उत्कंठापूर्ण श्रवणीय गाण्यांचा
दाता : पंचमदा
भारतीय गाण्यांमध्ये पाश्चिमात्य चालींचा वापर करण्याचे श्रेय राहुल देव बर्मन उपाख्य आर. डी. बर्मन अर्थात पंचमदांना दिले जाते. मात्र, त्यांनी आपल्या संगीतामध्ये भारतीय लोक संगीतालाही उत्तमप्रकारे सामावून घेतले आहे. यात त्यांनी बिहारमधील लोकसंगीताचा वापर त्यांनी केला आहे.
------------------------------------------------------------------------------------------------------------
पंचमदा अर्थात आर. डी. बर्मन किंवा राहुल बर्मन अशा नावांनी भारतीय संगीतक्षेत्रात ओळखले जाणारे महान संगीतकार. त्यांनी अनेक अविस्मरणीय गाणी आपल्या रसिकांवर उधळून लावली आणि भारतीय रसिकही तितक्याच उत्कंठेने तृप्त झाले.
भारतीय रसिक हा पूर्वापारच संगीताचा भोक्ता. संगीत कोणत्याही प्रकारातील असो, त्याला गोडव्याने ऐकले, तितक्याच तीव्रतेने प्रतिसाद दिला आणि उंच शिखरावर पोहोचवले. भारतीय संगीत उत्तुंग शिखरावर पोहोचवण्यात जसा रसिकांचा सहभाग आहे, तितकाच तो गीतकारांचा आणि संगीतकारांच्या श्रमाचा, साधनेचा, तल्लीनतेचा परिपाक आहे.
पंचमदांच्या एकूण ३३१ चित्रपटांच्या कारकिर्दीतील अनेक गाण्यांपैकी एक म्हणजे ‘तेरे बना जिंदगी से कोई शिकवा तो नहीं... ’(आँधी) हे होय. आर. डी. बर्मन यांचे हे अतिशय रोमँटिक गाणे आहे. संजीव कुमार आणि सुचित्रा सेन यांच्यावर चित्रित या गीताला ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांचा स्वर आहे. ‘घर आजा घर आयी बदरिया सावरिया...’(चित्रपट : छोटे नवाब) लता दीदी मंगेशकर यांनी गायिलेले गाणे शैलेंद्र यांनी लिहिले आहे. ‘चुनरी संभाल गोरी...’ (चित्रपट : बहारों के सपने)
भारतीय गाण्यांमध्ये पाश्चिमात्य चालींचा वापर करण्याचे श्रेय पंचमदांना दिले जाते. मात्र, त्यांनी आपल्या संगीतामध्ये भारतीय लोक संगीतालाही उत्तमप्रकारे सामावून घेतले आहे. यात त्यांनी बिहारमधील लोकसंगीताचा वापर त्यांनी केला आहे. मजरूह सुलतानपुरी यांनी लिहिलेले गाणे मन्ना डे आणि लता मंगेशकर यांनी गायिले आहे. ‘पल दो पल का साथ हमारा...’(द बर्निंग ट्रेन) धावत्या रेल्वेगाडीतील ही कव्वाली सर्वांचीच आवडती आहे. रोमांचक अशी ही कव्वाली मोहम्मद रफी आणि आशा भोसले यांनी गायिली आहे.
पंचमदांनी संगीतबद्ध केलेल्या ‘अमरप्रेम’ या चित्रपटातील ‘रैना बीती जाए...’ हे गाणे लता मंगेशकर यांनी गायिले आहे. वेगवेगळ्या पद्धतीचे संगीत आपण देऊ शकतो हे पंचमदांनी यातून सिद्ध केले आहे. ‘अ आ इ ई मास्टर जी की आ गई चिट्ठी...’ (किताब) चे गीतकार गुलजार आहेत आणि गायिका आहेत पद्मिनी कोल्हापुरे आणि शिवांगी कोल्हापुरे (श्रद्धा कपूरची आई). त्यावेळी दोघीही अगदी लहान होत्या. ‘कुछ तो लोग कहेंगे लोगों का काम है कहना...’(अमरप्रेम) आनंद बक्षींच्या शब्दांना पंचम यांनी सुंदर संगीत साज दिला . किशोरकुमार यांच्या आवाजामुळे त्याला वेगळी उंची मिळाली आहे. ‘मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है...’ (इजाजत) गुलजार यांच्या शब्दांना सुंदर चाल लावली आहे. आशा भोसले यांचा आवाज तर लाजवाबच. हरे रामा हरे कृष्णामधील ‘दम मारो दम...’ या गाण्यात पंचमदा यांनी तरुणवर्गाला चांगल्या पद्धतीने प्रतिनिधित्व दिल्याचे दिसून येते. ७० च्या दशकातील खुलेपणा या गाण्यात वापरला आहे. त्या काळात तरुणवर्गामध्ये होत असलेले बदल गाण्यात चित्रित केल्याचे दिसून येते. या गाण्याचे शब्द आनंद बक्षी यांचे आहेत. इजाजतमधील अन्य एक गीत ‘कतरा कतरा...’ गुलजार यांनीच लिहिले आहे. हे गाणं पंचमदांनी दोन वेगवेगळ्या ट्रॅक्सवर वेगवेगळ्या वेळी रेकॉर्ड केल्याचे सांगण्यात येते. हे दोन्ही ट्रॅक इतक्या बेमालूमरित्या एकमेकांमध्ये मिसळले आहेत, की संपूर्ण गीत एक स्वतंत्र भासते.
पंचमदांनी आपल्या गाण्यात वेगवेगळ्या थिम आणि संगीत वाद्यांचा उपयोग केल्याचे दिसून येते़ त्यांनी शालिमार (१९७८) मधील ‘वन टू चा चा चा...’ आणि हम किसीसे कम नहीमधील ‘तुम क्या जानो...’ या दोन्ही गाण्यात ईलेक्ट्रिक सितार वापरली आहे. घरमधील तेरे बिना जिया जाये ना आणि खुशबूमधील ओ मांझी रे...या गाण्यात तबल्याचा वापर केला आहे. मासूम (१९८३) मधील ‘तुझसे नाराज नही जिंदगी...’मध्ये १२ तारावाल्या सेमी इलेक्ट्रिक गिटारचा वापर केला आहे. अमरप्रेम (१९७१)मधील रैना बिती जाये...आणि चिंगारी कोई भडके...या दोन्ही गाण्यात संतूर आणि गिटार वापरली आहे. मेहबुबा मेहबुबामध्ये बिअरच्या बाटल्यांचा आवाज वापरला आहे. या सर्वांत पंचमदांनी ताल-सूर-लय आदींचा सुंदर संगम साधला आहे. वाद्यांच्या सुरांची सरमिसळ करत नवा अविष्कार करणे यात त्यांचा हातखंडा होता आणि म्हणूनच त्यांची गाणी लोकप्रिय पावली, असे म्हणता येईल.
आर.डीं. ची काही गाणी अशी: मेहबुबा मेहबुबा....़़शोले, यम्मा यम्मा...शान, तेरे बिना जिंदगी से शिकवा नाही......आंधी, प्यार हमें किस मोड पे ले आया....., चुरा लिया है तुमने जो दिल को......,आनेवाला पल.....गोलमाल,भिगी भिगी रातों में.....,दो लफ्जो की है एक कहानी...,हमे तुमसे प्यार कितना.......,चला जाता हूं.....अशी किती तरी गाणी लोकप्रिय ठरली आहेत, रसिकांच्या ओठी गुणगुणत आहेत.
No comments:
Post a Comment