परवेझ मुशर्रफांना काळाकडूनच शिक्षा!
पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष जनरल परवेझ मुशर्रफ यांना मंगळवारी (१७ डिसेंबर २०१९) इस्लामाबादच्या विशेष न्यायालयाने देशद्रोहाच्या आरोपात मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. या खटल्याची सुनावणी पेशावर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती वकार अहमद सेठ यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय खंडपीठाने केली. परवेझ यांनी ३ नोव्हेंंबर २००७ रोजी देशात आणीबाणी जाहीर केली होती. याप्रकरणी त्यांच्यावर डिसेंबर २०१३ मध्ये देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला होता, तर ३१ मार्च २०१४ रोजी त्यांना दोषी ठरवण्यात आले होते. दरम्यान, मुशर्रफ मार्च २०१६ पासून उपचारांसाठी दुबईमध्ये आहेत. सुरक्षा आणि प्रकृतीचे कारण पुढे ते पाकिस्तानात परतलेले नाहीत. याआधी तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने १७ डिसेंबर रोजी निकाल जाहीर होणार असल्याचे जाहीर केले होते. इस्लामाबाद उच्च न्यायालयाने मुशर्रफ आणि पाकिस्तान सरकारने दाखल केलेल्या याचिकांवर सुनावणी करताना विशेष न्यायालयाला २८ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर करण्यापासून रोखले होते.आजारपणाचे कारण...
मागील आठवड्यात एका विशेष न्यायालयाने मुशर्रफ यांना देशद्रोहाप्रकरणी ५ डिसेंबर रोजी जबाब नोंदवण्यास सांगितले होते. मुशर्रफ यांना विशेष न्यायालयासह उच्च न्यायालयाने सुद्धा वेळोवेळी समन्स बजावले आहेत. मात्र, प्रत्येक वेळी आजारपणाचे कारण देत त्यांनी पाकिस्तानात येणे टाळले. कारण त्यांना सरकारकडून अटकेची भीती वाटत होती. रुग्णालयातील अंथरुणाशी खिळलेल्या मुशर्रफ यांचा एक व्हिडिओ नुकताच समोर आला आहे. देशद्रोहाच्या खटल्यात काहीच तथ्य नाहीत. मी आपल्या देशाची नेहमीच सेवा केली आहे. कित्येकवेळा पाकिस्तानसाठी युद्ध लढवले आहेत. १० वर्षांची सेवा दिली असताना आता माझ्याविरोधात भयानक असा खटला चालवण्यात येत आहे. माझे काहीच ऐकून घेतले जात नाही. चौकशी समित्या अवश्य बनवा; परंतु न्यायालयाच्या प्रतिनिधींनी एकदा येऊन माझी प्रकृती पाहावी. माझा जबाब नोंदवावा, त्यानंतरच कारवाई करावी. या चौकशी समितीचे न्यायालयाने ऐकायला हवे. मला न्याय मिळेल अशी अपेक्षा ठेवतो, असे सदर व्हिडिओत म्हटले होते. दरम्यान, पाकिस्तानच्या इतिहासातील असे पहिले प्रकरण आहे की ज्यात एखाद्या माजी लष्करप्रमुखावर देशद्रोहाच्या आरोपात खटला चालवण्यात आला.पाकिस्तानमध्ये सैन्य आणि सरकार यांच्यात सुसंवादापेक्षा संघर्ष आणि सत्तापलट हा किस्सा फार जुना आहे. त्याचमुळे त्या देशात लोकशाही, स्थिरता, विरोधी पक्ष आणि स्थिर सरकार यासारखे शब्द क्वचितच ऐकू येतात. १२ आॅक्टोबर १९९९ या दिवशी तत्कालीन लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांनी पंतप्रधान नवाज शरीफ यांचे सरकार उलथून टाकून सत्ता हाती घेतली होती़ अगदी बेसावधपणे नवाज यांचा केसाने गळा कापण्यात आला होता. १९९९ च्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये नवाज शरीफ यांनी विजय मिळवला आणि पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारला. आपल्या सत्ताकाळात त्यांनी जनरल परवेझ मुशर्रफ यांना लष्करप्रमुख म्हणून नियुक्त केले. मुशर्रफांचा तसा डोळा तर पाकिस्तानची सत्ता बळकावण्याचाच होता. जनरल मुशर्रफ श्रीलंका दौºयावर असताना पंतप्रधान शरीफ यांनी संशयावरून परवेझ यांना पदावरून काढून टाकले आणि त्यांच्या जागी जनरल अजिज यांची लष्करप्रमुख म्हणून नियुक्त केली. मात्र, नवाज यांनी येथेच चूक केली. त्यांची नवी निवड विश्वासयोग्य नव्हती़ त्यांना समजून आले नाही की जनरल अजिज हे मुळातच परवेझ मुशर्रफ यांचे निष्ठावंत आणि विश्वासू आहेत. या घडामोडीनंतर
श्रीलंकेहून परत आल्या आल्या जनरल परवेझ मुशर्रफ यांनी अजिज यांच्या मदतीने नवाज शरीफ यांचे सरकार उलथून टाकले. इतकेच नव्हे नवाज शरीफ यांच्यासह त्यांच्या मंत्र्यांना अटक करून तुरुंगात पाठवले आणि स्वत: ला लष्करी शासक म्हणून घोषित केले. यानंतर मुशर्रफ यांनी स्वत: ला राष्ट्रपतिपदी नेमून घेतले होते.
