Tuesday, 16 June 2020

पुस्तके विकून गाठली अभिनयनगरी


‘बॉलिवूड’मधील अनेक कलावंत दीर्घकाळपर्यंत चाहत्यांच्या मनावर राज्य करत असतात. मग ते निवृत्त झाले असो वा दिवंगत़ नायक असो, सहनायक असो, नायिका असो वा खलनायक. भारतीय चित्रपटसृष्टीतील खलनायक म्हटले की, अभिनेता जीवन यांच्यापासून सुरुवात करता येईल़(कारण त्यांना ओळखणारी पिढी सध्या ८० वर्षांच्या आसपास असू शकते.) नंतरच्या काळात प्राण, अजित, अमरिश पुरी, प्रेम चोप्रा, अमजद खान, कादरखान, सदाशिव अमरापूरकर, मोहन जोशी अशी रांग लागते़ नव्या पिढीतील किरण कुमार, परेश रावल, गुलशन ग्रोवर, शक्ती कपूर आदींचा समावेश होतो. सध्याच्या घडीला मुकेश ऋषी, गोविंद नामदेव, आशिष विद्यार्थी, मुकेश तिवारी ही मंडळी आहेत. मित्रांनो, कलावंताची भूमिका कोणतीही असो, आपल्याला त्यांच्यातील अभिनय वारंवार खुणावत असतो. म्हणून तर मुगल ए आझममधील जितका अकबर, तितकाच सलीम आपल्याला आवडतो़ शोले चित्रपटातील जितके जय विरूचे चाहते असतो, तितका गब्बर पसंत असतो़ जातिवंत रसिक, तोच...जो केवळ कलाकारातील अभिनय चाखतो!
असाच एक खलनायक पाहूयात़़़अजित! होय अजितच...अभिनयाचा गर्भश्रीमंत खलनायक़ आपण खलनायक अजित अर्थात लॉयन यांच्याबदद्ल बोलूयात. शेरवानी किंवा बंद गळ्याचा कोट किंवा थ्री पीस सूट, गळ्यात मोत्यांच्या माळा, टोकदार मिशी आणि बोटात सिगार वा पेटती पाईप. हे दृश्य केवळ अजित यांनाच शोभत होते. अधिकांश वेळा ते श्रीमंत व्यापारी किंवा समाजसेवकाच्या रुपात समोर येऊन पडद्यावर काळेधंदे करण्यात रममाण असल्याचे रसिकांनी पाहिले आहे. त्यांचे खरे नाव हमीद अली खान असे होते. पडद्यावर त्यांनी ‘अजित’ असे नाव धारण केले. ( हे नाव त्यांना ज्येष्ठ दिग्दर्शक महेश भट्ट यांचे वडिल नानाभाई भट्ट यांनी दिले होते, असे सांगण्यात येते.) पीटर, रॉबर्ट, मायकेल सारख्या ख्रिश्चन व्यक्तिरेखा साकारणाºया अजित यांनी पडद्यावर स्मगलरची खलनायक म्हणूनच ओळख निर्माण केली. त्यांची प्रतिमा मवाळपणाने बोलणारी; पण विध्वंसक खलनायकाची होती. सन १९४० च्या सुरुवातीला २२ व्या वर्षी त्यांना मुंबईत हीरो बनण्याची हुक्की आली. अभ्यासाची पुस्तके विकून जिवाची मुंबई नव्हे, अभिनयासाठी मुंबई गाठली. (अजित यांचा जन्म हैदराबादमधील गोलकोंडा येथे २७ जानेवारी १९२२ रोजी झाला होता. वारंगलमध्ये शिक्षण घेतले.) मेहनत आणि संघर्षाच्या जोरावर ते हीरोही बनले. नानाभाई भट्ट यांनी त्यांना हीरो म्हणून पडद्यावर उतरवले. नास्तिक, बडा भाई, मिलनस बारादरी, ढोलक यात नायक म्हणून अभिनय साकारला, तर मुगल-ए-आझममध्ये सेकंड लीडवर समाधान मानले.
अजित यांनी आपल्या चाळीस वर्षांच्या कारकिर्दीत पृथ्वीराज कपूर यांच्यापासून अगदी अमिताभ बच्चन यांच्यासह अजय देवगण यांच्याबरोबरही काम केले आहे. त्यावेळी नूतन आणि नर्गिस वगळून सर्व अभिनेत्रींसोबत त्यांनी अभिनय साकारला. सहायक अभिनेता (साईड हीरो) म्हणून त्यांनी ‘नया दौर’ आणि ‘मुगल-ए-आजम’मध्ये दिलीप कुमारसोबत काम केले. आपण अभिनयात कमी नाही, हे त्यांनी या दोन चित्रपटांतून दाखवून दिले; परंतु नंतरच्या काळात त्यांना केवळ बी ग्रेड चित्रपटच मिळत राहिली. राजेंद्र कुमार यांच्या सल्ल्यावरून त्यांनी ‘सूरज’ चित्रपटापासून खलनायक म्हणून नवीन ‘ईनिंग’ सुरू केली. दुसºयाच वर्षी आलेल्या ‘कालीचरण’नंतर त्यांना लॉयन अशी उपाधी मिळाली. यापूर्वी ६० च्या दशकात प्राण यांनी मैदान गाजवले होते. यानंतर अजित यांनी १९७० आणि ८०चे दशक गाजवण्यास सुरुवात केली. हा खलनायक प्रामुख्याने श्रीमंती लोळत पडलेला दिसून आला. कालीचरणमधील ‘दीनदयाल’ असाच काहीसा होता. ‘सारा शहर मुझे लॉयन के नाम से जानता है’, हा संवाद मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाला. या खलनायकाला एक पर्सनल असिस्टंट सुद्धा असल्याचे दिसून येते़ ‘मोना डार्लिंग’ असे तिचे नाव़ अजित यांनी या भूमिकेत इतका जीव ओतला की चाहते ‘लॉयन’सोबत मोनाचीही आठवण काढत असे.

