माझं हास्य कुणाच्याही दु:खाचं कारण ठरू नये
चार्ली यांचा जन्म १६ एप्रिल १८८९ रोजी लंडनमध्ये झाला होता. त्यांचे पूूर्ण नाव चार्ल स्पेन्सर चॅपलिन असे होते. त्यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती फारच हालाखीची होती. पोट भरण्यासाठी त्यांना वयाच्या नवव्या वर्षीच नोकरी करावी लागली. बालपणीच त्यांचे आईवडील अलग झाले. यानंतर त्यांच्या आईची मानसिक स्थिती बिघडली. परिणामी वयाच्या १३ वर्षी चार्ली यांचे शिक्षणही सुटले.
चार्ली यांनी लहान वयातच नाटक आणि विनोदी कलाकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली होती. अवघ्या १९ व्या वर्षी एका अमेरिकन कंपनीने त्यांच्याशी करार केला आणि ते अमेरिकेला रवाना झाले. चार्ली चॅपलिन यांनी अभिनयाची सुरुवात अमेरिकेत केली. १९३० त्या सुमारास त्यांना आठवड्याला १५० डॉलर्स मिळत होते. यावर्षी त्यांनी तब्बल १३ चित्रपट निर्मात्यांशी करार केला होता. १९१८ सालापर्यंत ते जगातील लोकप्रिय चेहरा बनले होते.
१९१४ मध्ये प्रदर्शित झालेला ‘मेकिंग अ लिव्हिंग’ हा मूकपट त्यांचा पहिला चित्रपट होता. १९२१ मध्ये आलेली ‘द किड’ ही त्यांची पहिली फीचर फिल्म ठरली. चार्ली यांनी अ वूमन आॅफ पॅरिस, द गोल्ड रश, द सर्कस, सिटी लाईट्स, मॉर्डन टाईम्स यासारख्या प्रसिद्ध आणि यशस्वी चित्रपटांमध्ये काम केले. हे चित्रपट आजही पसंत केले जातात. चार्ली यांनी आपल्या आयुष्यात दोन महायुद्ध पाहिली. ज्यावेळी जग युद्धाची झळ सोसत होत, त्यावेळी चार्ली लोकांना हसवत होते.
आयुष्यही वादात
खासगी आयुष्यासोबतच चार्ली यांचे व्यावसायिक आयुष्यही चर्चेत आणि वादग्रस्त होते. १९४० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘द ग्रेट डिक्टेटर’ चित्रपटाने फारच वाद झाला होता. यात चार्ली यांनी जर्मनीचा चॅन्सलर हुकुमशाह अॅडॉल्फ हिटलरची व्यक्तिरेखा साकारली होती. यानंतर अमेरिकेत त्यांच्यावर कम्युनिस्ट असल्याचा आरोपही झाला. इतकेच नाही तर एफबीआयकडून त्यांची चौकशीही झाली. यानंतर चार्ली यांनी अमेरिकेला कायमचा रामराम केला आणि स्वित्झर्लंडमध्ये स्थायिक झाले.चार्ली चॅपलिन यांनी त्यांच्या कौटुंबिक आयुष्यात फारच उलथापालथ पाहिली. त्यांनी एकूण चार लग्न केली होती. या लग्नातून त्यांना ११ अपत्ये झाली. त्यांनी पहिले लग्न १९१८ मध्ये मिल्ड्रेड हॅरिससोबत केले; पण हे लग्न दोन वर्षेच टिकले. यानंतर त्यांनी लिटा ग्रे, पॉलेट गॉडर्ड आणि १९४३ मध्ये १८ वर्षांच्या उना ओनिलसोबत संसार थाटला. त्यावेळी चार्ली ५४ वर्षांचे होते. चार्ली चॅपलिन यांची चारही लग्न फारच वादात राहिली होती.
