एका पित्याची निराशा खूप घातक असू शकते. दिवसभराच्या श्रमानंतर तो आपल्या बाळांना पाहताच खुश होतो अन् त्याचा थकवा क्षणात पळून जातो. म्हणूनच आपल्या मुलांच्या सुखासाठी तो जगातील सर्व दु:ख सहन करण्याची ताकद राखून ठेवतो. उत्तुंग आशावादी, विविध नात्यांचा शिल्पकार, त्यागी, वज्रमनाच्या आणि तेवढ्याच संवेदनशील नात्याला कुणी दु:ख देता कामा नये.
मागील दिवसांत मोबाईलवर समाज माध्यमातून आलेला एक संदेश वाचण्यात आला. तरुणपणी आणि मध्यमवयात माणसाने कितीही मोठ्या पदावर काम केले असले तरी म्हातारपणात तो अधिकारविहिन तर होतोच़ शिवाय कुटुंबांत अडगळीत पडलेला दिसून येतो. काही हजारांची पेन्शन हाती येत असेल तर बरे, अन्यथा त्याच्याच पत्नीला कुटुंबात असलेले स्थान त्याच्या वाट्याला येत नाही़ येथे त्याची पत्नी सुद्धा मुले आणि सुनांसोबत जुळवून घेताना दिसून येते़ कारण ‘हे’ गेले तर आपल्याकडे कोण लक्ष देणार? ही महत्त्वाची बाब वारंवार तिच्या डोळ्यांसमोर येत असते़ इकडे त्या व्यक्तीची पिता म्हणून महती कधीचीच विसरलेली असते़, असा त्या संदेशाचा काहीसा आशय होता.
वडिल, पिता, बाबा, अब्बा, वालिद अशा अनेक शब्दांचे एकच नाते, ज्यामुळे कुणाचेही आयुष्य पूर्ण होऊ शकत नाही. या पवित्र नात्याची अन्य नात्यांशी तुलना होऊ शकत नाही. बालपणी आपण वडिलांचे बोट धरून चालणे शकतो. त्याच्याच कुशीत सुख-दु:खात निश्चत असतो. लहानपणीचे सर्व हट्ट तोच पूर्ण करतो. चॉकलेट, खेळणीपासून ते लॅपटॉप, बाईक, कार आणि उच्चशिक्षणापर्यंतच्या सर्व मागण्या पूर्ण करणारा एक पिताच असतो. आज अशी वेळ आली, की या आधुनिक आणि धावपळीच्या आयुष्यात ( आणि ही धावपळ आणली कुणी, हा एक वेगळा विषय) मुलांजवळ आपल्या पित्यासाठी वेळ नाही.
पिता हा ईश्वरासारखाच... जन्माबरोबरच या व्यक्तीशी आपला सामना होतो. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तो सोबत असतो. एक पिता आपल्या मुलांचा सर्वांत चांगला शिक्षक असतो. ही पिता नावाची सावली आपल्या मुलांसोबत सदैव असतो आणि त्यांच्याच सर्वांगीण उन्नतीसाठी आयुष्यभर झटत असतो.
याबाबत जाँर्ज हर्बर्ट यांचे एक सुंदर वाक्य आहे. ते असे, की एक पिता शंभर शाळामास्तरांपेक्षा मोठा असतो. तो आपल्या मुलांना नेहमी यशासाठी प्रोत्साहित करतो. एका पित्याचे हृदय नारळासारखे वरून कठोर आणि तितकेच आतून मुलायम आणि संवेदनशिल असते. जेव्हा मुले आपल्या मार्गावरून चुकीने बाजूला होण्याच्या स्थितीत असतात, त्याचवेळी हा पिता राग आणि प्रेमाने समज देऊन त्यांना सन्मार्ग मिळवून देतो.
एक समाजशास्त्रज्ञ म्हणतो, एका पित्याची निराशा खूप घातक असू शकते. दिवसभराच्या श्रमानंतर तो आपल्या बाळांना पाहताच खुश होतो अन् त्याचा थकवा क्षणात पळून जातो. म्हणूनच आपल्या मुलांच्या सुखासाठी तो जगातील सर्व दु:ख सहन करण्याची ताकद राखून ठेवतो. मातृपितृ भक्तीचे सुंदर उदाहरण आपल्या पुराणात दिसून येते. खांद्यावर मातापित्यांना तीर्थक्षेत्री घेऊन जाणारा श्रावण जेव्हा त्यांची तहान भागवण्यासाठी ओढ्यावर पाणी आणावयास जातो, त्याचवेळी राजा दशरथाचा एक तीर त्याच्या शरीरात शिरतो. प्राण जाण्यापूर्वी तो दशरथाला विनवतो, की माझे माता-पिता तहानलेले आहेत. आपण त्यांच्यापर्यंत पाणी पोहोचून ते पाजा. अशा या उत्तुंग आशावादी, विविध नात्यांचा शिल्पकार, त्यागी, वज्रमनाच्या आणि तेवढ्याच संवेदनशील नात्याला कुणी दु:ख देता कामा नये.
संजय मुंदलकर
(सर्वाधिकार सुरक्षित)
No comments:
Post a Comment