Tuesday, 25 April 2023

आपल्याच जाळ्यात मानव

 माणसाच्या आधी निसर्ग अस्तित्वात आला. पाने, फुले, हवा, पाणी, पशु-पक्षी अशा  सर्व गोष्टी निसर्गानेच बहाल केल्या.  माणूस स्वार्थी झाला आणि त्याच्या कार्यकक्षेत  नको तिकी ढवळाढवळ करायला सुरुवात केली. त्यामुळे जंगल, जमीन, पाणी, हवा अशा सर्व घटकांचे नुकसान केले. पाणी हे  सर्वात मोठे उदाहरण सांगता येईल. त्यामुळे जलप्रदूषण ही आज मानवाच्या अस्तित्वाची मोठी समस्या बनवली आहे. 

संपूर्ण जगात  काही आजार, रस्ते अपघात यांमध्ये मृत्युमुखी पडणाºया लोकांपेक्षा अधिक मृत्यू हे प्रदूषित पाण्यामुळे होत असल्याचे संशोधक वारंवार सांगत असतात. संपूर्ण जगभरात कोट्यवधी लोक आजही दूषित पाणी पितात. पाण्यात अनेक प्रकारची खनिजे, वायू मिसळलेले असतात. पाण्यात हे सर्व पदार्थ अतिप्रमाणात  एकत्र मिसळले गेल्यानो ते प्रदूषित होते आणि मानवच काय  वन्यजीव-प्राण्यांच्याही आरोग्यास हानिकारक बनले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार भारतातही मोठ्या लोकसंख्येला स्वच्छ पाणी उपलब्ध होऊ शकत नाही. विशेष म्हणजे ही आकडेवारी शहरी लोकांची आहे. गावखेड्यातील लोकसंख्येच्या बाबतीत सांगायचे तर खेड्यांमध्ये आजही दूषित पाणी पित असल्याचे वारंवार दिसून येते. परिणामी ग्रामीण क्षेत्रात पाण्यामुळे होणारे आजारांचे प्रमाणही अधिक आहे. 


संयुक्त राष्ट्रानुसार, आशिया, लॅटिन अमेरिका आणि आफ्रिका या देशांमध्ये प्रत्येक वर्षी ३५ लाख लोकांचा मृत्यू पाण्यामुळे होणाºया विविध आजारांमुळे होतो. प्रदूषित किंवा घाण पाणी प्यायल्याने प्रत्येक वर्षी जगात ८ लाख ४२ हजार लोकांचा मृत्यू होतो.लोकांना स्वच्छ पाणी आणि स्वच्छतागृहांच्या योग्य पातळीवरील सुविधा उपलब्ध करून दिल्यास संपूर्ण जगात पाण्यामुळे होणाºया आजारांच्या उपचारांवर देशांचा होणारा खर्च नऊ टक्क्यांनी कमी करता येऊ शकतो. भारताशिवाय असे ३२ देश आहेत, जिथे पाण्यामुळे होणाºया आजारांची संख्या अधिक आहे. या सर्व देशांमध्ये स्वच्छतेच्या सोयी आणि स्वच्छ पाणी उपलब्ध करून दिल्यास आजार आणि त्यासंबंधी गोष्टींवर होणारा खर्च कमी होईल, असेही युनोने म्हटले आहे.

प्रदूषित पाणी हे मानवासाठी विषासारखेच आहे. जगभरात मोठ्या प्रमाणातील आजारांसाठी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या प्रदूषित पाणी हेच कारण आहे. प्रदूषित पाण्यात अनेक रोगकारक जीवाणू, विषाणू असल्याने या पाण्यामुळे रोगांचा फैलाव होतो. अशा पाण्यात फ्लोराईडचे प्रमाण अधिक असल्याने मणक्याचे हाडही वाकडे होण्याचा धोका असतो, असे तज्ज्ञ सांगतात.

मानवाच्या हाती विज्ञानाचे कोलीत लागले आणि विविध रसायनांचा शोध लावण्यात आला. पिकांवर रसायनिक द्रव्ये फवारण्यात येऊ लागली. पिकांच्या वाढीसाठी जमिनीत रासायनिक खते जवळजवळ पेरण्यात आली़ अतिरेक वाढल्याने ती नापिक बनली़ तर, तिच्यातील अर्क पाण्यात उतरला़ प्रवाहित होऊन नाले-ओढे प्रदूषित झाले आणि पुढे नद्या. त्यातील पाणी घरोघरी पोहोचले.

