Friday, 24 March 2023

NAVANTIKA ... SANJAY MUNDALKAR STORY त्या धाग्यातील तू सुद्धा एक, मग कुणावर प्रेम करणं हा गुन्हा कसा ठरावा आणि कुणी ठरवावा? भाग ३

त्याला आणि तुलाही मी प्रत्यक्ष बघितलं नाही़  कुठल्या दिव्यदृष्टीनं बघतो तुला, अनुभवतो तुझं अस्तित्व? कां करतोय ओढल्या जातोय मी तुझ्याकडं? माझ्या प्रेमात आसक्ती आहे. वासना नक्कीच नाही़  निर्व्याज्य प्रेम करतोय मी तुझ्यावर आणि त्यासाठी कुठलाही त्याग करायची तयारी माझी! 


file photo


‘‘हा सगळा खेळ तुच खेळलास़ स्वार्थाचा  गोचिड अजूनही पोसतेस आपल्या मनावर! आणि हे जे तू, माझं वन केलं...माझं वन केलं म्हणून आव आणतेस ना, सब नाटक है...सब्ब नाटक!  आपल्या पोटच्या पोराचं स्वत:पेक्षा हजारपटीनं नुकसान केलंस़  नाकारणार हे सर्व ? आणि कसं? कुठला पुरावा आहे. अगं, समाजाचं सोड... तू आपल्या अंर्तमनाला तरी पुरावा देऊ शकतेस का?’’


नित्या केवळ हुंदके देत होती. निर्भय शब्दांच्या अस्त्र-शस्त्रांनी अगदी तुटून पडला.


‘‘ज्या वयात त्याला आई हवी होती, त्यावेळी कुणाच्या तरी संसारात मग्न होतीस़.. स्वार्थात मग्न होतीस ... स्पष्ट सांगायचं तर वासनेत तुडुंब होतीस. हे सर्व स्वीकारलसं आणि त्या लहानग्याचं मन धिक्कारलं? हेही तुला माहिती होतं, की त्याला वडील नाहीत आणि तू दहा-अकरा वर्षांच्या चिमुकल्यास आपल्या नणंदेच्या पदराआड लपवलं!’’


‘‘हो हो ... मी चुकलेचं...त्यावेळी परिस्थितीच तशी होती; पण मी हे सर्व वासनेसाठी केलं नाही. मी खोटं बोलत नाही. माझ्या घरातील लोकांनीच ही परिस्थिती जाणीवपूर्वक ढकलली माझ्यावर.’’


‘‘खोटं, साफ खोटं ... परिस्थिती तशी नव्हती, तर तसं ढोंग केलसं तू. काय होतं वय त्याचं आणि कोणती समज होती त्याला! आपली आई दुसºया कुण्या पप्पाजवळ राहायला गेली, हे त्यानं स्वीकारलं, असं समजतेस का तू? किती उन्हाळे-पावसाळे झेलले होते त्यानं? तुझ्यापासून दूर झाल्यानं त्याच्या मनावर जे काही ओरखडे पडले, ते नक्कीच पुसले जाणार नाहीत़, कदापिही नाही. ते व्रण आजन्म पुरेल त्याला.’’



नित्या काय बोलणार आणि कसं! सत्यता नाकारू शकणार नव्हतीच. आयुष्य आणखी एक वळण घेऊ पाहत होती. आपल्यावर आत्यंतिक प्रेम करणारा हा माणूस कुठून आणि कसा आपल्या आयुष्यात आला, हे आकलनही तिला होईना.


