Saturday, 20 August 2022

समाजद्रोहींकडूनच अपघात

वाहन उत्पादक  कंपन्यांनी ग्राहकांवर अधिक भार टाकत मासिक हप्त्यांनी सवलत दिल्याच्या दिवसांपासून आजतागत हा प्रकार सुरूच आहे. त्यावर आता तरी अंकुश बसणे अगदी काळाची गरज होऊन बसली आहे. रस्ते  आहेत तेवढेच आहेत आणि वाहतूक नियमांबाबतची बेफिकीरी वाढत आहे.


मृत्यू हा शाश्वत आणि सत्य. संपूर्ण जीवनमात्र त्याला स्वीकारतात ; परंतु सर्व काही सुरळीत सुरू असताना कुणाच्या तरी चुकीने आयुष्याचा अंत होतो़ ही बाब स्वीकारण्याजोगी नाहीच़ सध्या मानवजात नको तितकी ‘फास्ट’झाली आहे़ सर्व गोष्टी चुटक्यासरशी व्हाव्यात अशी ज्याची त्याची उपेक्षा असते आणि त्यासाठी त्याची कोणत्याही परिणामाला सामोरे जाण्याची तयारी असते. मग निसर्गनिर्मित असो वा मानवनिर्मित असो नियमांना पायदळी तुडविणे, हे फार शहाणपणाचे समजले जाते. त्यात प्राण गेला तरी बेहत्तर! असंच काहीसं सध्या होत आहे़ वाहनातून इच्छितस्थळी पोहोचण्यासाठी हा मानव पार नियम तोडत आहे आणि पदरी मात्र अपघाती मृत्यू ओढवून घेतोय. 

देशातील प्रत्येक मार्गावर अपघात होत आहेत़  रस्ता एकपदरी असो वा सहापदरी कोणताही जीव त्यावर सुरक्षित नाही़ कोणताही चांगला मार्ग वाहनांच्या सुरक्षित वेग ासाठी आणि प्रवासाचा वेळ कमी होण्यासाठी असला तरी सुरक्षिततेचा हेतू कधीच मागे पडला आहे. यापैकी अतिवेगाचा हेतू तर साध्य झाला;परंतु सुरक्षित आणि सुरळीत प्रवासाचा (वाहतुकीचा) हेतू साध्य झालेला आहे, असे ठाम सांगता येणार नाही. कारण रस्तोरस्ती अजूनही अपघातांची मालिका आहे.  भारतात रस्ते अपघातांचे प्रमाण मोठे आहेच़भरीसभर चार वा सहापदरी अशा अधिक रुंदीच्या रस्त्यांवरही असे अपघात वारंवार व्हावेत, हे मोठे दुर्दैवच म्हटले पाहिजे.

  अपघातांच्या मागे केवळ रस्ते हे एकमेव कारण नसल्याचे अनेकदा आढळून आले आहे. मानवी चुकाही अपघातास कारणीभूत ठरत आहेत. रस्ता कितीही सुरक्षित असला तरी तेवढे पुरेसे नाही. रस्त्यावरून जाणाºया वाहनांमध्ये किती प्रवासी (वा माल) कोंबावेत, वाहनचालकाने सलग किती तास ‘ड्रायव्हिंग’ करावी आणि वाहनाचा वेग किती असावा यावर सरकारने लक्ष ठेवावे,असे म्हणणे मूर्खपणाचे ठरेल.म्हणजेच अपघातांना इतर कारणांपेक्षा मानवी चुका अधिक कारणीभूत असल्याचे लक्षात येते. या चुकांची साखळी वाहतुकीची परवाने देण्यापासून सुरू होते, तिथून ती अतिवेगाने वाहने चालवण्याची प्रवृत्तीपर्यंत संपते. 

