Friday, 29 September 2023

संयुक्त कुटुंबात हात आणि साथ सोबत-सोबत ...

 काही दशकांआधी भारतीय समाज संयुक्त होता. मोठ्या कुटुंबातून वास्तव्यास होता. एकेका कुटुंबात सामान्यपणे १० ते १२ सदस्यांचा समावेश असे. आईवडिल, मुले, सुना, नातू या नात्यांसोबत कधी कधी विधवा बहीण, आत्या वा अन्य नातेवाईकांचाही समावेश असे. सकाळपासून सुरू होणारा स्वयंपाक पार काही तासांपर्यंत चालायचा. शेतातील  कामे  असो वा घर हातभार लावणारी अनेक हात असल्याने कामे  कशी भराभर व्हायची !



काळ बदलत गेला. शेतांचे तुकडे झाले तसे कुटुंबे  दुभंगली. देशात कारखानदारीसोबतच विविध कार्यालये उदयास आली. नोकरीकडे जाणाºयांचे प्रमाण वाढले. आपल्या आईवडिलांच्या कुशीत पहुडणारी मुले  आता आपल्या मातापित्यांना आपल्याजवळ ठेवण्याच्या ‘पात्रते’ची  झाली. कधी  कधी  आईवडिलांना  भार समजून  तो वाटणीला आला. विवाहित बहिणींना  वेगवेगळ्या चॉईस मिळाल्या. जो तो आपल्या पुरतेच पाहू लागला. आणि त्यातून नव्या समस्या निर्माण झाल्या़ कुठे आजी आजोबा दूर झाले तर कुठे आत्या दुरावल्या. जगाचे रहाटगाडगे समजून समाजाने हे सर्व  मान्य केले. अद्यापही भारतीय कुटुंब विभागलेलेच आहे. संयुक्त  होण्याची वेळ आली असताना कुणाचीही मने समोर धजावत नसल्याचे चित्र अनुभवास येत आहे.






मात्र, त्याचवेळी अमेरिकन समाजात मोठे बदल होत आहेत. याठिकाणी संयुक्त कुटुंबे झपाट्याने वाढत आहेत. कदाचित त्यांनी ही कुटुंबपद्धत ‘सुखा’सोबत ‘समाधाना’चीही मानली असावी. कारण २३ टक्के प्रौढ आता त्यांचे पालक आणि आजी आजोबांसोबत राहत आहेत. एका सर्वेक्षणानुसार,२०१५ ते २०२०च्या दरम्यान ‘सँडविच’ कुटुंबांची संख्या २८ टक्क्यांवरून ३० टक्क्यांवर पोहोचली आहे. ६५ वर्षांपेक्षा जास्त वयाचे लोक, जे  त्यांचे पालक आणि  प्रौढ मुलांची काळजी घेतात, त्यांना ‘सँडविच’ पिढी म्हणतात. एक अमेरिकन सामाजिक कार्यकर्त्या लॉरा रेगन सहा वृद्ध सदस्यांच्या  कुटुंबाला  मदत  करतात. कधी कधी वृद्ध आई-वडील आणि मुलांची काळजी घेणे हे दोन भिन्न वास्तवांमध्ये जगण्यासारखे असते. दोन पिढ्यांना सुखी ठेवणे हे अवघड काम आहे; परंतु त्यांच्याकडूनच कामाचे व्यवस्थापन करायला शिकले आणि कुटुंबासोबतच्या आयुष्यातील  प्रत्येक दिवस  ही एक अनमोल भेट आहे याची मला जाणीव झाली, असे रेगन सांगतात.



विभक्त कुटुंबापेक्षा संयुक्त कुटुंबातील मुले अधिक शिक्षित असल्याचे आढळून आले आहे. संयुक्त कुटुंबातील मुलांचा शैक्षणिक स्तर विभक्त कुटुंबापेक्षा चांगला असतो, असेही अमेरिकन समाजात घडत आहे. मोठ्या कुटुंबांमध्ये राहणारे किमान ३० टक्के तरुण पदवीधर आहेत़ तर, विभक्त कुटुंबांमध्ये ही संख्या केवळ  २० टक्क्यांची आहे. २७ टक्के उच्च उत्पन्न मिळवणाºया व्यक्ती संयुक्त कुटुंबात वास्तव्यास आहेत. कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या कुटुंबांचा वाटा अनुक्रमे २१ आणि २४ टक्के आहे. 



संयुक्त कुटुंबातील सहजीवनात राहणारे ४८ टक्के तरुण त्यांच्या कौटुंबिक जीवनात आनंदी आहेत. त्याच वेळी, विभक्त कुटुंबातील ४४ टक्के तरुण आनंद मानून घेतात. अमेरिकासारख्या नोकरीप्रधान समाज व्यवस्थेत लहान मुलांना आईवडिलांची जशी गरज आहे, तशीच आजी आजोबांची आणि अन्य नात्यांचीही आहे. संयुक्त कुटुंबाचा आनंद मिळतो, तो असा. कारण मनाने एकत्र राहण्याचे सुख केवळ याच समाज व्यवस्थेत अनुभवता येते. संयुक्त कुटुंबातील जबाबदाºयांच्या ओझ्यामुळे अशा कुटुंबांवर ताण येतो, असे मानले जाते. कालांतरान े मात्र ही कुटुंबे पालक व मुलांत समतोल राखण्यास शिकली असल्याचेही आढळून आले आहे. ते आता जबाबदारीला ओझे मानत नाहीत. कारण त्यांचे हात आणि साथ आता सोबत-सोबत असतात़ 


संजय मुंदलकर

No comments:

Post a Comment