‘‘नित्या, माझा निरजवर तेवढा अधिकार नाही, जितका तुझा आहे.तुझ्या उदरातून जन्म घेतलायं त्यानं. त्याची नाळ तुझ्याशी अधिक जुळलीयं. मी खूप पे्रम करतोय त्याच्यावर आणि तुझ्यावरही आणि हे सर्व जाणतेस, अनुभवतेस तू़. त्याला आणि तुलाही मी प्रत्यक्ष बघितलं नाही़  मात्र, कुठल्या तरी दिव्यदृष्टीनं बघतो तुला, अनुभवतो तुझं अस्तित्व़ कां ओढल्या जातोय मी तुझ्याकडं? प्रेमात आसक्ती आहे. वासना नक्कीच नाही़  निर्व्याज्य प्रेम करतोय मी तुझ्यावर आणि त्यासाठी कुठलाही त्याग करायची तयारी माझी! कुठल्या बंधनांनं एकत्र आणलंय आपल्याला. कुठल्या परिस्थितीनं जुळलोयं तुझ्याशी? नियतीनं आणखी कुणी नाही आणि तुलाच कसं माझ्या आयुष्यात आणलं, तेही अशा स्थितीत की जिथं वाटा तर दिसताहेत; पण चालता येत नाही...

file photo


नित्या स्तब्ध ऐकत होती.


‘‘प्रेमव्यासंगी मानव आहे मी़  तुझ्यासारख्या विवाहितेवर प्रेम जडले.  काय चूक त्यात? मी चोर नाही़  कुणाचं घर फोडलं नाही, कुणाला लुटलं नाही, ‘ओटीपी’ मागून फसवणूक केली नाही. मी कदाचित पत्रकार म्हणून समाजाप्रति अधिक संवेदनशिल आहे, हे नक्कीच़ कारण मी समाजाचा अभ्यास करतो, त्याला अनुभवतो़ लोकांच्या अडचणीतून माना काढतोयं़ रस्त्यांवर संताप पाहतोय़ हाता-तोंडाशी मोठ्या कठीण परिस्थितीत गाठ भेट होणारी माणसं पाहतोय़अशा लोकांवर प्रेम करणं मी का नाकारावं? आणि  त्या धाग्यातील तू सुद्धा एक. कुणावर प्रेम करणं हा गुन्हा कसा ठरावा आणि कुणी ठरवावा?’’


‘‘...याबाबत मला काहीही सांगता येणार नाही; पण मी त्यांच्या घरात गुदमरतेयं इतकंच मला सांगायचं... तिथं नाही राहू शकणार मी! माझ्या आणि माझ्या बाळाच्या आयुष्याला दिशा देणार ते तुम्हीच, इतकंच बोलू शकते.’’ नित्या  बोलली.

file photo


नक्कीच नात्यांमध्ये वेगवेगळी वळणं येऊ लागली होती. निर्भय आता नित्या आणि निरजमध्ये पूर्णपणे गुंतला होता. या प्रसंगापासून निशा आणि निहारिका अजाण असल्या तरी नित्या, निर्भयच्या त्यांच्याशी असलेल्या नात्याबाबत अवगत होती़  निर्भय एका मुलीचा बाप आहे, ही जाणीव सुद्धा तिला होती. दोन बाजू निर्भयपर्यंत पोहोचत होत्या़  त्यांच्यात त्रिकोण नव्हता, हे ही सत्य होतं; परंतु त्या पाचजणांचं भविष्य कसं असेल, हे आजच्या घडीला कुणालाही सांगता येणं शक्य नव्हतं, अगदी नियतीला सुद्धा नाही...





 


 लेखक :        संजय मुंदलकर 
 कथा :           नवंतिका
              जिथं प्रेम हाच देव्हारा ...

                    (सर्वाधिकार सुरक्षित)
                     ही कथा सलग नाही
                     छायाचित्र प्रतिकात्मक  
                    [ all rights reserved] 

Tuesday, 7 March 2023

KATHA महादेव म्हणाला, आता म्हायी लाज तुया हातात...




महादेवनं शेवटचा विळा पाजवला आणि काणसेनं त्याला धार लावली़ विळे मोजून एका सुतळीनं बांधून ठेवले़ रामराव धनगरानं पाच विळे बनवायला दिले होते़ निंदाई सुरू झालेली़ महादेवला पाच नव्या कोºया विळ्यांची ‘आॅर्डर’ मिळाली़ एकाच वेळी मोठी रक्कम हातात येणार होती़ मग त्यानं भट्टीतले कोळसे बाहेर ओढून  विझविले़ हातोडा, छन्नी, काणस, घण, डहान, लहान ऐरण, सांडशी असे अवजारे जागच्या जागी ठेवले़ दुकानाची झाडलोट केली़ कवाडीजवळ उभं राहून बाहेर नजर टाकली़ गाव सामसुम होते़ बसस्टँडवर काहीजण नजरेत आले़ एकटे दुकटे पानठेल्याशी उभे होते़ काही म्हाताºयाकोताºयांच्या बीडी-तंबाखूच्या संगतीत गप्पा सुरू होत्या़ 


