आता सर्वत्र एकच चर्चा सुरू झाली आहे़ ‘लॉकडाऊन’ ३ मे रोजी संपणार की वाढणार? सरकारचा निर्णय काय असेल? असे अनेक प्रश्न सर्वसामान्याच्या मनात उभे राहिले आहे़ कारण देशभरात कोरोना रुग्णांच्या तीव्रतेवरून रेड, आॅरेंज आणि ग्रीन असे विभाग पाडण्यात आले आहे़ त्यानुसार उपाययोजना, नियमांत शिथिलता देण्यात येत आहेत़ असे असले तरी रुग्णांची संख्या वाढतीवरच असल्याचे दिसून येते़ केंद्रीय आरोग्य खात्यानुसार, आज २५ एप्रिल २०२० रोजीच्या रात्री सव्वा दहावाजेपर्यंत भारतात २४ हजार ९४२ इतके कोरोना रुग्ण असून ७७९ जणांचा मृत्यू झाला आहे.
मागील सुमारे ३२ दिवसांपासून देशातील उद्योगधंदे, कारखाने, कंपन्यांतील उत्पादन बंद आहेत़ साहजिकच नोकरदारांच्या हाती, मजुरांच्या हाती किती प्रमाणात पैसा आहेत, याबाबत तेच स्वत: सांगू शकतील, अशी स्थिती निर्माण झाली आहे़ केंद्र आणि राज्य सरकारकडून अन्नधान्य स्वरुपात, लाभार्थ्यांना काही रकमेचा निधी पुरवण्यात आला आहे़ असे असले तरी प्रत्येकाची स्थिती बिकट असल्याचे दिसून येते़ अगदी कार्पाेरेट क्षेत्रातील कंपनी मालकापासून सर्वसामान्य मजुरांना एका रांगेत आणण्यात कोरोना विषाणू कमालीचा यशस्वी ठरला आहे, असे म्हटले वावगे ठरू नये़मूळ मुद्दा पुढील ३ मे रोजीचा ‘लॉकडाऊन’ संपल्यानंतरच्या दिवसांतील आहे. कोणत्याही कारखान्यातील उत्पादन तत्काळ बाजारात येऊन त्याची किमत वसूल होणार नाही. त्यासाठी काही वेळ, काळ जाऊ द्यावा लागणार आहे. घटलेला विकासदर स्थिरस्थावर होण्यास बराच कालावधी लागेल़ अशास्थितीत भारतीय अर्थव्यवस्थेची आर्थिक घडी बसवण्यात केवळ एकच आणि एकच क्षेत्र आपल्या हाती आहे. ते म्हणजे शेती. आता शेतीची पूर्णपणे ‘मना’पासून (कारण आपण शेतजमिनीला स्वार्थापायी दूर लोटले होते.) मशागत करून तिच्यातून उत्पादन घेणे एवढेच आपल्या हाती आहे़ ज्या काळ्यामातीपासून आपण मानवजात दिवसांगणिक दूर जात होतो, तिची सेवा करणे (शेती उत्पादन घेणे) अगदी कमीपणाचे समजत होतो, ती आता पुन्हा नव्याने फुलवावी लागणार आहे़ पूर्वीपेक्षा अधिक घाम गाळून ‘मोती’ पिकवावे लागणार आहे़ अधिक पैसा कमावण्याच्या स्वार्थापायी सुपीक जमीन मुद्दाम पडित पाडून तिच्यावर लोकवस्तीचे बिनकामाचे ले-आऊट पाडून ठेवलेत, मोठमोठ्या इमारती बांधून ठेवल्या (अनेक ठिकाणी कुणाचेही वास्तव्य नाही.)़ आता ती अगोदरची घमेंड, मस्ती सोडावी लागेल. उरलेल्या शेतजमिनी कसणेच आपल्या हाती आहे. तरच ती आपल्याला जिवंत राखण्यास पहिल्यापेक्षा अधिक मदत करेल. ही काळी मायच आपल्या भारत देशाची अर्थव्यवस्था तोलून धरेल, यात कुणाचेही दुमत असू नये.
पुढील काही दिवसांत खरीप हंगाम सुरू होईल़ कापूस, तूर, धान, ज्वारी, जवस, उडिद, मूग, मटकी, सोयाबीन, तीळ अशा पिकांचा हा हंगाम़ देशात या काळात अधिक पिकांची पेरणी केली जाते आणि उत्पादनही अगदी कमी काळात हाती येते़ यापैकी खाद्यतेलाची समस्या भागवणारे सोयाबीन आणि जवस, दाळपिके अर्थातच तूर, उडिद, मूग, मटकी, धान्याची गरज भागवणारी ज्वारी आणि नगदी पिके म्हणजे कापूस, तूर, सोयाबीन,ऊस आदींचा समावेश आहे. यापैकी कापूस, तूर वगळता इतर सर्व पिके कमी कालावधीत तयार होते. म्हणजे आपल्या सर्वांची अन्नाची गरज लवकर भागू शकते़ तर, कापूस आणि तूर पिकाच्या विक्रीतून नगदी पैसा हाती येतो़ शिवाय कापसाची निर्यातही करता येते़ उसापासून तयार होणारे उत्पादन हाती येण्यास बराच वेळ लागतो.
