुसर दाखवून त्यातून मिळालेल्या उत्पन्नातून आपला प्रपंच कसाबसा चालवत असे; परंतु  आधुनिकतेच्या नावाखाली यांत्रिकीकरणाचा  राक्षस बलुतेदारांपुढे उभा केला आहे. त्यामुळे त्यांचे व्यवसाय  कालबाह्य झाले, तर काही होण्याच्या मार्गावर आहेत. परिणाम असा झाला, की अनेक बलुतेदारांवर उपासमारीचे संकट उभे राहिले. शिक्षणाचा प्रश्न तर दूरवर राहिला.
 बलुतेदारांमध्येच पूर्वी समावेश असलेले मातंग व चांभार यांना शासनाने स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ देऊ केले खरे;परंतु त्यांनाही हव्या तशा सुविधा पुरवण्यात शासन प्रशासनाकडून पुरवण्यात येत  नसल्याचे दिसून येते. खºया अर्थाने शासनच काय पण प्रत्येक गावात, तालुक्यात, जिल्ह्यात राजकारण करताना लोकप्रतिनिधींच्याही  नजरेस बलुतेदारांची जगण्यासाठीची धडपड दिसते. त्यांचे हलाखीचे जीवन, व्यवसायांना लागलेली घरघर, खुंटलेला विकास हे सर्व काही  उघड्या  डोळ्यांनी  दिसून येते़ मात्र, त्याकडे राजकीय मंडळी जाणीवपूर्व दुर्लक्ष करीत करीत असतात. बलुतेदार घटकांची लोकसंख्या काही अपवाद सोडला, तर कित्येक गावांमध्ये बोटावर मोजण्याइतकीच असते. नेमका याच गोष्टींचा फायदा घेत  निवडणूक जिंकली जाते. बलुतेदारांमध्ये प्रामुख्याने लोहार, सुतार, सोनार, परिट ( धोबी), कुंभार, न्हावी, शिंपी, साळी,जोशी आदींची मिळून महाराष्टÑामध्ये जवळपास पाच कोटींच्या आसपास लोकसंख्या आहे.  मात्र, या लोकसंख्याचा वापर राजकारण्यांकडून फक्त निवडणुकीतील मतांपुरताच केला जातो.  निवडणूक  आली  की, आम्ही   बलुतेदारांसाठी  हे  करू, ते करू अशा भुलथापा मारून मते मिळवण्यात यशस्वी होतात. त्यानंतर मात्र दिलेल्या आश्वासनांचा दुसºया निवडणुकीपर्यंत विसर पडलेलाच दिसून  येतो.
लोहार आणि सुतार हा समाज त्यापैकीच  एक.  राजाच्या दरबारी लोहाराला विशेष स्थान होते. युद्धसंपन्न अशा शस्त्रागाराचा भार त्याच्या डोक्यावर असे. मान-सन्मान होता़ लढाईतील विजयाचा  विशेष वाटा  लोहाराचा असे. कधीकाळी श्रीमंती भोगणाºया या समाजाची आर्थिकस्थिती काळानुरूप बदलत गेली. उद्योगधंद्यांना उभारी देण्यात अग्रक्रमावर असलेल्या लोहार समाजाला संजीवनी देण्याची गरज आहे. उद्योगासाठी त्याच्यातील गुणकौशल्याचा वापर करून  घेण्यासाठी  संधी निर्माण करणे ही प्रशासनाची जबाबदारी असून या समाजाला  एखाद्या केंद्रीय  संस्थेशी जोडणे  काळाची  गरज  बनलेली आहे.  सुतार समाजाचेही तसेच झाले. एखाद्या लाकडातून किती सामान गवसेल? कोणत्या लाकडाचं आयुष्य किती? असा अंदाज वाढीबुवा हात लावून सांगायचा. कोणते शास्त्र होते त्याच्याजवळ, माहिती नाही. आता त्याच्या अंगभूत गुणांचे  काय झाले? त्याच्या व्यवसायावर ‘फर्निचर’ने अतिक्रण केले. प्लायवूड, सनमायका, फोरमायका या सारख्या बाजारात  सहज मिळणाºया  गुळगुळीत अन् चकचकीत सामानामुळे वाढीबुवाच्या  पोटापाण्याचा प्रश्न आणखी जटील बनला. आता तर अन्य समाजानेही त्याचा व्यवसाय ताब्यात  घेतल्याचे दिसून येते़ कधी संपूर्ण गावाची गरज भागवणारा हा समाज आता परागंदा झाला आहे, हे वास्तव पुसता येत नाही. मुळातच या समाजाला केवळ शिक्षण सुविधाच नाही तर त्याच्यातील कौशल्याचा, कलाकुसरीचा उपयोग करून घेणे गरजेचे आहे. आणि त्यासाठी त्याला  उद्योगात स्थान देणे, रोजगार देण्याचे कर्तव्य आता सरकारला, प्रशासनाला पार पाडावयाचे आहे. त्यामुळे  या  बांधवांसाठी ‘लोहार सुतार आर्थिक विकास महामंडळ’ अशा  अशी प्रशासकीय संस्था निर्माण करावी. विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी वसतिगृहाची निर्मिती, शिष्यवृत्ती, समाजातील ज्येष्ठांना निवृत्तीपेन्शनची व्यवस्था अशा काही मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार होणे अपेक्षित आहे़   याशिवाय परिट(धोबी) चांभार, कुंभार, न्हावी  या प्रमुख समाजघटकांतील बांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.         
या संदर्भात विश्वकर्मा लोहार सुतार विकास परिषद, नागपूर यांनी काही प्रमुख मागण्या पुढे केल्या आहेत. देशात श्री विश्वकर्मा जयंतीला सार्वजनिक सुट्टी जाहीर व्हावी, महाराष्ट्र राज्यस्तरावर लोहार सुतार आर्थिक उन्नती महामंडळाची निर्मिती करण्यात यावी (याद्वारे दीर्घ मुदतीचे आणि कमी व्याजाचे कर्ज अपेक्षित), उपराजधानीतील एमआयडीसीमध्ये उद्योगनिर्मितीसाठी  दीर्घ लीजवर जागा देण्यात यावी, राजधानी मुंबई आणि उपराजधानीत अधिवेशन काळात समाजातील कारागिरांच्या साहित्याचे प्रदर्शन आणि विक्रीस प्रोत्साहन द्यावे, समाजबांधवांना मोफत किंवा ना नफा ना तोटा या  तत्त्वावर लाकडाचे वितरण करावे, राज्यातील महत्त्वाच्या शहरात वसतिगृहाची  निर्मिती करण्यात यावी, लोहार सुतार समाजातून एका व्यक्तिची विधानपरिषदेत नियुक्ती करावी, केंद्र सरकार वा राज्य  सरकारच्या  मालकीच्या कारखान्यांकडून समाजाला लोखंडाचा स्वस्त दरात पुरवठा व्हावा आदींचा यात समावेश आहे.