एवढ्यात बाभुळगांवकडून एसटी बस गच्चकन येऊन थांबली़ गाडीत गर्दी नव्हती़ तुकाराम बारश्याचा मन्या, रामराव वठ्ठ्याचा दिन्या अन् शेजारच्या गावातली दोन-चार लोक उतरले होते. कंडक्टरनं घंटी मारली अन् एसटी पुन्हा नेरकडं निघाली.

इकडं नांदीजवळ महादेवनं हातपाय धुतले़ सपरीतल्या विटांवरून उडी मारत तो आतल्या खोलीत आला़ सपरीतल्या मातीचे पोपडे निघाले होते़ अजूनी ती कोरडी झाली नव्हती़ दुपारचा बरोबर एक वाजला होता़ त्यानं ग्लास आणि गडवा भरून घेतला़ दवडीतली दीड भाकर ताटात मोडून घेतली़ वाटीत भाजीच्या गंजातून फोडणीचं वरण घेतलं़ बरणीतलं रायतं घेवून जेवण उरकवलं़ शेल्याला हात पुसत तो घराबाहेर आला़ भरदुपारी अंगणात अंधार पडल्याचं दिसलं तसं त्याचं ध्यान वर गेलं़ थोड्यावेळापूर्वी चकाचक असलल्या आकाशात एकदम ढगांची रेटारेटी सुरू होती़ त्याच्या छातीत धस्स झालं़ 

‘ अरे देवा! आता हा चांगलास्स रिचवते़ पुन्ना सपरीत गाटा व्हईऩ देवबी म्हायी मोठी परीक्षाचं घेवून राह्यला माही अन् हा आबाबी कुठी गेला कोन जाणे ?’ असं स्वत:शीच बोलत तो तुºहाट्या-पºहाट्याच्या ढिगाकडे गेला़ 

‘दोन दिस चांगली उघाड पड्ली़ सपरीबी सोेकली व्हती़ आज पानी रिचवला तं कायी खरं नायी़’ असं पुटपुटत त्यानं हातातल्या विळ्यानं पºहाट्या उकरल्या़

इतक्यात थंड वारा सुरू झाला़ दोन-चार थेंबही पडू लागले़ महादेवनं पºहाट्याचा कवटा दुकानातल्या भात्याजवळ आणून ठेवला़ आता हवेचा वेगही वाढला़ धावत जात तुराट्याचा  दुसरा कवटा पहिल्याच्या बाजूला ठेवला़थेंब वाढत गेले़ हलकासा पाऊसही सुरू झाला़ अंगणातल्या कवाडीजवळ येत त्यानं आबाला हाक दिली़‘‘आबा, ओ आबा़’’ तेवढ्यात तुकाराम कुंभाराचा सुध्या येताना दिसला़ महादेवनं मग त्यालाच विचारलं,‘‘अरे सुध्या, म्हां आबा दिसला का ईस्टँडवर?’’

‘‘नायी गा काका़’’

‘‘़़़अन् तुया डवºयाले काय झालं?’’

‘‘अगा, दांडी तुटली़ म्हटलं रामकिस्ना मामाकडं नेतो लौकऱ’’

‘‘बरं बरं जा लौकऱ अभाय तं चांगलस्स भरून आलं़’’

त्यानं पºहाट्याचे चार कवटे दुकान आणि गायीच्या कोठ्यात आणून ठेवले़ कारण की पावसाचा काही भरवसा नव्हता़ कधी, कसा आणि किती दिवस रिचवण काही सांगता येत नव्हतं़ तेवढ्यात महादेवचा बाप आबा काठी टेकवत टेकवत आला़ 

