नवे वर्ष आले की आपल्या सर्वांचे डोळे परीक्षांकडे लागलेले असते. परीक्षा कोणत्याही वर्गाची असली तरी अख्खे कुटुंब परीक्षार्थी बनलेले असतात. त्यात दहावी वा बारावीची परीक्षा म्हटली की उत्सुकतासोबतच घाईगडबड आणि काहीसा तणाव सुद्धा अनेक कुटुंबात दिसून येतो. इयत्ता नववीखालील परीक्षा साधारण: एप्रिलमध्ये असतात़ दहावी-बारावी मात्र फेब्रुवारी,मार्च महिन्यात असल्याने अनेक विद्यार्थी रात्री उशिरा जागरण न करता सकाळी उठून अभ्यास करत असतात. मात्र, यावेळी काहीशी थंडी असल्यामुळे पहाटे उठून अभ्यास करताना झोप येते. विद्यार्थ्यांचा अभ्यास कमी आणि झोपण्यातच जास्त वेळ जातो. या सगळ्यांचा परिणाम अभ्यास आणि निकालावर होत असतो. मात्र, पहाटे अभ्यासाच्या वेळी काही गोष्टी पाळल्यास झोप दूर पळवता येऊ शकते.
सकाळी उठल्यानंतर अनेक विद्यार्थी केवळ ‘स्टडी लॅम्प’च्या प्रकाशात अभ्यास करण्याचा प्रयत्न करतात. एक ठराविक जागा वगळता बाकीची खोली जवळजवळ अंधारातच राहते. या कमी प्रकाशात आणि शांत वातावरणात झोप लागणे स्वाभाविक आहे. अशा वेळी अभ्यासाच्या ठिकाणी प्रकाश मोठा ठेवल्यास झोप टाळता येते.
अनेकजण सकाळी उठल्यानंतर बिछाना अर्थातच बेडवर बसून अभ्यासाला सुरुवात करतात. मित्रांनो, यातून एक तर आळशीपणा येऊ शकतो किंवा झोपून हळूहळू वाचन सुरू केल्यास झोप येते. त्यामुळे अभ्यास करताना नेहमी खुर्चीवर किंवा भींतीला पाठ सरळ करून बसावे. समोर टेबल ठेवावा. पुस्तक मांडीवर न ठेवता समोरच्या टेबलवर असावे. बसण्याच्या स्थितीतही काही वेळाने हात किंवा पाय हलवत राहावे.
अभ्यासादरम्यान काही वेळाने पाणी प्यावे. हे आरोग्यासाठीच फायदेशीर ठरेल. यामुळे वारंवार उठून शौचालयात जावे लागले तरी ज्यामुळे शरीरातील निष्क्रियता कमी होण्यास मदत होते.
परीक्षेच्या काळात रात्री उशिरापर्यंत अभ्यास केल्यास सकाळी जागे होणे कठीण असते. थकलेल्या मनाने अभ्यास केला की पुन्हा पुन्हा झोप येते. अशावेळी चेहºयावर पाणी शिंपडावे. आळस दूर होतो आणि अभ्यास करण्यासाठी मन नव्याने सक्रिय होते.
अभ्यास करताना वरील काही गोष्टी पाळणे गरजेचे आहे.
बेस्ट लक...
संजय मुंदलकर
शिक्षण अभ्यासक
No comments:
Post a Comment