©संजय इस्तारी मुंदलकर

Sunday, 15 March 2020

वाहतूक नियमांबाबत समाज संवेदनशील नाहीच...


वाहतूक व्यवस्था अपुरे रस्ते आणि वाढत्या गाड्या यामुळे फारच विस्कळीत झाली आहे. त्यात परत वाहतूक नियम न पाळणाºयांची फार मोठी आहे. अगदी तरुण मुले, मुली, काका, काकू ते पार वयस्कर लोकांपर्यंत सर्व वयोगटातील माणसे सिग्नल तोडत असतात. सिग्नल बदलायला १० सेकंद उरली असली तरी लोकं मागून हॉर्न वाजवतात जणू काही आपण सिग्नलची वाट पाहणे हा गुन्हा आहे. अनेकदा या अगदी क्षुल्लक कारणावरून वाद होत असल्याचा अनुभव येत असतो.

वाढत्या शहरीकरणामुळे शहरातील वाहतूक समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. रस्त्यांची दूरवस्था, वाहनांच्या संख्येत झालेली प्रचंड वाढ व शिस्तीचा अभाव  आदीमुळे भारतातील  सर्व मोठ्या शहरांत जलद आणि सुरक्षित प्रवास करणे कठीण झाले आहे. परदेशात याउलट परिस्थिती आढळते. उत्तम रस्ते, सुस्थितीतील अत्याधुनिक वाहने व नियमांची काटेकोर अंमलबजावणी यामुळे तेथील प्रवास जलद आणि सुरक्षित होणे सहज शक्य होते. अर्थात परदेशात लोकसंख्या भारताच्या मानाने खूप कमी आहे. ते देश सधन असल्याने त्यांना रस्ते बांधणी व त्यांची योग्य निगा राखणे जमू शकते.

आपल्याकडे पायी चालणारे, हातठेले, बैलगाडीसारख्या हळू चालणाºया वाहनांपासून ते जलद धावणाºया दुचाकी, जीप, मोटारी, ट्रक, ट्रॅक्टर, कंटेनर, सीमेंट वाहून नेणारी अवजड वाहने एकाच रस्त्याचा वापर करीत असतात. साहजिकच वाहतूक व्यवस्था प्रभावी होते.त्यातच वाहने थांबविण्याच्या जागा मर्यादित असल्याने व रस्त्यावरील अतिक्रमणे व फेरीवाले यामुळे ही परिस्थिती अधिकच अवघड होते. साहजिकच शहरात राहणाºया लोकांना वाहतूक समस्येचा फार त्रास होतो. शिवाय प्रदूषणामुळे त्यांच्या आरोग्यावरही परिणाम होतो. तरीही नोकरी धंद्यासाठी शहरातील वाहतुकीचा हा त्रास सहन करण्याशिवाय सर्वजण हतबल आहेत.

रस्त्यावर सर्वाधिक कोण...
आपण अनेकदा बोलून जातो की रस्त्यांवर गर्दी अधिक आहे. भरदुपारी काम करणारी मंडळी आपापल्या कार्यालयात असेल, तर ही रस्त्यांवरील मंडळी कोण आहे. तर यात सर्वाधिक संख्या ही रिकामटेकड्यांची आहे. ज्यांना काहीही काम नाही आणि यात सर्वात प्रमाण हे गुन्हेगारांचे आहे. ही मंडळी आपले सावज टिपत असतात. यात तरुणांचा अधिक भरणा दिसून येतो. यात बेरोजगारही आहे. याशिवाय मार्केटिंगच्या नावावर अनेकजण रस्त्यांवर असतात...त्यांची वाहने रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा होईल, अशापद्धतीने ठेवलेली असतात.  काहीजण नुसतीच फिरायला आलेली असतात. काही ग्राहक असतात, काही दुसºया शहरातून आलेली असतात. या सर्वांची वर्गवारी केली तर समाजातील एक छुपी बेरोजगारी आपल्याला दिसून येते. [ हा एक वेगळा विषय असला तरी त्याचा संबंध रस्ते अपघातासोबत आहेच ]




माहिती तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे या बिकट समस्येवर अगदी वेगळ्या प्रकारचा अभिनव उपाय सापडेल अशी आशा निर्माण झाली आहे. माणूस प्रवास कशासाठी करतो. नोकरीधंद्यानिमित्त आॅफिस वा दुकानात  जाण्यासाठी, शिक्षण, वैद्यकीय उपचार अशांसारख्या सुविधा घेण्यासाठी, बाजारहाट करण्यासाठी, इतर व्यक्तींना भेटण्यासाठी वा प्रत्यक्ष वास्तू , परिस्थिती वा निसर्ग पाहण्यासाठी. या व अशाप्रकारच्या सर्व कामांसाठी भविष्यात प्रत्यक्ष प्रवास करण्याची जरूर भासणार नाही. घरबसल्या या सर्व गोष्टी संगणकाच्या माध्यमातून आपल्याला साध्य करता येतील. यातील बºयाचशा गोष्टी परदेशात तसेच आपल्या देशातही यशस्वीरीत्या राबविण्यास सुरवात झाली आहे.

