Thursday, 22 September 2022

सहा लाखांची झोप

 झोपेत पडणारी स्वप्न माणसाच्या आरोग्याला महत्त्वाची आहे. या संदर्भात  निद्रा आणि  स्वप्न तज्ज्ञ डॉ. नायमन म्हणतात, की  माणसाची कार्यक्षमता, इच्छाशक्ती  आणि भावनिक यांचे  संगोपन आणि जोपासना स्वप्नांमुळे होते. स्वप्नविरहित  झोप  ही मोठ्या धोक्याचा इशारा आहे. 

मानवजातीला सर्वांत जास्त काय प्रिय असेल, ती झोप असते़ अगदी हक्काची  असणारी, कुठेही कधीही झोप काढणे शक्य जवळ जवळ शक्य असतेच. आणि  झोप काढून पैसे कमावता येत असेल तर...? मग मज्जाच मजा!असाच  काहीसा  प्रकार मागील दिवसांत घडला आहे. एका स्पर्धेतून बंगाली तरुणीला सर्वांत जास्त वेळ झोप काढल्याबद्दल चक्क  सहा  लाख रुपयांचे  बक्षीस  देण्यात आले. 

या स्पर्धेत तब्बल साडेचार  लाख स्पर्धकांनी भाग घेतला आणि पश्चिम बंगालमधील श्रीरामपूर(हुगळी) येथील त्रिपर्णा  चक्रवर्ती  हिने  सलग १०० दिवस  ९  तास  झोपून विक्रम केला आणि सहा लाख कमावले. याबाबत त्रिपर्णाने सांगितले, की  लहानपणापासूनच मला झोपण्याची  खूप आवड आहे. जेव्हा कधी झोप येते, तेव्हा मी बिनधास्तपणे झोप काढते. अनेकवेळा  परीक्षेच्या वेळीही झोपेचा अनुभव घेतला आहे...आता बोला!

त्रिपर्णाने आपण झोपाळू असल्याचा दावा केला असला तरी  माणसाची झोप कमी झाली असल्याचे अनेकदा सर्वेक्षणातून आढळून आले आहे. विशेष म्हणजे या झोपेचे आणि स्वप्नाचेही दूध-सायीचे नाते आहे. तणावाखाली झोपणाºया माणसाला स्वप्न  पडण्याचे प्रमाण कमी असल्याचे सांगण्यात येते.

स्वप्नं बघण्यात  वेळ वाया घालवू नकोस , असे माणसाला वारंवार कुटुंबाकडून सांगण्यात येते. (चक्क इशारा देण्यात येतो)  हातून  चूक झाली  की  झोपला होतास का किंवा झोपली होती काय, असा संताप व्यक्त होतो. सुस्त माणसाला ‘झोपाळू’ म्हणून  हिणवलेही जाते. थोडक्यात  म्हणजे  झोप  हा माणसाचा कायम शत्रू असल्याचे मनावर बिंबवले जाते. आता मात्र ही झोप आधुनिक जगातील माणसावर सूड घेत आहे. तंत्रज्ञान त्याच्या पायाशी लोळण घेत आहे. लक्ष्मी आणि  सुखसाधने  प्रसन्न  असली तरी झोपेने त्याच्याकडे पाठ फिरवली आहे. 

भारतात आणि जगात सुद्धा अपुरी झोप हा साथीचा आजार बनला आहे. सुरुवातीच्या दिवसांत यश, पैसा आणि उपभोग याकडे धावणाºया माणसाने झोपेकडे दुर्लक्ष केले. परिणामी तो ताण-तणावाच्या अंमलाखाली बिछाण्यावर पडतो, झोप मात्र कोसोदूर असते. गोळ्या घेतल्या तरच त्याला झोप येते. दुसरे असे की या कृत्रिम झोपेमुळे  त्याला  स्वप्न  पडेनाशी झाली आहे. झोपेत पडणारी स्वप्न माणसाच्या आरोग्याला महत्त्वाची आहे. या संदर्भात  निद्रा आणि  स्वप्न तज्ज्ञ डॉ. नायमन म्हणतात, की  माणसाची कार्यक्षमता, इच्छाशक्ती  आणि भावनिक यांचे  संगोपन आणि जोपासना स्वप्नांमुळे होते. स्वप्नविरहित  झोप  ही मोठ्या धोक्याचा इशारा आहे.  झोपेची उपेक्षा  माणसाला  फार महागात पडते.  हृदयविकार, रक्तदाब पोटाचे आजार असे आजार (झोपेच्या अभावामुळे ) मागे लागले आहे.

अन्नासाठी दाही दिशा फिराव्या तसे आधुनिक  माणसाला  झोपेसाठी  दहा डॉक्टरांकडे फिरावे लागत असून, मोठा खर्च होत आहे. निद्रानाशाच्या आजाराची साथ  जगात वणव्यासारखी पसरत असून, एकट्या अमेरिकेत  या दुखण्यावर दर वर्षी ५० ते १०० अब्ज डॉलर्स  खर्च होत आहेत.  झोपेच्या गोळ्या सर्वाधिक  खपाचे औषध बनले आहे. 

 ‘डाएट’चा बाऊ  करून  माणसाने खाण्या-पिण्यातील आनंद गमावला आहे. झोपेच्या भयामुळे  ही स्थिती निर्माण झाली आहे. झोप ही शरीराला आवश्यक विश्रांती आहे. कामधाम सोडून झोप काढली पाहिजे, असेही नाही. मात्र, दुपारी जेवणानंतर २० मिनिटांची झोप पुरते. रात्री  देखील ८ ते  ९ तासाची झोप सरसकट आवश्यक नसते. भुकेप्रमाणे  झोपेचे प्रमाण माणसागणिक भिन्न पातळीवर असते. एखाद्या माणसाला रात्री तीनचार तासांची झोपसुद्धा पुरते . तिच्याआधारे  तो दिवसभार वेगाने  काम करू शकतो. जाग  येताच क्षणी तरतरी वाटत असेल तर  पुरेशी झोप मिळाली आहे असे समजावे.   झोप ही बहात्तर दुखण्यांवरील  रामबाण इलाज आहे, असे  डॉ. नायमन निक्षून सांगतात.                               

संजय मुंदलकर

(सर्वाधिकार सुरक्षित) 

No comments:

Post a Comment