‘‘कुठी गेला होतास्स गां?’’ महादेवनं शेल्यानं डोक्यावरचे केस पुसत विचारलं़

‘‘अरे थ्या सखाराम शिप्याच्या घरून मेनकापड आनला़ सपरीवर हातरून देवू, थोडकश्यानं तरी पानी थांबलं़’’ दुकानातल्या बाजीवर बूड टेकवत आबा उत्तरला़

‘‘हो, पन तेवढ्यानं भागनार नायी़ पान्याच्या माºयानं पानी गयनचं़ मातर अवंदाचं वर्स निभवास्स लागऩ नशिबानं हे दिस दाखोले तं भोगालेस्स पाह्यजे़’’

पावसाचे थेंब कमी झाले तसा महादेव म्हणाला, ‘‘मी गायीसाठी दोन-चार पेंड्या चारा घिवून येतो़ पानी आलंस्स तं जरा ध्यान ठिवजो़ दुपारच्या सुट्टीत पोट्टेबी येईन जेवाले़ पाह्यजो त्यायच्याकडं, जेवतानी नुसते भांडते लेकाचे़’’

मग आपल्या हातचा विळा घेवून महादेव रस्त्याला लागला़ घराजवळ खारीतल्या पायवाटेने तो पांदणीत आला़ वावरावावरात निंदणी, डवरणीचं काम सुरू होतं़ पºहाटी वितभर वाढलेली तर तुरीच्या झाडांनीही उभारी धरली होती़ नजर पोहोचेपर्यंतचा सगळा शिवार हिरवागार दिसत होता़ मजुरांचे हात जोरात चालत होते़ बायकांचा कोलाहल कानावर आदळत होता़ दुसरीकडे डोक्यावरील आभाळात ढगांची गर्दी होती़ महादेवनं पावलांचा वेग वाढवला़ गवताच्या दोन-चार पेंड्या घेवून घर गाठणं गरजेचं होतं़ मात्र, सध्या तरी देवाचा पाऊस त्याच्या आयुष्यावर उठला होता, निदान त्याला तसा भास झाला होता़ आणि त्याचं कारणही तसंच होतं़़़


़़़महादेवच्या पोटी तीन पोरं होती़ मोठा विशाल, मधला प्रशांत त्यानंतर संदीप़ बायको पार्वती आणि बाप आबा असा त्याचा परिवार होता़ तो आपल्या आईवडलांना एकुलताच होता़ लाडाचा असल्याने मायबापानं कुठंही पाठवलं नाही़ केवळ गावातल्याच शाळेत तो शिकला़ मात्र, त्याच्या मनात शिक्षणाचं आकर्षण होतं़ आपण शिकलो तर नाही़, मुलांना तरी आपण खूप शिकवू, असा त्याने निर्धार केला होता़ आणि तो तडीसही नेला़ विशाल अकोल्यातून आपल्या परिवारासाठी आनंदाची बातमी  घेवून आला़ त्याला  बी. एड.साठी प्रवेश मिळणार होता; पण डोनेशनची गोष्ट ऐकून महादेवचा हिरमोड झाला़ मात्र, दुसºयाच क्षणी तो मनातून ताठ उभा राहिला़ कुठल्याही परिस्थितीत पोरांसाठी पैसे उभे करण्याचा निश्चय केला.

‘‘ह्ये सरकार गरिबाच्या लेकराले शिकूस्स देत न्हायी़ शिरीमंताकून घ्या म्हनावं लागनं तितके पैसे़ गरिबाच्या घरात तरी उजेड पडू द्याचा का न्हायी़’’ आबानं नातवाची तगमग ऐकून म्हटलं़

‘‘तसं नाही आबा़ सरकार नाही,संस्थावाले इतके पैसे घेते़’’ विशाल म्हणाला़

‘‘अरे पन, सरकारनं कायी कराले पाह्यजे का न्हायी?’’ आबाला विशालचं मत पटलेलं नव्हतं़

तेव्हा विशाल काहीशा नाराजीनेच महादेवला म्हणाला,‘‘बाबा, राहू द्या़ पुढल्या वर्षी कुठंतरी अ‍ॅडमिशन मिळेलच़तेव्हा पाहू...’’