 मोबाईल, फोन व इंटरनेटच्या साहाय्याने जगातील कोणत्याही संपर्क साधता येऊ लागला आहे व माहितीची देवाण घेवाणही करणे सहज शक्य झाले आहे. परदेशात अनेक ठिकाणी घरबसल्या आॅफिसचे काम करण्याची सुविधा कंपन्यांनी आपल्या कर्मचारी वर्गाला देऊ केली आहे. वेगवेगळया गावात राहणाºया व्यक्ती आता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे एकत्र चर्चा करू शकतात. वेबसाईटवरून दुकानदार आपल्या वस्तू जगभरातील गरजू ग्राहकांना दाखवू शकतो. अशा अनेक वेब दुकानांतून फेरफटका मारून आपण क्रेडीट कार्डद्वारे पैसे देऊ न आपल्या पसंतीची खरेदी करू शकतो.

भविष्यात  प्रत्यक्ष उपचार, इंजेक्शन वा  आॅपरेशन वगळता बाकी सर्व वैद्यकीय सल्ला आॅनलाईन घेता येईल. औषधीही घरपोच मिळतील. लग्न ठरविणे, घर पाहणे, कारखाना, प्रत्यक्ष प्रक्रिया वा कार्यक्रम पाहणे, भेट देणे  आदी कामे इंटरनेटच्या साहाय्याने  करता येतील. केवळ करमणूक म्हणून वा सहलीसाठी प्रवास करतील. अर्थात वस्तूंची निर्मिती करणे, प्रक्रिया करणे त्याची वाहतूक करणे, संरक्षण वा ज्याठिकाणी प्रत्यक्ष उपस्थिती आवश्यक असते अशा व्यवसायातील व्यक्तींना प्रवास टाळता येणार नाही. भारतात इंटरनेटचा प्रसार वेगाने होत आहे. इंटरनेटच्या सुविधांसाठी लागणाºया खर्चातही झपाट्याने घट होत आहे. 


दुसरीकडे समाजविघातक समस्याही या इंटरनेटने निर्माण केल्या आहेत. हे विसरून चालणार नाही आणि या सगळ्या गोष्टींचा वाहतुकीशी संबंध जोडावा, अशी स्थिती तरी नाही. आपल्या देशात संगणक क्षेत्रातील तज्ज्ञ मनुष्यबळाची कमतरता नाही. मात्र, त्याचे योग्य व्यवस्थापन होत नाही. आपण अजूनही काळाची पावले ओळखली नाहीत़, हे फार मोठे दुर्दैव आपल्या समाजाचे आहे आणि  त्यातून विविध अडचणी, समस्या निर्माण होतात. समाज निकोप, सुरक्षित तरच देश बलशाली, हे सूत्र कायद्याने शिकवण्याची गरज नाही, हे ज्या दिवशी सर्वांना समजेल, तो दिन सोन्याचा असेच म्हणावे लागेल.

महामार्गावरील अपघातांची कारणे

* जड वाहनांच्या चालकाने २४ तासांतून किती वेळ वाहन चालवावे, यावर बंधन नाही
* वाहनांना थांबण्यासाठी मोठ्या प्रमाणात ‘सब वे’ चा अभाव
* लांब पल्ल्याच्या वाहनचालकांना आराम करण्यासाठी सोय नाही
* मोठ्या वाहनांकडून पहाटेच्या सुमारास अपघात होतात. याबाबत जागृती नाही
* वाहनचालकाची झोप न होणे हेही मुख्य कारण
* अपघातग्रस्त वाहनांच्या दुरुस्तीसाठी सोय जवळजवळ उपलब्ध नसणे


संजय इस्तारी मुंदलकर

© NITYAAYAN

जादुई स्वरांची मल्लिका:भारतरत्न लता मंगेशकर



लता मंगेशकर...भारताच्या गानकोकिळा...भारतातील सर्वोच्च सन्मान ‘भारतरत्न’ मिळवणाºया दुसºया गायिका आहेत.  त्यांच्या अजरामर गाण्यांनी जवळपास सात दशके रसिकांना भुरळ घातली आहे. त्यांच्या  नावाची दखल गिनीज बूक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्येही घेतली गेली आहे.  चित्रपटसृष्टीतील मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कारानेही लतादीदींना गौरवण्यात आले आहे. लतादीदींचा हा सांगितिक ठेवा वेगवेगळ्या प्रकारच्या गाण्यांनी समृद्ध आहे. आजवर २० भारतीय भाषांत त्यांनी गाणी गायली आहेत. केवळ भारत नव्हे तर जगभरातील रसिकांवर त्यांची मोहिनी आहे.


लतादीदींचा जन्म २८ सप्टेंबर १९२९ रोजी इंदोरमध्ये पंडित दीनानाथ मंगेशकर यांच्या सांगितिक वारसा लाभलेल्या कुटुंबात झाला. दीनानाथांची नाटक संस्था होती. ते स्वत:ही उत्तम गायक होते. लतादीदींना वडिलांकडूनच संगीताचे प्रशिक्षण मिळाले. अमान अली खाँ साहेब आणि अमानत खान यांच्याकडेही लतादीदींनी संगीताचे धडे गिरवले. घरातून संगीताचा वारसा आणि गुरुकृपा यामुळे लतादीदींसारख्या हिºयाची  झळाळी  वाढण्यास कितीसा वेळ लागणार? मात्र त्यालाही दृष्ट लागली. दीनानाथांचे १९४२ मध्ये निधन झाले आणि घराचा सर्व भार त्यांच्या खांद्यावर आला. वडिलांच्या निधनानंतर लतादीदींसाठी गाणे केवळ आवड  न  राहता गरज बनली.  लतादीदींनी १९४२-४८ या काळात हिंदी आणि मराठी अशा आठ चित्रपटांत भूमिका केल्यात. 


