Monday, 10 April 2023

शंभरीत पंच्चाहत्तरी

 भारतीय चित्रपटसृष्टीत मागील ७५  वर्षांत एवढा बदल झाला आहे की तो मोजक्या शब्दांत मांडणे कठीण आहे. यासोबतच हेही खरे आहे की, भारतीय  चित्रपट देशातील  प्रत्येक व्यक्तीच्या मनाला स्पर्श करतो, त्याच्या समस्यांपासून ते नातेसंबंध आणि यश-अपयश या सर्व गोष्टी चित्रपटांमध्ये पाहायला मिळतात. आता विदेशातही भारतीय चित्रपटांना एक खास ओळख  मिळत आहे. 

कॅनडा, जपान आणि चीनसारख्या देशांमध्ये भारतीय चित्रपटांची मोठी कमाई होत आहे. त्याचबरोबर कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्येही भारतीय चित्रपटांचा बोलबाला आहे. मागील दिवसांत ‘आरआरआर’ ने केलेली  मोठी कमाल  जगाने अनुभवली आहे.

अनेक लेखकांनी स्वातंत्र्यानंतरच्या हिंदी चित्रपटांबद्दल बरेच काही सांगितले आहे. स्वातंत्र्यानंतरच्या काही दशकांत हिंदी चित्रपटसृष्टीवर  नेहरूवादी  समाजवादाचा प्रभाव दिसून आला. 

तथापि, या काळात बनवलेले  काही महत्त्वाचे चित्रपट, जसे राज कपूरचा आवारा (१९५१), बिमल रॉयचा दो बिघा जमीन (१९५३), मेहबूब खानचा मदर इंडिया (१९५७) आणि गुरू दत्तचा प्यासा (१९५७) या चित्रपटांचे बारकाईने परीक्षण केल्यास हे स्पष्ट होते, की त्या काळातील हिंदी चित्रपट नेहमीच नेहरूंच्या भारताच्या दृष्टीकोनाशी सुसंगत नव्हते. हेही खरे आहे की, अंदाज, नया दौर, हावडा ब्रिज यांसारखे तत्कालिन  चित्रपट नेहरूंच्या आधुनिक भारताच्या आदर्शाचे, आधुनिकतेच्या चांगल्या बाजू चित्रित करण्यात यशस्वी ठरले. देशाचा विकास डॉक्टर, अभियंता आदींच्या पात्रांच्या माध्यमातून दाखवला जातो आणि जुगार खेळणाºयांची पात्रे आणि दृश्ये, कॅबरे डान्स इत्यादींच्या माध्यमातून वाईट बाजू दाखवली जाते.  या दोन्ही बाबी समाजावर खोलवर परिणामकारक ठरल्या आहेत.



याशिवाय  देशातील  चित्रपटनिर्मितीवर काही महत्त्वाच्या घटनांचाही परिणाम झाला. भारत-चीन युद्धातील वेदनादायक सत्यता, १९६०च्या दशकातील हरित क्रांती, आणीबाणी  आदी ऐतिहासिक घटनांना हिंदी चित्रपटसृष्टी चुकली नाही. यानंतरच्या काळातील वाढलेली   लोकसंख्या आणि बेरोजगारी हा मुद्दा सुद्धा चित्रपटांत दिसून आला. १९८० च्या दशकात खलिस्तान चळवळीचा प्रभाव सुद्धा पाहावयास मिळाला. नव्वदच्या दशकापासून मात्र चित्रपटक्षेत्राच्या व्यापारीकरणाची प्रक्रिया सुरू झाल्याचे पाहायला मिळते. पी.व्ही. नरसिंह राव पंतप्रधान असताना त्यांनी जागतिकीकरणासह आर्थिक उदारीकरणाच्या नव्या युगाची सुरुवात केली. ही बाब चित्रपटक्षेत्रालाही लागू झाली.

मिस्टर इंडिया, तेजाब, कयामत से कयामत तक, मैने प्यार किया,  खिलाडी यासारख्या चित्रपटांच्या व्यावसायिक दृष्टीकोनाने हिंदी  चित्रपटसृष्टी  अधिक मजबूत झाली. २१व्या शतकाच्या  वळणावर   प्रामुख्याने  गुन्हेगारी पात्रे आणि  समाजाची  काळी  बाजू  दाखवण्यात आली होती. तर, २००० सालानंतर चित्रपटांनी नवे रूप स्वीकारल्याचे आपणांस दिसून आले. पुढील दिवसांत १०० कोटींच्या क्लबमध्ये सामील होण्याची शर्यत सुरू झाली आणि त्यावरच हिंदी चित्रपटाचे यश अवलंबून दिसून आले.

आज  हिंदी  चित्रपटांचा प्रवास वेब आणि ओटीटी प्लॅटफॉर्म पर्यंत पोहोचला आहे. यातून चित्रपट निर्मात्यांना प्रेक्षकांच्या आवडीनुसार वेगवेगळ्या प्रकारच्या  वेबसिरीज आणि चित्रपटांची निर्मिती करावी लागत आहे. कोरोना महामारीच्या काळाने तर प्लॅटफॉर्मला आणखी चालना दिली आहे. चित्रपटगृहे अनिश्चित काळासाठी बंद झाल्यामुळे प्रेक्षकांचे मनोरंजन येथूनच होऊ लागले. अनेक वर्षे  चित्रपटाचा पडदा गरीब टेलिव्हिजनला हसत होता़ आता ओटीटीने रुपेरी पडद्याला मात्र जोरदार टक्कर दिल्याचे म्हणता येईल.


@ sanjay mundalkar

No comments:

Post a Comment