तसा महादेव लागलीच म्हणाला,‘‘नायी पोरा़ म्होरल्या वर्सी नाही़ यंदाच!आतातोवरक तू एकेक सालं जपलं़ हे साल वाया जावू नोको देवू़ मी कायीतरी येवस्था करतो़ तू कायजी करू नोको़ कवा पाह्यजे थे सांग म्हंजीन मी कामाले लागतो़ फकस्त इतकं ध्यानात ठेव का तुया मांग दोघं भाऊ हायीती़ ’’

‘‘अजून पंधरा दिवस वेळ आहे़’’

‘‘बस्स तं मंग़ उद्यापासून काम सुरू़’’

‘‘़़़पण बाबा, रक्कम मोठी आहेक़ुठून जमवणार हे सर्व?’’

‘‘पोरा, रक्ताचे नसले तरी जीवाले जीव देणारे काका, मामा  हायीत  तुये़ लावतील हातभार थोडा थोडा़ कमी पडले तं लोखंड  टाकू  ईकूऩ तू त्याची चिंता नोको करू़ मी पाह्यतो काय कराचं तं़’’ महादेव विश्वासानं म्हणाला़


विशाल अभ्यासात हुशार होता़ त्याला शिक्षक व्हायचं होतं़ म्हणून त्यानं बी. एड़ साठी अर्ज टाकला़ मोठा मास्तर झाला तर लहान पोरंही मार्गी लागतील, असा महादेवचा होरा होता़ घरी तर शेतीवाडी नव्हती़ खातकाम करून तो आपल्या परिवाराच्या चार घास कमावण्याइतकी कमाई करत होता़ पार्वती शेतमजूरी करून संसाराला हातभार लावायची़ घरात शिल्लक असा पैसा नव्हताच़ तरीही महादेवनं हिंमत हारली नाही़ छातीला माती लावत पोराला कोणत्याही परिस्थितीत मास्तर बनवायचाच, असा चंग बांधला होता़ मात्र, त्यासाठी पन्नास हजाराची सोय करावी लागणार होती़ नशीब म्हणून थोडी फार सवलत मिळाली होती़ संबंधित संस्थेला  दिवाळीपर्यंत एकूण रक्कम देणे गरजेचे होते़


त्या रात्री जेवणखाणं झाल्यानंतर महादेवनं पार्वतीला सांगितलं,‘‘अवं, मी काय म्हनतो़ सकायी ईशालले पातूरच्या बाईकडं पाठोलं तं...’’

त्यावर पार्वती काही बोलली नाही. तेव्हा महादेवनंच आपलं बोलण रेटलं,‘‘तिचीबी शेतवाडी हाये़ निंदण,डवरणं सुरू हाये़ तरीबी जवायानं थोडा जोर लावला तं काम व्हईऩ’’

‘‘अवं पर बाईलेबी कसं म्हनावं़ ज्याच्या त्याच्या घरी निंदाई, डवºयाचं काम हाये़ मातर बाईवर ईस्वास हाये़ तुमची दूरची चुलत बईन असली म्हून काय झालं, तिनं आपल्याले टायमाटायमाले मदत केलीस्स हाये़’’  पार्वती म्हणाली़

‘‘़़़मले वाट्टे बाई पाचक हजार तं देईनस्स़’’ महादेवनं आपला विश्वास बोलून दाखविला़

‘‘अवं तं बाकीच्या पैशांचं काय?’’

‘‘व्हयं, त्याचाच ईचार हाये आता़’’

‘‘मोरगांवचा सुदाम भाऊ, दिसपूरचा नामा तात्या अन् कारंज्याचा देवराव हेस्स लोक कायी तरी देईऩ बाकी, गावातल्या आण्याजी अन् तुक्या दादाकडंबी सबद टाकून पाहू... ’’

‘‘़़़तरीबी कमी पडले तं?’’