 लतादीदींनी काम केलेला पहिला चित्रपट होता नवयुगचा ‘पहिली मंगळागौर’. याच चित्रपटात त्यांनी ‘नटली चैत्राची नवलाई...’ हे गाणे गायिले. दीदींची गायनाची औपचारिक सुरुवात झाली ती ‘किती हसाल’ या चित्रपटाने (१९४२). पुढे दीदींनी ‘आप की सेवा में’ या हिंदी चित्रपटासाठी पार्श्वगायन केले . लतादीदी जेव्हा गायन क्षेत्रात आल्या तेव्हा नूरजहां, शमशाद बेगम, जोहराबाई अंबालेवाली असा आवाजांची चलती होती. अशा काळात आवाज पातळ असे सांगून लता दीदींना संगीतकार नाकारत होते.  संगीतकार गुलाम हैदर  यांनी  सुरुवातीला त्यांना संधी दिली नव्हती. मात्र, १९४९ मध्ये नियतीने लता मंगेशकर या नावाला एका झंझावाताचे रुप दिले. बरसात, अंदाज, दुलारी आणि महलसाठी दीदींनी गायलेली गाणी सुपरहिट ठरली. त्यानंतर जे घडले तो इतिहास सर्वांना माहित आहे.

एस. डी. बर्मन, ओ.पी. नय्यर, सी. रामचंद्र, मदन मोहन अशा अनेक दिग्गज संगीताकारांसोबत लतादीदींनी भारतीय चित्रपटसंगीताचे विश्व गाजवले. लतादीदींच्या हिंदी आणि मराठी गाण्यांनी रसिकांना समृद्ध केले. लतादीदींनी भारतीय जनमानसाचे कान तृप्त केलेत असे म्हणणे अतिशयोक्तीचे  ठरणार नाही. आतापर्यंत दीदींनी जवळजवळ सर्व संगीतकारांबरोबर गाणी ध्वनिमुद्रित केली.

२७ जून १९६३ रोजी भारत-चीन युद्धानंतर एका कार्यक्रमात लताबाईंनी कवी प्रदीप लिखित आणि सी. रामचंद्र यांनी संगीतबद्ध केलेले ‘ऐ मेरे वतन के लोगों...’ हे देशभक्तिपर गीत भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या उपस्थितीत गायले. तेव्हा  लताच्या सुमधुर कंठातून युद्धात देशासाठी प्राण देणाºया जवानांना श्रद्धांजली वाहणारे ते गीत ऐकून पंडितजींच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले, असे सांगितले जाते.
लतादीदीने मराठीत अनेकानेक गाणी गायिली. त्यांनी हृदयनाथ मंगेशकर, वसंत प्रभू, श्रीनिवास खळे आणि सुधीर फडकेंचा विशेष उल्लेख करावा. लागेल. लतादीदीने स्वत: ‘आनंदघन’ अशा नावाने मराठी गाणी स्वरबद्ध करून गायिलेली आहेत.


© संजय इस्तारी मुंदलकर        

Sunday, 1 March 2020

जयश्री गडकरांचं अप्रतिम सौंदर्य, अद्वितीय अभिनय


अप्रतिम सौंदर्य, अद्वितीय अभिनयाने रसिकांच्या मनावर पाच दशके अधिराज्य गाजवणाºया अभिनेत्री जयश्री गडकर यांचा जन्म २१ फेब्रुवारी १९४२ रोजी कोल्हापूर जिल्ह्यातल्या सदाशिवगड येथे सामान्य कोकणी कुटुंबात जयश्री गडकर यांचा जन्म झाला होता. मूळच्या मीना, नंतर जया, जयश्री या नावाने ओळखल्या जाऊ लागल्या. त्या पाच वर्षांच्या असतानाच त्यांचे कुटुंब मुंबईला आल्यामुळे त्यांचे पुढचे शिक्षण मुंबईला झाले. कॉलेज शिक्षण मात्र झाले नाही. नृत्य-गायनाची आवड असल्यामुळे कलाक्षेत्राकडे त्यांचा विशेष ओढा होता. लहान असताना चोरून चित्रपट पाहिल्याच्या आठवणी जयश्री गडकर यांनी त्यांच्या ‘अशी मी जयश्री’ या आत्मचरित्रात सांगितल्या आहेत. बालपणीच त्यांचे नृत्याचे शिक्षण सुरू झाले. त्या गोपीकृष्णांकडून कथ्थक शिकल्या. पुढे  त्यांनी  गायनाचेही धडे घेतले.
१९५५ साली व्ही. शांताराम यांच्या झिनक झनक पायल बाजे’ मधील एका गाण्यात कोरसमध्ये नृत्य करणाºया तरुणींपैकी जयश्री गडकर एक होत्या. त्यावेळी त्यांचे वय होते केवळ  १३ वर्षे. १९५६ साली ‘दिसत तसं नसतं’ मध्ये अभिनेते  राजा गोसावी  यांच्यासोबत जयश्री यांनी काम केले होते. या चित्रपटातील एका गाण्यात त्यांनी नृत्य केले होते.
याच काळात रशियाचे नेते क्रुश्चेव भारत भेटीवर आले असताना पुण्यात एका कार्यक्रमात त्यांच्या स्वागतासाठी जयश्री गडकर यांनी ‘घनश्याम सुंदरा...’ आणि ‘लटपट लटपट तुझं चालणं...’  गाण्यांवर नृत्य सादर केले.  छायाचित्रकार राम देवताळे यांनी जयश्री गडकर यांची छायाचित्रे काढून त्यांच्या स्टुडिओमध्ये लावली. ही छायाचित्रे दिनकर पाटील यांच्या बघण्यात आली. त्यामुळे ‘दिसतं तसं नसतं’ मध्ये जयश्री गडकर यांना नृत्याची संधी मिळाली होती. दरम्यान, राजा परांजपे यांनी जयश्री गडकर यांना पाहिले आणि ‘गाठ पडली ठका ठका’मध्ये नायिकेची संधी मिळाली. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहले नाही. सूर्यकांत हे नायक होते. पुढे ही जोडी सांगत्ये ऐका, लग्नाला जातो मी, पंचारती, मल्हारी मार्तंड, लाखात अशी देखणी, साधी माणसं, सून लाडकी  या   घराची आदी चित्रपटांतून एकत्र झळकली. या जोडीला प्रेक्षकांनी पसंतीची पावती दिली होती.
सूर्यकांत यांच्याशिवाय अभिनेते राजा गोसावी यांच्यासोबतही जयश्री यांची आॅन स्क्रीन जोडी जमली होती. राजा गोसावींसोबत तब्बल नऊ चित्रपटांत जयश्री यांनी काम केले होते. ‘सांगत्ये ऐका’मधील ‘बुगडी माझी सांडली गं...’ ही लावणी अतिशय गाजली होती. तसेच, ‘साधी माणसं’ मधील ‘ऐरणीच्या देवा तुला ठिगणी ठिणगी वाहून दे...’ ही गाणीही अतिशय लोकप्रिय ठरली. मराठी चित्रपटांत सोज्वळ आणि तमाशाप्रधान भूमिका साकारून त्यांनी अष्टपैलू अभिनयाचे दर्शन घडवले होते.