महात्मा गांधींचे चाहते
प्रसिद्ध शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन आणि ब्रिटनची महाराणी यांसारखे दिग्गज चार्ली चॅपलिन यांचे चाहते होते. तर स्वत: चार्ली भारतीय स्वातंत्र्य आंदोलनातील महात्मा गांधी यांच्या कार्यावर अतिशय प्रभावित होते. ते महात्मा गांधी यांचा नितांत आदर करत होते. मात्र, असे सांगण्यात येते की, गांधीजींना चार्ली यांना कधी भेटायचेच नव्हते. नंतर त्यांना कळले की चित्रपटात अभिनय करणारे चार्ली यांना गरिबांबद्दल कळवळा आहे़ यानंतर त्यांनी चार्लीची भेट घेतली. यावेळी दोघांत खादीविषयी मोठी चर्चा रंगली होती, असेही सांगितले जाते. बॉलिवूड कलाकारही चार्ली यांचे चाहते होते. राज कपूर यांनी आपल्या चित्रपटांत चार्ली चॅपलिन यांची नक्कल केली होती.अभिनयाला अमेरिका घाबरली
एखाद्या विनोदी (कॉमेडियन) अभिनेत्यापासून कुण्या देशाच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ शकतो का, असा प्रश्न विचारला तर कुणीही बुचकळ्यात पडेल. एखाद्या कलाकाराच्या अभिनयापासून कुण्या देशाला काय धोका निर्माण होणार; परंतु असे घडलेले आहे आणि ते अमेरिकासोबत...चक्क एका महाशक्तीबरोबर!
साधारण: १९५०-६० च्या दशकात संपूर्ण जग दोन भागात विभागल्या गेले होते. एका बाजूूला अमेरिकाचे नेतृत्व, तर दुसºया बाजूला साम्यवादाचे समर्थक होते़ अर्थातच या गटाचे नेतृत्च रशियाकडे होते. त्याच काळात हॉलीवूडमध्ये चार्ली चॅपलिन सुपरस्टार होते. मात्र अमेरिकाची गुप्तचर संस्था एफबीआयला चार्ली हे साम्यवादी विचारधारापासून प्रभावित असल्याचा संशय होता. तसेच, ते आपल्या अभिनयाच्या माध्यमातून लोकांना साम्यवादी विचारांकडे वळवण्याचा प्रयत्न करत असल्याचे एफबीआयचे म्हणणे होते. विशेष म्हणजे चार्ली यांच्या खासगी आयुष्यातील घटनांचा शोध घेण्याचाही प्रयत्न केला होता. सन २०१५ मध्ये ब्रिटनची गुप्तहेर संस्था एमआई-5ची काही गुप्त दस्तावेज सार्वजनिक करण्यात आला. त्यातून ही बाब उघड झाली होती. त्यावेळी चार्ली सर्वाधिक काळ लंडनमध्ये व्यतित करत होते. त्यामुळे एमआई-5 वर विशेष जबाबदारी सोपवण्यात आली होती. मात्र, यातून काहीही सिद्ध झाले नाही. १९५३ मध्ये चार्ली चॅपलिन अमेरिकाबाहेर गेले असता त्यांना पुन्हा अमेरिकेत प्रवेश नाकारण्यात आला. यानंतर ते स्विर्त्झलँडमध्ये राहावयास गेले
२५ डिसेंबर १९७७ रोजी म्हणजे नाताळच्या दिवशीच वयाच्या ८८ व्या वर्षी चार्ली चॅपलिन यांचे निधन झाले; परंतु मृत्यूच्या दोन महिन्यानंतर काही लोकांनी त्यांचा मृतदेह चोरला होता. त्याचे कॉफिनच चोरल्याचे चौकशीतून समोर आले. चार्ली यांच्या कुटुंबियांकडून खंडणी मागण्याच्या उद्देशाने मृतदेहाची चोरी करण्यात आली होती. चोरांनी ६ लाख स्विस फ्रँक्सची मागणी केली होती; परंतु त्यांच्या पत्नीने ही रक्कम देण्यास नकार दिला होता. त्यांचा मृतदेह ताब्यात घेण्यात आला. यानंतर चोरीपासून वाचवण्यासाठी त्यांचा मृतदेह सहा फूट कॉंक्रिटच्या खाली दफन करण्यात आला.
© संजय इस्तारी मुंदलकर
No comments:
Post a Comment