अगदी  बनावट परवाधारक चालकापासून वळणावर वाहन असताना मोबाईलवर बोलण्यापर्यंतची साखळी अपघाताला कारणीभूत ठरली आहे़ आज अशी स्थिती आहे की  परवाना असलेला चालक अ सो वा नसलेला चालक असो, दोघांनाही अन्य कुणाच्या जीवांची पर्वा नाही़ मोबाईल कानाशी ठेवत  वाहन चालवणारे समाजद्रोही अनेकदा पाहावयास मिळतात. ते  कदापिही वाहतुकीच्या नियमांबाबत दक्ष नसतात. वेगाची मर्यादा न पाळणे, भरधाव गाडी ‘लेन’ तोडून दुसºया ‘लेन’मध्ये घेणे अशा प्रकारातून ते अपघातास कारणीभूत ठरतात. मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर अशा प्रकारच्या अनेक दुर्घटना मानवी चुकांमुळे झालेल्या आहेत. भारतात रस्ते अपघातात मरणाºयांची संख्या मोठी आहे आणि त्यावरून भारतीय किती बेशस्त आहेत, यावर प्रकाश पडत असतो. या बेशिस्तीमध्ये बेफाम वेगाने गाड्या चालवणे,‘ओव्हरटेक’ करण्याची चुकीची पद्धत आदी बाबी प्रामुख्याने आढळतात.अनेकदा प्रवासीही चालकाला गाडी वेगाने चालवण्याबाबत प्रोत्साहित करत असतात. अशाप्रकारामुळे वेगाची ‘झिंग’ पूर्ण होत असली तरी हा आपल्या आणि वाहकाच्या जीवाशी खेळ असतो, ही जाणीव त्यांना नसते. भारतात वाहनांची संख्या वाढत आहे.  (वाहन उत्पादक  कंपन्यांनी ग्राहकांवर अधिक भार टाकत मासिक हप्त्यांनी सवलत दिल्याच्या दिवसांपासून आजतागत हा प्रकार सुरूच आहे. त्यावर आता तरी अंकुश बसणे अगदी काळाची गरज होऊन बसली आहे.) मात्र, रस्ते  आहेत  तेवढेच आहेत आणि वाहतूक नियमांबाबतची बेफिकीरी वाढत आहे. त्यामुळे  ‘सुरक्षित वाहतूक’ हे  आव्हान  समाजासमोर दिवसांगणिक बिकट  होत  चालले  आहे. कारण दुर्घटनांचा बळी हाच समाज ठरत आहे.

संजय मुंदलकर (सर्वाधिकार सुरक्षित) 

Friday, 12 August 2022

शब्दांना फुटले भाले ...

 यंदाच्या १५ आॅगस्ट  रोजी भारतीय स्वातंत्र्याने सुमारे ७५ वर्षे पूर्ण केलेली असतील़ आणि म्हणून देशभरात भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होणार आहे. घरोघरी तिरंगा ध्वज फडकविण्यात येणार असून, स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष स्मरणीय ठरावे, यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने संपूर्ण देश एक होणार असून, सर्वांचा सहभाग अभिप्रेत आहे. एकत्वाची ही भावना  भविष्यासाठी प्रेरणादायी  ठरेल, हे निश्चित!


भारताला गतवैभवाचा आणि स्वातंत्र्यलढ्याचा गौरवशाली परंपरा आणि इतिहास आहे. स्वातंत्र्यातील आनंद अनुभवताना पारतंत्र्याची बंधने झुगारून देत ज्यांनी या लढ्याला सशक्त   केले आणि त्यासाठी घरदारावर तुळशीपत्र ठेवले अशा असंख्य अनाम वीरांप्रति देशवासियांच्या मनात अभिमानाची भावना सातत्याने तेवत आहे. त्यांचा त्याग हा आपल्या प्रगतीचा जसा आधार आहे, तशी ती देशाला यशाच्या मार्गावर पुढे नेणारी प्रेरणादायी बाब आहे. 