लग्नानंतरही अभिनय...
१९७५ साली बाळ धुरी यांच्यासोबत जयश्री विवाहबद्ध झाल्या. लग्नानंतरसुद्धा त्यांनी अभिनय सुरू ठेवला. बाळ धुरी यांच्यासोबतही त्यांनी काही चित्रपटांत भूमिका केल्या. अशी असावी सासू, हे दान कुंकवाचे, मुंबई ते मॉर्शिअसमध्ये ही जोडी एकत्र झळकली. ‘ससुराल’,‘लव कुश’, ‘डिटेक्टिव’, ‘संपूर्ण महाभारत’,‘जियो तो ऐसे जियो’ हिंदी चित्रपटांतूनही जयश्री यांनी भूमिका साकारल्या. केवळ मराठी, हिंदीतच नव्हे तर गुजराती, तामिळ, भोजपुरी आणि पंजाबी चित्रपटांतही काम केले.
 साधी माणसं, पाटलाची सून, थांब लक्ष्मी कुंकू  लावतेसाठी सलग तीन वर्षे राज्य शासनाचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जयश्री यांना मिळाला. जयश्री गडकर यांनी दग्दर्शन क्षेत्रातसुद्धा यशस्वी वावर केला.‘अशी असावी सासू’ हा चित्रपट त्यांनी  दिग्दर्शित केला होता. ‘अशी मी जयश्री’ हे जयश्री गडकर यांचे आत्मचरित्र प्रकाशित झाले आहे. मराठमोळ्या अभिनयाने सगळ्यांची मने जिंकू न घेणाºया जयश्री गडकर  यांची  आत्मकथा वसंत भालेकर यांनी  शब्दांकित केली आहे. आपल्या अप्रतिम अभिनयाने रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाºया जयश्री गडकर  यांनी २९ आॅगस्ट २००८ रोजी जगाचा निरोप घेतला. हृदयविकारामुळे त्यांची प्राणज्योत मालवली.

कैकयीऐवजी कौशल्या ...
भारतीय पहिली महामालिका ‘रामायण’मध्ये जयश्रींना  कै कयी बनायचे होते. तसे त्यांनी रामानंद सागर यांच्याकडे बोलून दाखवले. त्यावर ‘ही भूमिका  तुला दिली तर लोक मला शिव्या देतील, असे रामानंद यांनी जयश्रींना उत्तर दिले होते. कौशल्याच्या भूमिकेसाठी सुरुवातीपासूनच तुझंच नाव आम्ही ठरवलं होतं आणि  ही भूमिका तूच करावी, असे रामानंद सागर यांनी जयश्रींना म्हटले. विशेष असे की ‘रामायण’मध्ये दशरथ बनले होते त्यांचे पती बाळ धुरी.


© संजय इस्तारी मुंदलकर
   

Saturday, 29 February 2020

तेलाचं बोटं...

 लोकसंख्या वाढीचे दुष्परिणाम सर्वत्र जाणवत आहेत. केवळ  ११ जुलैला लोकसंख्यावर चिंता आणि चिंतन करून चालणार नाही.  लोकसंख्यामुळे निर्माण झालेल्या समस्या पदोपदी आणि क्षणोक्षणी प्रत्येकाला भोगाव्या लागत आहेत. त्यामुळे दररोज त्याविषयी विचारमंथन, जनजागृतीपेक्षा प्रत्यक्ष कृतीची  गरज निर्माण झाली आहे.


प्रसंग १ : लहानपणी आई केसाला फक्त तेलाचं बोट लाव, असं सांगायची. आम्हाला मात्र मोठ्या अनिच्छेनं केलेल्या आंघोळीनंतर केसांना चिप...चिप करायची सवय होती. त्यामुळं हा प्रकार आईच्या लक्षात आला की, कधी कधी तिच्या हातचा धपाटा बसायचाच बसायचा! मात्र, आई फक्त तेलाचं बोटच लाव, असं का म्हणते, हे काही अजूनही समजलंं नाही.
प्रसंग २ : एकदा आई जेवताना म्हणाली होती, की भाजी ‘लव लव’ खा. असं ती अनेकदा म्हणायची. यातून हा जेवायचा, तो जेवायचायं, असं  तिला सूचवायचं असे. ‘लव लव’ खा, या वाक्याचा अर्थ तिला भाजीला भाकर ही ‘लावून लावून’ खा अर्थात भाजी थोडी खा. जेवणारी मंडळी बाकी आहे, असं काहीसं सांगण्याचा तिचा हेतू असायचा; पण आईच्या बोलण्यातून येणाºया तेवढ्या दोन-चार वाक्याचा अर्थ समजायला आम्हाला अर्ध आयुष्य लागलं.
प्रसंग ३ : तिदस्ताच्या दिवाळीपूर्वी म्हणजे २०१९ मध्ये पेट्रोलचे भाव शंभरीच्या आसपास पोहोचले होते. तो ८२ रुपयांवर अनेकदा टांगता राहिला़ आज काल ८० रुपयांच्या आसपास झुलता असतो. सांगायचे हे की पेट्रोल महाग झाले तरी दुचाकी वा तत्सम वाहने वापरणाºयांची संख्या कमी झालेली नाही़़़होणारही नाही. मागणीनुसार पुरवठा होत नसल्याने महागाईची झळ नको तितकी सोसावी लागत असली तरी भारतवासी ज्याप्रमाणे नेटपँक कितीही महाग झाला तरी मोबाईलचा वापर करणे सोडणार नाही, त्याचप्रमाणे वाहन विकत घेणे आणि त्याला रस्त्यावर दौडवणे (चालवणे) सोडणार नाही, ही काळ्या दगडावरील रेघ आहे. अर्थातच आजच्या अर्थपूर्ण आर्थिक घडीला मागणी तसा पुरवठा होण्याची स्थिती नाहीच मुळी...कारण लोकसंख्या...





