आशादायी रामेश्वरी
आंध्र प्रदेशच्या काकीनाडा येथे जन्मलेल्या तल्लूरी रामेश्वरी हिंदी चित्रपटात ‘रामेश्वरी’ म्हणून ओळखल्या जातात. ‘दुल्हन वही जो पिया मन भाये’ (सन १९७७) या पहिल्या चित्रपटाने मोठी लोकप्रियता मिळवली. राजश्री प्रॉडक्शनच्या या चित्रपटात रामेश्वरीने कम्मोची भूमिका साकारली होती. चित्रपटाने देशभरातील चित्रपटगृहात रौप्य महोत्सव आणि सुवर्ण महोत्सव साजरा केला. यासह रामेश्वरी एका रात्रीतून स्टार बनल्या. चित्रपटाची कथा लोकांच्या अगदी आसपास घडणारी होती. कथेतील पात्रे देखील सामान्य लोकांतून घेतली गेली आहेत असे दिसून येते.
मदन पुरी, प्रेम किशन, इफ्तिखार, शशी कला, श्यामली, शिवराज, सुंदर, लीला मिश्रा, सविता बजाज, पिलू वाडिया, विजू खोटे आणि जगदीप यांनी भूमिका साकारल्या होत्या. गाणे आणि रवींद्र जैन यांचे संगीतही मधुर आणि मधुरच...
सन १९७० च्या दशकातही, सावळ्या रंगाच्या मुलींना ‘स्टार मटेरियल’ मानलं जात नव्हतं. तथापि, जया भादुरीनं लहान वयात यश संपादन केल्याचा अनुभव प्रेक्षकांनी घेतला होता. रामेश्वरीने हिंदी चित्रपट क्षेत्रात करिअरची सुरुवात केली तेव्हा जया भादुरी-बच्चन यांनी अमिताभ बच्चन यांच्याशी लग्न करून स्वत: ला अभिनयापासून दूर केले होते. अशा परिस्थितीत प्रेक्षकांना रामेश्वरीत जया बच्चनची प्रतिमा दिसू लागली, असेही काहीजण सांगतात.
रामेश्वरी यांनी पूर्णपणे भारतीय सुसंस्कृत स्त्रीची प्रतिमा स्वीकारली. त्याच्यात दर्शकांना एक आदर्श मुलगी, एक आदर्श पत्नी आणि आदर्श सून अशी प्रतिमा दिसू लागली होती. नशिबाने मात्र फार काळ साथ दिली नाही. एका चित्रपटाच्या छायाचित्रणादरम्यान डोळ्याला दुखापत झाली. यात एका डोळ्याचा आकार बदलला. या अपघाताने त्याच्या कारकिर्दीला ग्रहणच लागले. त्यांना चित्रपट मिळणे बंद झाले. मिळणाºया भूमिका सह अभिनेत्री म्हणून होत्या. मात्र, दुसरा मार्ग नव्हता. रामेश्वरीने परिस्थितीशी तडजोड करत मिळेल त्या भूमिका साकारण्यास सुरुवात केली. यात ‘आशा’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते.
रामेश्वरी यांनी तेलुगु चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. निर्माता के. विश्वनाथ यांचा १९७८ साली प्रदर्शित झालेला चित्रपट ‘सीतालक्ष्मी’ हा त्यांच्या कारकिर्दीचा क्लासिक चित्रपट मानला जातो. याशिवाय त्यांनी चिन्नो पेडडुडू, निझाम, नंदनवनम या तेलुगु चित्रपटांमध्येही आपली प्रतिभा दाखवली. ‘चिन्नो पेडडडू’ साठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा नंदी पुरस्कार देण्यात आला. लहान पडद्यावरील कैरी, मितवा, फूल कमल के, जब लव लव, बाबुल का आंगन छोटा ना, पडोसी आणि चमत्कार आदी मालिकांतही अभिनय साकारला आहे.
रामेश्वरी यांनी वर्गमित्र आणि पंजाबी चित्रपटांचे अभिनेता-निर्माता दीपक सेठ यांच्याशी लग्न केले. त्यांना भास्कर प्रताप आणि सूर्य प्रेम अशी दोन मुले आहेत. रामेश्वरी यांनी आपल्या पतीसमवेत १९८८ मध्ये ‘हम फरिश्ते नहीं’ ची निर्मिती केली. त्यात अभिनय देखील केला. २००७ मध्ये शेक्सपियरचे नाटक द कॉमेडी आॅफ एरर्स’ वर आधारित पंजाबी चित्रपट देखील बनवला होता.
अभिनयापासून दूर होण्याबद्दल रामेश्वरी म्हणतात, की चित्रपटांमधून निवृत्त झालेले नाही. अजूनही काम करण्याची आकांक्षा बाळगून आहे. निर्माता मला विसरले आहेत. चांगल्या अभिनयासाठी कोणत्याही औपचारिक प्रशिक्षणाची आवश्यक नसते, असा माझा विश्वास आहे. प्रतिभा ही नक्कीच जन्मजात असते. प्रशिक्षण एखाद्याची प्रतिभा वाढवू शकते, ती निर्माण करू शकत नाही.
काही प्रमुख चित्रपट
दुल्हन वही जो पिया मन भाये (१९७७), मेरा रक्षक (१९७८), सुनयना (१९७९), आशा (१९८०), मान अभिमान (१९८०), शारदा (१९८१), अग्निपरीक्षा (१९८१), आदत से मजबूर (१९८१),इकरार, ए न्यू हिस्ट्री, मान मर्यादा, भाई का दुश्मन भाई, प्यारी भाभी , हम फरिश्ते नहीं , कुछ तुम कहो कुछ हम कहें, बंटी आणि बबली. याशिवाय हिंदी आणि तेलगू व्यतिरिक्त मल्याळम, कन्नड, बंगाली, उडिया आणि भोजपुरी चित्रपटांमध्येही भूमिका केल्या आहेत.
लोकप्रिय गाणी
ले तो आये हमें सपनों की गाँव में, इन नजारों को तुम देखो, खुशियाँ हीखुशियाँ दामन में जिसके, ऐ मेरे उदास मन, जहाँ प्रेम का पावन दियारा जले, तुने मुझे बुलाया शेरावालीये आदी अनेक गाणी त्यांच्यावर चित्रित झालेली आहेत.
© संजय इस्तारी मुंदलकर
No comments:
Post a Comment