‘‘अवं लोखंड हाये़ गाय हाये़ बोद्या हाये़ अशावक्ती मानसापरीस जनावरंच कामी येत्यात़ ईकून टाकू लेकाले़ तरीबी नायी जमलं तं सपरीवरच्या टिना ईकू़पर ईशाल मास्तर झालास्स पाह्यजे़’’

‘‘अवं पर पावसायाचे दिस हाये़ टिना ईकल्या तं तिथं टाकणार काय? मेनकापड टिकत नायी़’’

‘‘अवो, तट्टे टाकू तुराट्याचे़ दोन घरी हायीत़ अनखी दोनक दुसºया कोनाले मांगू़’’ महादेवचा बेत तयार होता़

‘‘़़़पर सपरीवर तट्टे टाकले तरी थेबी गयनारचं का नायी़ नुसता गाटा व्हईऩ’’

‘‘मेनकापड हाथरू़़क़ायी नायी व्हतं़़़झोप आता़’’


महादेवनं आपल्याबरोबर पार्वतीलाही निश्चिंत केलं़ त्याच्या प्लॅननुसार हाती पैसे पडत गेले़ गावातल्याच सदाशिव पाठरेला एक गाय आणि बोद्या नावाचा गोºहा विकला़ तरीही अर्धी रक्कम जुळत नव्हती, तेव्हा त्यानं चांगले जाडेभरडे सहा टिन गावातल्या दौलत पटवाºयाला विकले़ भर पावसाळ्यात आपल्या पोराच्या शिक्षणासाठी डोक्यावरचं छप्पर विकणारा महादेव एक अवलियाच होता़ पार्वतीच्या डोळ्यांतून मात्र आसवाची रांग लागली़ लहान पोरांना काही कळत नव्हतं़ आपला मोठा भाऊ मास्तर होतोय, एवढंच त्यांच्या ध्यानी येत होतं़ त्याच दिवशी महादेवंन सपरीवर तुराट्याचे पाच तट्टे चढविले़ आणि वरच्या वर वरच्या देवाला हात जोडत म्हणाला,‘‘देवा,आता म्हायी लाज तुया हातात हाये़ एवढं मी पोरासाठी करतो़ त्याले लौकर मास्तर बनवं अन् माह्या घरावर पुन्ना असेच टिनं बसू दे़’’


दहा-बारा दिवस कसे निघून गेले, महादेवच्या ध्यानातही आलं नाही़ दुसºया दिवशी त्यानं विशालच्या हाती पंचवीस हजार ठेवले़ आणि म्हणाला,‘‘पोरा, मीनं पैसे कसे जमवले, हे तूबी पाह्यलंस्स़ बस्स! तेवढं ध्यानात ठेव़ आमी पान्यातबी दिवस काढू़ तू आपल्याकडं लक्ष दे़ कायी कायजी करू नोको़ बाकीच्या पैशाची दिवायीतवरक येवस्था व्हईनस्स़ लौकर मास्तर होवून आपल्या भावालेबी पुढं ने़’’ बोलता बोलता त्याला हुंदका आला. पार्वतीनं त्याला ओवाळलं. विशाल आपल्या मायबापाच्या आणि आजोबाच्या पायी पडून अकोल्यात गेला़


तिथून दोन दिवसांतच पावसानं ठाण मांडलं़ महादेवच्या घरातल्या सपरीवरच्या तट्टयातून पाणी गळालं़ जागोजागी धारा लागल्या़ परिवारानं असं दिवस बघितले नव्हते़ कोरडीठण्ण असलेली सपरी ओलीगच्च झाली़ सुरुवातीला धारेखाली गंज,टोपले,लहान मोठे  कटोरे ठेवले; पण त्या तट्ट्याच्या प्रत्येक छिद्राखाली भांडी ठेवणार किती आणि कुठवर? महादेव,आबा, पार्वती आंजोळीनं साचलेलं पाणी बाहेर फेकत होती़ आणि दोन पोरांच्या लहानश्या आंजोळींनीही हातभार लावला़ हे दृष्य गावकरी बघायचे़ तेव्हा  थांबून हळहळ व्यक्त करीत़ ‘पोराले शिकवाले घरावरचे टिन ईकून टाकल्या अन् पान्यात राहून राह्यले माय’,‘कसं केलं माय ह्या माहादेवनं़ घरावरच्या टिना कायले ईकल्या अन् आता पान्यात राह्यते़’,‘ पोरगं मास्तर झाल्यावर त्यानं घराकडं लक्ष नायी देल्लं तं़ एवढा कसा काय माहादेवनं पोरावर ईस्वास टाकला़’ ‘मी म्हनतो घरावरचे टिन ईकून पोराले शिकवाची कायी गरजस्स नोती़’असं काहीबाही कानावर आल्याने पार्वतीला वाईट वाटायचं़ तिचं घर बसस्थानकाशेजारीच असल्याने प्रत्येकाचं लक्ष जायचं़ प्रारंभी आभाळातील पावसाबरोबर पार्वतीच्या डोळ्यांतून आसवे गळायची़ नंतर मात्र आभाळच एकटं ओतायचं. एकदा तर सपरीत फूटभर पाणी साचलं़तेव्हा महादेवनं दारवाज्याच्या चौकटीखालून बाहेर दांड काढला़ मात्र, अंगणातीलच पाणी अंदर यायला लागलं़ तेव्हा त्या दोघांनी आंजोळीनं टोपल्यात पाणी जमा केलं आणि बाहेर फेकलं़ 