सांगायचं असे की १९ व्या आणि २० व्या शतकात विज्ञान आणि तंत्रज्ञानातील मोठ्या बदलामुळे अर्थात विविध संशोधनामुळे जगाचा जन्मदर  वाढला. यात मनुष्याचे आयुर्मान वाढले असले तरी तीव्र गतीच्या लोकसंख्यावाढीमुळे अन्नधान्य, निवारा, बेकारी, गरिबी, गुन्हेगारी यासारख्या अनेक समस्या आ वासून उभ्या राहिल्या. विकासाच्या प्रत्येक टप्प्यात  प्रगती साधली असली तरी आता कोणत्याही क्षेत्रातील विकासाला ही अवाढव्य  लोकसंख्या मुख्य अडथळा ठरला आहे, याकडे दुर्लक्ष करता येत नाही.ही लोकसंख्या आटोक्यात आणण्यासाठी शासन आणि प्रशासन मोठ्या प्रमाणात प्रयत्न करीत असले तरी आपली, समाजाची भूमिका महत्त्वाची ठरली आहे.

जगाची ऐशोआरामाची वृत्ती वाढली. दुचाकी, चारचाकी वाहनांची गरज सरली; पण शौक निर्माण झाला. कुठलीही गरज नसताना महागडे मोबाईल हाती आले. सर्व आयुष्य आँनलाईन झाले. कुणालाही वेळ राहिला नाही़ संवाद संपला. सुख-दु:खाची विचारणा संपली़ महिला, बालकांवरील अत्याचार वाढले आणि अधोगती सुरू झाली.
जगातील वाढत्या लोकसंख्येच्या समस्यांविषयी लोकांच्या मनात जागरुकता निर्माण  करण्यासाठी दरवर्षी जागतिक लोकसंख्यादिन साजरा करण्यात येतो. लोकसंख्या वाढीचे दुष्परिणाम सर्वत्र जाणवत आहेत. केवळ  ११ जुलैला लोकसंख्यावर चिंता आणि चिंतन करून चालणार नाही.  लोकसंख्यामुळे निर्माण झालेल्या समस्या पदोपदी आणि क्षणोक्षणी प्रत्येकाला भोगाव्या लागत आहेत. त्यामुळे दररोज त्याविषयी विचारमंथन, जनजागृतीपेक्षा प्रत्यक्ष कृतीची  गरज निर्माण झाली आहे.

श्वास तुटत चालला 

लोकसंख्यावाढीने  केवळ खाण्यापिण्याच्याच समस्या निर्माण झाल्या नाहीत, तर जमिनीतील पाणी संपतेय, प्रदूषण इतके वाढले की हवेतील प्राणवायू संपतोय, दुष्काळ पडतोय, महापूर येतोय, सूर्याचं  तापमान  वाढतेय, हे सर्व एका दिवशी झालेले नाही, तर मागील अनेक वर्षापासून तीळतीळ  सुरू  आहे आणि त्यातूनच मानवाचा श्वास तुटत चालला आहे.  परिणामी मोठ्या समस्या निर्माण झाल्याने विकासकामे जागच्या जागी थांबली. लोकांना मूलभूत सुविधाही मिळेनाशा झाल्या.  मुलगाच हवा म्हणून तीन-चार अपत्यांना जन्म  दिला जातो. अशिक्षित असो शिक्षित लोकसंख्यावाढीच्या परिणामाची चिंता कुणातही दिसून येत नाही. यावाढीमुळेच  समाजात विसंगत आर्थिक स्थिती  निर्माण झाली. आजच्या घडीला एकीकडे एका घरात सरासरी चार-चार दुचाकी गाड्या आणि एक चारचाकी वाहन, प्रशस्त  महागडे घर आणि आधुनिक सुविधा दिसून येत आहे, तर दुसरीकडे बेरोजगारी, गरिबी, एक वेळच्या भुकेसाठीही अन्न मिळत नाही, भीक मागण्याची प्रवृत्ती वाढलेली आहे, हे विरोधी  चित्र अनुभवास येते. ही स्थिती बदलण्यासाठी  लोकसंख्या  नियंत्रणाचा  उपाय होता़ मात्र, ती वेळही  कधीचीच निसटून गेली आहे. आता ओढूनताणून केलेल्या  उपायांचा परिणाम तत्काळ  दिसून  येणार नाही. त्यासाठी पुढील १०० वर्षे वाट पाहावी  लागेल, असे तज्ज्ञ सांगतात़ ते सर्व पाहायला आम्ही असू की नाही, शंका आहे. तितकीच शंका या जगाच्या अस्तित्वाबाबतची आहे.         
                                               