शहरातील घरांघरातील सांडपाणी जाणीवपूर्वक लहान मोठ्या नद्यांत सोडण्यात आले़ रासायनिकसारख्या तत्सम हजारो कारखान्यांतील दूषित घटके नद्यांत सोडण्यात आली़ त्यामुळे प्रत्येकाच्या घरात दूषित पाणी आपोआप पोहोचले. 

जगातील कोणताही देश असो वा कोणत्याही देशातील एखादे शहर असो, ही समस्या मानवानेच तयार केली आहे़ पृथ्वीवरील पाण्याचा प्रत्येक स्रोत दूषित करण्यात आला आहे़ ही बाब नाकारता येणार नाही़ निसर्गाने प्रदान केलेल्या खळखळत्या नद्यांना अवरुद्ध करून त्यांच्या विदू्रपीकरणाचा मोठा खेळ अख्ख्या मानवजातीने खेळला़ आता निसर्ग त्याला आपल्या बोटावर नाचवत आहे.

Tuesday, 18 April 2023

प्रत्येक जण मृत्यूच्या दाढेत

 आज मंगळवारी नागपूरवासीयांसाठी  दु:खाचा ठरला़ बुलढाणा जिल्ह्यातून जाणाºया समृद्धी महामार्गावर भीषण अपघात अपघातात भारतीय क्रिकेट खेळाडू प्रवीण हिंगणीकर यांच्या पत्नी सुवर्णा यांचा मृत्यू झाला. तर, ते स्वत: जखमी झाले. मेहकरजवळच्या लासुरा फाट्याजवळ क्रेटा गाडी उभ्या असलेल्या कंटेनरवर धडकली. कार चालकाला  झोपेची डुलकी लागल्यामुळे हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती  मिळत आहे. तपासानंतर दुर्घटनेचे कारण बाहेर येईलच.


 सर्व काही सुरळीत सुरू असताना कुणाच्या तरी चुकीने आयुष्याचा अंत होतो़ ही बाब स्वीकारण्याजोगी नाहीच़ सध्या   मानवजात नको तितकी ‘फास्ट’झाली आहे़ सर्व गोष्टी चुटक्यासरशी व्हाव्यात अशी ज्याची त्याची उपेक्षा असते आणि त्यासाठी त्याची कोणत्याही परिणामाची तयारी असते. मग निसर्गनिर्मित असो वा मानवनिर्मित असो नियमांना पायदळी तुडविणे, हे फार शहाणपणाचे समजतो, मग त्यात प्राण गेला तरी बेहत्तर! असंच काहीसं सध्या होत आहे़ वाहनातून इच्छितस्थळी पोहोचण्यासाठी हा मानव पार नियम तोडत आहे आणि पदरी मात्र अपघाती मृत्यू ओढवून घेतोय. 

 देशातील प्रत्येक मार्गावर अपघात होत आहेत़  रस्ता एकपदरी असो वा सहापदरी कोणताही जीव त्यावर सुरक्षित नाही़ कोणताही चांगला मार्ग वाहनांच्या सुरक्षित वेग ासाठी आणि प्रवासाचा वेळ कमी होण्यासाठी असला तरी वाहनांची वाहतूक अधिक सुरळीत व्हावी, सुरक्षित व्हावी,हाही त्यामागील हेतू आहे. यापैकी अतिवेगाचा हेतू तर साध्य झाला;परंतु सुरक्षित आणि सुरळीत वाहतुकीचा हेतू साध्य झालेला आहे, असे काही ठाम म्हणता येणार नाही. कारण रस्तोरस्ती अजूनही अपघातांची मालिका दिसून येते़  भारतात रस्ते अपघातांचे प्रमाण मोठे आहेच; परंतु सहापदरी आणि चारपदरी अशा अधिक रुंदीच्या मार्गांवरही असे अपघात वारंवार व्हावेत,हे मोठे दुर्दैव आहे.

      अपघातांच्या मागे केवळ रस्ते हे एकमेव कारण नसते. मानवी चुकाही अपघातास कारणीभूत ठरत असतात. रस्ता कितीही सुरक्षित असला तरी तेवढे पुरेसे नाही. रस्त्यावरून जाणाºया वाहनांमध्ये किती प्रवासी कोंबावेत, वाहनचालकाने सलग किती तास ‘ड्रायव्हिंग’ करावी आणि वाहनाचा वेग किती असावा यावर सरकारने लक्ष ठेवावे,असे म्हणणे मूर्खपणाचे ठरेल.म्हणजेच अपघातांना इतर कारणांपेक्षा मानवी चुका अधिक कारणीभूत असल्याचे लक्षात येते. या चुकांची साखळी वाहतुकीची परवाने देण्यापासून सुरू होते, तिथून ती अतिवेगाने वाहने चालवण्याची प्रवृत्तीपर्यंत संपते. 

