Friday, 1 May 2020

संगीतवेडा ऋषी




संगीत आणि आर. के. प्रॉडक्शन यांचा केवळ अभिनयाशीच नव्हे तर ताल, सूर, लय आदींसोबत घट्ट अनुबंध होता़ पृथ्वीराज कपूर यांच्यानंतर द ग्रेट शो मँन राज कपूर यांनीही संगीताला अनन्यसाधारण असे महत्त्व दिले. त्यांना शब्दांची, संगीताची जाण होती़ म्हणून राज कपूर यांनी आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीला सामाजिक चित्रपटनिर्मितीला प्राधान्य दिले. श्री ४२०, आवारा, अनाडी, मेरा नाम जोकर अशा चित्रपटांपासून ‘हिना’पर्यंत आपल्याला हाच अनुभव येतो. ऋषी कपूर यांच्या प्रत्येक यशस्वी चित्रपटातही संगीत अतिशय महत्त्वाचे ठरल्याचे आपणास दिसून येते. ऋषी यांचा नायक म्हणून पहिला चित्रपट ‘बॉबी’मधील सर्व गाणी हिट ठरली होती. सत्तरच्या दशकातील तरुणाईसाठी ती ‘स्वप्नाळू गाणी’ ठरलीत, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
मैं शायर तो नहीं, झूठ बोले कौआ काटे, हम तुम एक कमरे में बंद हो (बॉबी), हमने तुमको देखा, एक मै और एक तू (खेल खेल में), एक हसीना थी, तुमने किसीसे प्यार किया, दर्दे दिल (कर्ज), तू तू है वही (ये वादा रहा), ओ मेरी चांदनी, तू मुझे सुना मै तुझे सुनावू (चांदनी), सोचेंगे तुम्हें प्यार करें के नहीं (दिवाना), दामिनी ओ मेरी दामिनी (दामिनी), बोल राधा बोल तुने ये क्या किया (बोल राधा बोल), सागर जैसी आँखेवाली, जाने ने दो ना, सागर किनारे दिल ये पुकारे (सागर), डफली वाले डफली बजा, हम तो चले परदेस (सरगम), मेरी किसमत में तू नही, भँवरेने खिलाया फुल (प्रेमरोग), लंबूजी लंबूजी (कुली), चल चल चल मेरे भाई (नशिब), परदा है परदा (अमर अकबर अँथोनी), मै देर करता नही (हिना), बेचैन तुने इतना किया (नगिना) आदी गाण्यांनी ऋषी यांना तितक्याच प्रमाणात यशस्वी केले, जितके अभिनयाने!
अभिनय, संगीत, गीतांबरोबरच त्यांचे नृत्य कौशल्यही यशासाठी कारणीभूत ठरले. प्रत्येक गाण्यासोबत त्यांची नृत्यशैली बदलत गेल्याचे आपणांस दिसून येते. अगदी ‘नशिब’ चित्रपटातील चल चल चल मेरे भाई असो, ‘अमर अकबर अँथोनी’ मधील परदा है परदा असो, ‘सरगम’मधील डफलीवाले असो वा ‘चांदनी’मधील ओ मेरी चांदनी असो, या सर्व गाण्यांत ऋषींनी आपल्या नृत्याने प्रेक्षकांना कायम आकर्षित करून ठेवले.
‘दिवाना’मधील शाहरूख खान आणि अगदी कमी वयातील दिव्या भारती यांच्या भूमिकांसमोर ‘सोचेंगे तुम्हें प्यार करें के नहीं...’ या गाण्यावर तुफान नृत्यकौशल्य सादर करत आपल्यातील नर्तक अभिनेता शाबूत असल्याचे दाखवून दिले.
सुरुवातीच्या काळातील म्हणजे सन १९७६ मधील रंजितासोबतच्या ‘लैला मजनू’मधील सर्वच्या सर्व गाणी हिट ठरली़ आजही ती ऐका़, कानाला मनमुराद असा आनंद मिळतो़ हुस्न हाजिर है मोहब्बत की सजा पाने को, इस रेशमी पाजेब की झंकार, तेरे दर पे आया हू, ये दिवाने की जिद है, अब अगर हमसे खुदाई भी, लिखकर तेरा नाम जमीन पऱ़़ही सर्व गाणी हिट ठरली. मो़ रफी, लता मंगेशकर, अनुराधा पौडवाल, प्रीती सागर, शंकर शंभू, अंबर कुमार, राजकुमार रिझवी, अजिज नाझा आदींच्या स्वरातील गाण्यांनी चित्रपटाला मोठे यश मिळवून दिले होते आणि संगीतकार होते मदन मोहन आणि जयदेव़ ऋषी यांना मोहम्मद रफी, किशोर कुमार, शैलेंद्र सिंग इतकेच काय कुमार शानू, उदित नारायण यांचाही आवाज सुट होत होता. त्यामुळेच काळानुरुप ऋषी बदलत गेले, असे म्हणता येईल.

