Sunday, 1 October 2023

IT'S POLITICLE दिसंबर बहुत दूर नहीं ...

 पुढील काही दिवसांत मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, मिझोराम आणि  तेलंगणा या पाच राज्यात विधानसभा निवडणूक होत आहे. या निवडणुकीनिमित्त प्रचार, सभांतून सत्ताधारी-विरोधकांतील आरोप-प्रत्यारोप-टीकांचा धुरळा उडेल. एक  दिवशी मतदान पार पडून निकाल जाहीर होईल. भारतीय निवडणूक आयोगाने आपले  वेळापत्रक घोषित केले़ आणि सत्ताधारी आणि विरोधकांना कामाला जुंपले. तसा अप्रत्यक्ष प्रचार मागील काही महिन्यांपासूनच सुरू झाला होता. कारण या दोघांनाही ‘पंचराज्य’ कोणत्याही  परिस्थितीत काबीज करायचे आहे. [ SANJAY MUNDALKAR' NITYAASAN ]


पुढील वर्षी लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे म्हणजे  केंद्रीय  पातळीवरील  सत्तांतराचे  वर्ष. त्यामुळे  राजकीय दृष्टीने पाहता देशातील मानसिक बदलांचा कस लागणार आहे. कारण ही ‘पंचराज्य’ च   सत्ताधारी आणि विरोधकांचे नशीब ठरवेल. राष्ट्रीय आणि प्रादेशिक पक्षांनी सत्ताप्राप्तीसाठी दंड  थोपटले आहे. याठिकाणी  ज्या पक्षांची सत्ता येईल, त्या पक्षांचे ‘हौसले बुलंद’ होतील, यात शंका नाही. जो यशस्वी ठरेल, त्याचंच ‘खरं’ असेल. 


‘पंचराज्या’ची निवडणूक ही सत्ताधारी वा विरोधकांसाठी २०२४ आधी सेमी फायनल नाही,तर मोठा ‘स्पीड बे्रकर’ म्हणता येईल. कारण हा मोठा अडथळा जो पार करेल, त्याची ‘नाव’ पार होणार आहे. या राज्यांच्या निवडणुकीच्या निकालाचे मोठे परिणाम निश्चितच लोकसभा निवडणुकीवर दिसून येतील. मुळातच मोदी सरकारच्या  नऊ वर्षांत देशवासीयांच्या कल्याणासाठी घेतलेल्या विविध निर्णयांचे प्रतिबिंब या निवडणुकीच्या निकालात पाहता येईल. सत्ताधाºयांचाही प्रवास सोपा नाही. प्रचारासभादरम्यान २०१४ पासून आतापर्यंत निवडणुकीत  दिलेल्या किती आश्वासनांची आणि कशी पूर्तता केली, तेही छातीठोकपणे सांगावे लागणार आहे, अन्यथा आश्वासन पूर्ण न केल्याबाबत माफी मागत आगामी लोकसभा निवडणुकीआधी ते पूर्ण करण्याची ‘फुल्ल गॅरंटी’ द्यावी लागणार आहे. अर्थातच, हे काम तितके सोपे नाहीच. 





देशाची वाटचाल बदलली, काँग्रेसनेही बदलावे

काँग्रेसलाही पुढील लोकसभेत सत्ता गाठायची असल्यास २०१४ पासूनच्या  निवडणूक प्रचारपद्धतीला तिलांजली देत  नव्याने मूळ रुजवावे लागेल. सुमारे दहा वर्षांची सत्ता भोगल्यानंतर यूपीएला (आता काहीसे नामकरण इंडिया असे ...) बदलणे गरजेचे आहे. काँग्रेसची सत्ता संपुष्टात आल्यानंतर  मागील नऊ वर्षांत देशाची वाटचाल पूर्णपणे बदलली आहे. भाजपामुळे नवी आव्हाने निर्माण  झाली आहेत.

निवडणूकही ‘डिजिटल’ झाली आहे, असे म्हणता येईल. झालेल्या चुकांची खुलेदिलाने देशवासीयांची माफी मागावी लागेल. याशिवाय केवळ सत्ताधाºयांवर टीका करून चालणार नाही तर देशासमोर विकासाच्या नव्या संकल्पना मांडाव्या लागतील. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय  मुद्यांना कसे सोडविता येईल, याचाही उहापोह करावा लागेल. विद्यमान सरकारने नवनव्या योजना सुरू केल्या आहेत. मुख्य म्हणजे देशात भाजपा समर्थक तयार झाल्याच्या मुख्य बाबीकडे  दुर्लक्ष करता येणे काँग्रेसला परवडणारे नाही.


मागील कर्नाटक निवडणुकीत प्रामुख्याने  ‘नमो’ आणि  ‘रागां’  यांच्यातील जुगलबंदी  पाहावयास मिळाली़ काँग्रेसने आपली प्रचारपद्धती बदलविल्याने कर्नाटक हाती आला़ आता आणि पुढील सर्व निवडणुकांत ही हेच करावे लागणार आहे़ कारण पाच राज्यापैकी फक्त राजस्थान आणि  छत्तीसगडमध्ये  सत्ता आहे़ भाजपाकडेही एकटेच मध्य प्रदेश राज्य आहे़ (या राज्यातही सहज सत्ता मिळालेली नाही) तेलंगणामध्ये बीआरएसची आणि मिझोराममध्ये एमएनएफ सत्तेत आहे. तर, राजकारणाची  दिवसेंदिवस बदलत असलेली दिशा आणि दशा  पाहून  ही  पाचही  राज्ये  ताब्यात  घेण्यासाठी  ‘दिसंबर बहोत दूर नही...’



संजय मुंदलकर