अगदी  बनावट परवाधारक चालकापासून वळणावर वाहन असताना मोबाईलवर बोलण्यापर्यंतची साखळी अपघाताला कारणीभूत ठरली आहे, व्यवस्थित परवाने न दिलेले हे वाहक वाहतुकीच्या नियमांबाबत कधीच दक्ष नसतात. उलट आपण वाहतुकीचे नियम डावलून हमखास वाहतूक केली पाहिजे,याबाबत ते गरजेपेक्षा जास्त दक्ष असतात. त्यामुळे वेगाची मर्यादा न पाळणे, टोलनाक्यावर भरधाव गाडी ‘लेन’ तोडून दुसºया ‘लेन’मध्ये घेणे अशा प्रकारातून ते अपघातास कारणीभूत ठरतात. भारतात रस्ते अपघातात मरणाºयांची संख्या मोठी आहे आणि त्यावरून भारतीय किती बेशस्त आहेत, यावर प्रकाश पडत असतो. या बेशिस्तीमध्ये बेफाम वेगाने गाड्या चालवणे,‘ओव्हरटेक’ करण्याची चुकीची पद्धत आदी बाबी प्रामुख्याने आढळतात.अनेकदा प्रवासीही चालकाला गाडी वेगाने चालवण्याबाबत प्रोत्साहित करत असतात. अशाप्रकारामुळे वेगाची ‘झिंग’ पूर्ण होत असली तरी हा आपल्या आणि वाहकाच्या जीवाशी खेळ असतो, ही जाणीव त्यांना नसते. भारतात वाहनांची संख्या वाढत आहे.  रस्ते  आहेत  तेवढेच  आहेत आणि वाहतूक नियमांबाबतची बेफिकीरी वाढत आहे. त्यामुळे  ‘सुरक्षित वाहतूक’ हे आव्हान समाजासमोर दिवसांगणिक बिकट होत चालले आहे.

Ⓒ SANJAY MUNDALKAR

Monday, 10 April 2023

शंभरीत पंच्चाहत्तरी

 भारतीय चित्रपटसृष्टीत मागील ७५  वर्षांत एवढा बदल झाला आहे की तो मोजक्या शब्दांत मांडणे कठीण आहे. यासोबतच हेही खरे आहे की, भारतीय  चित्रपट देशातील  प्रत्येक व्यक्तीच्या मनाला स्पर्श करतो, त्याच्या समस्यांपासून ते नातेसंबंध आणि यश-अपयश या सर्व गोष्टी चित्रपटांमध्ये पाहायला मिळतात. आता विदेशातही भारतीय चित्रपटांना एक खास ओळख  मिळत आहे. 

कॅनडा, जपान आणि चीनसारख्या देशांमध्ये भारतीय चित्रपटांची मोठी कमाई होत आहे. त्याचबरोबर कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्येही भारतीय चित्रपटांचा बोलबाला आहे. मागील दिवसांत ‘आरआरआर’ ने केलेली  मोठी कमाल  जगाने अनुभवली आहे.

अनेक लेखकांनी स्वातंत्र्यानंतरच्या हिंदी चित्रपटांबद्दल बरेच काही सांगितले आहे. स्वातंत्र्यानंतरच्या काही दशकांत हिंदी चित्रपटसृष्टीवर  नेहरूवादी  समाजवादाचा प्रभाव दिसून आला. 

तथापि, या काळात बनवलेले  काही महत्त्वाचे चित्रपट, जसे राज कपूरचा आवारा (१९५१), बिमल रॉयचा दो बिघा जमीन (१९५३), मेहबूब खानचा मदर इंडिया (१९५७) आणि गुरू दत्तचा प्यासा (१९५७) या चित्रपटांचे बारकाईने परीक्षण केल्यास हे स्पष्ट होते, की त्या काळातील हिंदी चित्रपट नेहमीच नेहरूंच्या भारताच्या दृष्टीकोनाशी सुसंगत नव्हते. हेही खरे आहे की, अंदाज, नया दौर, हावडा ब्रिज यांसारखे तत्कालिन  चित्रपट नेहरूंच्या आधुनिक भारताच्या आदर्शाचे, आधुनिकतेच्या चांगल्या बाजू चित्रित करण्यात यशस्वी ठरले. देशाचा विकास डॉक्टर, अभियंता आदींच्या पात्रांच्या माध्यमातून दाखवला जातो आणि जुगार खेळणाºयांची पात्रे आणि दृश्ये, कॅबरे डान्स इत्यादींच्या माध्यमातून वाईट बाजू दाखवली जाते.  या दोन्ही बाबी समाजावर खोलवर परिणामकारक ठरल्या आहेत.



