मुख्य म्हणजे उत्पादकता घटल्याने रोजगारावर परिणाम होईल. उन्हाळ्याचा कालावधी वाढल्याने जगभरातील ८० दशलक्ष नागरिक येत्या सात वर्षांत म्हणजेच २०३० पर्यंत आपला रोजगार/ नोकºया गमावू शकतात.त्याची झळ भारतालाही पोहोचेल, असेही सांगण्यात येत आहे. कडक उन्हाचा पाणी, जंगल, जमीन आणि सर्वसामान्यांच्या जीवनावर प्रतिकूल परिणाम होत असल्याचा अनुभव आपण सर्वजण घेत आहोत.
मागील एप्रिल महिना उन्ह-पावसाने संपला आणि आता चालू मे महिन्याच्या सुरुवातीला अवकाळी पाऊस...देशातील काही भागात मध्यम स्वरूपाचा आणि मुसळधार पाऊस कोसळत आहे. यंदाच्या फेब्रुवारीमध्ये विक्रमी तापल्यानंतर यावर्षी उष्णतेची लाट होरपळून टाकेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला. उष्ण वाºयांमुळे केवळ मानवच नव्हे, तर प्राणी आणि जंगलावरही वाईट परिणाम होण्याची चिन्हे आहेत. एकूणच एक पर्यावरणाची तर मोठी हानी होत आहे. आपल्या देशातील हवामान संस्थांसोबतच जागतिक बँकेनेही उष्णतेबाबत गंभीर इशारा दिला आहे.
जागतिक बँकेनुसार तापमानात सातत्याने होणारी वाढ केवळ या वर्षीच नव्हे तर पुढील अनेक वर्षे सामान्य जनजीवनावर प्रतिकूल परिणाम करत राहणार. त्यामुळे मानवी जीवनावर अनेक प्रकारे संकटाचे ढग दाटून राहतील. हवामानातील बदलामुळे मानवी जीवनाला दुहेरी धोका निर्माण होईल, असे जागतिक बँकेच्या ‘क्लायमेट इन्व्हेस्टमेंट अपॉर्च्युनिटी इन इंडियाज कूलिंग सेक्टर’ अशा शीर्षकाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
यावर्षी अर्थात २०२३ मध्ये देशात उष्णतेची तीव्र लाट येईल, असा इशारा हवामानशास्त्रज्ञांनी मार्च २०२२ मध्ये दिला होता. त्यांचा हा अंदाज खरा ठरला. कारण फेब्रुवारी २०२३ मध्ये अचानक हवामान बदलले आणि मागील १७ वर्षांत हा फेब्रुवारी महिना सर्वाधिक उष्ण ठरला, असे हवामानतज्ज्ञांनी म्हटले आहे. यंदा फेब्रुवारीत कमाल तापमान ३३ अंश सेल्सिअसवर पोहोचले होते. या महिन्यातील सहा दिवस कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस इतके होते.
दिल्ली, राजस्थान, हरयाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, पंजाब, छत्तीसगड, महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये फेब्रुवारीतच मे-जूनमधील उन्हाळा अनुभवायला मिळाला. यंदाही उष्णतेच्या लाटेचा सामान्य जनजीवनावर वाईट परिणाम होईल, असा अंदाज आता हवामान खात्याने पुन्हा वर्तवला; परंतु मे महिन्यात वातावरण बदलले आणि चक्क पावसाळा सुरू झाल्याचा अनुभव येत आहे. विदर्भातील काही नद्यांना पुराची स्थिती अनुभवावी लागली. मे महिन्यातील तापमान २९ ते ३० अंशांपर्यंत खाली आले आहे. कुठून कसा ऋतू बदलतोय, ही बाब सर्वसामान्याच्या आकलनापलीकडील आहे, असे म्हणता येणार नाही.
हवामानाचे ऋतू बदलत असल्याचा धोका वर्तविण्यात येत आहे़ आगामी २०६० वर्षांपर्यंत उन्हाळ्याचे दिवस १८ दिवसांपर्यंत वाढण्याचा धोका व्यक्त होत आहे. शास्त्रज्ञांनी बदलत्या हवामानाचे दिवस लक्षात घेत पीक लागवडीच्या कालावधीत बदल करावे लागणार, असेही म्हटले आहे. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळी असे चार-चार महिन्यांच्या कालावधीचे हंगाम कधीच मागे पडल्याचे शास्त्रज्ञ सांगत आहेत. तिन्ही ऋतूंनी आपापल्या जागा बदलविल्याचे प्रकर्षाने जाणवत आहेत. तसे पाहता मे महिना सर्वाधिक प्रखर उन्हाचा असतो. उष्म्याचे विक्रम मोडणारा हा महिना असतो. जागतिक बँकेने आपल्या अहवालात उष्णतेच्या लाटेचा नागरिकांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होणार असल्याचे म्हटले आहे़ शिवाय उत्पादकतेवरही परिणाम होणार असल्याचे स्पष्टपणे सांगण्यात आले.
हे बदल कसे आणि कुणी केले? आणि शेवटी बोट जाते, ते मानवाकडेच!
संजय मुंदलकर
No comments:
Post a Comment