व्हिस्कीची आॅफर

कोणत्याही चित्रपटात खलनायकाने केवळ मारच खावा, असे अपेक्षित असते़ अजित मात्र त्याला अपवाद आहे. ते नायकाला चक्क व्हिस्की आॅफर करतात. आठवा जंजीर... या चित्रपटात एक संवाद आहे़ खलनायक सेठ धर्मदयाल तेजा म्हणतो, ‘आओ विजय, बैठो और हमारे साथ एक स्कॉच पियो. हम तुम्हें खा थोडेही जाएंगे. वैसे भी हम व्हेजिटेरियन है’. या चित्रपटात समोर त्यावेळचा अँग्री यंग मॅन अमिताभ बच्चन होते. जंजीर चित्रपटात अजित यांनी शब्दांमध्ये पॉझ घेत बोलण्याचा प्रयोग केल्याचे आपण सर्वांनी पाहिले आहे. (याबाबत असे सांगण्यात येते की अजित यांनी हैदराबादेतील एक व्यक्ती अशाचप्रकारे संवाद साधत असल्याचा अनुभव घेतला होता.) पुढील काळात हीच त्यांची ओळख बनली़ खलनायक सुद्धा मृदुभाषी आणि शालिन असू शकतो, हे त्यांनी सिद्ध करून दाखवले. याचा प्रत्यय जुगनू, वारँट, चरस, यादों की बारात, कहानी किस्मत की, संग्राम अशा अनेक चित्रपटांतून पाहावयास मिळतो.

गीतेचे ज्ञान 

कोणत्याही चित्रपटात हीरो (नायक) हाच खलनायकाला संस्कृती आणि नैतिकेतेचे धडे देत असतो. (चित्रपटाच्या लेखकाने तशीच काहीशी तरतूद केलेली असते.) अजित यांचा मामला मात्र उलटा आहे. ते स्वत: हीरोला ज्ञान देत असतात. हे म्हणतात, अपनी उम्र से बढ़कर बातें नहीं करते. आशीर्वाद तो बड़े देते हैं. हम तो सिर्फ राय देते हैं़ अच्छा खरीदार हमेशा सौदा करने से पहले दुसरों की किंमत का अंदाजा लगाता है. अजितमधल्या खलनायकाला हेही माहिती आहे की गीतेची रचना कशी झाली. त्यांचा एक संवाद असा आहे, ‘तारीख इस बात की गवाही देती है कि महाभारत की कहानियाँ कभी गुलाबजल से नहीं लिखी गयी. ये हमेशा गरम खून से लिखी जाती है.
मित्रांनो, अजित यांना आपले संवाद बोलण्याची एक विशिष्ट ढब गवसली होती. ती त्यांच्या आवाजाला ‘परफेक्ट’ बसली. आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी सकारात्मक भूमिका साकारल्या. मुगल-ए-आजममधील अजित यांना विसरणे अशक्य आहे. त्यांच्या आवाजात एक ‘वजन’ होते, ज्याने त्यांना मृत्यूपर्यंत म्हणजे २३ आँक्टोबर १९९८ पर्यंत ‘श्रीमंत खलनायक’ म्हणून कायम ठेवले.

काही प्रसिद्ध संवाद

* कुत्ता जब पागल हो जाता है तो उसे गोली मार देते हैं (जंजीर)
* सारा शहर मुझे लॉयन के नाम से जानता है (कालीचरण)
* जिस तरह कुछ आदमियों की कमजोरी बेईमानी होती है, उसी तरह कुछ आदमियों की कमजोरी ईमानदारी होती है (जंजीर)
* जिंदगी सिर्फ दो पांवों से भागती है और मौत हजारों हाथों से उसका रास्ता रोकती है (आजाद)
* मेरा जिस्म जरूर जख्मी है, लेकिन मेरी हिम्मत जख्मी नहीं (मुगल-ए-आजम)
* शाकाल जब बाजी खेलता है तो जितने पत्ते उसके हाथ में होते हैं, उतने ही उसकी आस्तीन में होते हैं (यादों की बारात)

©  संजय इस्तारी मुंदलकर

No comments:

Post a Comment