पिपल सुना पनघट सुना
घर शमशान का बना नमुना
फसले कटी आयी बैसाखी
तेरा आना रह गया बाकी
चिट्ठी आयी है... आयी है ...
वरील ओळींहून ज्येष्ठ गायक पंकज उधास यांनी मानवी मन आणि मानवी हृदयाचा ठाव घेतला होता़ प्रत्येकाच्या आयुष्यात आलेला हा प्रातिनिधिक प्रसंग त्यांनी अतिशय उत्कटतेने स्वरांतून सादर केला़
तू निघून गेलास़़़ घराजवळील पिंपळाचं झाडं सुनं झालंय़़़ ती विहीर सुद्धा नि:शब्द झालीं़़़दोन घोट पिण्यासाठी कुणीही तिच्याकडं फिरकेना़़़घरात स्मशान शांतता थयथय करतेय़़़ पिकांचा हंगाम आटोपून धान्याच्या राशी घरात येऊन पडल्यात तर बैसाखी सण सुद्धा चार दिवसांवरच ठेपलायं़ आता तुझीच काय ती प्रतीक्षा आहे़़़
अशा काळजाचा ठाव घेणाºया शब्दांवर आपला स्वर ओवाळून टाकणारे ज्येष्ष्ठ गायक पंकज उधास यांनी दोन दिवसांआधी सोमवारी समस्त संगीतप्रेमींची, भारतवासीयांची संगत सोडली़ एका अनंत प्रवासाला ते निघून गेले़
आपल्या गायकीने गेली अनेक वर्षे रसिक श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ गझल, हिंदी चित्रपट गायक पंकज उधास देश विदेशात लोकप्रिय होत़े त्यांच्या जाण्याने भारतीय गझल गायकीच्या क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे़ पंकज उधास भारतीय गझल गायकीतील लोकप्रिय नाव होते. त्यांच्या अनेक गाण्यांनी रसिकांना भुरळ घातली होती.
१७ मे १९५१ रोजी गुजरातमधील जेतपूर येथे पंकज उधास यांचा जन्म झाला होता. ज्येष्ठ गायक मनहर उधास आणि निर्मल उधास हे त्यांचे मोठे बंधू होत़ पंकज उधास यांना डॉक्टर व्हायचे होते़ त्यादृष्टीने वैद्यकीय शिक्षण घेण्याची तयारी सुरू केली होती. परंतु, याचदरम्यान त्यांचा संगीत क्षेत्रातील प्रवास सुरू झाला आणि त्यांचे डॉक्टर व्हायचे स्वप्न मागे पडले.
बॉलिवूडमध्ये संधी
पंकज उधास यांचे वडील शेती करत असे. मोठे बंधू मनहारआणि निर्मल यांच्यामुळेच पंकज उधास यांची संगीतात गोडी निर्माण झाली आणि यातच करिअर करण्याचा निर्णय घेतला. पंकज उधास यांना १९७२ मध्ये प्रदर्शित ‘कामना’ चित्रपटात पहिल्यांदा गाण्याची संधी मिळाली होती. यात यश मिळाले नसले तरी त्यांच्या गाण्याचे कौतुक झाले. त्यानंतर पुढे त्यांनी गझल गायनास सुरुवात केली.
पंकज उधास यांचा पहिला गझल अल्बम ‘आहट’ १९८० मध्ये प्रसिद्ध झाला. त्यातून त्यांना यश मिळू लागले आणि २०११ पर्यंत त्यांनी ५० पेक्षा अधिक अल्बम आणि शेकडो संकलन अल्बम रिलीज केले. डिसेंबर १९८७ मध्ये म्युझिक इंडियाने लाँच केलेला त्यांचा ‘शगुफ्ता’ हा अल्बम भारतात कॉम्पॅक्ट डिस्कवर रिलीज झालेला पहिला अल्बम होता.
१९९०साली ‘घायल’ चित्रपटासाठी त्यांनी लता दीदी मंगेशकर यांच्यासोबत ‘माहिया तेरी कसम’ हे युगल गीत गायले. या गाण्याने प्रचंड लोकप्रियता मिळवली. १९९४ मध्ये साधना सरगम यांच्यासोबतचे ‘मोहरा’तील ‘ना कजरे की धार’ गाणे अतिशय लोकप्रिय ठरले. साजन , ये दिल्लगी , नाम, फिर तेरी कहानी याद आयी यासारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी पार्श्वगायक म्हणून नाव मिळविले़
आपल्या कारकिर्दीत त्यांनी अनेक गीतांचे गायन केले़ गझलांसोबत गीतांच्या गायनातून हृदयाला भिडवणारा जादुई आवाज शांत झाला. एक सुवर्ण स्वर मागे सोडून ते अंतिम प्रवासाला निघून गेले़
पंकज उधास यांना मनस्वी श्रद्धांजली!
संजय मुंदलकर
Photos Courtesy : Google


