लोकांना चटक लावण्यात आली आणि पुढील कारस्थानी लोक लाळ घोळत घात लावून बसली आहेत आणि सावज टप्प्यात आले की तुमच्या ‘व्हाया मोबाईल’ बँकेच्या खात्यातून पैसा कायमचा चटका लावून कसा लंपास करतात, हे कळत सुद्धा नाही. कारण आधुनिक होण्याचे, कॉर्पाेरेट आयुष्य जगण्याचे भूत थयथय करत नाचत आहे.
मागील २० ते २५ वर्षांत समाजातील काही वर्गांचे जीवनमान फार बदलून गेले़ काही घटकांचा जीवन आणि मरण यातील दरी बुजवणारी गरज ही मोजक्या लोकांचा शौक, बडेजावपणा, आकर्षण आणि देखावा बनली, हे दुर्दैव मानावे का? ताटातील भाजीपोळीची जागा आता मोबाईल, महाग कपडे, दागिने, एचडी टीव्ही, टॅब, संगणक, लॅपटॉप, एसी आदींनी घेतली. पोट भरण्यासाठी अन्नाची गरज भासेनाशी झाली़ इतकेच काय प्राणवायूही नकोसा झाला आणि तो मिळणार कुठून, कसा? कारण प्रदूषणही याच समाजाने, तुम्ही आम्ही पसरवले़ सर्व कसे ‘आॅनलाईन’ झाले़ ‘आॅर्डर’ करताच हाती नव्हे तर पायाशी लोळण घेण्याचा प्रकार वाढला़ अगदी चोवीस तास सर्व सेवा मोबाईलवर काही सेकंदांच्या ‘क्लिक-क्लिक’वर उपब्लध होत आहेत.
आता तर समाजाच्या सणांची संकल्पनाच पार बदलून गेली़ सणसुद्धा प्रायोजित झाले़ होळी, पोळा, दसरा अशा सणांच्या माध्यमातून ते आपणास दिसून येते़ आता तर दिवाळीसण ‘कॉर्पाेरेट’ होण्याकडे निघालाय़ हा सण पूर्वीसारखा साजरा होताना दिसून येत नाही़ वेब पोर्टल्सनी सध्या आॅनलाइन विक्रीचा धमाकाच सुरू केला आहे. आपल्या वेबसाईटवर जगभरातील ब्रँडचा भडिमार केला जात आहे़ प्रत्येक पोर्टल ग्राहकाला आकर्षित करत आहे. प्रसारमाध्यमातून तर एक महिन्याभरापासूनच ‘आॅनलाईन’ खरेदीच्या एकेक पानाच्या जाहिराती सुरू होतात़ ज्याच्या त्या वाचनात आल्यात त्याचे हात मोबाईल, संगणकाकडे वळतात़ (कारण येथेही इंटरनेट, वायफाय तयार असतो़) ‘आॅनलाईन कंपन्या’ तर सज्ज झालेल्या असतात़
एके काळी केवळ पुस्तक, कपडे, भेटवस्तू, ईलेक्ट्रॉनिक्स वस्तूवर असणारा कल, आज लाईफ स्टाईल साहित्यांकडे वळला आहे. मनातील भावना ईमोजीने गुंडाळून टाकल्या. मातापित्यांजवळ, मित्रांजवळ, नातेवाईकांजवळ भावना जाहीर करण्यास शब्द आहेत; परंतु ते व्यक्त करण्यास वेळ नाही़ कारण इतरांसाठी आॅनलाईन उपस्थित राहायचे आहे. त्यातून कृत्रिम आशा-अपेक्षा पूर्ण करायच्यात़
जो तो आपले दैनंदिन आयुष्य ‘आॅनलाईन’मुळे कसे ‘स्मार्ट’ करता येईल, हा विचार करतो आहे़ दुचाकी, हातात स्मार्ट मोबाईल आणि अंगावर आकर्षक कपडे असले म्हणजेच ‘आयुष्य ’अशी नवी संकल्पना उदयास आली आहे़, मग हाताशी काम नसले तरी चालेल़ शिकार असलेल्या प्राण्याला चटक लावून ‘स्लो पॉयझन’ देत त्याची शिकार करणे, हा ‘कॉर्पाेरेट’ असे गोंडस नाव असलेल्या कंपन्यांनी व्यवसाय स्वीकारला आहे़ ‘ग्राहकाचे संतोष हेच आमचे समाधान’ ही बाब केव्हाच मागे पडली़ आता तर आॅनलाईन कंपन्या मोबाईलऐवजी विटाचे तुकडे वा कपडे धुण्याचे साबण पाठवते आणि मग सुरू होतात, तक्रारी आणि तक्रारी...शेवटी दोघेही पोहोचतात कोर्टात़
दुकानात जाऊन चार पैशांची घासाघीस करीत वस्तू विकत घ्यायची, ही पारंपरिक खरेदी घरातील डेस्कटॉपच्या विंडोमध्ये किंवा मोबाईलमध्ये खुणावत असली तरी त्याचे प्रमाण किती? देशातील किती लोकसंख्याकडे संगणक आहेत...इंटरनेट आहे़ जिथे अजूनही भूक मारली जाते, रोजगाराअभावी आत्महत्या होते़, पैसे नाही म्हणून शिक्षण नाही, दारिद्र्य-गरिबी पाठलाग सोडत नाही, तिथे आॅनलाईन आयुष्य, आॅनलाईन खरेदी कुठून येणार?
लोकांना चटक लावण्यात आली आणि पुढील कारस्थानी लोक लाळ घोळत घात लावून बसली आहेत आणि सावज टप्प्यात आले की तुमच्या ‘व्हाया मोबाईल’ बँकेच्या खात्यातून पैसा कायमचा चटका लावून कसा लंपास करतात, हे कळत सुद्धा नाही. कारण आधुनिक होण्याचे ,कॉर्पाेरेट आयुष्य जगण्याचे भूत थयथय करत नाचत आहे.
शेवटी प्रश्न काही दिवसांच्या आयुष्याचाच आहे... आणि दसरा आणि दिवाळी सण काही आठवड्यांवरच येऊन ठेपला आहे.
संजय मुंदलकर
(सर्वाधिकार सुरक्षित)
No comments:
Post a Comment