याशिवाय  देशातील  चित्रपटनिर्मितीवर काही महत्त्वाच्या घटनांचाही परिणाम झाला. भारत-चीन युद्धातील वेदनादायक सत्यता, १९६०च्या दशकातील हरित क्रांती, आणीबाणी  आदी ऐतिहासिक घटनांना हिंदी चित्रपटसृष्टी चुकली नाही. यानंतरच्या काळातील वाढलेली   लोकसंख्या आणि बेरोजगारी हा मुद्दा सुद्धा चित्रपटांत दिसून आला. १९८० च्या दशकात खलिस्तान चळवळीचा प्रभाव सुद्धा पाहावयास मिळाला. नव्वदच्या दशकापासून मात्र चित्रपटक्षेत्राच्या व्यापारीकरणाची प्रक्रिया सुरू झाल्याचे पाहायला मिळते. पी.व्ही. नरसिंह राव पंतप्रधान असताना त्यांनी जागतिकीकरणासह आर्थिक उदारीकरणाच्या नव्या युगाची सुरुवात केली. ही बाब चित्रपटक्षेत्रालाही लागू झाली.

मिस्टर इंडिया, तेजाब, कयामत से कयामत तक, मैने प्यार किया,  खिलाडी यासारख्या चित्रपटांच्या व्यावसायिक दृष्टीकोनाने हिंदी  चित्रपटसृष्टी  अधिक मजबूत झाली. २१व्या शतकाच्या  वळणावर   प्रामुख्याने  गुन्हेगारी पात्रे आणि  समाजाची  काळी  बाजू  दाखवण्यात आली होती. तर, २००० सालानंतर चित्रपटांनी नवे रूप स्वीकारल्याचे आपणांस दिसून आले. पुढील दिवसांत १०० कोटींच्या क्लबमध्ये सामील होण्याची शर्यत सुरू झाली आणि त्यावरच हिंदी चित्रपटाचे यश अवलंबून दिसून आले.

आज  हिंदी  चित्रपटांचा प्रवास वेब आणि ओटीटी प्लॅटफॉर्म पर्यंत पोहोचला आहे. यातून चित्रपट निर्मात्यांना प्रेक्षकांच्या आवडीनुसार वेगवेगळ्या प्रकारच्या  वेबसिरीज आणि चित्रपटांची निर्मिती करावी लागत आहे. कोरोना महामारीच्या काळाने तर प्लॅटफॉर्मला आणखी चालना दिली आहे. चित्रपटगृहे अनिश्चित काळासाठी बंद झाल्यामुळे प्रेक्षकांचे मनोरंजन येथूनच होऊ लागले. अनेक वर्षे  चित्रपटाचा पडदा गरीब टेलिव्हिजनला हसत होता़ आता ओटीटीने रुपेरी पडद्याला मात्र जोरदार टक्कर दिल्याचे म्हणता येईल.


@ sanjay mundalkar

Wednesday, 5 April 2023

लहान थोर भारतीयाच्या अंगावर मूठभर मांस चढण्यासारखे ... भारताने आपल्या स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांत प्रत्येक क्षेत्रात अगणित कामगिरी केली आहे. समाजजीवन असो वा अर्थव्यवस्था, शिक्षण असो वा आरोग्य, पृथ्वी, जल असो वा आकाश असो, संरक्षण क्षेत्र असो, सर्वत्र भारताचा तिरंगा फडकवला गेला आहे.

 भारताने आपल्या स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांत  प्रत्येक क्षेत्रात अगणित कामगिरी केली आहे. समाजजीवन असो वा अर्थव्यवस्था, शिक्षण असो वा आरोग्य, पृथ्वी, जल असो वा आकाश असो, संरक्षण क्षेत्र असो, सर्वत्र भारताचा तिरंगा फडकवला गेला आहे. 