© संजय इस्तारी मुंदलकर                                                                    

Tuesday, 18 February 2020

बेटी बचाओ, राजनिती पढाओ  

यंदाच्या १७ व्या लोकसभेसाठी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत महाराष्टÑात शिवसेना-भाजपने घवघवीत यश मिळवले.  यात भाजपचे  २४, शिवसेनेचे १८, राष्टÑवादीचे  चार, तर काँग्रेस आणि एमआयएमचा  प्रत्येकी एक खासदार  निवडून आला आहे. यापैकी आठ महिला खासदार संसदेत महाराष्टÑ राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. यात भाजपकडून सर्वांधिक पाच, शिवसेना, राकाँ, अपक्ष  यांचे प्रत्येकी एकेक मिळून एकूण आठ महिला खासदारांचा समावेश आहे. राज्यातील ४८ मतदारसंघातून                        एकू ण ८६७ उमेदवारांपैकी ८० महिला उमेदवारांना विविध पक्षांनी निवडणूक  रिंगणात उतरवले. यापैकी आठ महिलांना लोकसभेत जाण्याची संधी मिळाली. विशेष म्हणजे निवडून आलेल्या महिला खासदार राजकीय कुटुंबातीलच आहेत. यात मुलगी, सून, अशी नाते जपणाºया आहेत. सुप्रिया सुळे राष्टÑवादी काँग्रेसकडून बारामती मतदारसंघातून निवडून आल्या.  भावना गवळी (शिवसेना-यवतमाळ-वाशिम), नवनीत राणा (अपक्ष-अमरावती), प्रीतम मुंडे (भाजपा-बीड), रक्षा खडसे (भाजप-रावेर), हीना गावीत (भाजप-नंदुरबार), पूनम महाजन (भाजप-उत्तर मध्य मुंबई), भारती पवार (भाजप-दिंडोरी) या सर्व लोकसभेसाठी मतदारांनी आपला प्रतिनिधी म्हणून निवडून दिले आहे.
बारामती मतदारसंघातून राष्टÑवादी काँग्रेसच्या उमेदवार  सुप्रिया सुळे यांनी भाजपच्या कांचन कुल यांच्यावर मात केली.  सुळे यांनी आपल्या विजयाची हँट्ट्रिक केली आहे. कारण त्या  तिसºयांदा संसदेवर निवडून गेल्या आहेत. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या भावना गवळी यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे यांचा पराभव केला. मागील  निवडणुकीमध्ये त्यांनी काँग्रेसचेच शिवाजीराव मोघेंचा पराभव केला होता.
रावेर मतदारसंघात भाजपच्या उमेदवार व  माजी  महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या सुनबाई रक्षा खडसे यांनी काँग्रेसचे डॉ. उल्हास पाटील यांना पराभूत केले. हा त्यांचा दुसरा विजय आहे. मागील निवडणुकीत त्या सर्वात तरुण खासदार ठरल्या होत्या.(यंदा मात्र त्यांचा हा मान अन्य ओडिशातील महिला उमेदवाराकडे गेला आहे.) २०१४ लोकसभा निवडणुकीत त्यांनी राष्टÑवादीचे मनीष जैन यांचा जवळपास तीन लाख मतांनी पराभव केला होता.
बीड मतदारसंघात डॉ. प्रीतम गोपीनाथ मुंडे यांनी राष्टÑवादी काँग्रेस उमेदवार बजरंग सोनावणे यांचा पराभव केला. २०१४ साली बीडमधून गोपीनाथ मुंडे यांनी सुरेश धस यांना पराभूत केले होते. गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती मृत्यूनंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांची कन्या प्रीतम मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली आणि  त्या विजयी ठरल्या. आता पुन्हा एकदा संसदेत महाराष्टÑाचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबारमधील भाजप उमेदवार डॉ. हीना विजयकुमार गावीत यांनी काँग्रेस उमेदवार अ‍ॅड. के. सी. पाडवी यांच्यावर मात केली. यंदा त्यांची दुसरी टर्म आहे. २०१४ च्या निवडणुकीत हीना गावीत यांनी माजी खासदार माणिकराव गावीत यांचा पराभव केला होता. उत्तर-मध्य मुंबई मतदारसंघात भाजपच्या पूनम महाजन यांनी काँग्रेसच्या प्रिया दत्त यांचा मतांनी पराभव केला. मागील निवडणुकीतही पूनम -प्रिया असाच सामना रंगला होता.
अमरावतीत अपक्ष उमेदवार नवनीत रवी राणा यां                                                     नी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आनंदराव अडसूळ  यांचा पराभव केला. मागील निवडणुकीत आनंदराव आडसूळ यांनी राष्टÑवादीच्या उमेदवार नवनीत राणा यांना  पराभूत केले होते. पराभवाची परतफे ड करीत नवनीत लोकसभेवर निवडून आल्या आहेत. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांनी राकाँ उमेदवार धनराज महाले यांचा पराभव केला.
देशपातळीवर पाहिले तर १७  व्या लोकसभा निवडणुकीतील ५४२ वजयी उमेदवारांत महिला सदस्यांची संख्या केवळ ७८ इतकी आहे. विशेष म्हणजे महिला खासदारांची आतापर्यंतची ही सर्वात मोठी संख्या असून त्यांची टक्केवारी ही १७ इतकी आहे. यापूर्वी महिला सदस्यांची सर्वाधिक संख्या ही नवव्या लोकसभेत २८ इतकी होती. राष्टÑीय निवडणूक आयोगाद्वारा लोकसभेच्या  ५४२ जागांबाबत केलेल्या निकालानुसार, यंदा निवडून आलेल्या सर्वाधिक ४० महिला उमेदवार भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर  निवडून आल्या आहेत. काँग्रेस पक्षाकडून  संपुआच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनाच उत्तर प्रदेशातील रायबरेली येथून विजय मिळाला आहे.याशिवाय केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांनी उत्तर प्रदेशातील अमेठीमधून काँग्रेस अध्यक्ष  राहुल  गांधी यांचा पराभव करत  विजय मिळवला  आहे. मनेका गांधी सुल्तानपूर आणि अपना दलच्या उमेदवार अनुप्रिया पटेल  यांनी मिर्झापूर येथून निवडणूक जिकंली आहे. भाजप उमेदवार हेमा मालिनी मथुरा , प्रज्ञा ठाकूर भोपाळ, मीनाक्षी लेखी  नवी दिली, किरण खेर चंडीगड आणि रिता बहुगुणा जोशी यांनी अलाहाबाद  येथून विजय मिळवला.
पश्चिम बंगालमधील आसनसोल येथून  तृणमूल काँग्रेस उमेदवार मुनमुन सेन, सलचर येथील सुष्मिता देव, सुपोल येथून रंजीत रंजन कन्नोज येथून समाजवादी पार्टीच्या डिंपल यादव, रामपूर येथून भाजप उमेदवार जयाप्रदा यांचा मात्र पराभव झाला.
यात उल्लेखनीय असे की यंदाच्या लोकसभा निवडणुकीत देशभरातून एकूण ८ हजार ४९ उमेदवार मैदान  उतरले होते. आणि यापैकी केवळ ७२४ महिला उमेदवार होत्या, जे प्रमाण कमीच आहे. काँगे्रसने सर्वाधिक ५४  आणि भाजपने ५३ महिला उमेदवारांना निवडणूक मैदानात उतरवले होते. अन्य राष्टÑीय पक्षात बसपाने २४, तृणमूल कांग्रेसने २३, माकपाने १०, भाकपाने चार आणि राष्टÑवादी काँग्रेस पार्टीने  एक महिला उमेदवाराला तिकीट दिली.अपक्ष महिला उमेदवारांचा संख्या २२२  इतकी होती, तर चार ट्रान्सजेंडर उमेदवारांनी अपक्ष निवडणूक लढवली.

