Sunday, 5 March 2023

तिसरा भारत येतोय ...

मोठी आर्थिक शक्ती म्हणून वेगाने पुढे येत असल्याने भारताकडे सर्वांची नजर खिळली आहे. सुपातील आणि जात्यातील अशा रूपात जागतिक शक्तीचे विकेंद्रीकरण होत असतानाच भारत जागतिक शांततेचे आवाहन करत आपली प्रतिमा जोपासून आहे.


मागील २४ फेब्रुवारी २०२३ रोजी रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाला एक वर्ष पूर्ण झाले आणि पुन्हा एकदा हा संघर्ष तिसºया महायुद्धाकडे वळणार असल्याच्या चर्चांना वेग आला. आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक देशांनी सुद्धा पुढील काही दिवसांत तिसरे महायुद्ध सुरू होण्याचे संकेत  मिळत असल्याचे स्पष्ट केले. कारण या युद्धामुळे अन्नधान्य आणि पेट्रोलियम पदार्थासंदर्भात जागतिक समस्या निर्माण झाल्या़ त्यामुळे  हा  लढा  केवळ  दोन देशामधील असला तरी त्यात संपूर्ण  जग अप्रत्यक्ष  सहभागी आहेत़ कुणी रशियाला, तर युक्रेनला समर्थन दिले. समाजात जसा  चांगल्या  गोष्टींना पाठिंबा असतो, त्यासम किंवा त्या खालोखाल वाईट बाबींनाही महत्त्व दिले जाते. त्यामुळे लहानग्या युक्रेनच्या बाजूने अनेक देश असले तरी रशियाला  चोपडणारे अनेक देश  आहेत.  

युरोपात सुरू असलेले युद्ध हे शुद्ध वर्चस्वातून उदयास आले़ राजकीय महत्त्वाकांक्षा, विस्तारवादी  आणि  संपूर्ण जगावर वर्चस्व गाजविण्याची  वृत्ती या बाबी कारणीभूत  ठरल्या. म्हणून श्रीमंत-गरीब, विकसित-अविकसित असे विविध गट निर्माण झाले. अशातच युद्ध वर्षभरानंतरही संपुष्टात येण्याची चिन्हे दिसून न आल्याने त्याची वाटचाल नव्या दिशेने सुरू झाल्याचे आंतरराष्ट्रीय  तज्ज्ञांनी म्हटले आहे. पुढील  काही दिवसांत दोन्ही देशांतील संघर्ष संपेल किंवा  जग  तिसºया  महायुद्धाकडे ओढले जाईल. युद्ध सुरू असताना वा ते संपल्यानंतर जग तीन  गटांमध्ये विभागले जाईल. अर्थातच जगाची एकूण एक दिशा  बदलून  नव्या समूहाचे नेतृत्व  भारताकडे आपोआप येईल. 


भांडवलशाही देशांमध्ये अमेरिका, कॅनडा, ब्रिटन, युरोप, जपान, आॅस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया सहभागी असेल. दुसºया गटात रशिया, बेलारूस, इराण, सीरिया, व्हेनेझुएला, उत्तर कोरिया, चीन  सुद्धा असू  शकेल. चीनची  भूमिका ही ‘शत्रूचा शत्रू आपला मित्र’ अशी न्यायसंगत राहण्याची शक्यता असेल.

विकासशील अर्थात झपाट्याने उदयास आलेल्या तिसºया गटात आखाती देश, दक्षिण आशियायी देश, दक्षिण अमेरिका, भारत आदींचा समावेश असण्याचा दावा करण्यात येत आहे. मागील काही वर्षात भारताने आपली प्रतिमा जोरदार बदलण्याचा प्रयत्न चालविला़ त्यामुळे  जग  देशाला  ‘मानत’ आहे. यूनो, सार्क, क्वाड यासारख्या गटांमध्ये सक्रिय सहभाग, जवळपास सर्वच देशांसोबत द्विपक्षीय संंबंध, आर्थिक, संरक्षण क्षेत्रात सहकार्याची भूमिका या सर्व बाबी भारताने सकारात्मकरित्या जोपासल्या आणि त्याचा परिणाम आता दिसून येत आहे.

याशिवाय  मोठी आर्थिक शक्ती म्हणून वेगाने पुढे येत असल्याने भारताकडे सर्वांची नजर खिळली आहे. सुपातील आणि जात्यातील अशा रूपात जागतिक शक्तीचे विकेंद्रीकरण होत असतानाच भारत जागतिक शांततेचे आवाहन करत आपली प्रतिमा जोपासून आहे. म्हणूनच तिसरा गट हा भारताच्याच नेतृत्वात असण्याचा कयास बांधला जात आहे.

जग भारताकडे झुकण्याचे आणखी कारण म्हणजे २०२० मध्ये चीनने जगावर लादलेल्या कोरोनासारख्या महामारीच्या काळातही शोधलेली सहकार्याची संधी. आणि येथूनच उर्वरित जगाची नजर भारताकडे ‘आशाळभूत’ ठरली. कोरोना प्रतिबंधक मात्रांचे (लस) झालेले असमतोल वितरण सुद्धा जगाला विभागण्यात कारणीभूत ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. महामारीच्या काळातील भेदभावामुळे अनेक आर्थिक कमकुवत देश प्रामुख्याने अमेरिकेपासून  आपोआप दूर झाल्याचे  दिसून येते. भारताने अगदी महामारीच्या सुरुवातीपासून जगाला औषधीसाठा आणि कोरोना प्रतिबंधक मात्राचा तातडीने पुरवठा केला. हीच बाब भारताला जागतिक नेतृत्व प्रदान करू शकते, असे सांगण्यात येत आहे.


(सर्वाधिकार सुरक्षित)