देशाच्या विकासाच्या प्रवासात काही गोष्टी मैलाचे दगड ठरल्या आहेत, कृषी क्षेत्रापासून, आण्विक आणि अवकाश तंत्रज्ञानापर्यंत, सामान्य माणसाला उपलब्ध असलेल्या आरोग्यसेवांपासून, जागतिक दर्जाच्या शैक्षणिक संस्थांपर्यंत, वैद्यकीय शास्त्रापासून आयुर्वेदापर्यंत आणि उपचाराच्या विविध पद्धती, जैवतंत्रज्ञानापासून, जगात सक्षम आयटीपर्यंत. पॉवरहाऊस म्हणून, जगातील तिसरी सर्वात मोठी स्टार्टअप इकोसिस्टम तयार करण्यासाठी जगातील सर्वात वेगाने वाढणाºया प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी एक असल्याने, भारताने मोठा बदल पाहिला आहे. आपली लोकशाही राज्यघटनेवर आधारित आहे़ याच कारणामुळे जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून आपण जागतिक स्तरावर नावलौकिक  निर्माण केला आहे. स्वातंत्र्यानंतर देशाच्या पुनर्विकासात एकापाठोपाठ एक अनेक पंचवार्षिक योजना आल्या आणि या योजनांनी महत्त्वाचा पाया म्हणून काम केले आहे. आजपर्यंत देशात जितक्या वेळा लोकसभा निवडणूक झाल्या, तितक्या वेळा देशातील लोकशाहीही मजबूत झाली आहे आणि विविध आव्हानांना तोंड द्यायलाही ती शिकली आहे. 

 हरितक्रांतीमुळे देशातील तृणधान्यांच्या उत्पादनात (विशेषत: गहू आणि धानाच्या उत्पादनात) अभूतपूर्व वाढ झाली. आज भारताकडे धान्याचा अतिरिक्त साठा आहे, जो स्वत:च्या गरजा पूर्ण करतो तसेच मित्र आणि गरजू देशांना मदत करतो. अंतराळ क्षेत्रात भारताच्या प्रवेशामागे डॉ. विक्रम साराभाई यांच्यासारख्या महान शास्त्रज्ञाची ऊर्जा आणि क्षमता होती. इस्रोच्या स्थापनेचा उद्देश अंतराळ विकासाच्या क्षेत्रात तंत्रज्ञानाचा विकास तसेच अवकाश विज्ञान आणि ग्रह संशोधनातील संशोधन तसेच राष्ट्राच्या विकासासाठी होता. भारत आता चंद्र आणि मंगळ मोहिमांवर लक्ष केंद्रित करत आहे. याशिवाय दुग्ध उत्पादनाच्या क्षेत्रात भारताला जमिनीपासून आकाशापर्यंत नेणारा हा जगातील सर्वात मोठा दुग्धविकास कार्यक्रम होता. 

भारताने १८ मे  १९७४ रोजी पोखरण येथे पहिली अणुचाचणी करून आपल्या क्षमतेची ओळख जगाला करून दिली होती. २४ वर्षांनंतर ११ आणि १३  मे १९९८ रोजी एकामागून एक अशा पाच अणुचाचण्या घेतल्या. भारत आजच्या घडीला प्रत्येक  क्षेत्रात स्वयंपूर्ण झाला आहे़ अन्नधान्य उत्पादन, माहिती  तंत्रज्ञान, दूरसंचार, आरोग्य, संरक्षण, दळणवळण, अंतराळ संशोधन यासारख्या  प्रत्येक महत्त्वाच्या क्षेत्रात अभूतपूर्व यश मिळविले.

मागील ७५ वर्षांत अनेक राजकीय पक्षांची सरकारे आली; परंतु विकासाचा, संपन्नतेचा प्रवाह अखंड राहिला़ जगातील सर्वांत मोठी लोकसंख्या आणि सर्वांत मोठी लोकशाही प्रणालीचा मान भारताला मिळाला आहे आणि तो मान फक्त आणि फक्त भारतच सांभाळू शकतो.

दोन वर्षांअगोदर कोरोना महामारीच्या काळात भारताने अमेरिकासह लहान मोठ्या देशांना औषधींचा पुरवठा केला़ तर, नंतरच्या काळात युद्धस्तरावर कोरोना प्रतिबंधक लसींचे संशोधन आणि मोठ्या प्रमाणात उत्पादन करून संपूर्ण देशाचे लसीकरण करवून आणले़ ही जगातील सर्वांत मोठी लसीकरण मोहीम होती़ त्याचवेळी भारताने आपली गरज भागवून अन्य देशांना ही लस उपलब्ध करून दिली़ शिवाय ‘प्रथम शेजारी’ ही संवेदनात्मक भूमिकाही मोठ्या  बंधुच्या रूपात पार  पाडली. भारताच्या आजपर्यंत प्रत्येक सकारात्मक भूमिकांचे आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठे कौतुक झाले आहे, हेही लहान थोर भारतीयाच्या अंगावर मूठभर मांस  चढण्यासारखे आहे, असे आम्ही मानतो.

संजय मुंदलकर

सर्वाधिकार सुरक्षित