राजकीय पक्ष अपयशी

यंदा राज्यातील राजकारणाला दोनदा उभारी मिळाली. मे महिन्यात लोकसभा तर आॅक्टोबरमध्ये विधानसभा निवडणूक पार पडली. यंदा या निवडणुकीतून तरुणवर्गाला संधी मिळाली आणि ते निवडूनही आले. महिला उमेदवांराबद्दल बोलायचे झाल्यास यंदा विविध राजकीय पक्षांनी एकूण २३५ महिलांना आमदारकीची उमेदवारी दिली. एकूण ३,२३७ उमेदवारांपैकी हे प्रमाण ७.२५ टक्के आहे. यापैकी २४ महिला (८.३३ टक्के)उमेदवार प्रत्यक्ष निवडणुकीत जिंकल्या. मागील निवडणुकीच्या तुलनेत हे प्रमाण वाढले आहे. सन २०१४ च्या निवडणुकीत २० महिलांना यश मिळाले होते़़ तसेच, टक्केवारी ७़३ इतकी होती.
याशिवाय २५ अपक्ष उमेदवारांनी आपले नशिब अजमावून पाहिले़ हीच संख्या मागील निवडणुकीत ३३ इतकी होती़ विशेष म्हणजे यंदाच्या निवडणुकीत महिला उमेदवारांनीही आपल्या पक्षासोबत बंडखोरी केल्याचे दिसून आले. प्रणिती शिंदे काँग्रेस(सोलापूर), यामिनी जाधव शिवसेना (भायकुळा), सुमन आबा पाटील राष्ट्रवादी (तासगांव), मंदा म्हात्रे भाजप, (बेलापूर), माधुरी मिसाळ भाजप (पर्वती पुणे), मुक्ता  टिळक भाजप (पुणे), मंजुळा  गावित काँंग्रेस (साक्री), भारती लावेकर भाजप(वर्साेवा), सीमा हिरे भाजप(नाशिक), विद्या ठाकूर भाजप (गोरेगांव), देवयानी फरांदे भाजप (नाशिक), मोनिका राजळे भाजप (शेवगांव), लता सोनवणे शिवसेना(चोपडा जळगांव), वर्षा गायकवाड काँग्रेस (धारावी मुंबई), नमिता मुंदडा भाजप (केज   बीड), अदिती तटकरे राष्ट्रवादी(श्रीवर्धन), श्वेता महाले भाजप (चिखली बुलडाणा), यशोमती ठाकूर काँग्रेस (तिवसा), प्रतिभा धानोरकर काँगे्रस (वरोरा), मेघना बोर्डीकर भाजप(जिंतूर), गीता जैन काँग्रेस(मीरा भायंदर), सरोज अहिरे राष्ट्रवादी(देवळाली नाशिक), सुलभा खोडके काँग्रेस (अमरावती), मनीषा चौधरी भाजप (दहिसर)आदींचा समावेश आहे.

नातेसंबंधांना प्राधान्य

भारतीय लोकसंख्याच्या तुलनेचा विचार केला असता राजकीय पक्षांनी उमेदवारी देताना महिलांचा विचारच केला  नाही, जी  काही  उमेदवारी दिली आहे, ती केवळ नाईलाजास्तव दिल्याचे दिसून येते. कारण तेच ते चेहरे पुढे आणले आहे. यात नातेसंबंधांना प्राधान्य दिले आहे. यावरून  नवीन, सक्षम उमेदवारांचा शोध घेण्यात राजकीय पक्ष अपयशी ठरले  असे म्हणता येईल. राष्ट्रीयच काय पण प्रादेशिक पक्षानेही आपल्या किती जागा निवडून येवू शकतात, याचाच विचार केल्याचे दिसून येते.
एकीकडे महिला सक्षमीकरणाचा घोशा लावायचा आणि दुसरीकडे प्रत्यक्ष वेळ आल्यास त्यांच्याकडे दुर्लक्षित करायचे, हा प्रकार अनेक वर्षांपासून सदोदित चालू आहे. भारतीय लोकसंख्या ही आता तरुणांची आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रात आता शिक्षित, दूरदृष्टीच्या तरुणांचा भरणा अधिक असावा, असे सूचवावे वाटते.
भारतीय राजकारणाने आता भारतीय महिलांना अन्य क्षेत्रासोबतच  राजकीय क्षेत्र  पूर्णपणे उघडे करून द्यावे. महिलांनी पंतप्रधान, राष्ट्रपती, लोकसभा अध्यक्ष यासारख्या पदांचा हव्यास धरावा. दिवंगत इंदिरा गांधी, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, माजी लोकसभा अध्यक्ष  सुमित्रा महाजन, देशाच्या दुसºया संरक्षण मंत्री तसेच विद्यमान अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी हेच दाखवून दिले आहे. मात्र, त्यासाठी महिलांना प्रत्यक्ष निवडणुकीपासून दूर ठेवता कामा नये.

© संजय इस्तारी मुंदलकर