एकदा आबाला मोठ्या नातवानं विचारलं,‘‘ का गा आबा, झड लागली तं  कसं व्हईन?’’ तेव्हा आबा त्याच्या केसावर हात फिरवत म्हणाला, ‘‘अरे कायी नायी व्हतं़ दसºयात  आपण  नव्या टिना  ईकत आणू़ जा  खेय आता़’’ आपल्या नातवाची समजूत घालताना आबाला किती कठीण गेलं, हे त्याचं त्यालाच माहित! मनोमन त्यानं देवाला हात जोडले़‘देवा! माह्या महादेवले संभायून घे़’


लेखक : संजय मुंदलकर

कथा : महादेव म्हणाला, आता म्हायी लाज तुया हातात...(भाग १)                                            

उर्वरित भाग लवकरच

छायाचित्र प्रतिकात्मक 

Monday, 6 March 2023

NAVANTIKA ... SANJAY MUNDALKAR STORY जगावर मी प्रेम करतोय... पण माझं कोण...कोण माझं? ...... भाग २

‘‘या सगळ्या बाबींसाठी मानवी संवेदना असावी लागते. दुसºयांच्या मनाचा तळ गाठण्याची सवय असावी लागते़ इथं तर आपण स्वार्थ नावाच्या कोषातच बंदिस्त आहोत. कुठून कळणार दुसºयांचं शल्य...? कारण ते टोच्चकं...बोच्चकं? 

Sunday, 5 March 2023

तिसरा भारत येतोय ...

मोठी आर्थिक शक्ती म्हणून वेगाने पुढे येत असल्याने भारताकडे सर्वांची नजर खिळली आहे. सुपातील आणि जात्यातील अशा रूपात जागतिक शक्तीचे विकेंद्रीकरण होत असतानाच भारत जागतिक शांततेचे आवाहन करत आपली प्रतिमा जोपासून आहे.


मागील २४ फेब्रुवारी २०२३ रोजी रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाला एक वर्ष पूर्ण झाले आणि पुन्हा एकदा हा संघर्ष तिसºया महायुद्धाकडे वळणार असल्याच्या चर्चांना वेग आला. आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक देशांनी सुद्धा पुढील काही दिवसांत तिसरे महायुद्ध सुरू होण्याचे संकेत  मिळत असल्याचे स्पष्ट केले. कारण या युद्धामुळे अन्नधान्य आणि पेट्रोलियम पदार्थासंदर्भात जागतिक समस्या निर्माण झाल्या़ त्यामुळे  हा  लढा  केवळ  दोन देशामधील असला तरी त्यात संपूर्ण  जग अप्रत्यक्ष  सहभागी आहेत़ कुणी रशियाला, तर युक्रेनला समर्थन दिले. समाजात जसा  चांगल्या  गोष्टींना पाठिंबा असतो, त्यासम किंवा त्या खालोखाल वाईट बाबींनाही महत्त्व दिले जाते. त्यामुळे लहानग्या युक्रेनच्या बाजूने अनेक देश असले तरी रशियाला  चोपडणारे अनेक देश  आहेत.  

