ज्यावेळी कुटुंब आणि कौटुंबिक मूल्यांची चर्चा भरात येते, त्यावेळी भारत देश अव्वलस्थानी असल्याचे वारंवार सिद्ध झाले आहे. कारण भारतात ‘वसुधैव कुटुंबकम्’ ही संकल्पना मूळ धरून आहे. या देशाने नेहमीच परंपरा, संस्कृती, वारसा आदी बाबींचा आदर केला. म्हणूनच वर्ल्ड आॅफ स्टॅटिक्सने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, भारतात घटस्फोटाची सर्वात कमी प्रकरणे असल्याचे स्पष्ट केले आहे.
‘वसुधैव कुटुंबकम्’ अर्थात जग हे एक कुटुंब आहे, ही धारणा भारताने कधीचीच अभिमानाने स्वीकारली आहे. आणि त्याची सत्यता दिवसांगणिक आणखीच वाढत असल्याचा प्रत्यय वारंवार दिसून येतो. जगातील देश संकटात सापडले असताना ते भारताकडे आशेने पाहतात, तेव्हा त्यांना कधीही निराशेचा सामना करावा लागत नाही. जिथून सर्वांना ‘वसुधैव कुटुंबकम्’चे बळ मिळते, तिथे निराशा कशी येणार...हे बळ आपल्या कुटुंबातून आणि संस्कृतीतून मिळत असते. जन्मापासूनच वडीलधारी मंडळी संस्कारांबद्दल, संस्कृतीबद्दल बोलत असतात. सौजन्य शिकविण्यात येते. त्यातून धार्मिक महत्त्वाचा सुद्धा विस्तार होत असतो.
कुटुंबाचा स्पष्ट अर्थ आहे. आपुलकीने एकत्र राहणे आणि संकटसमयी पाषाणासारखे खंबीरपणे उभे राहणे. कुटुंबात केवळ स्वत:च्या महत्त्वाचीच चर्चा होत नाही, तर जवळच्या आणि प्रियजनांचीही चर्चा होत असते. स्वत:पेक्षा इतरांचीच चर्चा अनुभवास येते. आपण, माझ्यापेक्षा जास्त महत्त्वाचे आहात, ही भावना कुटुंबातच तयार होते आणि त्याची जडणघडण मजबूत होते आणि म्हणूनच विवाहाला अधिक महत्त्व प्राप्त होते, तेव्हा घटस्फोट होऊ नये, तो टाळला जावा, असा पुरेपूर प्रयत्न करण्यात येतो. परंतु, जगण्याच्या, व्यवहाराच्या संकल्पना सातत्याने बदल्याने विवाह मोडण्यात येतो आणि त्याचा विच्छेद केला जातो.
असे असले तरी उपरोक्त अहवालानुसार भारतात घटस्फोटाचे प्रमाण फक्त एक टक्का आहे. तर, व्हिएतनाम देशात ७ टक्के, ताजिकिस्तानमध्ये १० टक्के, इराणमध्ये १४ टक्के, मेक्सिको, इजिप्त आणि दक्षिण आफ्रिकेत प्रत्येकी १७ टक्के, ब्राझील देशात २१ टक्के आणि तुर्कीमध्ये २५ टक्के असल्याचे सांगण्यात येते. पोतुर्गालमध्ये घटस्फोटाचे प्रमाण सर्वाधिक ९४ टक्के आहेत. स्पेनमध्ये ८५ टक्के, लक्झेंबर्ग ७९ टक्के, रशिया ७३ टक्के, युक्रेन ७० टक्के, क्युबा ५५ टक्के, फिनलंड ५५ टक्के, बेल्जियम ५३ टक्के, फ्रान्स ५१ टक्के आणि अमेरिकेत सुमारे ४३ टक्के आहे.अहवालानुसार, घटस्फोटाची प्रकरणे आशियाई देशांमध्ये सर्वात कमी आहेत, तर युरोप आणि अमेरिकेची स्थिती दयनीय आहे. बहुतेक कुटुंबांची ताटातुट झालेली आहेत. अमेरिकन लोक स्वावलंबनाचा मुद्दा पुढे करत प्रौढ होताच वा त्यापेक्षाही कमी वयात कुटुंबापासून दूर जातात. भारतातील तरुण देखील त्याबद्दल बोलतात. परंतु, कुटुंब वा संस्कृतीपासून दूर जात नाहीत.
भारतातील लोक कुटुंब आणि संस्कारांना महत्त्व देतात. लग्न म्हणजे केवळ दोन व्यक्तीनी एकत्र येणे नसून आत्मा, कुटुंब आणि धार्मिक विधी यांचे मिलन असा आहे. येथे दोन कुटुंबे आणि त्यांचे नातेवाईक सुख-दु:खात एकमेकांच्या पाठीशी उभे असतात. परस्पर बुद्धीने वाद मिटवले जातात. अनेकदा पत्नी-पत्नीमधील वाद नातेवाईकांच्या पातळीवरच सोडविण्यात येतात़ कोर्टाची पायरी चढू दिली जात नाही. तथापि काहीवेळा प्रकरणे बिघडतात आणि मग घटस्फोटाची दिशा सुरू होते. मात्र, भारतातील स्थिती ही अन्य देशांच्या तुलनेत फार वेगळी असल्याचे वारंवार अनुभवास येते. कारण या देशातील धार्मिक परंपरांना, विधींना संस्काराच्या दृष्टीतून पाहण्यात येते आणि म्हणून भारतातील कुटुंब व्यवस्था अद्याप विस्क ळीत झालेली नाही, हे मान्य करावेच लागतेच!
Ⓒ SANJAY MUNDALKAR
No comments:
Post a Comment