देशाने मागील ७५ वर्षांच्या काळात विविध सरकार सत्तेत आली आणि देशाला विकासाच्या दिशेने चालत ठेवले़ या  मोठ्या कालावधीत  केलेली नेत्रदीपक प्रगती आपल्यासमोर आणि संपूर्ण जगासमोर आहे. आज  देश विज्ञान, तंत्रज्ञान, कला, कृषी, क्रीडा, शिक्षण, पायाभूत सुविधा, आरोग्य, अंतराळ, संरक्षण आदी विविध क्षेत्रात पुढे पुढे जात आहे. भारताने नव्या आणि उमेदीच्या काळात रस्त्यांचे जाळे विणत असतानाच रेल्वेमार्गाला प्राधान्य दिले. विमानाद्वारे सीमाही ओलांडल्या. शेतीला प्राधान्य देत असतानाच उद्योगांतून धूर सोडला. आणि सोबत विज्ञानही ठेवले. आजच्या घडीला आपल्यासोबत अन्य देशांनाही विकासाच्या दिशा दाखवत आहे. आणि जगाचे नेतृत्व करण्याची पात्रता आपल्या अंगी बाळगण्याचा दुर्दम्य आशावाद ठेवत आहे. या वाटेवरून आणखी उत्तुंग यशाकडे जाताना मागे  वळून  स्वातंत्र्य सैनिकांप्रति सन्मानाची भावना मनात राहणे हे सुद्धा देशगौरवासाठी तेवढेच महत्त्वाचे आहे. या निमित्ताने शाळा-महाविद्यालयांतून, विविध सामाजिक उपक्रमांतून त्यांचे कार्य नव्या पिढीपर्यंत  पोहोचणे अपेक्षित आहेत आणि त्यादृष्टीने उपक्रमही आयोजित करण्यात येत आहेत.

स्वातंत्र्यप्राप्तीच्या त्या दिवसांत शब्दांना भाले फुटले होते. ती शस्त्रांसारखी पाजळून निघाली होती, तर मौनांनाही शब्दांचे स्वरूप मिळाले होते. वंदे  मातरम् किंवा चले जाव या दोन शब्दांतून ठिगणी नव्हे,आग नव्हे तर वणवा भडकला होता. शब्दांची मर्यादा आणि त्याची प्राबल्य  काय असते, याचा प्रत्यय त्या काळात अनुभवास येत होता. तर, राष्ट्रपिता महात्मा गांधींनी मौनातून इंग्लिश सत्तेचा निषेध व्यक्त  केलेला. त्याच धर्तीवर तिरंगा हे सुद्धा एक प्रतिक... देशभक्तीचे, देशप्रेमाचे, समतेचे, एकतेचे, कर्तव्याचे आणि निष्ठेचेही.

तिरंगा ध्वजामागे राष्ट्रप्रेमाची, गौरवाची, अभिमानाची भावना आहे.  सीमेवर लढणारा जवानही तिरंग्यासाठी प्राण देण्यास तयार असतो. अंतराळात जाणाºया यानावर असलेला तिरंगा आपल्या मनात अभिमान निर्माण करतो. अशा  या आपल्या  तिरंगा  ध्वजाप्रति भावना व्यक्त करताना त्याचा सन्मान राखला जाईल याची दक्षतादेखील घ्यावी लागणार आहे.

अमृत महोत्सवाच्या निमित्ताने  सरकारने  ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम सुरू केला आहे.  या माध्यमातून तिरंग्याप्रति, भारतीय स्वातंत्र्याप्रति असलेली भावना घराघरातील तरुणाईपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न होत आहे.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशाच्या पुढील यशाची आणि गौरवाची पायाभरणी करणारा ठरावा अशी अपेक्षा आहे. त्यासाठी देशप्रेमाची ही ज्योत  मनात  सतत  तेवत आणि प्रज्वल ठेवावी लागणार आहे. आपली प्रत्येक सकारात्मक  कृती देशाच्या राष्ट्रध्वजाचा गौरव अधिक वाढवणारी ठरणार आहे.