युरोपात सुरू असलेले युद्ध हे शुद्ध वर्चस्वातून उदयास आले़ राजकीय महत्त्वाकांक्षा, विस्तारवादी  आणि  संपूर्ण जगावर वर्चस्व गाजविण्याची  वृत्ती या बाबी कारणीभूत  ठरल्या. म्हणून श्रीमंत-गरीब, विकसित-अविकसित असे विविध गट निर्माण झाले. अशातच युद्ध वर्षभरानंतरही संपुष्टात येण्याची चिन्हे दिसून न आल्याने त्याची वाटचाल नव्या दिशेने सुरू झाल्याचे आंतरराष्ट्रीय  तज्ज्ञांनी म्हटले आहे. पुढील  काही दिवसांत दोन्ही देशांतील संघर्ष संपेल किंवा  जग  तिसºया  महायुद्धाकडे ओढले जाईल. युद्ध सुरू असताना वा ते संपल्यानंतर जग तीन  गटांमध्ये विभागले जाईल. अर्थातच जगाची एकूण एक दिशा  बदलून  नव्या समूहाचे नेतृत्व  भारताकडे आपोआप येईल. 


भांडवलशाही देशांमध्ये अमेरिका, कॅनडा, ब्रिटन, युरोप, जपान, आॅस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया सहभागी असेल. दुसºया गटात रशिया, बेलारूस, इराण, सीरिया, व्हेनेझुएला, उत्तर कोरिया, चीन  सुद्धा असू  शकेल. चीनची  भूमिका ही ‘शत्रूचा शत्रू आपला मित्र’ अशी न्यायसंगत राहण्याची शक्यता असेल.

विकासशील अर्थात झपाट्याने उदयास आलेल्या तिसºया गटात आखाती देश, दक्षिण आशियायी देश, दक्षिण अमेरिका, भारत आदींचा समावेश असण्याचा दावा करण्यात येत आहे. मागील काही वर्षात भारताने आपली प्रतिमा जोरदार बदलण्याचा प्रयत्न चालविला़ त्यामुळे  जग  देशाला  ‘मानत’ आहे. यूनो, सार्क, क्वाड यासारख्या गटांमध्ये सक्रिय सहभाग, जवळपास सर्वच देशांसोबत द्विपक्षीय संंबंध, आर्थिक, संरक्षण क्षेत्रात सहकार्याची भूमिका या सर्व बाबी भारताने सकारात्मकरित्या जोपासल्या आणि त्याचा परिणाम आता दिसून येत आहे.

याशिवाय  मोठी आर्थिक शक्ती म्हणून वेगाने पुढे येत असल्याने भारताकडे सर्वांची नजर खिळली आहे. सुपातील आणि जात्यातील अशा रूपात जागतिक शक्तीचे विकेंद्रीकरण होत असतानाच भारत जागतिक शांततेचे आवाहन करत आपली प्रतिमा जोपासून आहे. म्हणूनच तिसरा गट हा भारताच्याच नेतृत्वात असण्याचा कयास बांधला जात आहे.

जग भारताकडे झुकण्याचे आणखी कारण म्हणजे २०२० मध्ये चीनने जगावर लादलेल्या कोरोनासारख्या महामारीच्या काळातही शोधलेली सहकार्याची संधी. आणि येथूनच उर्वरित जगाची नजर भारताकडे ‘आशाळभूत’ ठरली. कोरोना प्रतिबंधक मात्रांचे (लस) झालेले असमतोल वितरण सुद्धा जगाला विभागण्यात कारणीभूत ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. महामारीच्या काळातील भेदभावामुळे अनेक आर्थिक कमकुवत देश प्रामुख्याने अमेरिकेपासून  आपोआप दूर झाल्याचे  दिसून येते. भारताने अगदी महामारीच्या सुरुवातीपासून जगाला औषधीसाठा आणि कोरोना प्रतिबंधक मात्राचा तातडीने पुरवठा केला. हीच बाब भारताला जागतिक नेतृत्व प्रदान करू शकते, असे सांगण्यात येत आहे.


(सर्वाधिकार सुरक्षित)