कारगिल युद्धाचे मास्टरमार्इंड
यंदा २६ जुलै २०१९ रोजी कारगिल युद्धाने दोन दशक म्हणजे वीस वर्षे पूर्ण केली़ पाकिस्तानच्या ‘आॅपरेशन कोह-ए-पैमा’ ला भारतीय जवानांनी ‘आॅपरेशन विजय’ ने उद्धवस्त केले होते. (दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात) मात्र, मे - जुलै १९९९ मधील या युद्धामागे मास्टरमार्इंड म्हणून तत्कालीन लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ हेच होते. ही बाब काही वर्षांनंतर नवाज शरीफ यांनी कबूल केली होती. आपणास यातील काहीही माहिती नव्हते, अशी बाजूही यावेळी स्पष्ट केली. मुशर्रफ हे मुळातच अन्य एक लष्करशहा झिया उल हक यांचा वारसा चालवत होते. कारण कारगिल भागात घुसखोरी करण्याची योजना पाकिस्तान लष्कराचे जनरल झिया उल हक यांच्या काळापासून बनवली जात होती; परंतु अफगाण युद्धामध्ये जनरल झिया सोव्हिएत सैन्याच्या विरोधात अडकल्यामुळे पाकिस्तानच्या सैन्याने झियाच्या काळात कारगिल हल्ल्याची योजना टाळली होती. बेनझीर भुट्टो पुन्हा सन १९९३ ते १९९६ या काळात सत्तेत असतानाही पाकिस्तान सैन्याने कारगिलमध्ये घुसखोरी करून काश्मीर खोºयापासून लडाख वेगळा करण्याची योजना आखली होती. ही योजना मंजुरीसाठी दिवंगत पंतप्रधान बेनझीर भुट्टो यांच्यासमोर ठेवण्यात आली, तेव्हा त्यांनी ती फे टाळून लावली होती. कारगिल युद्धानंतरच पाकिस्तानात राजकीय आणि आर्थिक अस्थिता निर्माण झाल्याचे पाहून आणि नवाज शरीफांनी आपल्याला पदावरून हटवल्याने मुशर्रफांनी त्यांचे सरकार उलथवून लावले होते.भारताविरोधी कारवायांची कबुली
परवेझ मुशर्रफ यांनी मागील नोव्हेंबर महिन्यात एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत काही धक्कादायक गोष्टी कबूल केल्या होत्या. काश्मिरींना काश्मीरमधील भारतीय सैन्याविरुद्ध लढण्यासाठी पाकिस्तानमध्ये प्रशिक्षण देण्यात आले. ओसामा बिन लादेन आणि जलालुद्दीन हक्कानीसारखे दहशतवादी पाकिस्तानी सैन्याचे नायक होते, असे मुशर्रफ त्यावेळी म्हणाले होते. आम्ही सोव्हिएतला हाकलून लावण्यासाठी पाकिस्तानच्या बाजूने येथे एक धार्मिक दहशतवाद आणला. जगभरातून मुजाहिदीन आणले, आम्ही तालिबान्यांना प्रशिक्षण दिले़ शस्त्रे दिली आणि त्यांना भारताविरोधात लढावयास पाठवले, असेही खुलेआम सांगितले होते.त्यावेळी काळ मुशर्रफांच्या बाजूने होता़ त्यानुसार हाती सत्ता असल्याने त्यांनी लष्करप्रमुखपद, लष्करी शासक म्हणून स्वयंघोषितपद आणि त्यानंतर राष्ट्रपतीपदही उपभोगले. भारताविरोधात युद्धही केले. काळ त्यावेळी त्यांच्या अवतीभवती फिरत होता़ आमा मात्र तो बदलत आहे आणि या काळानेच त्यांना योग्य ती शिक्षा दिली, असे म्हणता येईल़ त्याचवेळी पाकिस्तानच्या सर्वाेच्च न्यायालयाने लष्करीशहांनाही चक्क इशारा दिला आहे. कारण विद्यमान पंतप्रधान इमरान खान यांच्यावर सुद्धा लष्कर दबाव टाकत असल्याची टीका काही दिवसांपूर्वी विरोधीपक्षांनी केली होती़ आता लष्कराच्या मदतीने देशातील लोकशाहीची गळचेपी करून घटनाविरोधात काम करणाºयांना हज्जारदा विचार करावा लागेल.
© संजय इस्तारी मुंदलकर