पत्नी नितू

ऋषी कपूर यांनी डिम्पल कपाडियापासून कोवळ्या वयातील दिव्या भारतीसोबत अगदी रोमँटिक अभिनय केला. श्रीदेवी, जयाप्रदा, मीनाक्षी शेषाद्री, जुही चावला, पद्मिनी कोल्हापूरे, पूनम ढिल्लो, माधुरी दीक्षित, अश्विनी भावे, वर्षा उसगांवकर, मनीषा कोईराला, नीलम, मौसमी चटर्जी, सुलक्षणा पंडित, मंदाकिनी, किमी काटकर, मधू, रविना टंडन, तब्बू, फराह, टीना मुनिम या सर्वांसोबत अभिनय केला, तर नीतू सिंग ही त्यांची पडद्याबाहेर आणि पडद्यावरीलही म्हणजे आॅन-आॅफ स्क्रीन पे्रयसी राहिली. या दोघांचे एकूण १२ चित्रपट आहेत़ पडद्यावर त्यांच्या रोमँटिक जोडीलाही जास्त पसंती होती. नंतरच्या काळात त्यांनी विवाहही केला. खेल खेल में (१९७५), कभी कभी (१९७६), अमर अकबर अँथनी (१९७७), दुनिया मेरी जेब में (१९७९) आणि पति पत्नी और वो (१९७९- यात दोघेही पाहुणे कलाकार) हिट ठरले. जहरीला इंसान (१९७४), जिंदा दिल (१९७५), दुसरा आदमी (१९७७), अनजाने में (१९७८), झुठा कहीं का (१९७९) आणि धन दौलत (१९८०), दो दुनी चार (२०१०), बेशरम (२०१३) हे ‘फ्लॉप’ ठरले.
कोणत्याही पठडीतील असो, ऋषी कपूर यांनी परिपक्व अभिनयच सादर केला़ समोर कुठलाही ज्येष्ठ सहकारी असो, त्यांनी स्वत:ला सिद्धच केले़ संजीव कुमार (कभी कभी), अमिताभ बच्चन (कुली, नशिब, अमर अकबर अँथनी), शत्रुघ्न सिन्हा (नशिब) या सर्व सिनिअर कलाकारांच्या प्रतिभेच्या काळात सामोरे गेले आणि आपली स्व स्थान निर्माण केले़ त्याचा परिपाक म्हणूनच त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार, फिल्मफेअर लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड, रशियन सरकारकडून विशेष सन्मान, फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेता, क्रिटिक पुरस्कार, स्क्रीन लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड, फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता पुरस्कार असे कित्येक सन्मान मिळालेत.
ऋषी हे आपल्या अभिनयाच्या रुपाने भारतीय चित्रपटसृष्टीत अजरामर राहतील;परंतु गीत संगीताच्या माध्यमातूनही ते आपल्यापाशी असतील, यात शंका नाही.
© संजय इस्तारी मुंदलकर

No comments:

Post a Comment