पाऊसही आपल्याच बाजूने
मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी ‘लॉकडाऊन’ मध्येही अतिशय आनंदाची बातमी आहे. यंदा मान्सून सामान्य असेल. सरासरीइतका पाऊस पडणार असून जून ते सप्टेंबर या काळात सरासरीच्या ९६ ते १०० टक्के पाऊस पडेल, असा मान्सूनचा पहिला दीर्घकालीन अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.आपल्या देशात सामान्यत: जून महिन्याच्या मध्यात मान्सूनची सुरुवात होते. आॅगस्ट महिन्याच्या शेवटी आणि सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला मान्सून परततो. यंदा पाऊसमान सामान्य राहण्याची शक्यता २१ टक्के, तर सामन्यापेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता २० टक्के असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. केरळमध्ये १ जूनपर्यंत पावसाचे आगमन होण्याची आशा आहे. चेन्नईत ४ जून, पणजीमध्ये ७ जून, हैदराबादमध्ये ८ जून, तसेच महाराष्ट्रातील पुणे आणि मुंबईत अनुक्रमे १० आणि ११ जूनपर्यंत दाखल होईल, असेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे या पावसामुळे रब्बी पिकांचे अर्थात गहू, हरभरा पिकांचेही भवितव्य शेतकºयांच्या हाती राहणार आहे.
उपासमारीचेही मोठे संकट
जगातील सर्व देशांनी धान्यउत्पादनाबाबत तातडीने उपाययोजना न केल्यास पुढील काही महिन्यात अनेक ठिकाणी उपासमारीचे गंभीर संकट निर्माण होऊ शकते, असा इशारा संयुक्त राष्ट्रांची एक शाखा असलेल्या विश्व खाद्य कार्यक्रम (डब्ल्यूएफपी) यांच्याकडून देण्यात आला आहे़ विश्व खाद्य कार्यक्रमानुसार, कोव्हिड-19 मुळे जगातील आर्थिक क्षेत्रात आलेल्या संकटामुळे यंदा जगात तीव्र खाद्य असुरक्षाचा सामना करणाºया लोकांची संख्या दुप्पट होऊ शकते.अर्थात या महामारीमुळे जगभरात २६.५ कोटी लोकांचा मृत्यू होऊ शकतो. जगात मागील वर्षातच खाद्य असुरक्षात वाढ होण्यास सुरुवात झाली होती. आता कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे ही परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते. ‘डब्ल्यूएफपी’च्या आकडेवारीनुसार, पोटभर जेवण न मिळणाºयांची संख्या २०२० मध्ये २६.५ कोटीपर्यंत चढू शकते, हीच संख्या मागील वर्षात १३.५ कोटी इतकी होती.जिनेव्हामध्ये आयोजित एका कार्यक्रमात विश्व खाद्य कार्यक्रमाचे मुख्य अर्थशास्त्रज्ञ तसेच संशोधन, मूल्यांकन आणि देखरेख विभागाचे प्रमुख आरिफ हुसेन यांनी सांगितले की, कोव्हिड-19 हे संकट, त्या लोकांसाठी अत्यंत विनाशकारी आहे, जे यापूर्वीपासूनच अन्नसंबंधी समस्यांनी घेरलेले आहेत.
कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या प्रसारावर नियंत्रण मिळवण्यासाठी लागू केलेल्या ‘लॉकडाऊन’मुळे जागतिक अर्थव्यवस्थेचे होणाºया नुकसानीबाबत जी-20 देशांनी म्हटले की, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खाद्य किंमतीची अस्थिरता थांबण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. विश्व खाद्य कार्यक्रम यांच्या वतीने २१ एप्रिल २०२० रोजी सादर केलेल्या चौथ्या वार्षिक जागतिक अहवालात नमूद केले की, यंदाच्या कोरोनो विषाणू संकट जगभर पसरण्यापूर्वीच मागील वर्षापासून खाद्य असुरक्षा संकट घोंगावत होते. सुमारे ५५ देशांमध्ये १३.५ कोटी यासंबंधीची आपत्कालिन स्थिती सहन करत होते. या जागतिक कारणामुळेही अन्नधान्याचे उत्पादन वाढवणे गरजेचे आहे, ही बाब लक्षात घ्यावी लागणार आहे.
मित्रांनो, मुळातच आपण कृषिदेशातील नागरिक़ माननिय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतीसंबंधी कामांना ‘लॉकडाऊन’पासून बंधनमुक्त ठेवले आहे़ त्यामुळे शेतीची कामे सुरू आहेत. ज्या कुणाकडे शेतजमीन आहे, त्यांनी आता पिकांच्या उत्पादनाचे नियोजन करावे़ या नंतरच्या काळात सरकारकडून आणखी काही दिशानिर्देश लागू होण्याची शक्यता आहे़ पिककर्जेही मिळतील़ त्यातूनही कामे करता येईल; परंतु त्याचवेळी पूरक पिकांच्या उत्पादनावरही
भर देणे अगदी काळाची गरज बनली आहे़ पशुपालन (याद्वारे दुग्धव्यवसाय),चारा पिकांची लागवड, शेळीमेंढीपालन,कोंबडी,बदकांचे पालन, अंडी व्यवसाय, नर्सरी, मत्स्यपालन, फुलांची शेती, पाण्याची सोय असल्यास फळपिकांचे उत्पादन करता येणे शक्य आहे़ यातून आपली आणि पर्यायाने देशाची आर्थिक स्थिती मूळपदावर आणण्यास आपण मोठी मदत करू शकतो.
© संजय इस्तारी मुंदलकर
No comments:
Post a Comment